आज की पुरोगामी ताजा खबर गुरमेहेर कौर

विवेक मराठी    04-Mar-2017
Total Views |

गुरमेहेर कौर हिच्याबद्दल असलेल्या सहानुभूतीचा भरपूर गैरफायदा वृत्तवाहिन्यांतल्या आणि प्रसारमाध्यमांमधल्या 'पुरोगामी विचारवंत' माफियाने घेतला नसता, तरच नवल! केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी कारणे शोधणाऱ्या ह्या वर्गाला गुरमेहेर कौर हे एक नवीन प्यादे मिळाले. परत एकवार सरकारवर असहिष्णुतेचे आरोप झाले. मीडियामधून गुरमेहेर कौरच्या विधानाविरुध्द बोलणाऱ्या सर्व लोकांना 'ट्रोल' ठरवण्यात आले, मग ते देशासाठी पदके जिंकणारे पद्मश्रीने सन्मानित केलेले योगेश्वर दत्त आणि वीरेंद्र सेहवागसारखे खेळाडू का असेनात.

आजकाल गुरमेहेर कौर हे नाव मीडियामध्ये फार गाजतेय. गुरमेहेर कौर ही दिल्ली विश्वविद्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या लेडी श्रीराम कॉलेज ह्या उच्चभ्रू कॉलेजची विद्यार्थिनी. तिचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी होते. ती फक्त दोन वर्षांची असताना तिचे वडील कॅप्टन मनदीप सिंग जम्मू काश्मीरमधल्या कूपवाडा येथे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांशी लढा देताना हुतात्मा झाले होते. गुरमेहेर स्वत:ला शांतीची पुरस्कर्ती म्हणवते आणि तिला तसे म्हणण्याचा हक्क आहेच.

सध्या गुरमेहेर कौर एकदम प्रकाशझोतात येण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी दिल्ली विद्यापीठाच्या रामजस महाविद्यालयात मागे घडलेल्या जे.एन.यू. प्रकरणात भारतविरोधी घोषणा देणाऱ्या  उमर खालीद याच्या भाषणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या भाषणाच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविपच्या) विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्या वेळी हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या 'ऑॅल इंडिया स्टुडंट असोसिएशन' (AISA) आणि अभाविप ह्या दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. थोडाफार शारीरिक संघर्षही झाला. गुरमेहेर कौर काही रामजस महाविद्यालयाची विद्यार्थिनी नव्हे आणि ती हा प्रसंग घडला तेव्हा रामजस महाविद्यालयात हजरही नव्हती. पण ह्या प्रकरणाला विरोध म्हणून तिने 'मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. मी 'अभाविप'ला घाबरत नाही' असा मजकूर लिहिलेले पत्रक हातात धरून स्वत:चा फोटो सोशल मीडियावर टाकला. 'स्टुडंट्स अगेन्स्ट एबीव्हीपी' ह्या हॅशटॅगखाली तिने सोशल मीडियावर एक मोहीमही सुरू केली. अर्थात तिचे मत शांततापूर्ण मार्गाने व्यक्त करायचा तिला पूर्ण हक्क आहे, त्याबद्दल कुणाचेच दुमत नसावे.

तिने ही मोहीम सुरू केल्यानंतर आंतरजालावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. तरीही काही मोठेसे घडले नसते, पण त्यापाठोपाठ गुरमेहेर कौरचे 'पाकिस्तानने माझ्या वडिलांना मारलं नाही. त्यांना युध्दाने मारलं' अशा अर्थाचा फलक हातात घेऊन काढलेले छायाचित्र आंतरजालावर व्हायरल झाले आणि मग मात्र खूप मोठया वादाला तोंड फुटले. ह्या छायाचित्रावर खूप उलट-सुलट प्रतिक्रिया आल्या.

मुळात गुरमेहेर कौर ही देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शूर सैनिकाची मुलगी आहे. तिच्या वडिलांच्या बलिदानाबद्दल सगळया देशाला आदर आहे. केवळ दोन वर्षांची असताना वडील गमावलेल्या ह्या मुलीबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात सहानुभूतीदेखील होती. तिला युध्द नको, शांती हवी असे का म्हणावेसे वाटते हेही लोक समजून घेऊ  शकतात, पण म्हणून 'पाकिस्तानने माझ्या वडिलांना मारले नाही, युध्दाने मारले' असे तद्दन गल्लाभरू विधान करणे म्हणजे केवळ गुरमेहेर कौरच्या वडिलांच्याच नाही, तर देशासाठी लढताना प्राण दिलेल्या प्रत्येक भारतीय सैनिकांच्या पवित्र स्मृतींचा अपमान आहे. कारगिल युध्दात पाकिस्तान्यांच्या हातात जिवंत सापडल्यानंतर अनन्वित छळ करून मारण्यात आलेल्या कॅप्टन सौरभ कालिया ह्यांच्या वडिलांनी जनसत्ताला मुलाखत देताना स्पष्ट म्हटले आहे की ''माझ्या मुलाचे हाल युध्दाने नाही, पाकिस्तानी सैनिकांनी केले. त्याच्या मृत्यूला युध्द नाही, तर पाकिस्तान जबाबदार आहे.''

बहुसंख्य सामान्य भारतीयांनी गुरमेहेर कौरच्या ह्या  छायाचित्रातल्या मजकुराची भरपूर खिल्ली उडवली. 'मी ज्यू लोकांना मारले नाही, गॅसने मारले' - हिटलर. 'मी 9/11ला वर्ल्ड ट्रेड टॉवरवर हल्ले घडवून आणले नाहीत. ते विमानांनी केले' - ओसामा बिन लादेन इथपासून ते 'मी हे ट्वीट केले नाही, माझ्या संगणकाने केले' इथपर्यंतच्या विनोदांचा, मीम्सचा पाऊस आंतरजालावर पडला. त्यात वीरेंद्र सेहवाग ह्या प्रसिध्द क्रिकेट खेळाडूने 'मी शतके केली नाहीत, माझ्या बॅटने केली' अशा अर्थाचा फलक धरलेला फोटो टाकला. तो फोटो रणदीप हुडा ह्या अभिनेत्याने री-ट्वीट केला. त्याला बबिता आणि गीता फोगट ह्या 'दंगल'फेम महिला कुस्तीगीरांनी पाठिंबा दिला. पाठोपाठ योगेश्वर दत्त ह्या ऑॅलिम्पिक पदक विजेत्यानेही वीरेंद्र सेहवागची री ओढली आणि स्वत:ला 'पुरोगामी विचारवंत' म्हणवून घेणाऱ्या एका वर्गाला सामूहिक फेफरे आले.

गुरमेहेर कौर हिच्याबद्दल असलेल्या सहानुभूतीचा भरपूर गैरफायदा वृत्तवाहिन्यांतल्या आणि प्रसारमाध्यमांमधल्या ह्या 'पुरोगामी विचारवंत' माफियाने घेतला नसता, तरच नवल! केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी कारणे शोधणाऱ्या ह्या वर्गाला गुरमेहेर कौर हे एक नवीन प्यादे मिळाले. परत एकवार सरकारवर असहिष्णुतेचे आरोप झाले. मीडियामधून गुरमेहेर कौरच्या विधानाविरुध्द बोलणाऱ्या सर्व लोकांना 'ट्रोल' ठरवण्यात आले, मग ते देशासाठी पदके जिंकणारे पद्मश्रीने सन्मानित केलेले योगेश्वर दत्त आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासारखे खेळाडू का असेनात. जावेद अख्तर ह्यांच्यासारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या गीतकाराने बबिता फोगट, योगेश्वर दत्त, आणि वीरेंद्र सेहवाग  ह्यांना 'कुस्तीगीर ट्रोल' आणि 'अर्धशिक्षित खेळाडू' अशा शेलक्या शिव्या बहाल केल्या, कारण ह्या खेळाडूंनी गुरमेहेर कौर हिच्या विधानाला अत्यंत सौम्य शब्दात आणि तिचा कुठेही प्रत्यक्ष न उल्लेख करता आक्षेप घेतला होता.

म्हणजे केवळ गुरमेहेर कौरला काय वाटतं ते तिला हव्या त्या शब्दात सांगायचा हक्क आहे, मग ती मते इतरांना देशविरोधी का वाटेनात. पण तिच्या विधानाला कुणी हरकत घेतली, मग ती कितीही सभ्य शब्दात का असेना, ती व्यक्ती लगेच असभ्य, शिवराळ ट्रोल ठरवली जाते. कारण 'पुरोगामी विचारवंत' माफियाने ठरवलेल्या भूमिकेशी विसंगत अशी भूमिका ह्या देशात कुणी घेऊच कसे शकते?

अशा प्रकारच्या मोहिमा देशाला नवीन नाहीत. 2014नंतर भारतात अशी खूप प्रकरणे मीडियाने पध्दतशीरपणे गाजवलेली आहेत. मजेची गोष्ट म्हणजे दर वेळेला देशात कुठेही निवडणूका असल्या की हमखास अशी प्रकरणे गाजतात. प्रसारमाध्यमांमधून खूप राळ उडवली जाते. असहिष्णुता, ऍवार्डवापसी, सेडिशन वगैरे चमकदार शब्दांचा धुरळा उडवला जातो. ह्या घटनांना पंतप्रधान मोदीच कसे जबाबदार आहेत, हे लोकांना कसेही करून पटवून द्यायचा प्रयत्न सुरू होतो आणि निवडणुका संपल्या की तो धुरळा आपोआप खाली बसतो. दादरी चर्चवरची कथित दगडफेक, रोहित वेमुला प्रकरण, कन्हैया कुमार ही सगळी ह्या मोहिमांचीच उदाहरणे. हे गुरमेहेर कौर प्रकरण म्हणजे त्याच मोहिमांचा पुढचा अध्याय आहे.

ह्या मोहिमा नेहमी एका पॅटर्ननुसार राबवल्या जातात. 'पुरोगामी' अजेंडयाला पूरक अशी एखादी घटना घेतली किंवा हेतुपुरस्सर घडवली जाते. त्या घटनेतली एखादी व्यक्ती ही 'व्हिक्टिम' ठरवून तिच्याभोवती एक पध्दतशीर नॅरेटिव्ह रचले जाते. आधी इंटरनेटवरचे स्वघोषित 'लिबरल' आणि मग प्रसारमाध्यमे ह्या 'व्हिक्टिम'च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्या व्यक्तीच्या किंवा त्यांच्या नातेवाइकांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्या 'व्हिक्टिम'ला केंद्रस्थानी ठेवून चर्चासत्रे घेतली जातात. त्या नॅरेटिव्हच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ठरवून 'असहिष्णू', 'भगवा दहशतवादी', 'जातीयवादी' वगैरे घोषित केले जाते. एक तद्दन खोटारडा कांगावा रचला जातो. त्या व्यक्तीच्या मागे बोलविता धनी कोण आहे हे सत्य जाणूनबुजून दडवले जाते आणि तो कांगावा उघडकीस येण्याची चिन्हे दिसली की 'आमच्यावर हल्ला झाला हो' म्हणत गळे काढले जातात. प्रसारमाध्यमांनी एकदा हे प्रकरण पुरेसे मोठे केले की आप आणि काँग्रेस यांच्यासारखे पक्ष त्यामध्ये पडून तापल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेतात. निवडणुका पार पडेपर्यंत हे सगळे चालते. एकदा निवडणुका संपल्या की मग सारे काही शांत शांत, पुढच्या मोहिमेपर्यंत. गेल्या दोन वर्षांत हार्दिक पटेल, दादरी प्रकरण, रोहित वेमुला, ऍवॉर्डवापसी, कन्हैया कुमार अशा कितीतरी मोहिमा आपण बघितल्या. गुरमेहेर कौर प्रकरण म्हणजे आजकी ताजा खबर.

गुरमेहेर कौरचा पध्दतशीरपणे उदोउदो करताना प्रसारमाध्यमांनी बऱ्याच गोष्टी आपल्यापासून लपवलेल्या आहेत. गुरमेहेर कौरचा जो पहिला व्हिडियो प्रसिध्द झाला, तो 'व्हॉइस ऑॅफ राम' नावाच्या व्यक्तीने केला होता. हा 'व्हॉइस ऑॅफ राम' म्हणजे आम आदमी पक्षाचा प्रसारप्रमुख. हा व्हिडियो करायला पैसे कुणी दिले? नोव्हेंबर 2016मध्ये डाव्या विचारसरणीच्या काही लोकांनी जंतर मंतर येथे एक तथाकथित 'युध्दविरोधी' सेमिनार आयोजित केले होते. त्यामध्ये सोनिया गांधींच्या जवळचे ख्रिस्ती मिशनरी आणि हिंदूविरोधी कार्यकर्ते जॉन दयाळ, माओवादी विचारसरणीच्या कविता कृष्णन आणि फुटीरतावादी ओमर खालिदची सहकारी शेहला रशीद ह्या लोकांचा सहभाग होता. गुरमेहेर कौर हिचेही नाव ह्या कार्यक्रमाच्या पोस्टरमध्ये आहे. तिच्या फेसबुक प्रोफाइलवर तिने आम आदमी पक्षाला उघड समर्थन दर्शवले आहे. प्रसारमाध्यमे हा इतिहास लोकांपासून का दडवून ठेवत आहेत?

गुरमेहेर कौरने असे म्हटले आहे की तिला अत्यंत असभ्य शब्दात शिवीगाळ झाली, तिला बलात्काराच्या धमक्या आल्या. बलात्काराची धमकी ही अत्यंत निषेधार्ह आहे. कुठल्याच स्त्रीला अशा प्रकारे सतावले जाऊ  नये, हे खरेच आहे. अशा धमक्या देणाऱ्या लोकांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. पण त्यासाठी गुरमेहेर कौरने पोलिसात तक्रार देणे आवश्यक आहे. ती तक्रार न देता गुरमेहेर कौर दिल्ली सरकारच्या स्त्री आयोगाकडे का गेली? ती कॅनडाची नागरिक असल्याच्या बातम्या येत आहेत, त्यात कितपत तथ्य आहे? ह्या सगळया प्रश्नांकडे प्रसारमाध्यमे जाणूनबुजून दुर्लक्ष का करताहेत?

गुरमेहेर कौरलाच काय, ह्या देशाच्या कुठल्याही नागरिकाला सरकारविरोधी किंवा भाजपाविरोधी मते व्यक्त करण्याचा किंवा अभाविपचा विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण माजी सैनिक मेजर गौरव आर्य ह्यांच्या शब्दात सांगायचे झाले, तर ''पक्ष वेगळा, सरकार वेगळे आणि देश वेगळा. देशाविरुध्द बोलायचा अधिकार मात्र देशाच्या कुठल्याच नागरिकाला नाही!''

sshefv@hotmail.com

अपडेट

गुरमेहेरने 28 फेब्रुवारी रोजी केलेल्या ट्वीटमध्ये आपण या आंदोलनातून माघार घेत असल्याचे सांगितले. नेमका मुद्दा काय आहे हे लक्षात न घेता माझ्या कुटुंबाला या वादात उगाचच ओढले जात आहे, असे माध्यमांसमोर सांगून ती जालंधर येथील आपल्या घरी परतली.