....आणि शूर जवान चंदू चव्हाण परतला

विवेक मराठी    21-Mar-2017
Total Views |

 एकीकडे मैत्रीचा हात पुढे करायचा नि दुसरीकडे आपल्या भारतीय सैन्यतळावर अगर निरपराध नागरिकांवर गोळया झाडायच्या, असे षड्यंत्र रचणारा देश चंदू चव्हाणला सहजासहजी सोडेल यावर कोणाचा विश्वास बसणारा नव्हता. मात्र शनिवार  दि. 21 फेब्रुवारी 2017 रोजी रात्री पाकिस्तानने नाटयमयरित्या त्याची सुटका केली.

र्जिकल स्ट्राइकच्या धामधुमीत भारतीय सेना गुंतली असताना दुसरीकडे सीमा सुरक्षा दलातील जवान चंदू चव्हाणने भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषा ओलांडली. एकीकडे पाकिस्तानात घुसून त्यांना धडा शिकविल्याचा आनंद साजरा होत असताना, टेहळणी करणारा एक जवान पाकिस्तानव्याप्त काश्मिरात घुसल्याने त्याला झालेल्या अटकेबाबत हळहळही व्यक्त होऊ लागली होती. सर्जिकल स्ट्राइकमुळे मानहानी झालेला पाकिस्तान आपल्या जवानाची सुटका करेल का? असा प्रत्येक भारतीयांच्या मनातला सवाल चंदू चव्हाणच्या कुटुंबाचीही चिंता वाढवीत होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा वचक चंदूची सुटका करण्यास पाकिस्तानला भाग पाडेल, हा तमाम जनतेला विश्वास होता. चंदूच्या कुटुंबीयांनाही तो विश्वास होता. असे असले, तरी दोन देशांतील आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कार्यवाही झाल्याशिवाय चंदूची सुटका होणार नाही, हेदेखील सत्य होते. चंदूला झालेली अटक व सुटका यादरम्यान दोन्ही देशांमध्ये प्रशासकीय पातळीवर चर्चा झाल्या. दोन्ही देशातील सेनादलांमध्ये झालेल्या चर्चेमुळे व संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या शिष्टाईमुळे 6 महिने उलटल्यावर चंदू चव्हाण भारतात परतला. चंदूला घेऊन डॉ. भामरे दि. 11 मार्च रोजी दुपारी धुळयात दाखल झाले. धुळेकरांनी त्याचे जल्लोशात स्वागत केले. प्रारंभी त्याने शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळयाला अभिवादन केले. या वेळी उपस्थित जनसमुदायाने 'भारतमाता की जय', छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'वंदे मातरम्'चा जयघोष केला.

धुळयापासून जवळच असलेले धुळे-औरंगाबाद मार्गावरील बोरविहीर हे जवान चंदू चव्हाणचे गाव. शत्रूच्या तावडीतून परतलेल्या आपल्या 'छाव्याची' गाव अनेक दिवस प्रतीक्षा करीत होते. तो परतल्याचा निरोप गावाला मिळताच होळीच्या सणालाच संपूर्ण गावभर दिवाळी साजरी झाली. त्याच्या स्वागताला सगळा गाव लोटला होता.

चंदूने नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळे तो पाकिस्तानच्या तावडीत सापडल्याच्या धक्क्यानेच आजी लीलाबाई पाटील वारल्या होत्या. 11 मार्चला गावी परतल्यानंतर चंदूने नाशिक येथील गोदावरी पात्रातील रामकुंडामध्ये आजीच्या अस्थींचे विसर्जन केले. ''मी भाग्यवान आहे की मला देशाची सेवा करता येत आहे. देशातील जनतेचे माझ्यावरील प्रेम मी कधीही विसरू शकत नाही. सेनादलातील माझ्या सहकाऱ्यांचा, वरिष्ठांचा माझ्याप्रती असलेला जिव्हाळा मी कधीही विसरू शकत नाही,'' अशा शब्दात त्याने आपली कृतज्ञता व्यक्त केली.

तावडीत सापडलेल्या जवानांचा शिरच्छेद करणारे पाकिस्तान सरकार चंदूला सोडेल का? हा प्रश्न भारताला सतावीत होता. शहीद भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करणारा देश भारताच्या सुपुत्राला सहज सोडेल असे कधीच वाटले नाही. एकीकडे मैत्रीचा हात पुढे करायचा नि दुसरीकडे आपल्या भारतीय सैन्यतळावर अगर निरपराध नागरिकांवर गोळया झाडायच्या, असे षड्यंत्र रचणारा देश चंदू चव्हाणला सहजासहजी सोडेल यावर कोणाचा विश्वास बसणारा नव्हता. मात्र शनिवार दि. 21 फेब्रुवारी 2017 रोजी रात्री पाकिस्तानने नाटयमयरित्या त्याची सुटका केली. त्यानंतर गुप्तचर संस्थेने त्याला विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले. या काळात चंदू आपल्या गावी जाण्यासाठी उत्सुक होता. परंतु एका सैनिकाला सोडणाऱ्या पाकिस्तानच्या मनात काय आहे, हे जाणून घेतल्याशिवाय भारतीय सेना त्याला घराकडे जाऊ देण्यास कशी तयार होईल? अमृतसरहून दिल्लीला त्याची रवानगी झाली. तेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सविस्तर विचारपूस केली. पाकिस्तानात त्याच्याशी कसे वर्तन होते याचा अहवाल गृह मंत्रालयाने संबंधित संस्थांकडे मागितला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पार पडून गावी परतायला त्याला पुढचे 20 दिवस लागले.

30 सप्टेंबरच्या ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राइकच्या बातम्यांनी देशभर भारतीय सैनिकांच्या पराक्रमाने देशवासीयांचा ऊर अभिमानाने भरला असताना चंदू चव्हाण हा जवान पाकिस्तानच्या कब्जात सापडल्याच्या वार्ता धडकल्या. सेनेच्या 37व्या राष्ट्रीय रायफलच्या तुकडीत तो होता. तो हल्ला करणाऱ्या तुकडीसोबत होता, असाही सुरुवातीला दावा करण्यात आला. परंतु नंतर तो टेहळणी करता करता त्याच्याकडून नियंत्रण रेषा ओलांडली गेल्याचे समजले. पाकिस्तानात चंदू चव्हाणचा शारीरिक छळ गेल्याच्या खुणा त्याच्या शरीरावर दिसत नसल्या, तरी त्याच्यावर मानसिक आघात करण्यात आल्याचे दिसून आल्याचे सेनादलाचे म्हणणे आहे. 21 फेबुवारीला सुटका झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरच त्याला कुटुंबीयांच्या भेटीसाठी गावाकडे जाऊ देण्यात आले.

पाकिस्तानच्या तावडीतून सुटून आल्यानंतर पुन्हा आपण देशसेवेसाठी सीमेवर जाणार असल्याचे चंदू चव्हाण यांनी सांगितले. त्याच्या या देशाप्रती असलेल्या निष्ठेबाबत सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे. तसेच त्याच्या सुटकेसाठी सतत प्रयत्न करणारे धुळे लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे व देशाचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे जनतेत कौतुक होताना दिसून आले.

& 8805221372