रंगू संवादाचे रंगी...

विवेक मराठी    06-Feb-2017
Total Views |


संवादाने दोन बिंदू जोडले जातात. बोलणारा अन् ऐकणारा. त्या दोघांनाही त्यातून काहीतरी मिळतं. संवादाचं आपल्या जीवनात इतकं महत्त्व आहे. म्हणजे बघा ना, आपल्याला जगापुढे व्यक्त करणारा, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे हा संवाद. जिथे जिथे विचार, भावना आहेत तिथे संवाद आहे. केवळ माणूसच नव्हे, पशू, पक्षी, कीटक...इतकंच काय, वनस्पतीसुध्दा संवाद करत असतात.

हाटेची वेळ. बाहेर थंडीची अजूनही चांगलीच पकड होती. एक उबदार शाल पांघरून बाहेर पडले. प्राजक्ताचा मंद सुगंध दरवळत होता. झाडांच्या पानावरून ओघळणाऱ्या दवाचा टपटप आवाज शांततेशी हितगुज करत होता. दूरवर कुठे एखादा पक्षी त्याच्या घरटयाला जागवत होता. अजूनही चांदण्यांची चकचकीत चादर आकाशाने पांघरली होती. या वातावरणात काहीतरी विशेष होतं, जे मला माझ्याशीच जोडत होतं. त्या शांत वातावरणात स्वत:शीच गप्पा सुरू झाल्या. सूर्याच्या लाल बिंबाने एकदम भानावर आणलं, पण खूप छान वाटलं. हरवत चाललेला संवाद स्वत:शीच करता आला. मग माझं मन 'संवाद' शब्दाभोवती फेर धरू लागलं.

स्वसंवादाची व्याप्ती हळूहळू वाढत जाते. आपल्या मनात निर्माण झालेल्या विचार-भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची आणि दुसऱ्या व्यक्तीच्या मनातील विचार-भावना समजून घेण्याची ओढ मनुष्याला जन्मजातच असते. अगदी तान्हं बाळदेखील शब्दाविना किती व्यवस्थित बोलत असतं त्याच्या आईशी...

अर्थात, संवाद हा माणसाच्या जीवनात निरंतर आहे. जितका हा संवाद सुयोग्य पध्दतीने होतो, तितक्या प्रमाणात व्यक्तीला समाजाचा सदस्य म्हणून मान्यता मिळते.

एक दिवस आपण कोणाशीही न बोलता अथवा कोणाचंही न ऐकता अलिप्त राहिलो, तर... कसं वाटेल आपल्याला? छे, छे... हा विचारही आपल्याला एकाकी करतो. संवादाचं आपल्या जीवनात इतकं महत्त्व आहे. म्हणजे बघा ना, आपल्याला जगापुढे व्यक्त करणारा, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे हा संवाद. मग तो आरसा लख्ख करायला पाहिजे ना...?

जिथे जिथे विचार, भावना आहेत तिथे संवाद आहे. केवळ माणूसच नव्हे, पशू, पक्षी, कीटक... इतकंच काय, वनस्पतीसुध्दा संवाद करत असतात. संवादाने दोन बिंदू जोडले जातात. बोलणारा अन् ऐकणारा. त्या दोघांनाही त्यातून काहीतरी मिळतं. जोपर्यंत त्यांना त्यात रस असतो, तोपर्यंत संवाद सुरू राहतो.

केवळ बोलणं म्हणजे संवाद नाही. निरुद्देश, निरर्थक केलेली बडबड ऐकायला कुणाचेच कान तयार नसतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, तर काही वेळा नकारात्मक हेतू ठेवून एकमेकांशी बोललं जातं किंवा वागण्यातून तशा भावना व्यक्त होतात, तेव्हा तो 'संवाद' न राहता 'विसंवाद' होतो.

सोप्या शब्दांत सांगायचं तर जो माणसांना जोडतो तो संवाद आणि राग, दुरावा, दु:ख यात ज्याचा शेवट होतो तो 'विसंवाद'.

आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक क्षेत्रात (वैयक्तिक असो वा व्यावसायिक) आपल्याला माणसामाणसांशी जोडणारा सुंदर संवाद साधता यावा, चुकूनही विसंवादाशी संग न व्हावा असं आपल्याला वाटत असेल, तर संवादाची कौशल्यं आत्मसात करावी लागतील.

कृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद हजारो वर्षांनंतरही जगाला मार्गदर्शक ठरतो आहे तो त्यांच्यातील गाभ्यामुळे. वक्ता आणि श्रोता यांच्याइतकाच महत्त्वाचा आहे तो 'संदेश'. जे सांगितलं जातं त्याचं मूल्य फार महत्त्वाचं.

संवादांची सुरुवात होते ती व्यक्तीच्या मनातल्या विचारांनी. मनाच्या अफाट सामर्थ्याने आलेल्या विचारांत खूप ताकद असते. ते माणसाला प्रेरित करतात. मग ते विचार कुठे व्यक्त करावे ते ठरवून पहिला श्रोता निश्चित होतो. मग त्याच्यापर्यंत हे विचार कसे पोहोचवावे हे ठरवलं जातं. म्हणजे हे 'बोलावं' की 'लिहून द्यावं' की 'अशाब्दिक गोष्टींचा' वापर करावा याची निश्चिती होते. ही झाली योग्य पध्दत.

यात जर गडबड झाली, निर्णय चुकला, तर संवादात अडथळा येतो. उदा., एखाद्या विद्यार्थ्याला संपूर्ण वर्गासमोर उभं करून शिक्षकांनी त्याच्या चुकांचा, दुर्गुणांचा पाढा वाचला तर तो त्यांच्याशी मोकळेपणाने बोलेल का? हेच जर त्यांनी त्याला एकटयाला बोलावून त्याला शांतपणे त्यांचं मत सांगितलं, तर संवादाचा जो हेतू होतो तो पूर्ण होण्याची शक्यता जास्त असेल.

म्हणूनच संवाद साधण्यापूर्वी एकदा हे तीन प्रश्न स्वत:ला जरूर विचारावेत.

  1. हा संदेश मी कोणाला देणार आहे? (Receiver)
  2. हा संदेश मी का देणार आहे? (Purpose)
  3. हा संदेश मी कसा देणार आहे? (Way)

एकदा हे निश्चित झालं, की मग पुढील गोष्टी सोप्या होतात. मग तो संदेश योग्य पध्दतीने पोहोचला का, त्यानुसार परिणाम घडतात का हे पाहावं.

बोलणारा अन् ऐकणारा दोघे उत्सुक असले आणि संवादाचा योग्य मार्ग निवडला, की तो अधिक फुलून येतो. म्हणूनच ऐकणाऱ्याने आणि बोलणाऱ्याने एकमेकांकडे लक्ष दिलं पाहिजे. समजा, तुम्ही एखाद्या डॉक्टरांकडे गेला आहात, त्यांच्यासमोर बसून तुमच्या आरोग्याच्या समस्या त्यांना सांगत आहात आणि डॉक्टर मात्र दर अर्ध्या मिनिटाने मोबाइलमध्ये पाहत असतील, तर तुमचं मत काय असेल...? म्हणूनच संवाद हा जोडव्यवसायासारखा न साधता तो पूर्ण अवधानाने घडला पाहिजे. ही दोघांची जबाबदारी आहे. Senderची अन् Receiverचीदेखील.

इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, जे त्या संवादाचा घटक आहेत, त्यांच्यापेक्षा जेव्हा इतरांना त्या संवादात जास्त रस असतो, तेव्हा त्या विषयांत 'बिन बुलाएं मेहमान' म्हणून तेही मध्ये पडतात आणि मग सारंच बिघडतं.

यासाठी एक नियम आपण घालून घ्यावा की, ज्या विषयांत मी अपेक्षित नाही, त्या विषयांत मी बोलणार नाही. निरुद्देश चौकशा, अनावश्यक तपशील विचारणं टाळलं पाहिजे. दोघांच्या मध्ये बोलणं गरजेचं आहे अशी स्थिती आली, तर आधी परवानगी घेऊन मगच बोलावं.

संवादाला हेतू असणं आवश्यक आहे, पण आपण जर दुसऱ्याने कसं बोलावं, काय बोलावं याच्या कल्पना आधीच पक्क्या केल्या आणि त्यापेक्षा वेगळं समोर आलं तर चिडचिड, निराशा येते. यासाठी दुसरा कशी प्रतिक्रिया देईल याबाबत पक्कं मत बनवणं टाळावं.

काही व्यक्तींना एकतर्फी बोलत राहण्याची सवय असते. आपलं बोलणं समोरच्याला कळतंय का? पटतंय का? त्याला त्यात रस आहे का? त्याला काही बोलायचं आहे का? हे पाहण्याचं भान किंवा जाण त्यांच्यात नसते. मग अशा व्यक्तीला लोक टाळू लागतात किंवा त्यांचं बोलणं गांभीर्याने घेतलं जात नाही. माझ्या शेजारी पूर्वी एक मावशी राहायच्या. त्यांची आठवण झाली. त्यांना वेगवेगळया पाककृती जबरदस्तीने सगळयांच्या गळी उतरवायचा छंद होता.

अर्थात कुणाशी, काय आणि किती बोलावं याचं भान सदैव ठेवावं.

बोलण्याच्या ओघात शिव्यांचा मसाला पेरण्याची किंवा टोमण्यांची फोडणी देण्याची सवय अनेकांना असते. हे चांगल्या संवादाचा भाग नक्कीच नाही. आपल्या बोलण्यात सवयीने काही अपशब्द येत असतील, तर ती सवय मोडणं आपलंच काम आहे.

एकदा मी कॉलेजबाहेरच्या बस स्टॉपवर उभी होते. शेजारी पाच मैत्रिणी गप्पा मारत होत्या. तिथून एक मुलगी गेली. लगेच या मैत्रिणींची तिचे केस, ड्रेस, स्वभाव यावर चर्चा सुरू झाली. अचानक आमच्या इथे आणखी एक मुलगी येऊन उभी राहिली, मग त्यांचा विषय थांबला. मला गंमत वाटली. ती मुलगी त्यांच्याशी जुजबी बोलून बसमधून निघून गेली. मग पुन्हा पहिली मुलगी अन् तिची मैत्रीण असलेली दुसरी यांच्यावर चर्चा सुरू... हे सगळीकडेच पाहायला मिळतं. घर, शाळा, ऑफिसेस - गॉसिपिंग ओघाने येतं. पण हा संवाद होता का? संवादाला भय असतं का? निश्चितच नाही. शुध्द, मोकळा, माणसामाणसाला सांधणारा असतो संवाद. कारण दुसऱ्याला कमी लेखण्यात 'त्याला' स्वारस्य नसतं. म्हणूनच एक 'सोपा' नियम घालून घेऊ - 'उपस्थित नसलेल्या व्यक्तीबाबत अकारण, वायफळ चर्चा टाळणं.'

आपण बोलताना शब्दांची गती नियंत्रणात हवी. वेगाने बोलणाऱ्या माणसावर एक गोष्ट दोन-तीनदा सांगण्याची वेळ येते, तर खूप मंद गतीने बोलणं निरस वाटू लागतं.

उच्चार स्पष्ट असणं हा शब्द संवादाचा प्राण आहे. 'ण' आणि 'न' यांचा उच्चार जिभेच्या वळणावर अवलंबून असतो, भौगोलिक प्रदेशावर नाही, हा संदेश सर्वत्र पोहोचला पाहिजे. चुकीचे उच्चार हा भाषेचा अपमान आहे.

संवाद कौशल्यासाठी आपली भाषा समृध्द व्हायला हवी. व्याकरणाचं ज्ञान हवं. यासाठी वाचनाची आवड असणं आणि नसल्यास ती लावणं हितकारक.

वर्कशॉपच्या निमित्ताने शाळा-कॉलेजात जाते, तेव्हा संवाद कौशल्याबाबत एक गोष्ट जाणवते. बहुतांश मुलं नवीन व्यक्तीशी बोलताना नजरेला नजर देऊन बोलत नाहीत. याकरिता आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आपली नजर आपल्या बोलण्याला बळकट बनवत असते.

आमच्या लहानपणीच्या शाळेत होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धा डोळयांसमोर येतात. हाताची घडी घालून 'अध्यक्ष महाशय' म्हणत, मागे-पुढे झोके घेत आणि पंखा, दिवा किंवा भिंत अशा निरुपद्रवी वस्तूंकडे पाहत 'केलेली घोकंपट्टी' ऐकवणारेच बहुतांश स्पर्धक. त्यातही त्यांची गाडी कधी रिव्हर्स यायची, तर कधी एखादा परिच्छेद गाळून वेग घ्यायची. पण तोही खरंच संवाद असायचा का?

संवाद म्हटलं की आपल्याला आठवतात ते शब्द. पण संशोधनानुसार 40% संवाद आवाजाची तीव्रता, चढउतार यांच्यामार्फत, 50% संवाद हावभाव, देहबोली, स्थळ, काळ यांच्यामार्फत, तर केवळ 10% संवाद शब्दांच्या मार्फत घडत असतो. भाषा येते तर मी 10% संवाद यशस्वी करू शकेन, पण 90%साठी जाणीवपूर्वक प्रयत्न हवेत.

संवादाला साज चढतो तो हावभाव, देहबोली, शब्दांचे उच्चार, त्यांची लय या साऱ्यांमुळे. अनेकदा 'शब्दांवीण संवादू' साधल्याचा अनुभवदेखील आपल्याला येतो. अनेक वर्षांनी एखादी बालमैत्रीण वा बालमित्र समोर आला किंवा तुमच्या अथक प्रयत्नांनी एखादं काम यशस्वी झालं, तर त्यावेळी शब्द मूक होतात, पण आपल्या भावना मात्र समोरच्यापर्यंत पोहोचतात.

याचसाठी आपले हावभाव, देहबोली, नजर यातून जे व्यक्त होतं तेच शब्दातूनही समोर आलं पाहिजे. जर एखाद्या विद्यार्थ्याला शिकवलेला मुद्दा समजला नसेल आणि तो 'कळलं' म्हणत असेल, तर ते त्याच्या चेहऱ्यावरून लगेच समजेल.. कारण हावभाव हे सहजतेतून आलेले असतात. म्हणून काही गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला हवं.'

* बोलताना ऐकणाऱ्याकडे पाहून बोलावं. जेव्हा समूहात (Groupमध्ये) बोलायचं असेल, तर सर्वांना नजर देऊन बोलावं. सतत नजर भिरभिरत ठेवणं टाळावं.

* आपण बोलण्यापूर्वी आरशासमोर सराव करावा. आपले हावभाव अतिप्रमाणात व्यक्त होणं किंवा हावभावांशिवाय संवाद कोरडा होणं यातील काही घडत नाही ना, ते पाहावं.

* बोलताना हाताची घडी घालू नये. शरीर अगदी मोकळं, रिलॅक्स असावं.

तर अशी ही देहबोली. जी तुमच्या शब्दांना दुजोरा देणारी असावी.

संवादात वक्त्याइतकाच महत्त्वाचा आहे तो श्रोता. 'श्रोते असावे समाधान' ही त्याची पहिली आवश्यकता. बोलणाऱ्याच्या शब्दांकडे आणि हावभावांकडे ऐकणाऱ्याचं व्यवस्थित लक्ष असलं पाहिजे.

श्रोता (Receiver) सक्रिय असला पाहिजे. ऐकताना नजरेने, शब्दाने (हो, हं, बरोबर, अच्छा) किंवा देहबोलीने (मान हलवणं) प्रतिसाद दिला पाहिजे. यातून आपल्याला लक्षपूर्वक ऐकलं जातंय याची बोलणाऱ्याची (SenderMr) खात्री पटते आणि संवाद अधिक खुलतो.

जिथे काही शंका उत्पन्न होते, तिथे योग्य वेळी प्रश्न विचारून निरसन करावं, पण एखाद्याचं बोलणं मध्येच तोडू नये. संयम ठेवावा.

अर्धवट तपशील ऐकणं, फायद्याचं तेवढंच ऐकणं, ऐकताना पूर्वीचे अनुभव आठवत राहणं किंवा आपण आता काय बोलावं या विचारात गुंतून जाऊन संपूर्ण संदेश न ऐकणं या काही त्रुटी संवादाला अडथळा आणतात.

वक्ता अन् श्रोता यांच्या भूमिका बदलत जाऊन संवादाला गती मिळते. या दोघांना परस्परांचा आदर असणं आणि तो व्यक्त होणं महत्त्वाचा धागा आहे.

आपल्याला या दोन्ही भूमिका समाधानकारकरित्या पार पाडता आल्या की आपण जिंकलो. ऐकताना केवळ ऐकलं पाहिजे. आपण बरेचदा हे विसरून जातो की, इतरांनाही काही सांगायचं असतं आणि आपण ते ऐकून घ्यायचं असतं. काउन्सेलिंगसाठी इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसह तिची आई आली होती. मी मुलीला काही प्रश्न विचारत होते, पण उत्तरं मात्र आईच द्यायची. माणसं बरेचदा असंच वागतात. दुसऱ्याचं ऐकलं तरच दुसरा आपलं ऐकून घेतो, नाही का?

निसर्गाने आपल्याला दोन कान आणि एक तोंड दिलं, ते श्रवणाचं महत्त्व जाणूनच. म्हणूनच दुसऱ्यांना ऐकण्याची सवय लावून घेऊ या.

आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तींपैकी अशा व्यक्ती आठवा, ज्यांचं बोलणं तुम्हाला ऐकावंसं, ऐकत राहावंसं वाटतं किंवा ज्यांच्याशी बोलावंसं वाटतं. काय असतं असं त्यांच्यात?

विचार केला की उलगडत जातात काही गोष्टी. त्यांचे शब्द साधे, नेहमीचेच असतात, पण त्यामागची शक्ती मोठी असते. त्यांच्या संवादाचा शुध्द, प्रामाणिक अन् सकारात्मक हेतू, आवाजातील गोडवा, दुसऱ्याचं शांतपणे ऐकून घ्यायची तयारी. योग्य शब्दांचा वापर त्यांच्या संवादाला वेगळयाच उंचीवर घेऊन जातात.

समाजातील विविध घटकांतील संवादामुळेच समाज उन्नत होत असतो. म्हणूनच आपण हा संवाद जबाबदारीने करतो का, याचा विचारही या निमित्ताने व्हावा.

सोशल मीडिया हे असंच क्षेत्र आहे. अनेकांशी आणि वेगाने संवाद साधण्याचा सोपा मार्ग; पण गुड मॉर्निंग-गुड नाइटचे फोटोयुक्त संदेश, पातळी सोडून लिहिलेले विनोद पुढे पाठवत जाणं किंवा माहितीची सत्यासत्यता न पाहता अफवा, असत्य गोष्टी पुढे पसरवत जाणं अशा गोष्टींनी त्याचा दुरुपयोगच जास्त होताना दिसतो. याकरिता आपण आत्मपरीक्षण करूनच या क्षेत्राचा वापर करावा.

सहज, सुलभ, सकारात्मक संवाद साधत आपण नाती अधिक दृढ करू शकतो. संवादाला भाषा, वेष, मतभिन्नता.. कसलीही सीमा नसते. असा सर्वांना सामावून घेणारा संवाद साधायचा आहे आपल्याला.

निसर्गातल्या चराचरात असणारा संवाद, एकतानता पाहून आपण हरखून जातो. काळया मेघांच्या स्वागताला थुईथुई नाचणारा मोर, पावसाच्या सरींना आगमनाची सुगंधी सलामी देणारी माती, फुलांचा सुवास स्वत:सह वाहून नेणारा वारा यांच्यातील भुरळ पाडणारा हा संवादाचा रंग आपणही भरू या आपल्या जीवनचित्रात...!

& 9273609555, 02351-204047

suchitarb82@gmail.com