परीसस्पर्श...

विवेक मराठी    07-Mar-2017
Total Views |

जगण्याच्या या नावीन्याने, आश्चर्याने भरलेल्या प्रवासाला सकारात्मकतेच्या परिसाचा स्पर्श करून सोनेरी रंगाचा साज चढवणं, गोड-कडू-आंबट चवींचे आस्वाद घेत अनुकूल-प्रतिकूलतेच्या धाग्यांनी पुढे सरकणारा हा प्रवास अधिक सुखकर करणं आणि ही जीवनाची सुंदर भेट देणाऱ्या विधात्याचे आभार मानणं हे आपल्याच हाती आहे.

डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात समुपदेशक म्हणून काम करताना खूप काही शिकायला मिळालं. ज्याच्या नुसत्या नावानेही घायाळ व्हावं असा आजार म्हणजे कॅन्सर. अशा अनेक कॅन्सरग्रस्तांना जवळून अनुभवता आलं. काळ लोटला तरी तिथे पाहिलेल्या काही व्यक्ती मनात घर करून राहिल्या. त्यापैकीच 'ती' एक.

मला आठवतंय, मी राउंड घेताना तिच्या बेडपाशी पोहोचले. तिची फाइल पाहिली. वय 50 वर्षे, सर्व्हिक्स कॅन्सर. रेडिएशन सुरू होतं. शरीर कृश झालेलं, केस गेल्याने डोक्यावर रुमाल बांधलेला. ती पेनने पेपरवर काहीतरी लिहीत होती. अगदी एखादं लहान मूल आवडत्या खेळण्यांमध्ये कसं रमून जातं, तशी रमून गेली होती. माझ्या हाकेने ती एकदम भानावर आली. मला पाहून हसत-हसत उठली. तिची रूटीन चौकशी झाल्यावर मी तिला विचारलं, ''काय लिहीत होतात एवढं?'' ती म्हणाली, ''शब्दकोडं... एकच शब्द अडलाय. थांबा हं. सांगते - अशी गोष्ट जी तुम्हाला सुखी किंवा दु:खी बनवते.'' मी तिच्याकडे पाहतच होते. मृत्यूच्या छायेत सतत वावरणाऱ्या तिच्याकडे सहजपणे या शब्दकोडयांशी दोस्ती करणारं असं काय असेल बरं...? या विचाराला पटकन माझ्या मनातून उत्तर आलं अन पटकन तोंडून शब्द आले, ''तुमचा दृष्टीकोन!'' ''बरोबर'' ती आनंदाने टाळी वाजवत म्हणाली. क्षणभर मला कळलंच नाही की तिने टाळी का वाजवली. त्यानंतर मी तिला अनेकदा भेटले. ती एकदा मला म्हणाली होती, ''कोडी सोडवणं हा माझा आवडता छंद. पूर्वी कामामुळे वेळ नाही व्हायचा. पण आता इथे वेळ खूप असतो, तर सगळे पेपर घेऊन यायला सांगते मुलाला. कॅन्सरचं कळलं, तेव्हा पायाखालची जमीनच सरकली. पण मग शांतपणे विचार केला, मृत्यू कुणाला टळतो का? त्याला काहीतरी कारण हवं असतं. माझ्यासाठी त्याने हे शोधलं, इतकंच... पण जगणं का सोडायचं!!''

ती रोज जेवण झाल्यावर हळूहळू वॉर्डमधल्या प्रत्येक रुग्णाला, नातेवाइकांना भेटून विचारपूस करायची. ती खरोखरच 'जगत' होती. होणाऱ्या वेदना सहन करण्यासाठी तिच्याकडे प्रचंड मानसिक बळ होत आणि ते तिला मिळत होतं जीवनाकडे पाहण्याच्या सकारात्मकतेतून, आला क्षण आनंदाने जगण्याचं तिचं साधं-सोपं तत्त्वज्ञान होतं.

आपल्या आजूबाजूला कितीतरी माणसं अशी खऱ्या अर्थाने 'जगत' असतात. शरीररचना तर सगळयांची सारखीच, पण तरीही एक गोष्ट त्यांना अन्य व्यक्तींपासून विशेष ठरवत असते. अशा माणसाच्या सहवासात सर्वांना उत्साह येतो. मनात चांगले विचार येतात. नवनव्या कल्पना स्फुरतात. त्यांच्या नुसत्या हजेरीने अडचणी, निराशा नाहीशा होतात. असे लोक सर्वांना हवेहवेसे असतात. पटतंय ना आपल्याला? असं होतं ना काही व्यक्तींबाबत? अशी कोणती जादूची छडी असते या लोकांकडे? वरकरणी सामान्य दिसत असले, तरीही त्यांना असामान्य बनवतो तो त्यांचा दृष्टीकोन, स्वत:ला इतरांना अन् परिस्थितीला पाहणारा...

आज आपण या दृष्टीकोनालाच समजून घेणार आहोत. खरं तर दृष्टीकोन हा आपल्या विचारांवर होणारा एक संस्कार आहे, जो आपल्या स्वत:कडून आजूबाजूच्या परिस्थितीतून होणाऱ्या आपल्या आकलनातून घडत असतो. सकारात्मक दृष्टीकोन माणसाचं जगणं सुलभ करतो. आनंददायी करतो.

एखादी गोष्ट, व्यक्ती वा घटना याकडे आपण कसं पाहतो आणि त्याबाबत कोणतं मत बनवतो, त्यानुसार आपला दृष्टीकोन ठरतो.

'पिंडे पिंडे मति: भिन्न:' यानुसार एकच गोष्ट प्रत्येक व्यक्तीला वेगळया पध्दतीने दिसते. म्हणजे बघा हं... एखाद्या नवविवाहित मुलीकडून काम करताना काचेची मोठी बरणी फुटली. त्या वेळी  तिथे तिची सासू, तिची आई आणि अन्य नातेवाईक उपस्थित असतील, तर ह्या घटनेवर तिच्या सासूची प्रतिक्रिया कशी असेल? तिच्या आईची प्रतिक्रिया कशी असेल? आणि अन्य व्यक्तींची प्रतिक्रिया कशी असेल बरं? विशेषत: सासू आणि आई यांचे शब्द, भाव, आवाज सारं काही एकसारखं असेल का? निश्चितच नाही. कारण त्याकडे बघण्याचा प्रत्येकीचा दृष्टीकोन वेगळा आहे.

म्हणून म्हणतात ना... जसा चश्मा लावाल तसं जग दिसेल. आता आपण कोणता चश्मा लावणार बरं? दृष्टीकोन आपल्या जगण्याला मूल्य देतो. ज्या ज्या व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने काळावर आपली मोहोर उठवली, त्यांनी प्रतिकूलतेवर मात करतच हे साध्य केलं. कोणतीही यशस्वी व्यक्ती पाहा ना, त्यांनी जगाकडे वेगळया दृष्टीने पाहिलं हेच त्यांच्या यशाचं गमक असतं.

असाच एक किस्सा भगतसिंग यांच्या जीवनातला. खरं तर जीवनाच्या शेवटच्या काही तासांमधला. देहदंडाची शिक्षा झालेली. फासावर चढण्याचा दिवस उजाडला. तुरुंगामधला मध्यम वयाचा शिपाई जड अंत:करणाने त्यांना हाक मारायला आला, तेव्हा त्याने पाहिलं - एक पुस्तक वाचण्यात ते गढून गेले होते. शिपाई म्हणाला, ''मी तुम्हाला जागं करायला आलो, पण तुम्ही तर...?'' भगतसिंग शांतपणे हसत म्हणाले, ''अरे, खूप सुंदर पुस्तक आहे. शेवटची दोनच पानं राहिली आहेत, ती पूर्ण करतो.'' त्यांच्या स्थिर वृत्तीला तोडच नव्हती. मरणाला सामोरं जाणाऱ्या त्या तरुणाचा जीवनाकडे पाहण्याचा तो दृष्टीकोन तो शिपाई डोळे भरून पाहत राहिला.

असंच आणखी एक उदाहरण इतिहासाने आपल्यासमोर ठेवलं. ज्यांना बालपणी, तरुणपणी अपमानाचे, अवहेलनेचे चटके बसले, विषमतेच्या विखाराने माणूसपणाचा अधिकारही नाकारला गेला, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या मनात कधीही कटुता, वैरभाव, बदला घेण्याचे विचार डोकावले नाहीत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जे अनुभवलं, त्यातून टोकाची नकारात्मकता जन्मली नाही. म्हणून तर तारतम्याने विचार करत त्यांनी मुस्लीम अन् ख्रिश्चनांच्या आमंत्रणाला नकार देत भारताच्या प्राचीन परंपरेशी नातं सांगणाऱ्या बौध्द धर्मात 5 लाख बांधवांसह प्रवेश केला. याला एकमेव कारण म्हणजे परिस्थितीकडे, भविष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन.

आपल्या स्वयंपाकघरात दोन वस्तू प्रत्येक गृहिणीच्या हाताशी असतात. एक असते चाळण, जी नेहमी निरुपयोगी गोष्टींना स्वत:शी कवटाळते आणि जे काही उपयुक्त ते सारं सोडून देते. तर दुसरी वस्तू असते सूप... ते पिण्याचं सूप नाही हं... धान्य आसडण्याचं बाबूंच्या काडयांनी विणलेलं सूप. काय करतं ते? तर नकोशा गोष्टी निवडून बाहेर टाकण्याचा आणि स्वच्छ, शुध्द धान्य स्वत:मध्ये राखून ठेवण्याचा त्याचा स्वभाव. दोन वस्तूंचे परस्परविरोधी दृष्टीकोन आणि त्यानुसार होणारी कृती.

आपल्या आजूबाजूच्या जगाकडे आणि स्वत:कडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक केली पाहिजे.

काही व्यक्तींना प्रत्येक गोष्टीत खोट काढण्याची सवय असते. पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहतानादेखील ''त्यावर काहीतरी काळं दिसतंय'' असं तोंड वाकडं करून सांगणाऱ्या मंडळींचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा निराश, नकारात्मक असतो.

मला एक परिचित आठवले. त्यांच्याशी बोलताना कोणाबद्दल काही चांगलं बोलण्याचा अवकाश, की ते म्हणायचे, ''हे बघ, एका पिसाने मोर होऊ नये. या जगात 100% चांगलं काहीच नाही.'' आपलं मत पटवायला ते अनेक उदाहरणं द्यायचे. पण मला वाटतं आपण दुसऱ्या बाजूने विचार केला पाहिजे. हेच वाक्य आपण असंही म्हणून शकतो की या जगात 100% वाईट काहीच नाही. काहीतरी चांगलं असतं म्हणून तर आपण असतो. ते चांगलं प्रकट करणं हेच तर आपलं उद्दिष्ट आहे.

यासाठी प्रत्येकामध्ये आणि स्वत:मध्ये असलेल्या चांगुलपणावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात करू. हळूहळू आपला दृष्टीकोन बदलत जाईल.

आणखी एक (गैर)समज आपण करून घेतलेला असतो - जे काही प्रतिकूल होतं ते सगळं माझ्याच वाटयाला आलं; सारं जग किती सुखी आहे! किती सोपं आहे त्याचं जगणं, मला मात्र कष्टांचा डोंगर... बोललो नाही, तरी आपण जेव्हा इतरांच्या आयुष्याकडे पाहतो, तुलना करतो, तेव्हा आपली दु:खं फार मोठी वाटतात आणि दुसऱ्याची दु:खं हलकी वाटतात. म्हणतात ना 'परपिडा शितल:'। यावरून एक ऐकलेली कथा आठवली. सगळी माणसं ब्रह्मदेवाची प्रार्थना करू लागली. इतकी दु:खं दिलीस आणि इतरांना छान सुखात ठेवलंस. प्रत्येक जण देवाला आपली दु:खं कमी करण्याची विनंती करू लागला. ब्रह्मदेव प्रकट झाले, त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले, ''ठीक आहे. तुमची प्रत्येकाची दु:ख एकत्रित करा आणि तुम्हाला जी पिशवी दिली जाईल, त्यात बांधा. ही पिशवी समुद्रात फेकून द्या. पण एक अट आहे. ही दु:खाची गाठोडी भरतीच्या वेळी किनाऱ्यावर येतील, तेव्हा त्यातील एक हलक्यात हलकं गाठोडं तुम्हाला घ्यावं लागेल.'' सगळी माणसं खूश झाली. त्यांनी देवाने सांगितल्याप्रमाणे आपापली दु:ख पिशवीत भरली, त्याला गाठ मारली आणि समुद्रात टाकून दिली. ज्या वेळी भरतीने ही एकसारखी दिसणारी गाठोडी समुद्रकिनाऱ्यावर आणली, तेव्हा जो-तो हलक्यात हलक्या गाठोडयाची निवड करू लागला. प्रत्येकाने आपल्याला हवं ते गाठोडं उचललं. सर्वांची निवड पूर्ण झाल्यावर देवांनी ती गाठोडी उघडून पाहायला सांगितलं. प्रत्येकाने आपली पिशवी उघडली... पाहतात तर काय... त्यांनी नको म्हणून फेकलेली दु:खच सर्वात हलकी म्हणून त्यांनी निवडली होती. प्रत्येकाला समजून चुकलं. आपल्याला पेलेल इतकंच दु:ख आपल्याला मिळतं.

तात्पर्य काय, दुसऱ्याच्या गोष्टींची तुलना करत अनेक जण स्वत:च्या आयुष्याकडे निराशेने पाहतात. तसंच इतरांचं यश म्हणजे आपला पराजय ही 'पक्की धारणा' बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी आपली दृष्टी अधिक व्यापक केली पाहिजे.

परिस्थितीला, नशिबाला दूषणं देणं टाळून, उपलब्ध गोष्टींची योग्य जुळवाजुळव करून अडचणींतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

जसा आपला दृष्टीकोन, तशी आपली दृष्टी आणि जशी दृष्टी तशी प्रगती. एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. 999 प्रयत्न असफल झाले. 1000व्या प्रयत्नात तो यशस्वी झाला. त्याला प्रसिध्दी मिळाली. त्याची मुलाखत झाली, त्यात ''999 चुकांबद्दल काय वाटतं?'' असं विचारलं गेलं. तो म्हणाला, ''एकही प्रयत्न फुकट गेला नाही. प्रत्येत प्रयत्न मला दिव्याच्या 'योग्य तंत्राकडे' नेतच होता. दिवा कसा बनवायचा नाही, हे त्या प्रत्येक प्रयत्नाने शिकवलं मला.''

यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी अशक्य नाहीत. संपूर्ण प्रयत्न यशाकडे जाण्यासाठी करावेत. पण कधी अपयश आलंच, तर ते स्वीकारलं पाहिजे.

आपण मनुष्य आहोत, त्यामुळे आपणही कळत-नकळत चुकू शकतो, हे स्वीकारावं. चूक मान्य करावी अन् त्यावर काम करावं.

कोणतीही गोष्ट बोलताना ती होकारात्मक पध्दतीने कशी मांडता येईल याचा विचार करावा. उदा. 'एखादी व्यक्ती इथे नाही' म्हणण्यापेक्षा 'ती बाहेर गेली आहे' असं म्हणणं अधिक योग्य.

माननीय पंतप्रधान एका भाषणात म्हणाले होते, ''काही जण म्हणतात, 'पेला अर्धा रिकामा आहे', तर काहींना तो अर्धा भरलेला दिसतो. पण मी म्हणतो, पेला पूर्ण भरलेलाच आहे. अर्धा पाण्याने तर अर्धा हवेने.'' प्रत्येक गोष्टीकडे पाहताना या दृष्टीने पाहिलं, तर टाकाऊ, उपद्रवी गोष्टींचा आश्चर्यकारक वापर करता येईल.

सकारात्मकता हा आपला सहजभाव व्हावा, यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात काही सुलभ गोष्टींचा समावेश करू या.

1) दिवसाची सुरुवात स्वत:ला शुभेच्छा देऊन करू या.

2) आरशात पाहून स्वत:ला स्मितहास्याची भेट देऊ या.

3) आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या किंवा आठवणीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबाबत एखादी चांगली आठवण आठवून त्याला उजाळा देऊ या.

4) नकोशा, त्रासदायक अनुभवांची उजळणी करून भूतकाळाची सावली वर्तमानावर पडू देणं टाळू या.

5) प्रत्येक व्यक्तीला नमस्कार, गुड मॉर्निंग इत्यादी म्हणून Positive environment निर्माण करू या.

6) इतरांच्या चुका काढणं, इतरांना दोष देणं टाळू या.

7) वर्तमानात जगायला शिकू या. भूतकाळाच्या गुऱ्हाळाने किंवा भविष्याच्या चिंतेने केवळ निराशा येते.

8) T.V.वरील नात्यात नकारात्मकता, अविश्वास निर्माण करणाऱ्या मालिका टाळू या.

9) आपल्याला जसं कोणी चांगलं म्हटलं की आपण सुखावतो, हाच न्याय इतरांबाबत ठेवून इतरांच्या चांगल्या गोष्टीचं मनापासून कौतुक करू या.

10) एक सकारात्मक शब्द तुम्हाला 100 पट सकारात्मकता मिळवून देतो.

11) चुकांमधून आलेल्या अपयशावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा चुकीला कारणीभूत घटकांना बाजूला करून अचूकतेने यश मिळवण्यावर लक्ष देऊ या.

तात्पर्य काय, तर पोटभर जेवणाऱ्या गर्भश्रीमंताने 'आज चव काही जमली नाही' म्हणणं किंवा दिवसातून एकदाच पोटभर जेवणाऱ्याने तृप्तीने ढेकर देणं हे आपल्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे.

जगण्याच्या या नावीन्याने, आश्चर्याने भरलेल्या प्रवासाला सकारात्मकतेच्या परिसाचा स्पर्श करून सोनेरी रंगाचा साज चढवणं, गोड-कडू-आंबट चवींचे आस्वाद घेत अनुकूल-प्रतिकूलतेच्या धाग्यांनी पुढे सरकणारा हा प्रवास अधिक सुखकर करणं आणि ही जीवनाची सुंदर भेट देणाऱ्या विधात्याचे आभार मानणं हे आपल्याच हाती आहे.

शेवटी आपणच तर ठरवायचं आहे 'कसं जगायचं.. रडत रडत की गाणी म्हणत...'

लेखिका समुपदेशक आहेत.

9273609555