योगी आदित्यनाथ आणि मीडियाची दोन रूपे 

विवेक मराठी    25-Mar-2017
Total Views |

योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर कारण नसताना अर्धवट शहाण्या विद्वानांनी संघाला त्यात खेचण्याचा प्रयत्न केला. या महापंडितांना हे माहीतही नाही की दि. 16 मार्चपासून कोईमतूर येथे संघाची अखिल भारतीय बैठक चालू झाली. प्रथम प्रांत प्रचारकांची बैठक, नंतर प्रतिनिधी सभेची बैठक आणि नंतर कार्यकारी मंडळाची बैठक असे तिचे स्वरूप असते. या बैठकीत सत्तेच्या राजकारणावर शून्य चर्चा होते. राज्याचा मुख्यमंत्री कोण व्हावा? हे भाजपाने ठरवायचे असते, संघाने नाही. बरे झाले, टाइम्स ऑफ इंडियानेच आपल्या बातमीचा तो विषय केला. बैलगाडीखालून चालणाऱ्यांना थोडीशी तरी अक्कल येईल, असे समजू या.

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांच्या विरोधात 'मीडिया ट्रायल' सुरू झाली. मीडिया ट्रायलमध्ये न्यायाधीश, वकील एकच असतो. फासावर कोणाला लटकवायचे आहे याचा निर्णय आधीच झालेला असतो. चर्चेत भाग घेणारे सगळे जण अतिशहाणे विद्वान असतात. प्रश्न विचारणारा ज्याच्या विरोधात ट्रायल चालली आहे त्याच्या विरोधात आरोप करणारे प्रश्न विचारत राहतो. अतिशहाणे विद्वान त्याला उत्तरे देतात आणि आपल्यासारखे सामान्य लोक 'इडियट बॉक्स'समोर बसून सर्व ऐकत राहतात. अशीच एक ट्रायल पाहत असताना ऍंकर भाजपाच्या प्रवक्ता याला प्रश्न विचारतो की आदित्यनाथ यांची निवड योग्य आहे की अयोग्य? कसेही उत्तर दिले तरी उत्तर देणारा फसतो. अयोग्य म्हटले तर पक्षाविरुध्द भूमिका घेतली असे होते आणि योग्य म्हटले तर एवढया भयानक माणसाची निवड योग्य कशी? त्यातही तो फसतो. आदित्यनाथ म्हणजे एक भयानक माणूस, मुसलमानांचा द्वेष्टा, स्त्रीद्वेष्टा, परंपरावादी, बुरसटलेल्या विचारांचा इत्यादी मीडियाने ठरवूनच टाकलेले आहे आणि आम्ही ज्याला असे ठरविले आहे, त्याला समर्थन देणारे तेवढेच नालायक आहेत, हे मीडियाला सांगायचे आहे.

भारतातील डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली असलेला मीडिया बैलगाडीच्या खालून चालणाऱ्या कुत्र्यासारखा असतो. बैलगाडी बैल ओढत असतो, त्या कुत्र्याला वाटते की गाडी मीच ओढत असतो. ज्यांना भारत समजलेला नाही, हिंदुत्वाचे एक अक्षरही समजलेले नाही, हिंदू समाज समजलेला नाही, हिंदूंचे तत्त्वज्ञान समजलेले नाही, त्यांना आपल्या देशात डावे विचारवंत, सेक्युलरवादी आणि मानवतावादी म्हटले जाते. आपला जन्म उपदेश करण्यासाठी झालेला आहे, या अहंकारात ते जगतात आणि मरताना माझ्या तिरडीला दहा माणसे कशी येतील याची फिकीर करीत बसतात. समाजात त्यांना काहीही किंमत नाही. गल्लीतील कुत्रेदेखील असा माणूस गल्लीत आला तर त्यावर भुंकण्याचे मनात आणीत नाहीत. आपलाच भाऊबंद आहे असे समजून त्याच्याकडे काणाडोळा करतात.

योगी आदित्यनाथ गोरखपूरच्या नाथपीठाचे प्रमुख आहेत. फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या 20 मार्चच्या अंकात त्यांच्याविषयीचे आलेले वृत्त असे आहे -'मीडियाने आणि वृत्तवाहिन्यांनी आदित्यनाथ यांना कट्टर मुस्लीमविरोधी ठरवून टाकलेले आहे, त्यामुळे उत्तर प्रदेशातील अल्पसंख्य जमात दुय्यम नागरिकासारखी वागविली जाईल. त्यांना भयाच्या वातावरणात रहावे लागेल.' हे सांगून फायनान्शिअल एक्स्प्रेस म्हणतो, 'वयाच्या बाविसाव्या वर्षापासून योगी मठाच्या कारभाराशी जोडले गेलेले आहेत. मठ ही एक प्रकारची सामाजिक प्रयोगशाळाच आहे. सर्व जातींची माणसे - एवढेच नव्हे, तर मुसलमानदेखील मठाच्या कामात संलग्न आहेत. ते रोज दोन तास जनता दरबार भरवितात. या दरबारात असंख्य मुसलमान येतात. योगींचे पत्र मिळाले की प्रश्न संपतो. नुकताच त्यांनी मशिदीच्या जमिनीचा प्रश्न सोडविला. या जमिनीवर अतिक्रमण झालेले होते. ते त्यांनी दूर केले. समशेर अलाम म्हणतो, ''योगी महाराजांचे पत्र मिळाले की सरकार दरबारी खेटे घालावे लागत नाहीत, काम चटकन होते.'' चौधरी कैफूल वराक म्हणतात, ''मला हज यात्रेला जायचे होते, सरकारी कोटयात माझे नाव घालण्याची विनंती मी त्यांना केली आणि माझे काम झाले.'' मला वाटते, 'फायनान्शिअल एक्स्प्रेस'ने अतिशहाण्या विद्वानांच्या ही थोबाडीतच मारलेली आहे.

आता 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या बातमीकडे येऊ या. 20 मार्चची दिल्लीतील बातमी आहे - 'योगी आदित्यनाथ यांची निवड आश्चर्यकारक नसून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापुढे त्यांचे नाव निवडणुका जाहीर झाल्यापासूनच होते. संघाचा या निर्णयात अल्पसादेखील वाटा नाही.' बातमीत पुढे असे म्हटले आहे की, योगी यांची लोकप्रियता जातिनिरपेक्ष आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राजनाथ सिंह यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळण्यासंबंधी विचारले होते. त्यावर राजनाथ सिंह म्हणाले की, ''मुख्यमंत्री कोण असेल हे घोषित न करताच आपण निवडणुका लढविल्या पाहिजेत.'' भारतीय जनता पार्टीने मतदारांचे जे निवडणूकपूर्व सर्वेक्षण केले, त्यात योगी आदित्यनाथ यांचे नाव पुढे आले. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत आदित्यनाथ यांनी प्रचारात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. ते अत्यंत शिस्तबध्द आहेत. पूर्व उत्तर प्रदेशात तिकिट वाटपावरून खूप नाराजी होती. हे राजकीय आव्हान आदित्यनाथ यांनी पेलले. गोरखपूर प्रभागात बंडखोरी करणारे सर्व पडतील हे त्यांनी बघितले. त्यांची राहणी अतिशय साधी आणि बोलणे अतिशय स्पष्ट असते. अमित शहा यांच्याबरोबर जे रोड शो झाले, त्यात त्यांची लोकप्रियता सिध्द झाली. आदित्यनाथ संन्यासी असल्यामुळे संन्याशाला कोणती जात नसते. गोरखनाथ पीठाचे अनुयायी प्रामुख्याने मागास जातीतीलच आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्री होण्यात संघाची काहीही भूमिका नाही. संघाने कोणत्याही प्रकारचे दडपण आणलेले नाही.

योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर कारण नसताना अर्धवट शहाण्या विद्वानांनी संघाला त्यात खेचण्याचा प्रयत्न केला. या महापंडितांना हे माहीतही नाही की दि. 16 मार्चपासून कोईमतूर येथे संघाची अखिल भारतीय बैठक चालू झाली. प्रथम प्रांत प्रचारकांची बैठक, नंतर प्रतिनिधी सभेची बैठक आणि नंतर कार्यकारी मंडळाची बैठक असे तिचे स्वरूप असते. या बैठकीत सत्तेच्या राजकारणावर शून्य चर्चा होते. राज्याचा मुख्यमंत्री कोण व्हावा? हे भाजपाने ठरवायचे असते, संघाने नाही. बरे झाले, टाइम्स ऑफ इंडियानेच आपल्या बातमीचा तो विषय केला. बैलगाडीखालून चालणाऱ्यांना थोडीशी तरी अक्कल येईल, असे समजू या.

योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्याने राज्यघटनेचे काय होणार? सेक्युलॅरिझमचे काय होणार? असे रडगाणे सुरू आहे. कोणी मृत्यू पावल्यास रडण्यासाठी भाडोत्री लोक आणले जातात. त्याला रुदाली म्हणतात. या विषयाचा एक चित्रपटही आला होता. हे असे रुदाली मगरीचे अश्रू ढाळत बसले आहेत. सोनिया गांधी यांनी सर्व सत्ता आपल्या हाती ठेवण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलची निर्मिती केली आणि स्वतः त्याच्या चेअरपर्सन झाल्या. म्हणजे सर्वेसर्वा झाल्या. ही नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सुपर कॅबिनेट होती. सरकारने धोरणे कोणती आखावीत, कायदे कोणते करावेत, वगैरे गोष्टी एनएससीमध्ये ठरविल्या जात. हे घटनेच्या कोणत्या कलमाप्रमाणे झाले, हे आतापर्यंत तरी या रुदाली वर्गाने सांगितलेले नाही. पूर्णतः घटनाबाह्य शक्ती केंद्र उभे करण्याचा हा उपद्वयाप झाला. त्या वेळी या सर्व रुदाली तोंडाला फेव्हिकॉल लावून बसले होते. लोकांनी न निवडून दिलेला पंतप्रधान दहा वर्षे आपल्या डोक्यावर बसला आणि कळसूत्री बाहुलीप्रमाणे काम करीत राहिला. या राज्यघटनेचा कशा प्रकारे सन्मान झाला आणि लोकशाही कशा प्रकारे बळकट झाली, हे आपल्याला या रुदाली वर्गाकडून काही ऐकायला मिळाले नाही. एक संन्यासी योगी मुख्यमंत्री झाल्याबरोबर यांची कावकाव सुरू झालेली आहे.

मठाधिपती मठांच्या नियमांप्रमाणे आणि विचारसरणीप्रमाणे बांधलेला असतो. मुख्यमंत्री राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे आणि न्यायालयाच्या देखरेखीने बांधलेला असतो. कोणताही मुख्यमंत्री - एवढेच काय, पंतप्रधानदेखील घटनाबाह्य राज्यकारभार करू शकत नाही. लालूप्रसाद किंवा जयललिता यांच्यासारखे ''मी म्हणजे सर्व काही'' असे मानणारे मुख्यमंत्रीदेखील न्यायालयाने तुरुंगात टाकले. त्या वेळी लालूप्रसाद आणि जयललिता यांनी त्या निर्णयाचा सन्मान केला. ते असे म्हणाले नाहीत की 'न्यायालयाला काय समजते? घटना घटना काय लावलेले आहे? मी म्हणेन तीच घटना आहे.' त्यांनी राज्यघटनेचा सन्मान केला. हीच आपली परंपरा आहे. ही परंपरा लोकशाहीची शक्ती आहे. योगी आदित्यनाथ यांना हीच परंपरा पुढे चालवायची आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांना राज्यघटनेने घालून दिलेल्या मर्यादेत काम करायचे आहे. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सर्व जनांचा विचार करायचा आहे. हे त्यांचे कर्तव्य आहे. ते त्यांना उत्तम प्रकारे माहीत आहे आणि हे कर्तव्य ते उत्तम प्रकारे पार पाडतील याची खात्री बाळगायला हरकत नाही. राज्यघटनेचे काय होणार याचा आलाप करणारे खरे म्हणजे महाबदमाश आहेत असे म्हणायला पाहिजे; परंतु तो असंसदीय शब्द होईल, म्हणून 'हे सर्व लोक लबाड आहेत' असे म्हणायला हवे.

दि फर्स्टपोस्ट या साइटवर श्रीमय तालुकदार यांचा फारच सुंदर लेख आहे. या लेखात तालुकदार म्हणतात, ''योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवड करून नरेंद्र मोदी नेहरूवियन सेक्युलॅरिझमचे अंत्यसंस्कार करीत आहेत.'' हे अंत्यसंस्कार कसे होत आहेत, याचा त्यांनी संपूर्ण लेखात खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्याचा सारांश असा - युरोपियन सेक्युलॅरिझमच्याऐवजी भारताची बहुविधता जपणारी धार्मिक परंपरा मोदी पुनरुज्जीवित करीत आहेत. युरोपमधला सेक्युलॅरिझम चर्च आणि राज्यसंस्था यांच्या संघर्षातून जन्माला आला. आपल्याकडे असा संघर्ष झालेला नाही. 'सत्य, न्याय, नीती' असा आपल्याकडे धर्माचा अर्थ केलेला आहे. नेहरूंना असे वाटते की, युरोपियन सेक्युलॅरिझम जर आपण आपल्याकडे आणला, तर अल्पसंख्याकांचे रक्षण होईल. नेहरूंनी बहुसंख्यवाद आणि अल्पसंख्यवाद अशी मांडणी केलेली आहे. नेहरू यांनी हिंदुराष्ट्राची संकल्पना धुडकावून लावली. नेहरूवियन मॉडेल 60 वर्षे देशात राबविले गेले. ती देशाची मुख्य विचारधारा मानली गेली. तिला विरोध करणारे बाहेर फेकले गेले. भाजपा सत्तेत आल्यापासून या विचारधारेला आव्हान प्राप्त झालेले आहे. अनेक संस्थाचे पुनर्घटन सुरू आहे.

निवडणुकीत जे यश मिळाले आहे, ते भारताचे पुनरुत्थान करण्याचा जनादेश आहे. या जनादेशाप्रमाणे सेक्युलॅरिझमऐवजी धर्माधारित प्लूरॅलिझम (बहुविधता) आणण्याचा कालखंड सुरू झालेला आहे. सोप्या भाषेत सांगायचे, तर आदित्यनाथ यांची नियुक्ती करून मोदी हिंदुराष्ट्राची सुरुवात झाली आहे असा इशारा देत आहेत. हे लेखकाचे मत आहे. हिंदुराष्ट्राविषयी आमचे मत असे आहे की, हे हिंदुराष्ट्र आहे, काल होते, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. त्याची सुरुवात वगैरे काही होत नाही. एवढेच म्हणता येईल की सध्या त्याच्या प्रकटीकरणाचा कालखंड सुरू झाला आहे.

लेखकाने सान फ्रॅन्सिस्को विद्यापीठाचे वामसी जुलरी याच्या हपिंग्टनपोस्टमध्ये आलेल्या एका लेखातील उतारा दिलेला आहे. तो उतारा देऊन हा लेख समाप्त करू. वामसी जुलरी म्हणतो, ''तरुण हिंदू स्वतःला महान संस्कृतीचा वारसदार समजतो. केवळ प्राचीन वैभवाची ठेव म्हणून तो तिचा आदर करीत नसून अध्यात्म हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. सर्व धर्मांचा आदर करण्याचे आणि त्यांच्याबरोबर गुण्यागोविंदाने राहण्याचे ही आध्यात्मिकता आपल्याला शिकविते. मुसलमान, ख्रिश्चन, शीख, बौध्द, जैन आणि अनेक प्रकारे विभक्त हिंदू ही भूमी आणि तिचा इतिहास याचे हिस्सेदार असतात. भारताच्या सेक्युलर राज्यघटनेमुळे त्यांच्यात ही भावना निर्माण झाली नसून हिंदू धर्माच्या प्राचीन अशा सर्व पंथांचा आदर करण्याच्या वारशातून निर्माण झाली आहे.'' काय आश्चर्य आहे! हिंदू नसलेल्या विदेशी माणसास भारत समजतो, परंतु भारतातील अन्न खाणाऱ्या, इथल्या हवेत श्वास घेणाऱ्या, आणि इथेच ज्यांची हाडके राख होणार आहेत त्यांना भारत समजत नाही आणि हिंदू समजत नाही! नरेंद्र मोदी पंतप्रधान होत असताना आजच्यासारखेच रडगाणे चालू होते. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होताना हीच तबकडी पुन्हा वाजविली जात आहे. काही लोकांना मोदींचे मोठेपण समजायला अडीच वर्षे लागली, आदित्यनाथ यांची योग्यता समजायला आणखी दोन-तीन वर्षे लागतील.

vivekedit@gmail.com