राजकारणाच्या देशीकरणाचा कालखंड सुरू झाला आहे

विवेक मराठी    20-Mar-2017
Total Views |

जातवाद, भाषावाद, जमातवाद, धर्मवाद, घराणेशाहीवाद यांचे राजकारण करण्याचा कालखंड संपला असून आता खऱ्या अर्थाने देशाचे राजकारण करण्याचा कालखंड आला आहे. राजकारणाचे देशीकरण होण्याचे युग आता सुरू झाले आहे. देशीकरण म्हणजे हा देश काय आहे? लोक कसा विचार करतात? आपल्या मूल्यपरंपरा काय आहेत? आपले संचित वैचारिक धन काय आहे? लोकांच्या राष्ट्रीय आकांक्षा कोणत्या आहेत? हे सर्व जाणून राजकारण करण्याचे दिवस आता येत चालले आहेत.


पाच राज्यातील विधानसभांचे निवडणूक निकाल आतापर्यंत सर्वांना माहीत झालेले असल्याने त्यावर नवीन लिहिण्यासारखे काही नाही. भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेश विधानसभेत 324 जागा मिळविल्यामुळे भाजपाच्या विजयावर वेगवेगळया प्रकारचे भाष्य चालू आहे. हा हिंदुत्वाचा विजय आहे का? हा नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा विजय आहे का? काँग्रेसचा अस्त होणार काय? प्रादेशिक पक्ष संपणार काय? नरेंद्र मोदी यांना खरोखरच अखिल भारतीय नेतृत्वाची मान्यता मिळाली आहे का? असे प्रश्न घेऊन सध्या चर्चा चालू आहेत. उमर अब्दुल्ला म्हणाले की, ''2019 विसरा, आता 2024ची तयारी करा.''

राजकीय विश्लेषणाची गंमत अशी असते - जो ज्या वैचारिक भूमिकेत आहे, त्या भूमिकेवरून तो परिस्थितीचे विश्लेषण करतो. आज विश्लेषण करणाऱ्या अनेकांचे तीन-चार वर्षांपूर्वी मत होते की, जर मोदी यांचा प्रभाव वाढला, तर भारतीय लोकशाहीच काय, भारतीय राष्ट्र संकटात येईल. देशाची बहुविधता संपेल. हिंदू-मुसलमान दंगली वाढतील. अल्पसंख्याकांचे जीवन धोक्यात येईल. राज्यघटना संपेल इ.इ. त्यातील काही जण म्हणाले होते की, मोदी पंतप्रधान झाल्यास मी देश सोडीन, कुणाला वाटले, मोदी पंतप्रधान होणे हा काळाकुट्ट दिवस असेल. आज याच विचारधारेचे लोक म्हणतात की, मोदी आता देशाचे सर्वमान्य नेता झाले असून पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्यानंतर मान्यतेच्या संदर्भात मोदींचेच नाव घ्यावे लागते.

विश्लेषण करणाऱ्यांचा दुसराही एक वर्ग आहे. या वर्गाने भाजपाला हिंदुत्ववादी पार्टी ठरवून टाकले आहे. हिंदुत्ववादी ठरविण्यात काही गैर नाही, पण त्यांनी भाजपाचा हिंदुत्वाचा अजेंडा, विषयसूचीदेखील ठरवून टाकली. घटनेचे 370 कलम रद्द करणे, गोहत्याबंदी, रामजन्मभूमी मुक्ती, समान नागरी कायदा हे चार विषय हिंदुत्वाचे म्हणजे भाजपाचे ठरविण्यात आले. हे चार विषय मुसलमानांना स्पर्श करतात, म्हणून भाजपा मुस्लीमविरोधी पार्टी आहे, असा या लोकांचा प्रचार चालतो. भाजपात मुसलमान नाहीत, केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांना नगण्य प्रतिनिधित्व आहे हे वारंवार सांगण्यात येते.

या विश्लेषकांचा आणि विचारवंतांचा त्यापुढचा विश्लेषणाचा विषय असतो भाजपाचा प्रभाव रोखण्यासाठी, कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगण्याचा. त्यांचे गणित सोपे असते. भाजपा हा उच्चवर्णीय ब्राह्मण, ठाकूर, बनिया यांचा पक्ष असल्याने त्याविरुध्द ओबीसी, दलित, अल्पसंख्य ख्रिश्चन, मुसलमान यांनी युती करायला हवी. दलित + यादव + मुस्लीम म्हणजे विजयाचे सोपे समीकरण ते मांडतात. बिहारमध्ये नितीश, लालू आणि मुसलमान यांनी त्यांचे परिणाम दाखविले आहेत, असा त्यांचा दावा असतो.

आता झालेल्या विधानसभा निवडणुकांनी जे निकाल पुढे आणले आहेत, ते निकाल या सर्वांच्या थोबाडात मतदारांनी हाणलेली सणसणीत चपराक आहे. पंजाबमध्ये स्वबळावर सत्तेवर येण्याची भाजपा स्थिती कधीच नव्हती. तेथला त्यांचा पराभव असंगासी संग केल्यामुळे झालेला आहे. गोव्यात कोणत्याही पक्षाला आतापर्यंत काठावरच बहुमत मिळाले असून अनेक वेळा युतीचे शासन ही तेथील अपरिहार्यता ठरत आलेली आहे. मणिपूरमध्ये भाजपा प्रथमच फार जागा मिळवून आघाडीवर आला आहे. भाजपाने उत्तराखंडात प्रचंड मताधिक्य आणि उत्तर प्रदेशातही प्रचंड मताधिक्य मिळविले आहे. या सर्व निवडणूक निकालांचे विश्लेषण पारंपरिक पध्दतीने - म्हणजे जसे आपले विश्लेषक करीत असतात तसे करून काही उपयोगाचे नाही. एका वेगळया दृष्टीकोनातून या सगळया निकालाकडे पाहिले पाहिजे.

समुत्कर्ष भावनेचा विजय

हा विजय हिंदुत्वाचा आहे काय? म्हटले तर आहे आणि म्हटले तर नाही. विद्वान विश्लेषकांनी हिंदुत्वाची जी विषयसूची ठरविली होती, त्यापैकी एकही विषय निवडणूक प्रचाराचा विषय नसल्याने त्यांच्याच तर्कशास्त्राप्रमाणे हा हिंदुत्वाचा विजय नाही, पण तसे नाही. हा विजय हिंदुत्वाचा आहे. कारण नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यापासून बहुतेक केंद्रीय आणि राज्यस्तरीय नेते संघविचारधारेतून आलेले आहेत. संघाची विचारधारा हिंदुत्वाची आहे. हिंदुत्व समजून घेऊन आणि राजकारणात ते कसे व्यक्त करायचे? हे काम भाजपाचे. संघस्वयंसेवक रोज संघाची प्रार्थना म्हणतो. या प्रार्थनेत परमेश्वराला वंदन केल्यानंतर तो म्हणतो की, मला समुत्कर्षासाठी तू आशीर्वाद दे, क्षमतावान कर. समुत्कर्ष याचा अर्थ कोणता? त्याचा अर्थ आजच्या परिभाषेत सांगायचा, तर सामाजिक न्याय, सर्वांचे कल्याण, सर्वांचा ऐहिक उत्कर्ष; राजकीय परिभाषेत सांगायचे, तर 'सब का साथ, सब का विकास.' कोणी अस्पर्श, अस्पृश्य, अनालक्षित राहणार नाही याची चिंता. नरेंद्रभाईंनी संघासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. देशाचा पंतप्रधान म्हणून काय करायचे हे त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही, कारण काय करायचे, कसे करायचे हे ते पूर्ण जाणून आहेत. मला विरोधकांनी, अतिविद्वानांनी ठरविलेला हिंदुत्वाचा अजेंडा राबवायचा नसून समुत्कर्षाचा अजेंडा, सर्वांगीण विकासाची विषयसूची राबवायची आहे, हे त्यांना 14 मे 2016पासूनच माहीत आहे. म्हणून हा विजय समुत्कर्ष भावनेचा विजय आहे.

हा विजय नरेंद्र मोदी या एका व्यक्तीचा विजय आहे का? म्हटले तर आहे आणि म्हटले तर नाहीदेखील. निवडणूक प्रचारकाळात मोदींनी दोनशेहून अधिक सभा घेतल्या. सारा उत्तर प्रदेश पिंजून काढला. आपले शासन कोणता विकासाचा अजेंडा घेऊन उभे आहे हे सांगितले. त्यांच्या कष्टाला काही सीमा नाहीत; परंतु भाजपा ज्या संघसंस्था जीवनाचा भाग आहे, त्या संस्थाजीवनात सामूहिकतेला सर्वाधिक महत्त्व असते. एक व्यक्ती कितीही मोठी झाली, तरी त्या व्यक्तीच्या पाठीशी कार्यकर्त्यांची सेना लागते. म्हणून नरेंद्र मोदी यांचा जसा हा विजय, तसा तो लाखो कार्यकर्त्यांच्या सामूहिक वृत्तीचाही विजय आहे. सामूहिक मानसाचा एक विचार आहे, जीवनमूल्ये आहेत. नरेंद्र मोदी यांचे प्रतीक झाले आहेत. त्यांचे ते प्रतिनिधित्व करतात.

भाजपा जिंकला, अन्य सर्व हरले असा हा विजय नसून हा विजय राष्ट्रवादाचा विजय आहे. गेल्या वर्षापासून राष्ट्रवादावर आपल्या देशात वेगवेगळया प्रकारची चर्चा चालू आहे. 'देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती' (Patriotism vs Nationalism) या दोन वेगळया गोष्टी आहेत. 'देशभक्त ठरण्यासाठी अमुक अमुक गोष्टी मी केल्याच पाहिजेत असे नाही, मी स्वतंत्र माणूस आहे. मला काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य आहे' अशा प्रकारे ही चर्चा चालली. भारतातील सर्वसामान्य माणसाला यापैकी फारसे काही समजत नाही. स्वयंघोषित विद्वानांची मते त्याच्या डोक्यावरून जातात. त्याच्या डोक्यात 'वाराणसी माझी आहे, गंगा माझी आहे, परिसर आणि निसर्ग माझा आहे, संत माझे आहेत' हे पक्के बसलेले असते. त्याला 'हर हर गंगे, जय शिवशंकर'ची भाषा चटकन समजते. शेवटी राष्ट्रवाद म्हणजे तरी काय? आपल्या भूमीवर, निसर्गावर, नद्यांवर, पवित्र स्थानांवर, साधुसंतांवर श्रध्दा ठेवणे याचेच दुसरे नाव राष्ट्रवाद. विद्वानांची परिभाषा वेगळी असते आणि सामान्यजनांची भाषा वेगळी असते. आपल्या परंपरा, आपल्या श्रध्दा, आपले आदर्श जगण्याची आणि प्रसंगी प्राणत्याग करण्याचीही प्रचंड प्रेरणा आणि ऊर्जा तयार करतात. भाजपाचे उमेदवार राष्ट्रवादी आहेत. राष्ट्र प्रथम मानणारे आहेत. देशासाठी काम करणारे आहेत, यावर जनतेने पसंतीची मोहोर उमटवली आहे.

घराणेशाहीचा पराभव

हा विजय जातवाद, धर्मवाद आणि घराणेशाहीच्या पराभवाचा आहे. भाजपा ज्या संघसंस्कारातून आला आहे, त्या संस्कारात जातवाद, धर्मवाद आणि घराणेशाही यांना थारा नाही. 'आसेतुहिमालय भारत एक', भारताचे जन एक, भारत आमची मायभूमी, आम्ही सर्व तिची संतान, आमच्यात कोणी जन्माने लहान-मोठा नाही, कोणी अस्पृश्य नाही' हा संघविचार आहे. तो घेऊन राजकारण करताना दलित व्होट बँक, मुस्लीम व्होट बँक, सवर्ण व्होट बँक असा विचार करता येत नाही. आपण सर्व प्रथम भारतीय आणि नंतरही भारतीयच, हीच राजकीय भूमिका ठेवावी लागते. भाजपाने या निवडणुकीत या विचारांचे अनुसरण केल्याने दलितांचे, मुस्लिमांचे, सवर्णांचे - म्हणजे कुणाचेही तुष्टीकरण केले नाही. सामान्य भारतीय माणसालाही ते नको असते. माझ्याकडे दलित, मुसलमान, सवर्ण म्हणून पाहू नका, एक माणूस म्हणून पाहा, एक भारतीय म्हणून पाहा अशी सामान्य भारतीय माणसाची अपेक्षा असते. मला राजकारणात तरी माझी ओळख एक भारतीय अशी घडवू द्या, ही त्याची रास्त अपेक्षा असते. मायावतीच्या जातवादाला, यादवांच्या यादवीला आणि मुस्लीम तुष्टीकरणाला तसेच गांधी घराण्याच्या घराणेशाहीला लोक कंटाळले आहेत. मतदारांनी त्यांना कठोर आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त केले आहे.

हा विजय म्हणजे पुरस्कार वापसी करणाऱ्यांच्या, सहिष्णुतेचे पाठ देणाऱ्यांच्या, देशाच्या उदारमताचा ठेका घेतलेल्यांच्या पेकाटात मतदारांनी मारलेली सणसणीत लाथ आहे. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही लाथ एकदा बसली होतीच. तिची पुनरावृत्ती झाली, एवढेच. सामान्य माणूस आपल्या रोजच्या जीवनात जी सहिष्णुता जगतो, त्याला जगात तोड नाही. घराजवळील मशिदीवरील कर्कश बांग दिवसा तो पाच वेळा ऐकतो. मिशनरी करीत असलेले धर्मांतर तो पाहतो, कांदा कधी पन्नास रुपये किलोने खरेदी करतो, प्रचंड गर्दीत रेल्वेने प्रवास करतो, टी.व्ही.वरील अतिशय रटाळ, अर्थहीन मालिका तो सहन करतो, मालिकांतील अतिशय पांचट विनोद तो सहन करून हसतो. अशा माणसांना सहिष्णुता शिकविण्याचा आव अतिशहाणाच आणू शकतो. पुरस्कार वापसीवाले अतिशहाणे असल्याने त्यांना हे धाडस शोभून दिसले. सहिष्णू लोकांचे शासन कधीच असहिष्णू असू शकत नाही. त्यांनी तसा प्रयत्न केल्यास जनता त्यांना पायदळी तुडविल्याशिवाय राहात नाही. 1977 साली देशाने याचा अनुभव घेतलेला आहे.

लंडनच्या 'दि गार्डियन' पत्राने 2014च्या विजयावर भाष्य करताना म्हटले की, '16 मे या दिवसाचे 'इंग्रजांनी भारत कायमचा सोडला तो दिवस' या शब्दांत वर्णन करावे लागेल.' आताच्या भाजपा विजयाबद्दल (महाराष्ट्र धरून) असे म्हणता येईल की जातवाद, भाषावाद, जमातवाद, धर्मवाद, घराणेशाहीवाद यांचे राजकारण करण्याचा कालखंड संपला असून आता खऱ्या अर्थाने देशाचे राजकारण करण्याचा कालखंड आला आहे. राजकारणाचे देशीकरण होण्याचे युग आता सुरू झाले आहे. देशीकरण म्हणजे हा देश काय आहे? लोक कसा विचार करतात? आपल्या मूल्यपरंपरा काय आहेत? आपले संचित वैचारिक धन काय आहे? लोकांच्या राष्ट्रीय आकांक्षा कोणत्या आहेत? हे सर्व जाणून राजकारण करण्याचे दिवस आता येत चालले आहेत. मला वाटते राजकारणाचे हे मूल्यात्मक परिवर्तन आहे.

vivekedit@gmail.com