...आणि वैष्णवांच्या भूमीत फुलले कमळ!

विवेक मराठी    20-Mar-2017
Total Views |


*** प्रशांत पोळ****

मणिपूर या राज्यात भाजपाचे अस्तित्व अक्षरश: नगण्य होते. मुळात ख्रिश्चन प्रभाव असलेल्या या राज्यात विजय संपादन करणे अवघड काम होते. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने अथक परिश्रम घेऊन 21 जागा जिंकल्या. पुढे बहुमताच्या आकडयासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि प्रकाश जावडेकर यांनी चपळता दाखवत चार आमदार असलेल्या 'नागा पीपल्स फ्रंट' आणि चार आमदार असलेल्या 'नॅशनल पीपल्स फ्रंट' यांना आपल्या बाजूला वळवले. त्यामुळे मणिपूरच्या भाजपाच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदी एनबिरेन सिंह विराजमान झाले आहेत. 

देशाच्या राजकारणाला वळण देऊ शकणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या, तेव्हा त्यातील दोन राज्ये अगदी लहान होती - गोवा आणि मणिपूर. एक देशाच्या दक्षिण-पूर्वेस, तर दुसरे उत्तर-पूर्वेच्या टोकाला. अगदी 'डायगोनली अपोझिट'. दोन्ही प्रांतात ख्रिश्चन मतदारांचा आणि चर्चचा प्रभाव हा समान दुवा.

आणि ह्या दोन्ही राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपाने सत्ता पटकावली आहे. 'खाये गोरी का यार, बलम तरसे...!' म्हणत सोशल मीडियावर या दोन्ही राज्यांचे यथार्थ वर्णन केले जात आहे..!

या दोन्ही राज्यात क्रमांक एकचा पक्ष काँग्रेस होता. दोन्हीकडे त्याला फक्त तीन-चार आमदारांची गरज होती. आणि दोन्ही राज्यांत मागून येऊन, तत्परता आणि चपळता दाखवत भाजपाने सत्ता आपल्या हातात घेतली.

या दोन्ही राज्यांपैकी मणिपूरमध्ये भाजपा सत्तेवर येणे फार महत्त्वाचे होते. मणिपूर हे भारताच्या अगदी उत्तर-पूर्वेच्या टोकाचे राज्य. याची पूर्व सीमा म्यानमारला (ब्रह्मदेशला) लागून असलेले राज्य. अस्वस्थ आणि अशांत राज्य. अवघी 28 लाख लोकसंख्या असलेले हे राज्य देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

मात्र दहशतवादाने ह्या राज्याला फार त्रास दिलाय. म्यानमारची सीमा लागून असल्याने, दहशतवादी आणि फुटीरतावादी एखादे मोठे हत्याकांड करून म्यानमारमध्ये लपतात. आणि म्हणूनच सन 2015मध्ये आपल्या सैन्याने मणिपूर-नागालँडला चिकटलेल्या म्यानमारच्या हद्दीत शिरून सुमारे तीस दहशतवाद्यांना मारून त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. कदाचित भाजपाच्या यशाचा पाया याच घटनेत दडला असावा..!

देशाच्या सीमेवरील राज्य म्हणून भाजपाच्या दृष्टीने मणिपूरचे महत्त्व जास्त आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने इतर देशांशी सीमा लागून असलेल्या राज्यांमध्ये राष्ट्रवादी विचारधारेचे सरकार असणे आवश्यक आहे. म्हणूनच भाजपाने जम्मू-काश्मीरमध्ये तडजोडी करत पी.डी.पी.बरोबर संयुक्त सरकार स्थापन केले. आणि म्हणूनच पंजाब हातचे गेल्यावर, मणिपूरमध्ये सरकार येणे आवश्यक होते. या कारणासाठीच 60पैकी फक्त एक तृतियांश (21) आमदार असूनही भाजपाने मणिपूरमध्ये आपला मुख्यमंत्री बसवला.

सन 2012च्या निवडणुकांत भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी होती फक्त 2.12% आणि या निवडणुकीत मिळालेली मते आहेत 36.6%. म्हणजेच भाजपाच्या मतांमध्ये सणसणीत अठरा पटीची वाढ...!

काँग्रेसच्या मतांमध्ये काहीशी घसरण झाली. मागच्या वेळी मिळालेल्या 42.4% मतांच्या तुलनेत त्यांना 35.1% मते मिळाली. अर्थात भाजपापेक्षा दीड टक्का कमीच. मात्र मिळालेल्या जागा ह्या भाजपापेक्षा सातने जास्त होत्या. यंदा अप्रत्यक्षरित्या रामविलास पासवान यांच्या पक्षालाही एक जागा मिळाली.

मात्र सर्वांचे लक्ष असलेल्या थाऊबल ह्या विधानसभा क्षेत्रात निवडणूक निकाल अगदीच अळणी निघाले. याआधी तीनदा निवडणूक जिंकलेल्या मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्या विरोधात इरोम शर्मिला ह्या निवडणूक लढवत होत्या. मणिपूरमधून AFSPA हा दहशतवादविरोधी कायदा दूर करावा, म्हणून त्या पंधरा वर्षे उपोषण करत होत्या. गंमत म्हणजे त्यांना पंधराशे मतेही मिळाली नाहीत. इबोबी सिंह यांना 15,000, तर इरोम शर्मिला यांना फक्त 100 मतांवर समाधान मानावे लागले. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चाओबा सिंह हे मुख्यमंत्रिपदाचेही दावेदार होते. मात्र नाम्बोल विधानसभा क्षेत्रातून त्यांना हार मानावी लागली.

निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेसकडे 28 आमदार असल्यामुळे, त्यांचेच सरकार बनेल असे चित्र होते. काँग्रेसला फक्त तीन आमदारांचीच गरज होती, तर भाजपाला हवे होते दहा आमदार..!

मात्र ससा-कासवाच्या शर्यतीसारखी भाजपाने चपळता दाखवली. चार आमदार असलेल्या 'नागा पीपल्स फ्रंट' आणि चार आमदार असलेल्या 'नॅशनल पीपल्स फ्रंट' यांना आपल्या बाजूला वळवले. हे घसघशीत आठ आमदार भाजपाच्या बाजूला आल्यावर इतर दोन आमदार सहजरित्या येऊन मिळणार, हे निश्चित होते. गोव्यात आणि मणिपूरमध्ये काँग्रेसने सरकार स्थापनेसाठी जो काही वेळ लावला, त्यावरून हे स्पष्ट होते की काँग्रेसमधील जीवनेच्छाच संपून गेलेली आहे. निवडणुकीच्या काळातही काँग्रेसचे पर्यवेक्षक होते काँग्रेसच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रमुख करिम लश्कर, ज्यांना काँग्रेसचे कार्यकर्ते तरी ओळखत असतील की नाही ही शंका आहे.

आणि म्हणूनच भाजपाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि प्रकाश जावडेकर जेव्हा इम्फाळमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी जोमाने गाठीभेटी घेत होते, तेव्हा काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व काहीही हालचाल न करता आराम करत होते.

एनबिरेन सिंह हे भाजपाचे मणिपूरचे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या पांगी जमसरतचंद्र सिंह यांना पराभूत केले. कधी फूटबॉलचे चांगले खेळाडू असलेले बिरेन सिंह हे पूर्वी काँग्रेसचे मुख्यमंत्री इबोबी सिंह यांचे उजवे हात समजले जायचे. काँग्रेसच्या नेतृत्वाशी मतभेद झाल्यामुळे गेल्या वर्षी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता.

मणिपूर हे पूर्वांचलातील भाजपाशासित तिसरे राज्य झाले आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि आता मणिपूर. गेली अनेक वर्षे आपले पूर्वांचल अस्वस्थ राहिलेले आहे. देशाचा हा समृध्द आणि संपन्न भाग दहशतवादामुळे उपेक्षित राहिलेला होता. नागलँड, मणिपूर आणि मिझोरम या, म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये तर फुटीरतावादी शक्तींनी थैमान घातले होते. आता मणिपूरमध्ये भाजपाच्या रूपात राष्ट्रवादी विचारांचे सरकार आल्यामुळे सीमेवर एक जागता पहारेकरी तैनात झाला आहे..!

9425155551

telemat@airtelmail.in