तिची ओळख

विवेक मराठी    24-Mar-2017
Total Views |

''वैनी, नमस्कार.!!!'' म्हणत पाच-दहा कार्यकर्त्यांचा घोळका दिवाणखान्यात येऊन स्थिरावला. वहिनींनीसुध्दा हसून नमस्कार केला. ''दादा येताहेत, चहा आणि नाश्ता केल्याशिवाय निघू नका'' असं म्हणत त्यांची पावलं स्वैपाकघराकडे वळली. चहा आणि नाश्ता दिवाणखान्यात न्यायला सांगून त्या दादांच्या बेडरूमकडे निघाल्या. दादांची तयारी पूर्ण होत होती. नेहरू जाकिटाचं शेवटचं बटण लावून त्यांनी हात पुढे केला. वहिनी लगबगीने पुढे सरसावल्या. खणातून काढलेल्या पांढऱ्याशुभ्र रुमालावर अत्तराचे दोन थेंब लावून त्यांनी तो दादांच्या हातात दिला. ''बाहेर कार्यकर्ते....'' वहिनींचं वाक्य पूर्ण होण्याआधीच दादा बेडरूमबाहेर पडले होते. दोन क्षण वहिनी बेडवर बसल्या, आणि कालची संध्याकाळ त्यांच्या डोळयांसमोर तरळली.

महाराष्ट्रातल्या अग्रगण्य मॅनेजमेंट कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा भेट सोहळा. पंचतारांकित वातावरण, जवळपास दहा वर्षांनंतर भेटताना असलेलं कुतूहल, उत्सुकता आणि आपण साधलेल्या आर्थिक आणि भौतिक प्रगतीच्या गप्पा आणि तयार केलेल्या स्वतःच्या ओळखीचं कौतुक... अशी भरगच्च संध्याकाळ. काल आपल्या बॅचमेट्सना भेटताना, त्यांची व्हिजिटिंग कार्ड्स घेताना वहिनींना जाणवलं - आपणही काही वर्षांपूर्वी ह्यांच्यातलेच होतो, मग आपली ओळख हरवलीये का? आणि त्यांना जाणवलं, आपण इथे आलो तेव्हाही 'कुणाचीतरी मुलगी' होतो आणि आज 'कुणाचीतरी बायको' आहोत. मुलगी ते वाहिनी या प्रवासात आपल्यातली 'ती' कुठेतरी हरवलीये.

 ह्याला सुरुवात कदाचित त्या दिवसापासून झाली असावी.  त्यांना लख्खपणे तो दिवस आठवला. गणपतराव देशमुख म्हणजे तिचे डॅडी. त्या दिवशी विधानसभेत 'स्त्री सबलीकरण' या विषयावर घणाघाती भाषण देऊन आले होते. तीसुध्दा कमालीची खूश होती. लवकरच नामांकित कंपनीत नोकरीचं स्वप्न तिने पाहिलेलं. त्याच दिवशी गणपतरावांनी तिच्यासमोर लग्नाचा विषय काढला आणि तिच्या आयुष्यात दादांची एंट्री झाली. युवराजदादा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील साखरसम्राट शंकरराव मोहित्यांचे सुपुत्र. कर्तृत्व शून्य असलं, तरी वडिलांची पुण्याई आणि पैसा यामुळे त्यांचं राजकीय भवितव्य उज्ज्वल होतं.

गणपतरावांसाठी हे लग्न म्हणजे एक राजकीय सोय होती. विधानसभेतून लोकसभेत जाण्याच्या तयारीसाठीची सोय. तिने विरोध केला, पण पप्पांपुढे तो टिकला नाही. कुणाला किती स्वातंत्र्य कसं द्यावं, हे घरातला कर्ता 'पुरुष' या नात्याने गणपतरावांनीच ठरवलं. आता तिची ओळख बदलली. ती वैनी झाली. 'दादांची बायको' म्हणून तिला लोक ओळखायला लागले. महिला दिनाच्या समारंभात दादांच्या बाजूला बसून ती स्त्री स्वातंत्र्यावर दोन शब्द दर वर्षी बोलायची. नव्या ओळखीला ती सरावली होती. तिची विरोधाची धार बोथट झाली होती

पण कालच्या त्या सोहळयाने तिला हलवून हलवून जागं केलं. कुठल्यातरी निश्चयाने ती उठली आणि बेडरूममधलं आपलं कपाट उघडलं. पार आत ठेवलेली एक बॅग काढली. तिच्यावरची धूळ झटकली. जणू त्या बॅगेत ती स्वतःलाच पाहत होती. त्यामध्ये होत्या तिच्या 'ऍचिव्हमेंट्स'. एक गोल्ड मेडल, 'बेस्ट लीडर'ची ट्रॉफी आणि सगळयात आत तिचं डिग्री सर्टीफिकेट. गोल्डन एम्बॉसिंग केलेल्या नावावरून तिने हात फिरवला आणि मनाशी एक निश्चय केला.

आता तिला स्वत:चा प्रवास स्वत: करायचा होता. स्वत:ची ओळख स्वत: निर्माण करायची होती. कुणाच्याही विरोधाला न जुमानता. दोन वर्षांच्या एमबीएमध्ये शिकवलेल्या बऱ्याचशा गोष्टी आता तिला 'ऍप्लाय' करायला लागणार होत्या. कुठल्याशा निर्धाराने तिने लॅपटॉप काढला आणि रेझ्युमे बनवायला घेतला. घरातल्या विरोधाचं 'SWOT Analysis' ही तिची पुढची स्टेप असणार होती. मुलगी आणि वाहिनी या पलीकडे जाऊन स्वत:ची ओळख तयार करण्याच्या मार्गावर तिचा प्रवास सुरू झाला होता.

9773249697

aabhish101010@gmail.com