गरज निकोप आणि सकस साहित्याची

विवेक मराठी    03-Feb-2017
Total Views |


..आ
णि अखेर डोंबिवली येथे 90वे अखिल भारतीय साहित्य संमेलन संपन्न झाले. आजवर अखिल भारतीय साहित्य संमेलनांनी जी परंपरा निर्माण केली आहे, त्याला साजेसे हे संमेलन झाले असे म्हणायला हरकत नाही. संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मनाची जागरूकता आणि उत्स्फूर्त कृतिपूर्णतेची अपेक्षा व्यक्त केली आहे. सद्यःस्थितीत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करण्याला खूप महत्त्व आहे. आज आपला साहित्य व्यवहार, समाज व्यवहार कसा आहे याचा शोध घेतला तर असे वाटते की डॉ. अक्षयकुमार काळेंनी व्यक्त केलेली अपेक्षा ही नव्या साहित्य- आणि समाजजीवनाची नांदी ठरावी.

साहित्यकाराच्या पहिल्या सभेच्या निमित्ताने महात्मा फुलेंनी  अपेक्षा व्यक्त केली होती. महात्मा फुलेंनी साहित्याच्या प्रवाहातील आपले स्थान अधोरेखित करण्यासाठी न्यायमूर्ती रानडेंना पत्र लिहिले होते. ती अपेक्षा पूर्ण झाली, आता त्याच्याही पुढचे पाऊल टाकले जात आहे. आता मराठी साहित्यात जातीवार, प्रांतवार साहित्य संमेलने होऊ लागली आहेत. साहित्यनिर्मिती हे केवळ मूठभरांची मक्तेदारी आहे ही संकल्पना कधीच मोडून पडली असून आता  समाजातील कोणताही घटक मुक्तपणे साहित्याच्या प्रागंणात प्रवेश करू शकतो आणि तेथे व्यक्तही होऊ शकतो. एका अर्थाने समग्र समाजाच्या स्थिती-गतीचा विस्तीर्ण पटच मराठी साहित्यात उलगडला जाऊ लागला आहे. या गोष्टीचा जितका आनंद होतो, तितकेच सर्जनाला जात चिकटवली जाते याचे दुःख होते. आज महाराष्ट्रात अनेक छोटीमोठी साहित्य संमेलने होत असतात. काही सन्माननीय अपवाद वगळता या सर्वच संमेलनांना जातीचे अधिष्ठान असते. साहित्य संमेलन आयोजन करताना 'पाहिजे जातीचे' हा परवलीचा शब्द असतो. असे जातीय संमेलन आयोजित करून साहित्यापेक्षा जातीय अस्मिता आणि परजातीचा द्वेष या दोन सूत्रांभोवती ही संमेलने फिरताना दिसतात. खरे तर जितक्या जास्त प्रमाणात छोटी छोटी साहित्य संमेलने होतील, तितक्या जास्त प्रमाणात घुसळण होत राहील आणि सकस साहित्याची अधिक प्रमाणात निर्मिती होईल.. किमान त्या दिशेने पावले पडतील. नव्या संकल्पना, नवे विचार पुढे येतील आणि त्यावर साहित्य व्यवहाराशी संबंधित व्यक्ती विचार करतील. यासाठी अशी प्रादेशिक आणि वेगवेगळया विचारधारांची संमेलने आवश्यक आहेतच. अशी संमेलने होणे आणि त्यातून निकोप साहित्य चर्चा होणे हे मराठी साहित्यविश्वाचे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचे लक्षण आहे. मात्र हे तत्त्व जितके उदात्त आहे, तितकाच या क्षेत्रातील व्यवहार नीचांकी आहे. आपल्या प्रदेशाचा, जातीचा, विचाराचा गट तयार करून साहित्य क्षेत्रात कंपूशाही तयार केली जात आहे. परिणामी मराठी साहित्याचा मूळ प्रवाह सशक्त होण्याऐवजी तो प्रवाह विविध गटांत विभागला जात आहे. अशामुळे हे गटही खूप प्रभावी आणि प्रवाही होत आहेत असे नव्हे, तर त्या गटांतही साचलेपणा आला आहे.

या परिस्थितीच्या पाठीमागे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे अधिष्ठान आहे. कधीकाळी साहित्य आणि ज्ञान ही काही ठरावीक गटाची मक्तेदारी होती. आज ती परिस्थिती राहिली नाही. आधुनिकीकरण, तंत्रज्ञानाचा वेगवान प्रसार आणि जाणिवांच्या प्रकटीकरणासाठी मुक्त व्यासपीठे यामुळे आज साहित्य जगत ही मूठभरांची मक्तेदारी राहिली नाही. अगदी तळागाळातील माणूसही आपल्या भावभावना आणि वेदना व्यक्त करू लागला आहे. आपल्या विचाराचे प्रकटीकरण करू लागला आहे. पण हे करत असताना तो 'माझिया जातीचा' सूर आळवू लागला आहे. त्यामुळे निखळ आणि सर्वसमावेशक साहित्य प्रसवण्याऐवजी एकमेकांविषयीचा द्वेष जन्माला घातला जातो. आपल्या जातीवर, समाजावर इतिहासात झालेले अन्याय अत्याचार, उपेक्षा आणि आजच्या जगण्यातून निर्माण होणारा विद्रोह या सामग्रीच्या बळावर साहित्य निर्माण केले जाते. ते निखळ असण्यापेक्षा कुणाला तरी टीकेचे लक्ष्य करून आपल्या वेदनेचे गाणे गाईले जाते. विद्रोह व्यक्त केला जातो. विद्रोह हे चिरकालीन साहित्यमूल्य नाही. एका पिढीला तिची गरज होती. त्याच्या आधाराने सरस साहित्यही प्रकट झाले. पण हे मूल्य घेऊन संपूर्ण साहित्य जगत भारून टाकण्याचा कुणी विचार करत असेल, तर त्यांनी वेळीच वास्तवाचे आकलन करून घ्यायला हवे. कारण ज्ञानावर जशी कुणाची मक्तेदारी नाही, तशीच वेदनेवरही कोणाची मक्तेदारी राहिली नाही. वेदनेला जात नसते, हे आता साहित्यातून प्रकट व्हायला हवे. जागतिकीकरणाचा आणि  खाजगीकरणाचा परिणाम होऊन आपल्या जगण्यात आणि समाजव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाले आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात समाजच्या सर्वच स्तरांसमोर जे प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्याची उत्तरे वेगळया परिप्रेक्ष्यातून शोधावी लागतील आणि त्यासाठी साहित्यातील वेगवेगळया प्रवाहांनी एकत्रित होऊन समाजाचा विचार करायला हवा. कारण साहित्य समाजमन तयार करते, समाजाला दिशा देते. समाजाला सकारात्मक ऊर्जा आणि मनोबल देण्याची जबाबदारी साहित्यिकांच्या खांद्यावर येते. अशा वेळी साहित्य आणि साहित्यिक यांना एका समान सूत्राने कशा प्रकारे जोडायचे, हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे, असे आम्हाला वाटते - साहित्यिकाने जगाकडे, आपल्या भवतालाकडे सजगपणे पाहिले पाहिजे. मनाची जागरूकता जपत भवतालाच्या सुखदुःखाशी समरस झाले पाहिजे आणि त्याचे प्रतिबिंब आपल्या साहित्यातून प्रकट करत निकोप, निर्दोष समाजमन तयार करण्यासाठी कृतिपूर्ण आदर्श उभा करावा, जातीपातीच्या पलीकडे जाऊन साहित्यातील अनेक प्रकार, उपप्रकार हाताळत मराठी भाषेचे संवर्धन करत साहित्यिकांनी आपली पुढची वाटचाल करावी आणि मराठीला आणि महाराष्ट्राला ललामभूत ठरेल अशी साहित्यशिल्पे साकार करावीत.