वेळेशी गट्टी जुळता...

विवेक मराठी    20-Mar-2017
Total Views |

 एखाद्या व्यक्तीमध्ये 'हात लावेल तिथे पाणी काढेल' म्हणतात ना, तसं धैर्य आणि आत्मविश्वास आहे, ती व्यक्ती पूर्णत: सकारात्मक, आशावादी आहे. सर्वांशी तिचे नातेसंबंधही चांगले आहेत. इतरांना समजून घेण्याची अन् समजावून देण्याची क्षमतादेखील वाखाणण्याजोगी. त्याने एक ध्येयदेखील निश्चित केलं. पण या व्यक्तीकडे केवळ एकच कमतरता आहे - वेळेचं नियोजन! त्यामुळे मार्गी लागणारी कामं कमी अन् साठलेली जास्त. म्हणूनच आपल्याला निसर्गत: काळाचं बंधन आहे याचं भान ठेवणं आणि त्यासाठी उपलब्ध वेळेचं व्यवस्थापन समजून घेणं आणि आत्मसात करणं हा व्यक्तिमत्त्व विकासातला पायाचा दगड आहे.

'क्षितिज'च्या माध्यमातून विविध ठिकाणी, विविध वयोगटांसाठी कार्यशाळा होत असतात. या दरम्यान खूप माणसं भेटतात, अभ्यासायला मिळतात. तसं म्हटलं, तर प्रत्येक माणूस एकमेवाद्वितीयच, पण तरीही काही बाबतीत मात्र त्यांच्यात कमालीचं साम्य जाणवतं.

अशीच मला जाणवलेली एक गोष्ट. मुलं, प्रौढ आणि वृध्द या साऱ्यांनाच कार्यशाळेदरम्यान एक प्रश्न विचारला जातो - ''कोणकोणत्या गोष्टी करायच्या राहून गेल्या असं वाटतं?'' थोडं आठवून मोठी यादी तयार होते. मग त्यांना त्या गोष्टी न केल्याचं कारण विचारलं जातं, तेव्हा बहुतांश प्रश्नांची उत्तरं 'वेळ मिळाला नाही' अशीच असल्याचं आढळलं.

आपणदेखील अनेकदा 'वेळ मिळाला नाही' या गोष्टीसाठी खंतावतो. कधी तर असंही घडतं - एखादी चांगली संधी येते अन् जाते, ती गेली की आपल्याला जाणवतं, 'अरे, वेळच नाही मिळाला.' कधी एखादे नात्यातले वा परिचित आजारी असल्याचं कळतं, आपण भेटायला जायला हवं असं म्हणतोही आणि जेव्हा ज्यांना भेटायला जायचं होतं ते कायमचे निघून गेलेत हे कळतं, तेव्हा आपण लगेच म्हणतो, ''अरेरे!! तेव्हा वेळ मिळाला असता तर किती बरं झालं असतं, भेट तरी झाली असती.''

विद्यार्थ्यांना परीक्षेवरून आल्यावर वाटतं, 'छे, वेळ पुरला नाही, खरं तर मला सगळं येत होतं.'

आपल्याला कुणाकडे भेटायला जाण्यास, आपली कामं मुदतीत पूर्ण करण्यास कुणी अडवत असेल, तर 'हा वेळ' असं म्हणून आपण वेळेला खलनायकच बनवून टाकतो. पण खरंच वेळ वाईट असते का? किंवा प्रत्येकाला ती वेगवेगळी असते का?

पूर्वी दूरदर्शनवर 'महाभारत' ही मालिका प्रत्येक रविवारी लागायची. महेंद्र कपूर यांच्या आवाजातलं गाणं (टायटल साँग) झालं की ब्रह्माडांच्या पार्श्वभूमीवर फिरणारी पृथ्वी दिसायची आणि धीरगंभीर आवाज यायचा, 'मैं समय हूँ'. तेव्हा एवढंच कळायचं की त्या साऱ्या घटनांची साक्षीदार आणि तरीही तटस्थ असलेली अशी ही व्यक्ती असावी. सर्वव्यापी असते, पण दिसत नाही.

खरंच काळाच्या पटलावर अगणित व्यक्ती, घराणी, राज्य, संस्कृती आल्या अन् गेल्या. ज्यांना देवत्व बहाल केलं, ते महामानव राम, कृष्ण आणि बुध्द यांनाही काळाच्या चक्रातून फिरावंच लागलं.

उत्पत्ती, स्थिती आणि लय हे कालचक्र सतत फिरतच आहे. काळ कोणासाठी थांबला नाही आणि थांबणारही नाही. तो तटस्थ असतो, पण निष्ठूर नाही हं...! बघा ना, रोज उगवत्या सूर्यासह 86,400 सेकंदांची, म्हणजेच 24 तासांची भेट तो प्रत्येकाला निष्पक्षपणे देतोच ना!! एके ठिकाणी रवींद्रनाथ ठाकूर म्हणतात, 'फूलपाखरू स्वत:च आयुष्य महिन्यांत नव्हे, तर क्षणाक्षणात मोजतं, कारण त्याला माहितेय त्याच्याकडे वेळ मर्यादित आहे. खरं तर माणसालादेखील वेळ मर्यादितच आहे. मृत्यूची सीमा काळाने प्रत्येकासाठी, त्याच्या कर्तृत्वासाठी घातलेली आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं आणि अशा मर्यादित गोष्टीचा 'वापर' म्हणण्यापेक्षाही उपयोग कसा करावा, याचं चिंतनही करायला हवं.'

एमर्सन हा विद्वान म्हणतो - 'प्रत्येक वेळ ही सारखीच असते. तुम्ही तिचा कसा उपयोग करता, त्यानुसार ती चांगली वा वाईट ठरते. काळाचं देणं सगळयांना सारखंच राहिलंय. रोजचे 24 तास. पण काही माणसांनी त्यावर आपलं नाव कोरलं. काय असेल बरं याचं कारण? अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण आहे की ते काळाला ओळखू शकले. त्याला समजून घेऊ शकले. काळाच्या हातात हात घालून चालताना त्याच्या पावलांचा मागोवा घेणं त्यांना साध्य झालं.'

स्वामी विवेकानंदांचं जीवन आणि साहित्य पाहा ना! किती पुढचा विचार केला त्यांनी... भूतकाळात गडप झालेल्या वेदान्ताचं पुनरुज्जीवन करताना त्यांनी भविष्याचा अचूक वेध घेतला. म्हणून तर आज 125 वर्षं उलटून गेल्यावरही त्यांचं साहित्य आपल्याला गीतेसारखं मार्ग दाखवतं. डॉ. हेडगेवार, स्वातंत्र्यवीर सावरकर,
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अशा कितीतरी व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रातून हेच दिसतं की त्यांनी काळाचा महिमा जाणला, काळाशी सलगी केली, म्हणून तर इतिहासाला त्यांनी उज्ज्वल केलं.

एका ठिकाणी लिहिलं होतं, वेळ उडून जातो ही वाईट गोष्ट आहे, पण चांगली गोष्ट ही आहे की वेळेचे पायलट तुम्ही आहात.

म्हणजे बघा हं, एखाद्या व्यक्तीमध्ये 'हात लावेल तिथे पाणी काढेल' म्हणतात ना, तसं धैर्य आणि आत्मविश्वास आहे, ती व्यक्ती पूर्णत: सकारात्मक, आशावादी आहे. सर्वांशी तिचे नातेसंबंधही चांगले आहेत. इतरांना समजून घेण्याची अन् समजावून देण्याची क्षमतादेखील वाखाणण्याजोगी. त्याने एक ध्येयदेखील निश्चित केलं. पण या व्यक्तीकडे केवळ एकच कमतरता आहे - वेळेचं नियोजन! त्यामुळे मार्गी लागणारी कामं कमी अन् साठलेली जास्त.

यामुळे काय काय होईल बरं? पहिला परिणाम म्हणजे Short term goal पूर्ण होणार नाहीत. मग कामाचा ताण येऊ लागतो. ताण पहिलं आक्रमण करतो ते आत्मविश्वासावर. एकदा स्वत:बाबतची खात्री डळमळीत झाली की मग अज्ञातातल्या सकारात्मकतेवर विश्वास दाखवणं कठीण होतं. मग प्रत्येक कौशल्य निष्प्रभ ठरू लागतं.

म्हणूनच आपल्याला निसर्गत: काळाचं बंधन आहे याचं भान ठेवणं आणि त्यासाठी उपलब्ध वेळेचं व्यवस्थापन समजून घेणं आणि आत्मसात करणं हा व्यक्तिमत्त्व विकासातला पायाचा दगड आहे.

आता वेळेला समजून घ्यायचं, तर आधी आपण वेळेकडे कसं पाहतो ते समजून घेऊ. कुणी दोन मित्र, नातेवाईक, परिचित भेटले तर म्हणतात, ''यायचं आहे हो तुमच्याकडे, पण वेळच नाही होत.'' आपण अनेक कामं आळसाने किंवा महत्त्वाची नाहीत असं वाटल्याने करणं टाळतो. पण जेव्हा त्याची जबाबदारी घ्यायची वेळ येते, तेव्हा खुशाल वेळेच्या खात्यात दोष जमा करतो. काही जण म्हणतात, ''ऑफिसच्या, व्यवसायाच्या व्यापात वेळच नाही होत,'' तर काही व्यक्ती घरच्या जबाबदाऱ्यांचं कारण पुढे करतात.

या संदर्भात एक गोष्ट वाचनात आली. एकदा महाराजांनी सर्व विद्वानांना आमंत्रित केलं. महाराजांनी सर्वांना आधीच सांगितलं होतं की आपण आपापल्या भागातील सामाजिक कामात योगदान द्या. एक विद्वान मात्र आज्ञापालन करत नसल्याची माहिती महाराजांना मिळाली. त्यांनी थेट त्या विद्वानाला प्रश्न केला. ''आपण या मोहिमेत सहभागी होत नाही. याचे कारण काय?'' राजाच्या प्रश्नाने विद्वान क्षणभर बावरला, पण लगेच सावरून म्हणाला, (शेवटी तो विद्वानच!) ''महाराज, मला इच्छा तर आहे, पण सांसारिक जबाबदाऱ्यांनी मला अगदी बांधून ठेवलंय. वेळच होत नाही.'' महाराजांनी मान हलवली. विद्वान स्वत:च्या उत्तरावर मनातल्या मनात खूश झाला. इतक्यात महाराज त्या विद्वानाला म्हणाले, ''हे काय होतंय बघा. मला इथून उठायचंय, पण... पण हे सिंहासन मला सोडत नाहीये. काय करावं? मार्ग सुचवा.'' तो विद्वान म्हणाला, ''महाराज, ते सिंहासन कसं धरून ठेवू शकतं? तुम्ही उठायचं ठरवलं तर नक्की उठाल.'' महाराज म्हणाले, ''अहो महाशय, मी खरंच सांगतो. तुमच्या संसाराने तुम्हाला जसं पकडलंय, तसंच या सिंहासनाने मला पकडलंय.'' विद्वानाच्या सारं काही लक्षात आलं.

असं अनेकदा घडतं, माणूस निमित्तांची ढाल करून काम टाळतो. पण म्हणतात ना 'आवड असेल तर सवड नक्कीच मिळते.' अर्थात वेळ नाही किंवा अन्य कामांतून वेळच मिळत नाही हा आपण आपल्या इच्छा नसण्याला किंवा नियोजन नसण्याला दिलेला मुलामा असतो. पटतंय ना?

चाणक्य एका ठिकाणी म्हणतात, 'अभ्यास विषय अगणित आहेत, पण आपल्याकडे वेळ सीमित आहे. अडचणी अनेक आहेत. यासाठी राजहंसासारखी पारख करून योग्य गोष्टीच निवडा.' हाच न्याय कामांबाबत. जी कामं आवश्यक आहेत ती आधी केलीच पाहिजेत. विचार करा. डॉक्टरांकडे जाणं हे कोणाला आवडतं? पण ते योग्य वेळी केलं नाही, तर स्वत:च्या पायावर दगड मारण्यासारखंच आहे की नाही?

म्हणूनच आज आपण घडयाळाच्या काटयांसह स्वत:ची गती कशी जुळवायची ते समजून घेऊ.

सुरुवातीला आपण आपली साधारण दिनचर्या निश्चित करू. सुट्टीच्या दिवशी थोडा बदल घडेल, पण मुख्य चौकट तीच राहील.

8 तास झोप, 8 तास काम (शाळा, नोकरी, व्यवसाय, गृहिणीची जबाबदारी) हे तर ठरलेलं आहे. आता आपल्या हातात 8 तास राहणं अपेक्षित. ह्या 8 तासांत स्वत:ची वैयक्तिक कामं, कुटुंबातील आपली जबाबदारी असणारी कामं आणि सामाजिक स्तरावर असलेली कामं आपल्याला बसवायची आहेत. या 8 तासांचं कौशल्याने नियोजन केलं, तर पश्चात्तापाची संधी आपण स्वत:ला देणार नाही.

योग्य वेळी काम व्हावं आणि योग्य प्रकारे व्हावं असं वाटत असेल, तर रोज रात्री 'उद्या करायच्या कामांची यादी' (To Do List) बनवावी. यासाठी पाठकोरे कागद, ट्रेन-बसची तिकिटं यांचा वापर करावा. दुसऱ्या दिवशी झालेल्या कामांना टिक करावी, न झालेली कामं पुढील दिवशीच्या यादीत लिहावीत.

याचे काही मानसशास्त्रीय लाभ आहेत. ही कामं लिहिताना मानसिक पातळीवर आपण जणू काही ती करतच असतो, त्यामुळे त्यांना स्वीकृती मिळते. त्यांच्यावर नियंत्रण असल्याचं जाणवतं आणि आपला आत्मविश्वासही वाढतो.

आपण एका आठवडयाची, पंधरा दिवसांची किंवा एखाद्या विशिष्ट प्रवासाची, कार्यक्रमाचीदेखील अशी यादी तयार करू शकतो.

आता आपण एक उदाहरण पाहू. एका महाविद्यालयीन युवकाने त्याची यादी तयार केली. आता त्याला त्याची विभागणी चार भागात करायची आहे.

1) आवश्यक आणि तातडीने करायची कामं - Accountचा Problem सोडवणं. नोटस् पूर्ण करणं. दाताच्या डॉक्टरकडे जाणं.

2) आवश्यक पण सवडीने करण्यासारखी कामं - पुढील वर्षीच्या टयूनशची चौकशी करणं, इस्त्रीचे कपडे आणणं.

3) तातडीने करायची पण आवश्यक नसलेली कामं - मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं, एकांकिका स्पर्धेसाठी ग्रूपचं नाव देणं.

4) आवश्यक नसलेली व सवडीने करायची कामं - रद्दी पेपर बांधून ठेवणं, इंटरनेट रिचार्ज करणं.

सोपं झालं ना आता नियोजन? पहिल्या गटातली कामं प्राधान्याने आपणच करायची आहेत. दुसऱ्या गटातली कामं आजची उद्या झाली, तरी चालणारी आहेत. तिसऱ्या गटातली काम आपण स्वत: नाही करू शकलो, तरी पर्यायी व्यवस्था वापरू शकतो - उदा., फोनवर शुभेच्छा देणं, बिल दुसऱ्या कुणालातरी भरायला देणं. आणि चौथ्या गटातली कामं ही जेव्हा मोकळा वेळ खूप असेल तेव्हा आरामात करून चालणारी आहेत.

या पध्दतीने विचार केला, तर रखडलेली कामं मार्गी लागतील, असा अनुभव आहे.

आमच्या कोकणात एक म्हण आहे - 'वेळेवर वेळ अन् शिमग्यावर खेळ' म्हणजे ज्या वेळची कामं त्याच वेळी करावीत. एखाद्या परिचित व्यक्तीच्या घरी कुणाचा मृत्यू झाला, तर त्यांना भेटायला जाण्याचा योग्य कालावधी, योग्य वेळ आपण समजून घेतली पाहिजे व पाळलीही पाहिजे.

विद्यार्थिदशेत अनेकदा आपण कामं पुढे ढकलतो. नंतर-नंतर म्हणत अगदी गळयाशी आलं की आपली धावपळ होते. असाइनमेंट, प्रोजेक्ट डेडलाइनच्या आधी पूर्ण करणं म्हणजे जणू पराक्रमच समजला जातो! पण काम पुढे ढकलून आपण त्यावरचं आपलं नियंत्रण घालवत असतो. याकरिता काम पुढे ढकलणं टाळावं.

काही व्यक्तींना वेळ पुरत नाही, कारण ते कामांच्या क्रमवारीत चूक करतात. नंतर करण्याचं काम आधी केलं की वेळेची अडचण भासतेच. समजा, आपल्याला अचानक फोन आला की एक तासात आपल्या घरी पाहुणे येणार आहेत. आपण घरात सगळा पसारा काढून ठेवला आहे. तर आपण कुठून सुरुवात करू? पाहुणे येणार, बसणार ती बैठकीची खोली आधी साफ करू. व्यवस्थित लावू. मग स्वत:ची तयारी आणि मग त्यांच्या खानपानाची व्यवस्था. पण हा क्रम उलटा झाला तर कदाचित असंही घडेल - पाहुणे दारात येताच त्यांना खमंग उपम्याचा वास येईल, आपण छान आवरून त्याचं स्वागत केल्याने त्यांना प्रसन्नही वाटेल, पण घरात पाऊल टाकताच अस्ताव्यस्त असलेली बैठकीची खोली दिसेल! याकरिता आधी काय अन् नंतर काय याचा तारतम्याने विचार करावा.

कधीकधी मनात उठणाऱ्या इच्छा किंवा बाहेरून येणारी प्रलोभनं आपल्याला वेळेच्या बांधिलकीपासून परावृत्त करतात. कधी एखादा विद्यार्थी ठरवून रविवारी दुपारी अभ्यासाला बसतो आणि मित्राचा फोन येतो - 3 ते 6ची पिक्चरची तिकिटं मिळाली आहेत, लगेच निघ. तर कधी आपल्या पत्नीला मदत करायचं ठरवून पतिराज घरातल्या एखाद्या कामाला सुरुवात करतात आणि टी.व्ही.वर भारत-पाकिस्तान वनडेची कॉमेंट्री ऐकू येते. अशा वेळी हाती घेतलेल्या कामाशी बांधिलकी ठेवता आली पाहिजे किंवा आपल्या क्षमतेबाहेरील कामांना नाही म्हणता आलं पाहिजे. वेळ आपल्याला यशाकडे नेणार आहे. मग नाही कोणाला म्हणावं? क्षणाच्या मोहाला की आश्वासक वेळेला?

आपल्या वेळेच्या नियोजनात जेवण आणि विश्रांती यांना योग्य आणि पुरेसा वेळ दिला पाहिजे.

आज जर आपल्या समाजात वैयक्तिक आरोग्यावर प्रकाश टाकला, तर 'व्यायाम' या गोष्टीला वेळ देणं आपली अन् काळाची गरज झाली आहे. अन्यथा महिन्यातून दोनदा पॅथॉलॉजीत जाणं, डॉक्टरांना भेटायला जाणं, 10 प्रकारच्या गोळया 3 वेळा घेणं, जिना चढताना 2-3 वेळा थांबणं आणि सतत तब्येतीच्या चिंतेने ग्रस्त होणं यात जाणारा वेळ हा व्यायामाच्या तिप्पट असेल.

परीक्षेच्या काळात कसं आपण 'Mark's economy'नुसार उत्तर लिहितो. एक प्रश्न आहे - स्वत:बद्दल काय सांगाल? तर आपण आधी काय करू? तर त्या प्रश्नाकरिता किती गुण आहेत ते पाहू आणि त्यानुसार उत्तर देऊ. मग हाच न्याय कामांना. कामाच्या महत्त्वानुसार त्याला वेळेची मर्यादा ठरवून घेऊ या.

काम म्हणजे वेळेने दिलेली संधी आहे - प्रगतीची, स्वत:ला सिध्द करण्याची. म्हणून या दोघांचाही (काम आणि वेळ यांचा) सन्मान करू या. हाती घेतलेलं काम लक्ष देऊन, मन लावून पूर्ण करू या.

विश्रांती आपल्याला रिलॅक्स करते. शेवटी आपण माणूस आहोत. यंत्र नाही. दोन कामांच्या मध्ये थोडी विश्रांती घेऊ या.

आपण प्रवासात असतो किंवा डॉक्टर, बँका यांच्या दाराबाहेरच्या रांगेत आपला नंबर येण्याची वाट पाहतो. या वेळेत काही लहान-लहान कामं करता येऊ शकतात - वाचन, लेखन, Online करण्याची कामं, राहिलेले फोन कॉल्स, आपल्या पुढील आठवडयाचं, महिन्याचं नियोजन इ.

कधी वेळेच्या आधी काम करण्याचा मोहात आपण भरभर काम करतो आणि तिथेच गडबड होते. तुम्हाला स्टेशनवरून घरी यायला 15 मिनिटं चालत यावं लागतं, तेच अंतर आज तुम्ही 8 मिनिटांत कापण्याचा अट्टाहास केलात, तर काय होईल? तर घरी आल्यावर जो थकवा येईल, त्यामुळे अर्धा तास वाया जाईल. ह्यामुळे काम निर्दोष करायचं, तर प्रत्येक गोष्टीला पुरेसा वेळ दिलाच पाहिजे.

काही कामं एकाच वेळी किंवा एकामागोमाग एक करता येतात, याचा युक्तीने विचार करावा. यामुळे वेळेचा पुरेपूर वापर होईलच, शिवाय कष्ट वाचतील. त्या बिरबलच्या गोष्टीत नाही का बादशहाचा मेहुणा रुसला, ''सारखं बिरबल बिरबल... असं काय आहे त्याच्यात?'' बादशहा त्याला म्हणाला, ''जा बरं, हा आवाज कसला आहे ते पाहून ये.'' त्याने जाऊन पाहिलं नि येऊन सांगितलं, ''लग्नाची वरात जातेय.'' बादशहा म्हणाला, ''कोणाचं लग्न?'' तो पुन्हा धावत गेला. मग पुन्हा बादशहाचा प्रश्न - ''कुठे चालली वरात?'' अशा सात प्रश्नांना सात फेऱ्या मारून मेहुणा बेजार झाला. मग बादशहाने बिरबलला दरबारात बोलावलं आणि तोच प्रश्न विचारला, ''हा आवाज कसला बरं?'' बिरबल गेला अन् सगळी माहिती एकाच वेळी घेऊन आला.

थोडक्यात काय, Hard workपेक्षा Smart work ही काळाच्या परीक्षेत पास होण्याची गुरुकिल्ली आहे.

आपण या साऱ्या तंत्रांनी वेळेशी छान मैत्री केली. वेळेचा योग्य वापर करू लागतो, कामं योग्य प्रकारे होत गेली. त्यातून यश मिळू लागलं की स्वत:ला काहीतरी बक्षीस द्यावं. आपल्या प्रत्येकात एक लहान मूल दडलंय. ते सुखावलं की अधिक चांगलं वागू लागतं.

'वेळेचं नियोजन आणि व्यवस्थापन' आत्मसात करत आपल्या व्यक्तिमत्त्वात आणखी एका रंगाची भर घालू या...!

लेखिका समुपदेशक आहे

9823879716

suchitarb82@gmail.com