असा जांबुवंत पुन्हा होणे नाही!

विवेक मराठी    28-Feb-2017
Total Views |

लोकप्रियता ओसरली, तरी भाऊंनी राजकारणातून संन्यास घेतला नाही. वयोमानाप्रमाणे तो अंगार - त्यावर राख बसती झाली आणि आता तर तो धगधगता अंगार कायमचा शांत झाला. 'वा रे...शेर आ गया शेर' ही घोषणा आता इतिहासाच्या पुस्तकात बंद झाली. असा शेर विदर्भात पुन्हा होणे नाही. भाऊ गेले. एक झुंज, एक आक्रमकता संपली. पण एक खंत मात्र कायम राहील की विदर्भाचे स्वतंत्र राज्य होण्याची एक संधी फक्त भाऊंनी आणली होती आणि ती स्वत:च्या हाताने - कुठल्याही स्वार्थाशिवाय - गमावली होती. असे भाऊ पुन्हा होणे नाही.

विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या निधनामुळे स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीचा झुंजार सेनानी काळाच्या पडद्याआड गेला आहे. भाऊ या नावाने ओळखले जाणारे जांबुवंतराव म्हणजे त्या काळात एक वादळ होते. ते एकटे रस्त्याने चालायला लागले तरी किमान 400-500 लोकांचा जमाव त्यांच्यामागे चालत असे. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना जांबुवंतरावांना अटक करणे हे पोलिसांसमोर आव्हान असे.

जगाचे भाऊ

भाऊंनी कुणालाच वेगळे मानले नाही, तर ते जगाचे भाऊ होते. त्यामुळे नागपूरच्या हजारो महिला - प्रामुख्याने वेश्याव्यवसाय करणाऱ्या - त्यांना राखी बांधत असत. त्या समाजातील उपेक्षित वर्गाला समाजात स्थान मिळवून देण्यासाठी भाऊ धडपडत असत. राजकारणानंतर समाजकारण हा त्यांचा आवडता छंद होता. एखाद्या स्त्रीला अगतिक होऊन शरीरविक्रय करावा लागत असे याचा अर्थ ती वाईट आहे असा होत नाही, हे सांगत ते तिला नैतिक सन्मान मिळवून देत. त्यामुळे या परिसरातून नेहमी भाऊ सांगतील ती व्यक्ती, तो पक्ष विजयी होत असे. पुंडलिकराव मसुरकर हे अनेक वर्षे त्या परिसराचे नगरसेवक होते व उपमहापौरही झाले होते. त्या सर्वांमागे भाऊ होते.

नागपूरच्या राजकारणात भाऊ आले ते फॉरवर्ड ब्लॉकचे म्हणून. सुभाषबाबू त्यांचा आदर्श होते. फॉरवर्ड ब्लॉक हा डाव्यांकडे वळलेला पक्ष होता, म्हणून त्यांच्यासोबत कम्युनिस्ट पक्षाचे नेते ए.बी. बर्धन नेहमी राहत. त्यामुळे जनसंघाला भाऊ मिळत नसत. कधी एखाद्या व्यासपीठावरून भाऊ बोलू लागले की जनसंघाला शिव्या घालत नसत, पण बर्धन मात्र संधी सोडत नसत. भारतीय मजदूर संघाचे नेते माजी आमदार गोविंद आठवले यांनी त्यांचे बर्धनसोबत राहणे सोडविले. एवढेच नव्हे, तर पुढे जनसंघाच्या मदतीने भाऊ खासदार झाले. भाऊ लोकसभेला उभे राहायला तयार नव्हते, पण जनसंघाचे त्या वेळचे संघटन मंत्री बबनराव देशपांडे यांनी त्यांना तयार केले. भाऊ नेहमी म्हणत, ''बघ, मी जांबुवंत आहे. माझ्यामागे फालतू काम लावू नको.'' पण बबनरावही त्याना सांगत, ''भाऊ, लोक मला बबन म्हणून ओळखत असले, तरी माझे नावही हनुमान आहे. तुम्हाला खासदार केल्याशिवाय मी राहणार नाही.'' 1971 साली भाऊ लोकसभेला उभे राहिले. अपक्ष म्हणून त्यांना जनसंघ, खोरिप, नागविदर्भ आंदोलन समिती यांचा पाठिंबा होता व त्यांनी काँग्रेसचे रिखबचंद शर्मा व भाकपचे ए.बी. बर्धन यांना पराभूत केले होते.

स्वतंत्र विदर्भासाठी सारे काही

भाऊंनी विदर्भ आंदोलनाला जनतेपर्यंत नेले. जनतेला नवीन मार्गांनी आंदोलन करण्यास तयार केले. पोलिसांची अस्त्रे त्यांनी प्रभावहीन केली होती. भाऊंच्या नेतृत्वाला विदर्भ मान्यता मिळाली. अश्रुधूर हे पोलिसांचे अस्त्र आंदोलकांनी निष्प्रभ करून टाकले होते. अश्रुधुराचे गोळे सोडले जाताच जमाव जाऊन त्यावर ओले पोते टाकत असे. त्यावर पाणी ओतत असे व गोळे विझून जात. पण भाऊंनी आंदोलकांना नवीन मंत्र दिला. अश्रुधुराची नळकांडी विझविण्याऐवजी जमाव ती नळकांडी वरचेवर झेलून पुन्हा पोलिसांच्या दिशेने भिरकावीत असत. त्यामुळे पोलिसांना अश्रुधुराला सामोरे जावे लागत असत. जमावाजवळ पाणी असे. ओली पोतीही असत. आजूबाजूचे नागरिक जनतेला मदत करीत. पण पोलिसांना पाणीही मिळत नसे. त्यामुळे या अश्रुधुराचा खरा ताप पोलिसांना होऊ लागला. यातून आंदोलक पोलिसांच्या तावडीत सापडले, तर पोलीस त्यांना बडवून काढीत. कृषी विद्यापीठ आंदोलनानंतर भाऊंचे नेतृत्व विदर्भात प्रस्थापित झाले. त्यांचे चालणे, बोलणे, वागणे यातून भाऊंचे अनुकरण करणे सुरू झाले. मायमाउली-बायाबापडयांप्रती अतीव आदर, निरिच्छ जीवन यातून भाऊ समाजाचे हिरो झाले. त्या जोडीला भरपूर वाचन, प्रभावी वक्तृत्व याची साथ होतीच. विदर्भाच्या कोष्टी जमातीला एक लढाऊ, झुंजार नेता मिळाला. भाऊ यातून आमदार झाले, पण त्यांच्यातील जन्मजात धगधगता अंगार सरकारला जाळण्यासाठी कायम सिध्द असे. त्यांच्या बारशाला जणू जमदग्नी, विश्वामित्र व दुर्वास आदी तामसींची मांदियाळी आशीर्वाद द्यायला आली होती, असे त्यांचे वर्तन असे. त्या वर्तनाला स्थळकाळाचे बंधन राहत नसे. महाराष्ट्र विधानसभेत संतापी भाऊंनी सदस्यांसमोरील माइकही तोडले आहेत. पूर्वी आमदारांच्या टेबलावर पेपरवेट असे. भाऊ ते सत्ताधाऱ्यांच्या दिशेने लीलया भिरकावू लागले. त्यामळे त्यांच्याविरुध्द हक्कभंगाचा ठराव आला. मार्शलद्वारा विधानसभेतून त्यांची उचलबांगडी झाली. सभागृहातील वर्तनामुळे जांबुवंतरावभाऊंचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. ती जागा रिक्त घोषित करण्यात आली. कारागृहात असतानाच निवडणूक लागली आणि भाऊ कारागृहात असतानाही विजयी झाले. विधानसभेने त्यांची इतकी दहशत घेतली की पेपरवेट ठेवणे बंद झाले व माइक आसनासमोरील टेबलावर पक्के करण्यात आले. या विजयानंतर भाऊंची आक्रमकता, दरारा खूपच वाढला. जनता जणू त्यांना देव समजू लागली.

याच आक्रमतेचा परिणाम होता की जेव्हा केव्हा ते पोलिसांच्या तावडीत सापडत, तेव्हा पोलीस त्यांना सरळ करण्यासाठी बलप्रयोग करीत असत. देशाच्या राजकारणात जांबुवंतराव धोटे व जॉर्ज फर्नांडिस या राजकीय नेत्यांनी पोलिसांचा जेवढा मार खाल्ला, तेवढा कोणत्याच नेत्याने खाल्ला नाही. पण पोलिसी बडदास्तीनंतरही त्यांच्यातील रग संपली नव्हती.

इतवारी परिसरात भाऊंनी विदर्भ चंडिकेची स्थापना केली. त्यानंतरचे प्रत्येक आंदोलन त्या समोरून सुरू होऊ लागले. इतवारी, मंगळवारी, नागनाथ, बुधवारी परिसरातून भाऊंना अटक करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असे. त्यांना अटक करताना पोलिसांना जणू युध्दछावणी स्थापन करावी लागत असे व अनेकदा पराभूत होऊन परतावे लागत असे. कोष्टी बांधव जिवाची पर्वा न करता त्यांचे रक्षण करीत असत.

चळवळीचा उतरणीचा प्रवास

जांबुवंतरावांची नागविदर्भ आंदोलन समिती व जनसंघ व खोरिप यांची आघाडी नागपूर महापालिकेत सत्तेवर होती. जांबुवंतरावांचे अनेक सहकारी - बनवारीलाल पुरोहित, नानाभाऊ एंबडवार, सुरेंद्र भुयार, हरीश मानधना, भगवंतराव गायकवाड, टीजी हे आमदार, मंत्री झाले. जांबुवंतरावांबरोबर भंडारा येथील राम हेडावू हे लोकसभा सदस्य झाले. पण अणीबाणी आली आणि भाऊही एकपक्षीय लोकशाहीचे पुरस्कर्ते झाले. इंदिराजींनी त्यांना आपल्या कह्यात घेतले आणि जांबुवंतरावभाऊ इं.काँ.मध्ये सहभागी झाले. ते काँग्रेसचे खासदार म्हणून नागपुरातून विजयी झाले. पण जनमानसातील त्यांची प्रतिमा भंग झाली. अणीबाणीनंतर भाऊ विरोधक म्हणून विजयी झाले. पण इंदिराजींना शहा आयोग प्रकरणात अटक झाल्यावर ते काँग्रेसचे सहप्रवासी झाले आणि तिथून भाऊंचा व विदर्भ चळवळीचाही उतरणीचा प्रवास सुरू झाला.

भाऊ मधल्या काळात विवाहबध्द झाले. रामराव आदिक यांच्या कन्या विजयाताई या त्यांच्या सहधर्मचारिणी झाल्या. हे लग्नही मोठया नाटयपूर्णरित्या व आकाशाला साक्षी ठेवून झाले.

पण भाऊंच्या काँग्रेस प्रवेशानंतर त्यांचा करिश्मा कमी होत गेला. जनमानसावरील ती पकडही सैल झाली. निवडणुकीत पराभव सोसावा लागला. अनेक सहकारी त्यांना सोडून वेगवेगळया पक्षांत गेले. भाऊंना साथ देणारी कोष्टी जमातही आर्थिक ओढाताणीत फारच पिचली गेली. 'बिछडे सभी बारी बारी' अशी भाऊंची अवस्था झाली. पण तरीही भाऊ आपल्या शैलीत, मस्तीत जगत होते, संघर्ष करीत होते. वैचारिक संघर्ष करीत होते. संपूर्ण विदर्भावर अधिराज्य गाजविणारा हा नेता बघता बघता पुन्हा यवतमाळ जिल्ह्यापुरता मर्यादित झाला. जिगरबाजपणा मात्र संपला नव्हता. झुंज देण्याची ताकद संपली होती, पण धडका देणे त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते.

कुठेतरी लिखाणातून, कुठेतरी भाषणांतून आणि काही पुरस्कार घेताना भाऊंचे दर्शन होत होते. स्वातंत्र्यवीर बॅ. विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाचा पुरस्कार त्यांना हिंदी मोरभवनात देण्यात आला, तेव्हा त्यांचे व विजयाताईंचे शेवटचे एकत्र दर्शन झाले होते. त्या वेळी भाऊंचे भाषण खूपच गाजले होते, मात्र करिश्मा संपला होता. धगधगता अंगार शांत झाला नव्हता, पण त्यावर वयोमानाप्रमाणे राख जमू लागली होती. धग मंदावली होती. शरीर तेवढेच बलदंड होते, ऊर्जा कायम होती, पण परिणामकारकता मात्र मंदावली होती. आणि आता भाऊ काळाच्या पडद्याआड गेले.

कापूस एकाधिकार आंदोलन

भाऊंच्या आणखी एका आंदोलनाचा उल्लेख केला नाही, तर त्यांचा जीवनप्रवास अपुरा राहील. भाऊंनी कापूस एकाधिकाराविरोधात आंदोलन करून विधानभवनाची नाकेबंदी केली होती. त्या काळात विधानभवनावर आजच्याएवढा कडक पहारा नसे. भाऊंनी पहाटेच बैलगाडया घेतलेले कापूस उत्पादक, कापूस घेऊन विधानभवनावर आणले. बैलगाडया व त्यांचे बैल भाऊंनी एकात एक असे गुंतवून टाकले होते की ज्याचे नाव ते. 10च्या सुमारास पोलीस आले, पण त्यांनाही हा प्रकार आवरता आला नाही. दुपारी 1 वाजता विधानसभा सुरू होईपर्यंत पुढचा मार्ग त्यांनी कसाबसा मोकळा केला होता. पण विधानभवनाचा घेराव मात्र त्यांना उठविता आला नाही. त्या दिवशी भर दुपारी विधानभवनाजवळील कस्तुरचंद पार्क मैदानावरील एका विशाल वृक्षावरून भाऊंनी आंदोलक शेतकऱ्यांना संबोधित केले होते. झाडावरून आंदोलकांना भाषण देणारे भाऊ व बैलगाडयांचा घेराव हे चित्र देशभरातील जवळजवळ सर्व वृत्तपत्रांनी छापले होते.

पण तो धगधगता अंगार काँग्रेसमार्गी झाला व विदर्भाच्या चळवळीला असणारा लोकाश्रय, लोकाधार संपला. लोकप्रियता ओसरली, तरी भाऊंनी राजकारणातून संन्यास घेतला नाही. वयोमानाप्रमाणे तो अंगार - त्यावर राख बसती झाली आणि आता तर तो धगधगता अंगार कायमचा शांत झाला. 'वा रे...शेर आ गया शेर' ही घोषणा आता इतिहासाच्या पुस्तकात बंद झाली. असा शेर विदर्भात पुन्हा होणे नाही. भाऊ गेले. एक झुंज, एक आक्रमकता संपली. पण एक खंत मात्र कायम राहील की विदर्भाचे स्वतंत्र राज्य होण्याची एक संधी फक्त भाऊंनी आणली होती आणि ती स्वत:च्या हाताने - कुठल्याही स्वार्थाशिवाय - गमावली होती. असे भाऊ पुन्हा होणे नाही.

8888397727