मधुमेहाची परिणती

विवेक मराठी    16-Mar-2017
Total Views |


रक्तात असलेलं ग्लुकोज पेशींच्या आत जायला पेशींचा दरवाजा उघडावा लागतो. या दरवाजाची चावी म्हणजे इन्श्युलीन. मधुमेहात एकंदरीतच इन्श्युलीन कमी तरी असतं, किंवा उपलब्ध असलेलं इन्श्युलीन परिणामकारक तरी नसतं. त्यामुळे पेशींचा दरवाजा उघडत नाही. रक्तात भरपूर ग्लुकोज असलं, तरीही पेशींना ते मिळत नाही, कारण मुळात ते पेशींच्या आत शिरू शकतच नाही. सर्वत्र पूर आलेला असताना मधलं एखादं बेट पाण्यासाठी तडफडावं, तसा काहीसा हा प्रकार होतो.

धुमेहासारख्या जीवनशैलीशी निगडित आजारात दुखत नाही, खुपत नाही. निदान सुरुवातीला तरी कुठलाही त्रास होत नाही. मग त्यावर उपचार का करायचे? वाढलं, तर वाढू दे ग्लुकोज. कशाला उगाच औषधं घ्यायची? हा विचार कुणाच्याही मनात येणं स्वाभाविक आहे. त्यामुळे मधुमेहामुळे शरीरावर कुठले परिणाम होतात हे पाहायला हवं.

सगळयात प्रथम लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे रक्त आख्ख्या शरीरभर फिरणार. याचा अर्थ रक्तातलं ग्लुकोज वाढल्याने होणारे परिणाम शरीराच्या ज्या कुठल्या भागात रक्त पोहोचतं, तिथे तिथे दिसणार. शरीराचा असा कुठलाही भाग नाही, जिथे रक्त पोहोचत नाही. म्हणजे निदान वरकरणी तरी शरीराचं कोणतंही इंद्रिय मधुमेहाच्या चढाईला बळी पडणार नाही असं नाही. परंतु प्रत्यक्षात असं होत नाही. मज्जासंस्था, मूत्रपिंड, डोळे, हृदय यासारखी काही इंद्रियं मधुमेहाला प्रकर्षाने बळी पडतात. इतर अवयवांच्या मानाने त्यांच्यावर मधुमेह लवकर परिणाम करतो. रक्त आणि त्याबरोबर त्यातलं ग्लुकोज संपूर्ण शरीरभर सारखंच फिरत असताना हे असं का होतं, ते समजून घेणं आवश्यक आहे.

रक्तात असलेलं ग्लुकोज पेशींच्या आत जायला पेशींचा दरवाजा उघडावा लागतो. या दरवाजाची चावी म्हणजे इन्श्युलीन. मधुमेहात एकंदरीतच इन्श्युलीन कमी तरी असतं, किंवा उपलब्ध असलेलं इन्श्युलीन परिणामकारक तरी नसतं. त्यामुळे पेशींचा दरवाजा उघडत नाही. रक्तात भरपूर ग्लुकोज असलं, तरीही पेशींना ते मिळत नाही, कारण मुळात ते पेशींच्या आत शिरू शकतच नाही. सर्वत्र पूर आलेला असताना मधलं एखादं बेट पाण्यासाठी तडफडावं, तसा काहीसा हा प्रकार होतो. पेशींची ग्लुकोजची उपासमार होत असली, तरी त्याचा एक फायदाही होतो. निदान पेशींना मुबलक ग्लुकोजमुळे होणारी इजा होत नाही. ज्या ज्या पेशींचं दार उघडायला इन्श्युलीन लागतं, त्यांना त्यांना फायदा मिळतो. त्या पेशी थोडया सुरक्षित राहतात.

अर्थात सगळयाच पेशी इतक्या सुदैवी नसतात. मेंदू आणि एकंदर मज्जासंस्था, मूत्रपिंड, रक्तातल्या तांबडया पेशी, डोळयांच्या पेशी यांना निसर्गाचं एक लहानसं वरदान असतं. त्यांना इन्श्युलीनवर फारसं अवलंबून राहावं लागत नाही. रक्तात असलेलं ग्लुकोज या पेशींमध्ये विनासायास शिरू शकतं. नॉर्मल माणसाला याचा फायदा होतो. इन्श्युलीन कमी-जास्त झालं, तरी या पेशींना फरक पडत नाही हीदेखील या पेशींचं कामकाज सहजी बंद पडू नये म्हणून निसर्गाने केलेली योजना. त्यांच्या या विशिष्ट पेशींना ग्लुकोजचा पुरवठा सतत होतच राहतो. मग इन्श्युलीन असो की नसो. एरव्ही हा फायद्याचा वाटणारा सौदा मधुमेहात त्यांच्या जिवावर उठतो. कारण रक्तात ग्लुकोज वाढलं की तितकंच ग्लुकोज त्या पेशींच्या आत उतरतं. जेवढं ग्लुकोज अधिक, तेवढं ते पेशींच्या आत जास्त शिरकाव करणार, हे ओघाने आलंच.

आता तुम्ही म्हणाल, यात काय वाईट झालं? चांगलंच आहे. पेशींना हवं असलेलं इंधन आयतंच मिळतंय, तेही मुबलक प्रमाणात. मग बिघडलं कुठे? पण इथेच तर गोम आहे. पेशींमध्ये ग्लुकोजची भाऊगर्दी होते. आता पेशीच ती. तिच्या मर्यादा असतातच. अचानक भरपूर ग्लुकोज आत आलं, म्हणून तिचं आकारमान थोडंच वाढणार? त्यामुळे जी दाटीवाटी होते, त्यामुळे पेशींना आपलं काम करायला मोकळीक राहत नाही. तेवढी जागाच शिल्लक राहत नाही. वेगळया शब्दात सांगायचं, तर आपली पी.टी. उषा चांगली धावपटू आहे. तिला मोकळं मैदान मिळालं, वाऱ्याची आणि धावपट्टीची साथ मिळाली की ती वाऱ्याशी स्पर्धा करायच्या वेगाने धावेल. परंतु एखाद्या मध्यवर्ती रेल्वे स्टेशनवर भर गर्दीच्या वेळेला तिला धावायला सांगितलं तर, जमेल का तिला जोरात धावायला? फार तर ती जलद चालू शकेल. अगदी तसंच या पेशींचं होतं. त्यांना आपलं नेहमीचं काम करणं अवघड होऊन बसतं.

इन्श्युलीन बनवणाऱ्या बीटा पेशीदेखील याच पठडीतल्या असतात. ग्लुकोज आत घेण्यासाठी त्यांनाही इन्श्युलीनची गरज भासत नाही. मधुमेह वाढला, म्हणजे त्यांच्या आतसुध्दा अतिरिक्त ग्लुकोज जातं. तिथे गर्दी करतं. त्यामुळे बीटा पेशींना आपलं इन्श्युलीन बनवायचं काम नीट करता येत नाही. बीटा पेशी कमी इन्श्युलीन बनवतात. शरीराची गरज भागवायला तितकं इन्श्युलीन पुरत नाही. मधुमेह आणखी वाढतो. आणखी ग्लुकोज बीटा पेशींमध्ये शिरतं. हे दुष्टचक्र सुरू राहतं. आम्हा वैद्यकीय मंडळींना मोठे मोठे शब्द आवडतात. त्या प्रथेला जागून या सगळया प्रकाराला आम्ही 'ग्लुकोटॉक्सिसिटी' असं नाव दिलंय. थोडक्यात काय, तर जास्तीच्या इन्श्युलीनचं ओझं होतं. एक प्रकारे ते विषाचं काम करतं.

ही गोष्ट मधुमेहात केवळ ग्लुकोजच्या दाटीवाटीनेच होते असं नाही. रक्तातलं ग्लुकोज वाढलं, की या अतिरिक्त ग्लुकोजची साठवण करायला आपलं शरीर पुढे सरसावतं. पुढच्या काळात उपयोगी पडावं म्हणून आपण अन्नधान्याचा, पैशाचा साठा करतो. शरीरालादेखील ही सवय असते. त्यामुळे सुगीच्या दिवसात मिळणाऱ्या मुबलक अन्नाची साठवण करायची सोय निसर्गाने प्रत्येक प्राण्याच्या शरीरात करून ठेवली आहे. कारण निसर्गात अन्नचक्र सुरू असतं. काही काळासाठी भरपूर, थोडं जास्तच अन्न उपलब्ध असतं. त्यानंतरच्या काळात जरा अधिक मेहनत करून का होईना, पण अन्न मिळतं. पण काही काळ असा असतो, ज्या वेळेला फाके पडतात. कष्ट करूनसुध्दा रित्यापोटीच झोपायची पाळी प्राण्यांवर येते. असं होऊ नये, अन्नाचं दुर्भिक्ष असताना प्राण्याला जिवाला मुकावं लागू नये, म्हणून सुगीच्या दिवसात मिळालेल्या अन्नाचं चरबीत रूपांतर करून ते साठवायची योजना करायला निसर्ग विसरला नाही.

माणूससुध्दा प्राणीच. त्याच्या शरीरात ही योजना आहेच. फक्त त्याने इतर प्राण्यांपासून फारकत घेतली. त्याला अन्नचक्राची फिकीर उरली नाही. आपलं डोकं वापरून त्याने पाहिजे तेव्हा पाहिजे तितकं अन्न आपल्याला मिळेल याची खातरजमा करून घेतली. फार जास्त सतत खात राहिल्याने त्याला मधुमेहासारखे विकार जडले. रक्तातलं ग्लुकोज वाढू लागलं. पण शरीराला कुठलं कळायला की हे ग्लुकोज वाढलंय ते मधुमेहाने.... त्याने आपलं नेहमीचं काम चालू ठेवलं. जास्त झालेल्या ग्लुकोजचं चरबीत रूपांतर करणं हा शरीराचा गुणधर्म. त्याला ते जागत राहिलं. रक्तात ट्रायग्लिसराईड - म्हणजे चरबी वाढू लागली. या वाढलेल्या चरबीच्या कणांची गर्दीदेखील बीटा पेशींमध्ये व्हायला लागली. आता ग्लुकोजचा प्रश्न नव्हता. चरबीचा होता. म्हणून चरबीच्या गर्दीने जेव्हा बीटा पेशींच्या कामाच्या क्षमतेवर बाधा येऊ लागली, चरबी एक प्रकारे विषाचं काम करू लागली, तेव्हा आम्ही त्याला 'लायपोटॉक्सिसिटी' म्हणू लागलो.

बीटा पेशींना मधुमेहात या दोन्ही गोष्टींचा त्रास होतो आणि त्या कमी कमी इन्श्युलीन बनवू लागतात. औषधोपचारांनी मधुमेह आवाक्यात आला, रक्तातलं ग्लुकोज नियंत्रणात आलं, म्हणजे बीटा पेशींमधली भाऊगर्दी कमी होते. त्या पुन्हा जोमाने इन्श्युलीन बनवायचं आपलं काम करू लागतात. याचा फायदा होतो. कित्येक दिवसांपर्यंत मधुमेह काबूत राहू शकतो. या एकाच सिध्दान्ताने डॉक्टर प्रेरित झालेत. प्रसंगी इन्श्युलीन देऊन ग्लुकोज नियंत्रणात आणायचा प्रयत्न ते करायला लागलेत. कारण असं केल्याने सगळी औषधं बंद करूनही काही काळ ग्लुकोज मधुमेही पातळीच्या खाली राहतं, असं काही महत्त्वाच्या पाहण्यांमध्ये दिसून आलं आहे.

आतापर्यंत आपण शरीराच्या काही महत्त्वाच्या - म्हणजे मज्जातंतू, डोळयांच्या पडद्याच्या किंवा मूत्रपिंडाच्या पेशींबद्दल बोलता बोलता अचानक बीटा पेशींकडे वळलो. ग्लुकोटॉक्सिसिटी आणि लायपोटॉक्सिसिटी या दोन शब्दांचा परामर्श घेतला. बीटा पेशी मधुमेहावर नियंत्रण राखण्याच्या दिशेने महत्त्वाच्या. त्यात झालेली भाऊगर्दी आणि त्या गोंधळामुळे त्यांचं व पर्यायाने शरीराचं झालेलं नुकसान महत्त्वाचं. पण ज्यांना ग्लुकोज आत येण्यासाठी इन्श्युलीनची गरज लागत नाही, अशा सगळयाच पेशींमध्ये रक्तात वाढलेलं ग्लुकोज तितकंच नुकसान करतं. या ग्लुकोजच्या गर्दीचं जे काही होतं, ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मधुमेहाने शरीरावर होणारे परिणाम समजून घेण्याच्या प्रक्रियेत हाच सर्वात मोठा घटक आहे.

& 9892245272