अणुबाँब आणि मानवी बाँब

विवेक मराठी    27-Mar-2017
Total Views |


गाच्या पूर्व आणि पश्चिम भागात कम्युनिस्ट व जिहादी विचारधारांनी जगाला विनाशाच्या कडयावर आणून ठेवले आहे. उत्तर कोरियाने अण्वस्त्रांच्या व क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून केवळ द. कोरियाच्याच नव्हे, तर जपान आणि अन्य देशांसमोरही चिंताजनक वातावरण तयार केले आहे. उत्तर कोरिया स्वत:ला कम्युनिस्ट देश म्हणवितो व त्याने अण्वस्त्रांच्या बळावर द. कोरिया, जपान व अमेरिका यांना नष्ट करण्याची घोषणा केली आहे. या देशावर एका कुटुंबाची हुकूमशाही असून तेथील अत्याचाराच्या बातम्या प्रकाशात येत असतात. आजवर उत्तर कोरियाला चीनने पाठीशी घातले आहे. ज्याप्रमाणे पाकिस्तानचा उपयोग करून चीन भारतावर कुरघोडी करू पाहत आहे, तसेच उत्तर कोरियाचा उपयोग त्याने द. कोरिया व जपान यांच्यावर दबाब टाकण्याकरिता केला आहे. परंतु आता उत्तर कोरिया हा चीनच्या नियंत्रणाखाली राहील याची खात्री देता येत नाही. ट्रंप सत्तेवर आल्यानंतर अमेरिका आपल्या देशापुरते पाहील, अन्य देशांनी आपले आपण पाहून घ्यावे अशी भूमिका घेतली असली, तरी उत्तर कोरियाने निर्माण केलेले संकट एवढे महत्त्वाचे आहे की अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांनी तातडीने जपान, दक्षिण कोरिया व चीन यांची भेट घेऊन उत्तर कोरियाच्या संकटाविषयी चर्चा केली. एका अनियंत्रित, लहरी, हुकूमशहाच्या हाती आधुनिक शस्त्रास्त्रे पडली तर त्यातून कोणत्या ज्वालामुखीचा स्फोट घडू शकेल याचा अंदाज करणेही अवघड आहे. अण्वस्त्रांच्या साठयावर बसलेल्या उत्तर कोरियावर नेमकी कोणती कारवाई करावी, हेच या सर्व देशांना समजू शकत नाही. प्रत्यक्ष अमेरिकेवर हल्ला करण्याकरिता आवश्यक असलेला पल्ला गाठणारी क्षेपणास्त्रे अजून उत्तर कोरियाकडे नसली, तरी द. कोरिया-जपानवर व हिंदी महासागरातील अमेरिकन लष्करी तळावर अण्वस्त्र हल्ला करू शकण्याची क्षमता त्याच्याकडे आहेत. या विभागातील देशांचे भवितव्य एका माथेफिरू हुकूमशहाच्या हाती आहे.

पूर्वेकडे उत्तर कोरियाने ही चिंता निर्माण केलेली असतानाच इंग्लंडमध्ये दहशतवादाच्या नव्या अवताराने जिहादी आव्हानाची भयानकता स्पष्ट केली आहे. आजवर झालेल्या हल्ल्यांत व आताच्या हल्ल्यात महत्त्वाचा फरक असा की या नव्या हल्ल्यासाठी सुसूत्र व सुसंघटित यंत्रणेची आवश्यकताही उरलेली नाही. मानवी बाँब म्हणून आपल्या शरीराचा उपयोग करून देण्याचे अनेक प्रकार राजीव गांधी यांच्या हत्येपासून घडले असले, तरी या नव्या प्रकारासाठी बाँब मिळविण्याची आवश्यकताही उरलेली नाही. ट्रकसारख्या एखाद्या वाहनाचा उपयोग करून दहशतवादी कारवाया करण्याचे प्रकार युरोपमध्ये वाढत आहेत. जिहादी प्रचाराने एकदा मने पेटली की त्यांना दहशतवादासाठी कोणतेही हत्यार चालू शकते. उत्तर कोरियाच्या संबंधात चीनच्या पाठिंब्याने गुंडगिरीची भाषा बोलणाऱ्या एका देशापुढे जग हतबल झाले आहे, तर जिहादी दहशतवादामध्ये एका धर्माच्या शिकवणीमुळे जो उत्पात घडत आहे, त्यामुळे जग हतबल झाले आहे. अमेरिका, रशिया व चीन या तिन्ही देशांनी आपापल्या स्वार्थासाठी मुस्लीम अतिरेकीपणाला खतपाणी घातले. रशियाने अमेरिका विरोधासाठी अरब देशातील इस्रायइलविरोधी वातावरणाचा उपयोग करून घेतला. अमेरिकेनेही अफगाणिस्तानात रशियाला पराभूत करण्यासाठी तालिबान्यांना आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले. आता चीनही भारताविरोधात पाकिस्तानचा उपयोग करून घेण्याकरिता तेथील दहशतवादाला पाठीशी घालत आहे. या तिन्ही महासत्तांच्या सक्रिय सहकार्यामुळेच जिहादी दहशतवादाचा भस्मासूर अनियंत्रित होण्याएवढा मातला आहे.

या सर्व देशांबरोबरच स्वत:ला मानवतावादी, उदारमतवादी म्हणविले जाणारे विचारवंतही या परिस्थितीला तितकेच जबाबदार आहेत. जिहादी किंवा कम्युनिस्ट अशा ज्या विचारसरणींची हिंसाचारावर श्रध्दा आहे, त्यांचा कठोर बंदोबस्त केला पाहिजे असे म्हणणारे जणू काही मानवतेचे विध्वंसक आहेत असे वातावरण या उदारमतवाद्यांनी निर्माण केले आहे. भारतात तर नक्षलवादी चळचळ व त्याला पाठिंबा देणारे बुध्दिवादी व मुस्लीम जातीयवादी यांच्याविरोधी बोलणे हा वैचारिक गुन्हा ठरतो. अमेरिकेत मुस्लीम दहशतवादाविरुध्द स्पष्टपणे बोलणाऱ्या ट्रम्प यांचा उदय आताच झाला. त्यांच्या भूमिकेमुळे अमेरिकेतील पुरोगामी विचारविश्वही आक्रस्ताळेपणाने वागू लागले आहे. भारतात तर श्रीरामन्मभूमी आंदोलनापासूनच हा पुरोगामी थयथयाट सुरू आहे. या आंदोलनात न्याय कोणाच्या बाजूने आहे याचा सर्वोच्च न्यायालय आज तीस वर्षांनंतर शोध घेत आहे. वास्तविक तो तीस वर्षांपूर्वीच घ्यायला हवा होता. जर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मते श्रीरामजन्मभूमीवर हिंदूंचा अधिकार आहे, तर न्याय्य हक्काचा आग्रह धरल्याबद्दल कारसेवकांवर खटले कसले? त्यांचा तर गौरव केला पाहिजे. जवाहरलाल विद्यापीठासह विविध विद्यापीठांत दहशतवादी प्रवृत्तीचे खुलेआम समर्थन करणाऱ्या शक्तींना उदारमतवादाच्या किंवा मानवतावादाच्या नावाखाली जे पाठिंबा देत आहेत, तेही या हिंसाचाराला तेवढेच जबाबदार आहेत. अरब देशात जे अराजक, हिंसाचाराचे थैमान माजले आहे, त्यातून जे निर्वासित होत आहेत, ते त्या अराजकाची, हिंसाचाराची बीजेही आपल्या सोबत घेऊन जात आहेत. त्यांना जर वेळीच हटकले नाही, तर त्यातून काय घडू शकते ते युरोप पाहत आहे. या तथाकथित उदारमतवाद्यांना झुगारून स्वत:ला वाचविण्याइतकी भारतीय जनता शहाणी होत जाताना दिसत आहे. नुकतेच लागलेले निवडणुक निकाल हा त्याचाच पुरावा आहे.