योग आणि मधुमेह

विवेक मराठी    07-Mar-2017
Total Views |

नियमित योग केल्याने रक्तातलं ग्लुकोज कमी होतं. रक्तदाब उतरतो, शरीरातला रासायनिक गोंधळ सुधारतो. त्यामुळे कोलेस्टेरॉल नॉर्मलच्या दिशेने वाटचाल करतं. इन्श्युलीन रेझिस्टन्स कमी होतो. टाइप टू मधुमेहात हाच मोठा प्रश्न असल्याने त्यात झालेली सुधारणा मधुमेहींना खूपच दिलासादायक ठरते.

व्यायामाला आणखी काही गोष्टींची जोड मिळाली, तर मधुमेह अधिक कह्यात येतो हे लक्षात घ्यायला हवं. जगभर मान्यता पावलेल्या अशा जोड उपचार पध्दतींपैकी आपला योग हा कदाचित सर्वात वरचा असावा. परंतु योगसाधना म्हणजे चालण्याच्या किंवा पोहण्यासारख्या इतर व्यायामांना फाटा असं नव्हे. रोजचा, आपण निवडलेला, ऑॅक्सिजन वापरणारा, एरोबिक व्यायाम प्रकार सुरू ठेवून त्याला जोड म्हणून मधुमेहात जे काही करायचं, त्याचा योग हा एक भाग असला पाहिजे.

इथे कदाचित कोणी प्रश्नचिन्ह उभं करील की खरंच योगाभ्यासाचा काही निश्चित फायदा होतो का? त्याचं उत्तर ठामपणे सकारात्मक देता येईल. अगदी मान जोराने वळवून ''हो'' म्हणता येईल. कारण जगाने ठोस पुरावे मागितले, तरी आपण ते हसतमुखाने देऊ. योगाच्या उपयुक्ततेवर कित्येक शोधनिबंध लिहिले गेलेले आहेत. जगात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अनेक वैद्यकीय जर्नल्समध्ये ते प्रसिध्द झालेत. इतकंच कशाला, पुराव्यांवर आधारित वैद्यकाचा पुरस्कार करणाऱ्या मधुमेहाच्या पाठयपुस्तकात त्याला मानाचं पान दिलं गेलं आहे. एक आख्खं प्रकरण त्यासाठी राखून ठेवण्यात आलं आहे. एक भारतीय म्हणून आपली छाती गर्वाने फुगून यावी अशी ही गोष्ट आहे, इतकं नक्की.

अगदी ॐकारापासून याची सुरुवात होताना दिसते. ॐकार काही काळासाठी आपलं लक्ष फक्त श्वास आणि मुखातून निघणारे शब्द यावर केंद्रित करतो. तितका वेळ आपल्या मनात इतर कुठलेही विचार येत नाहीत. त्यामुळे आपल्या शरीरात स्रवणारे स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात. स्ट्रेस हॉर्मोन्स मुळातच रक्तदाब आणि रक्तातली ग्लुकोजची मात्रा वाढवण्यासाठी बनलेले आहेत. उत्क्रांतीच्या काळात प्रत्येक प्राण्यामध्ये निसर्गाने अशा सोयी करून ठेवल्या आहेत की प्राण्याला असलेल्या धोक्यापासून त्याला स्वत:चं संरक्षण करता यावं. स्ट्रेस हॉर्मोन्स हा त्या सोयींचाच एक हिस्सा आहे. पूर्वी जेव्हा आपण इतर प्राण्यांसोबत जंगलात राहत होतो, तेव्हा हा धोका जीविताला असायचा. मग स्वत:चा जीव सुरक्षित राखताना आपल्याला एकतर त्या प्राण्याशी लढाई तरी करावी लागायची किंवा त्या प्राण्याच्या कक्षेपासून दूर पळून तरी जावं लागायचं. सर्व शक्तीनिशी प्रतिकार अथवा जास्तीत जास्त वेगानं पळणं या दोन्हींसाठी ऊर्जा लागायची. अर्थातच नेहमीच्या आपल्या ऊर्जेच्या गरजेत अचानक वाढ करता यावी, केवळ काही क्षणात तुमचे स्नायू तयार व्हावेत अशी काहीतरी योजना करणं निसर्गाला भाग होतं. स्ट्रेस हॉर्मोन्स निर्माण करून निसर्गाने आपला हा प्रश्न सोडवला.

पण माणूस खुल्या जंगलातून बाहेर पडून वस्त्यांमध्ये आला आणि कुंपण बांधून राहू लागला. त्याने हत्यारं बनवली. जंगलातल्या अगदी हिंस्र श्वापदांशी लढाई जिंकणं त्याला फारच सोपं बनलं. यासाठी त्याला आपल्या तल्लख मेंदूचा प्रचंड उपयोग झाला. पण श्वापदांचा धोका कमी कमी होत असताना याच तल्लख मेंदूने त्याचा घात करायला सुरुवात केली. उत्क्रांतीवादातून निर्माण झालेले स्ट्रेस हॉर्मोन्स त्याच्या शरीरात तसेच होते. मानवाने अल्प काळात केलेल्या प्रगतीचा आणि कित्येक हजार शतकातच उत्क्रांत होऊ शकणाऱ्या शरीराच्या जीन्सचा मेळ काळाच्या मोजपट्टीत बसणं काही शक्य नव्हतं. तल्लख मेंदूला पडलेल्या विविध प्रश्नांनी त्याचे स्ट्रेस हॉर्मोन्स उद्दीपित होऊ लागले. त्याचं ग्लुकोज आणि रक्तदाब वाढवू लागले. माणूस तणावाचा शिकार बनला. आजारी पडू लागला.

इथे त्याच्या बुध्दीचा वापर करून माणसाने आपली औषध प्रणाली विकसित करून घेतली. आपण अधिकाधिक जगू कसे हे पाहिलं. पण या उपचार पध्दती मोठया प्रमाणात तयार होत असताना एक चूक झाली. रोगांवर लक्ष केंद्रित झालं. मनाचा विचार फार कमी केला गेला. मनातले विचार, त्यांचा रोगांवर होणार परिणाम आणि स्ट्रेस हॉर्मोन्स यांची सांगड पुरेशा प्रमाणात घातली जायला हवी होती, ते झालं नाही. एक प्रकारे प्रचलित उपचार पध्दतीत ही फार मोठी त्रुटी राहून गेली. आपण मात्र सुदैवी निघालो. आपल्या ॠषिमुनींनी या सगळयाचं त्रैराशिक आधीच मांडलं होतं. त्यांनी योग निर्माण केले होते. आता जगाला याची महती पटली आहे. औषधोपचारासोबत आणखी काहीतरी करायला हवं असतं, हे त्यांनी हेरलं आहे.

थोडक्यात सांगायचं, तर आजार बरे करण्यामध्ये योग अनेक दृष्टीने सहभागी होतो. शरीराची हालचाल घडवत असल्याने तो एक प्रकारचा व्यायाम होतो. शरीरातले अनेक चांगले उपयुक्त हॉर्मोन्स त्यामुळे उद्दीपित होतात. नको असलेले, ग्लुकोज वाढवणारे अनेक हॉर्मोन्स शांत होतात. योग प्रत्येक माणसाच्या जीवनशैलीत शिस्त आणतो. मधुमेह हा चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम असल्याने जीवनशैली सुधारल्यावर त्याचा उचित फायदा दिसणं स्वाभाविक आहे. सगळयात महत्त्वाचं म्हणजे योग स्ट्रेस कमी करतो. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून आपल्याला योगाचा निश्चित उपयोग होतो.

हे स्पष्ट आहे की नियमित योग केल्याने रक्तातलं ग्लुकोज कमी होतं. रक्तदाब उतरतो, शरीरातला रासायनिक गोंधळ सुधारतो. त्यामुळे कोलेस्टेरॉल नॉर्मलच्या दिशेने वाटचाल करतं. इन्श्युलीन रेझिस्टन्स कमी होतो. टाइप टू मधुमेहात हाच मोठा प्रश्न असल्याने त्यात झालेली सुधारणा मधुमेहींना खूपच दिलासादायक ठरते. तणाव कमी तर होतोच.

आता प्रश्न उपस्थित होतो की योगाच्या कुठल्या अंगांचा मधुमेहींना फायदा होतो? ॐकार हा योगात महत्त्वाची जागा पटकावून आहे. विशेषत: ॐकाराचा धर्माशी संबंध लावत काही जण त्याच्यापासून होणाऱ्या फायद्यापासून वंचित राहतात, हे दुर्दैवी आहे. मधुमेहात त्याची उपयुक्तता प्रचंड आहे. इतस्तत: भटकणारं मन स्थिरस्थावर करत ॐकार तुमचा तणाव जवळजवळ नाहीसा करतो. प्राणायामालादेखील मधुमेह नियंत्रणात राखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपचारात मानाचं पान आहे.

काही आसनं मधुमेह काबूत राखतात, असं दिसून आलं आहे. त्रिकोणासन, कटिचक्रासन, अर्धमत्स्येंद्रासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, धनुरासन, पादचक्रासन, शवासन ही मधुमेहात उपयोगी पडणारी काही प्रमुख आसनं. पैकी अर्धमत्स्येंद्रासन आणि धनुरासन या दोन आसनांच्या बाबतीत त्यांची बाजू मजबूतपणे मांडता येईल इतका पुरावा मिळाला आहे.

योगप्रकारांसोबत आणखी एका भारतीय पध्दतीने जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. महर्षी महेश योगींनी ज्याचा आयुष्यभर पुरस्कार केला, ते 'ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन' खरंच आपला तणाव बराच कमी करतं, हे सिध्द झालेलं आहे. वेगवेगळया धर्मांमध्ये प्रार्थना वेगवेगळया असतील, पण त्यामागची प्रेरणा कदाचित आपलं आरोग्य चांगलं राहावं, आपल्या मनावरचा ताण थोडा तरी हलका व्हावा अशी असावी असं मानायला जागा आहे. 

आपण आपली पाठ थोपटून घेत असताना जगभर चाललेल्या अशाच प्रयत्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चीन हा आपल्याइतकीच जुनी परंपरा असलेला देश. त्यांनी ताई ची नावाचा प्रकार आणला. आता ज्याला 'गायडेड इमॅजेरी' म्हणतात, तो पाश्चिमात्य देशातून आला आहे. पहिला प्रकार उदयाला आला तो मार्शल आर्ट म्हणून. परंतु आता मात्र त्याचे आरोग्यविषयक फायदे लोकांच्या ध्यानात यायला लागले आहेत. त्यात शिकवले जाणारे व्यायाम प्रकार तुमची शारीरिक क्षमता वाढवतात, तर मन एकाग्र करण्यासाठी आणि शांत करण्यासाठीचा भाग तुम्हाला दीर्घायुषी करतो. याच कारणाने ताई ची सध्या जगभर धूम माजवतं आहे. आपल्या योगाला स्पर्धा निर्माण करतं आहे. गायडेड इमॅजेरीमध्ये जेव्हा तुम्हाला खूप तणाव येतो, तेव्हा ते शांत करण्यासाठी तुम्ही मनाने प्रयत्नपूर्वक वेगळया ठिकाणी, वेगळया वातावरणात जाण्याचं काम करता. अशा वेगळया वातावरणात जिथं तुमचं मन रमेल, तुमच्या मनाला शांती मिळेल.

योग, प्रार्थना आणि त्यांचे आधुनिक आविष्कार सगळे तुमचा मधुमेह खाली आणण्याचं काम करतात, हे निश्चित.

& 9892245272