अंदरकी बात

विवेक मराठी    24-Mar-2017
Total Views |

नॉर्मल माणसांमध्ये पेशींच्या आत शिरकाव करू शकणारं ग्लुकोज मर्यादित असतं. त्यामुळे पेशींची सर्वोत्तम यंत्रणा व्यवस्थित उपलब्ध होते. मधुमेहींमध्ये हा संदर्भ थोडा बदलतो. पेशींच्या आत येणारं ग्लुकोज बरंच जास्त असतं. वहिवाटीची रासायनिक यंत्रणा मर्यादित असल्याने प्रश्न निर्माण होतो. वाढीव ग्लुकोज ही वहिवाटीची यंत्रणा सोडून दुसऱ्या यंत्रणेची नाइलाजाने कास धरतं. राजमार्गावर वाहन कोंडी झाल्यावर लोकांनी शेजारच्या लहानसहान गल्ल्यांतून वाहनं न्यावीत, त्याप्रमाणे हे होतं. राजरस्ता नीट बांधलेला असतो, त्यावर सिमेंट-काँक्रीट किंवा ऍस्फाल्ट असतं, तिथे वाहनं फारशी गहजब करत नाहीत. पण छोटया कमी वाहतुकीच्या रस्त्यावरून जाताना वाजवीपेक्षा अधिक धुरळा उडतो, तसा काहीसा प्रकार इथेही होतो.

पेशींच्या आत शिरलेलं ग्लुकोज हाताळणाऱ्या आणि त्या ग्लुकोजपासून ऊर्जेची निर्मिती करणाऱ्या दोन यंत्रणा निसर्गाने माणसाला बहाल केल्या आहेत. दोन्ही यंत्रणांमध्ये ग्लुकोज हाच कच्चा माल असतो आणि शेवटी निघणारं उत्पादन म्हणजे ऊर्जा असते. परंतु या दोन्ही यंत्रणांमध्ये चालणाऱ्या रासायनिक घडामोडी मात्र बऱ्याच भिन्न असतात. हल्ली कित्येक मोटारगाडयांमध्ये पेट्रोल आणि सी.एन.जी. अशी दोन भिन्न इंधनं वापरून गाडी हाकण्याची सोय असते, त्यातलाच हा प्रकार. अर्थात त्या त्या क्षणाला ती गाडी जे इंधन वापरत असेल, त्याप्रमाणे त्यातून निघणारा धूर किंवा एक्झॉस्ट वायू बदलणार हे जसं खरं, तसंच या पेशींचं असतं. ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्या जी यंत्रणा वापरत असतील, त्याप्रमाणे त्या त्या रासायनिक प्रक्रियेतून निर्माण होणारं रसायन वेगवेगळं असतं.

 नॉर्मल माणसांमध्ये पेशींच्या आत शिरकाव करू शकणारं ग्लुकोज मर्यादित असतं. त्यामुळे पेशींची सर्वोत्तम यंत्रणा व्यवस्थित उपलब्ध होते. नेहमीच्या रुळलेल्या रासायनिक प्रक्रियेचा उपयोग करून घेते. त्यातून निघणारी रसायनं पेशींना फारशी इजा करत नाहीत. सगळं कसं बिनबोभाट चालतं. मधुमेहींमध्ये हा संदर्भ थोडा बदलतो. पेशींच्या आत येणारं ग्लुकोज बरंच जास्त असतं. वहिवाटीची रासायनिक यंत्रणा मर्यादित असल्याने प्रश्न निर्माण होतो. वाढीव ग्लुकोज ही वहिवाटीची यंत्रणा सोडून दुसऱ्या यंत्रणेची नाइलाजाने कास धरतं. राजमार्गावर वाहन कोंडी झाल्यावर लोकांनी शेजारच्या लहानसहान गल्ल्यांतून वाहनं न्यावीत, त्याप्रमाणे हे होतं. राजरस्ता नीट बांधलेला असतो, त्यावर सिमेंट-काँक्रीट किंवा ऍस्फाल्ट असतं, तिथे वाहनं फारशी गहजब करत नाहीत. पण छोटया कमी वाहतुकीच्या रस्त्यावरून जाताना वाजवीपेक्षा अधिक धुरळा उडतो, तसा काहीसा प्रकार इथेही होतो. फक्त पेशींमध्ये धुरळा उडत नाही, रासायनिक गडबड होते. कित्येक शतकांच्या जीन्सच्या सुधारणांतून, त्यात वेळोवेळी होत आलेल्या बदलांतून वहिवाटीची यंत्रणा बनलेली आहे. दुसरी यंत्रणा ही केवळ पर्यायी व्यवस्था आहे. डार्विनच्या सिध्दान्तानुसार गरजेपोटी तिचा जन्म आहे. मूलभूत व्यवस्था तिच्यापेक्षा उजवी असणारच.

मधुमेहात वाढलेलं ग्लुकोज केवळ नाइलाजाने या पर्यायी व्यवस्थेकडे वळलेलं असतं. या पर्यायी यंत्रणेला 'पोलिओल पाथवे' म्हणतात. जेव्हा ग्लुकोजचं या यंत्रणेमार्फत विघटन होतं, तेव्हा तिथे अल्कोहोल तयार होतं. कारण 'अल्डोज रिडक्टेज' नावाचं एक एन्झाइम या पर्यायी यंत्रणेचा प्रमुख सूत्रधार असतं. हे एन्झाइम मुख्यत: डोळयांचा पडदा (रेटिना), मूत्रपिंडातला मूत्र गाळणारा भाग, डोळयांतलं भिंग, मज्जातंतू, रक्तवाहिन्यांच्या पेशी यामध्ये असतं. शिवाय नेमक्या याच पेशींना ग्लुकोज आत घेण्यासाठी इन्श्युलीनवर अवलंबून राहावं लागत नाही. त्या पेशींचं दार ग्लुकोजसाठी सदैव उघडं असतं. ग्लुकोज आत घेण्यासाठीचा दरवाजा उघडण्यासाठी त्यांना इन्श्युलीनची चावी लागत नाही. त्यामुळे रक्तात जितकं ग्लुकोज असेल, तितकं ग्लुकोज या पेशींमध्ये बिनबोभाट शिरू शकतं. नॉर्मल माणसांना त्यांच्या या गुणधर्माचा काहीच उपद्रव होत नाही. त्यांची परवलीची, वहिवाटीची यंत्रणा आत आलेलं योग्य प्रमाणातलं ग्लुकोज हाताळायला सक्षम असते. पण मधुमेहात ज्यांचं ग्लुकोज अनियंत्रित असतं, त्यांची गोची होते. रक्तातलं वाढलेलं ग्लुकोज विनासायास या पेशींमध्ये शिरून गर्दी करतं. या वाढीव ग्लुकोजचा निचरा करायला नेहमीची यंत्रणा अपुरी पडते. मग अल्कोहोल बनवणाऱ्या दुसऱ्या यंत्रणेत हे वाढीव ग्लुकोज शिरतं. ही यंत्रणा अल्कोहोल बनवत असल्याने तिला 'पोलिओल पाथवे' असं म्हटलं जातं.

अल्डोज रिडक्टेज एन्झाइमचं असणं, मधुमेहात जास्त ग्लुकोज मिळाल्याने त्या एन्झाइमची चांदी होणं आणि त्यातून मोठया प्रमाणात अल्कोहोल निर्माण होणं या एकापाठोपाठ घडणाऱ्या घटनांनी डोळयांचा पडदा (रेटिना), मूत्रपिंडातला मूत्र गाळणारा भाग, डोळयांतलं भिंग, मज्जातंतू, रक्तवाहिन्यांच्या पेशी या इंद्रियांना सगळयात जास्त त्रास सोसावा लागतो. साहजिकच ही इंद्रियं सर्वप्रथम मधुमेहाच्या दुष्परिणामांची शिकार होतात.

अल्कोहोल वाढल्याबरोबर पेशींची परवड सुरू होते. अल्कोहोल तेलकट तसंच पाणी या दोन्ही द्रवांत विरघळतं. मधुमेहातलं जास्त ग्लुकोज अधिक अल्कोहोल बनवतं. ते पेशींच्या आतलं पाणी स्वत:त विरघळवून टाकतं. पेशी शुष्क व्हायला लागतात. पाणी हे पेशींचं जीवन. ते कमी झालं, तर पेशींच्या कामात अडथळा येणारच. पेशींचे भोग सुरू व्हायला इतकं कारणदेखील पुरतं.

पण हे भोग इथे संपत नाहीत. तयार झालेलं अल्कोहोल जसं पाणी शोषून घेऊन पेशींना शुष्क बनवतं, तसंच त्यामध्ये तैल द्रव्यसुध्दा विरघळतात. आपल्या मज्जातंतूंच्या बाहेरचं आवरण अशाच तैल पदार्थांचं बनलेलं असतं. तेव्हा मज्जातंतूंमध्ये जर अल्कोहोलचं प्रमाण वाढलं, तर आपल्याला न्यूरोपॅथी होऊ शकते. किंबहुना नियमित आणि भरपूर दारू पिणाऱ्यांना न्यूरोपॅथी होते ती याच कारणाने. एकदा न्यूरोपॅथी व्हायला लागली की पायाच्या तळव्याला जळजळ वगैरे प्रश्न येतात. त्यात ग्लुकोज अनियंत्रित असताना भरमसाठ दारू पिणं बंद केलं नाही, तर ही न्यूरोपॅथी आणखी लवकर होते आणि अधिक त्रासदायक बनू शकते.

वाढीव ग्लुकोज हाताळताना पेशींवर अतिरिक्त ताण पडतो. मुळात पेशी इंधन म्हणून ग्लुकोजचा वापर करून ऊर्जा बनवत असताना त्यांना ऑॅक्सिजनची गरज भासते. हवेतला ऑॅक्सिजन स्थिर रेणूंचा बनलेला असतो. पण रासायनिक प्रक्रियेत भाग घेताना त्याचं विघटन व्हावं लागतं. त्यासाठी स्थिर ऑॅक्सिजनचा रेणू अस्थिर बनावा लागतो. अर्थात या अस्थिर रेणूला कशाचा तरी आधार घेतल्याशिवाय करमत नाही. बुडणारी व्यक्ती जशी मिळेल त्याचा हात पकडून जीव वाचवायचा प्रयत्न करते, त्याप्रमाणे ऑॅक्सिजनचा अस्थिर रेणू मिळेल त्या इतर रेणूला धरायचा प्रयत्न करत सुटतो. हेच ते 'रिऍक्टिव्ह ऑॅक्सिजन स्पेसीज (ROS). ज्या ज्या रेणूंना हे ROS चिकटतील, त्या त्या रेणूंचे मूळ गुणधर्म ते बदलून टाकतात. आपल्याला म्हातारपण येण्यामागे हेच ROSचे रेणू असतात, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. मधुमेहात या ROSची संख्या विलक्षण वाढते. साहजिकच त्यांचे दुष्परिणामदेखील आपल्या बोकांडी बसतात.

मधुमेहात ग्लुकोज वाढतं आणि ते त्याच्या संपर्कात आलेल्या ऊतींना चिकटतं, हे आपण पाहिलेलं आहे. हे समजायला सोपं आहे. साखरेच्या पाकात आपण आवळे खूप दिवस भिजत ठेवले, तर त्यांचा मुरावळा होताना आपण पाहिलेला असतो. मुरावळा म्हणजे जसा साखर चिकटलेला आवळा, तसा प्रकार वाढीव ग्लुकोजच्या संपर्कात आलेल्या प्रोटीन्स वगैरेंच्या बाबतीत होतो. त्यांना ग्लुकोज चिकटतं. आवळा फार काळ साखरेच्या संपर्कात आलेला नसेल किंवा साखरेचा पाक बऱ्यापैकी अगोड असेल, तर तो जास्त साखर शोषून घेणार नाही. त्यामुळे त्यात खूप गोडवादेखील उतरणार नाही. परंतु जितकी साखर जास्त होईल आणि आवळा पाकात असण्याची वेळ वाढेल, तितका आवळा गोड होत जाईल आणि आंबटपणाचा आपला मूळ गुणधर्म विसरून जाईल. मधुमेहात वाढीव ग्लुकोजच्या संपर्कात आलेल्या प्रोटीन्सच्या बाबतीत जवळपास हाच प्रकार घडतो. मधुमेह जुना आणि जास्त असेल, तितकं प्रोटीन्सना चिकटणारं ग्लुकोज घट्ट होतं. प्रोटीन्सना ग्लुकोज चिकटल्याने त्यांचा आकार बदलतो, गुणधर्म बदलतात. या प्रकाराला वैद्यकीय भाषेत 'ऍडव्हान्स्ड ग्लायकेशन एंडप्रॉडक्ट (AGE)' असं म्हणतात. असे प्रोटीन्स मग कुचकामी ठरतात. आपल्या शरीराची सर्व कामं प्रोटीन्सच्या माध्यमातून होत असतात. त्यांचेच गुणधर्म बदलले, तर शरीराचं सगळंच काम ठप्प होणार हे ओघाने आलंच.

ही झाली पेशींची 'अंदरकी बात.' पण हे आकार बदललेले प्रोटीन्स पेशींच्या बाहेरसुध्दा आपली करामत दाखवतातच. गुणधर्म बदललेले प्रोटीन्स शरीराला उपयोगी तर नसतातच, शिवाय ते एक प्रकारचा दाह निर्माण करतात. शरीरात असा दाह निर्माण करणारी रसायनं मग आपला इंगा दाखवायला सुरुवात करतात. वेगवेगळया इंद्रियांमध्ये ती पोहोचली की उपद्रवमूल्य दाखवतात. साहजिकच संपूर्ण शरीरभर काही ना काही नुकसान व्हायला सुरुवात होते.

यानंतर ती 'अंदरकी बात' राहत नाही. सगळया शरीराला हानी पोहोचवणारी एक साखळी तिथे सुरू होते. शेवटी ती रुग्णाला भरपूर त्रास देते.

& 9892245272