वैद्यकीय विश्व बदललंय...

विवेक मराठी    01-Apr-2017
Total Views |

***डॉ. रवी बापट****

धुळयात आणि ठाण्यातील रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याच्या घटना अलीकडे पुन्हा घडल्या. त्यामुळे निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुरक्षिततेच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी 'मार्ड'ने मोठा संप केला होता. हा आताच उद्भवलेला, तात्कालिक स्वरूपाचा प्रश्न नाही. गेली अनेक वर्षे हा प्रश्न वैद्यकीय विश्वात आणि प्रसारमाध्यमात वेगवेगळया घटनांनी वारंवार चर्चेत येत असतो. या निमित्ताने प्रख्यात सर्जन, मार्डचे संस्थापक व ज्येष्ठ लेखक डॉ. रवी बापट यांनी डॉक्टर-रुग्ण यांच्या हरवलेल्या संवादासंबंधी आणि एकूण वैद्यकीय विश्वासंबंधी आपले विचार व्यक्त केले आहेत.

धुळयातील आणि ठाण्यातील डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाइकांनी हल्ला केल्याच्या बातम्या आपण नुकत्याच वाचल्या असतील. धुळयातल्या डॉक्टरांच्या डोळयाला तर जबर जखमही झाली. यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा प्रकाशात आला आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यामागची कारणं ही डॉक्टर, रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक या तिघांशी जोडलेली असतात.

डॉक्टर-रुग्ण सुसंवादाचा अभाव

डॉक्टर-रुग्ण सुसंवाद हा प्रकार गेल्या काही वर्षांत कमी कमी होत आता लुप्त झाला आहे. याचं कारण रुग्णाशी आणि त्याच्या नातेवाइकांशी कसा संवाद साधावा, याचं अपेक्षित शिक्षण डॉक्टरांना दिलं जात नाही. संवादकौशल्य या अभ्यासक्रमात असणाऱ्या छापील विषयातून 'संवाद' शिकता येत नाही. ही गोष्ट आपण आपल्या ज्येष्ठांकडून शिकायची असते. ते कोणत्याही पुस्तकात छापलेलं नसतं. समजा, एखाद्या माणसाला यकृताचा कर्करोग झाला असेल. त्याविषयी त्याच्या पातळीवर येऊन, त्याला समजेल अशाच भाषेत सांगणं गरजेचं आहे. तो कोणत्या समाजातला, कोणत्या प्रांतातला आहे याचा अंदाज घेऊन आपल्याला त्याच्याशी बोलावं लागतं.

प्रॅक्टिस करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरसाठी गुरू-शिष्य परंपरा आवश्यक असते. मी राउंडच्या वेळी वॉर्ड नंबर पाचमध्ये रुग्णांशी बोलत असताना अनेक विद्यार्थी बाहेर उभे असायचे ते केवळ आमचा संवाद ऐकण्यासाठी. अनेकदा रुग्णाचे नातेवाईक मला येऊन सांगतात - तुमच्याशी नुसतं बोलल्यानंतर रुग्णाला बरं वाटतं. काही वेळा रुग्णांना आपल्याला काहीतरी होतंय असं वाटत असतं, पण प्रत्यक्षात रिपोर्ट्समध्ये कोणत्याही विशिष्ट आजाराची लक्षणं आढळत नाहीत. अशा वेळी मी त्यांना त्यांची दिनचर्या विचारतो. माणसाच्या मानसिक स्थितीचा परिणाम त्याच्या शरीरावर होत असतो. झोपेच्या कमतरतेचाही परिणाम शरीरावर झालेला दिसून येतो. पण एक डॉक्टर म्हणून रुग्णाशी तुमचा संवादच नसेल, तर या निष्कर्षाप्रत येणार कसे? रुग्णाशी आपण काय, कसं आणि किती बोलतो यावर त्यांच्या मनावरचा नेमका ताण डॉक्टरला कळणं अवलंबून असतं. एखाद्या माणसाला तपासल्यावर तो दुर्धर आजारामुळे दगावणार आहे हे डॉक्टर म्हणून आम्हाला समजलेलं असतं. पण त्याचे तांत्रिक आडाखे देऊन आपण रुग्णाशी आणि त्याच्या नातेवाइकांशी बोलू शकत नाही. अन्य शास्त्रं ग्राहककेंद्री असली व ग्राहकाशी संवाद असणं अपेक्षित असलं, तरी एखादं मशीन बिघडलं असेल तर वापरणाऱ्याला स्पष्टपण सांगता येतं. पण रुग्णाच्या बाबतीतला शरीरातला बिघाड त्याच्या नातेवाइकांना सांगायचा कसा? हाच वैद्यकशास्त्र आणि अन्य शास्त्रांतला फरक आहे. रुग्णाच्या नातेवाइकांचे असंख्य प्रश्न असतात. त्यात आजची पिढी भरपूर वाचते. वेगवेगळया माध्यमांतून अधिकाधिक माहिती मिळवते. अशा वेळी उत्तर देताना डॉक्टरांनी व्यवस्थित संवाद साधण्याचं कौशल्य मिळवणं गरजेचं असतं.

आपल्याकडे आलेल्या काविळीच्या रुग्णाला पित्तनलिकेचा किंवा स्वादुपिंडाचा कर्करोग झालेला आहे, असं माझ्या लक्षात आलं, तर मी त्याला आपण कर्करोगाची चाचणी करू या असं थेट सांगणं योग्य नाही. मी त्याला सांगेन की कावीळ तीन प्रकारची असते. 1. साथीची कावीळ - जी केवळ औषधाने बरी होते. 2. पित्ताशयात किंवा स्वादुपिंडात होणारी व ऑपरेशनने बरी होऊ शकणारी कावीळ आणि 3. जन्मतःच बाळाला होणारी कावीळ. रुग्णाला त्यातली कोणती कावीळ झालीये ते समजून घेण्यासाठी काही तपासण्या कराव्या लागतील. कोणत्याही रुग्णाला दोन किंवा तीनपेक्षा अधिक तपासण्या कराव्या लागत नाहीत. यातून दोन गोष्टी स्पष्ट होतील - 1. कर्करोगाच्या क्लिनिकल निदानाला पुष्टी मिळेल, 2. बायोप्सीसारख्या कर्करोगाच्या चाचणीची गरज आहे की नाही तेही लक्षात येईल. अशा पध्दतीने सांगितलं तर त्याला आजाराविषयी माहिती मिळेल, पण त्याचा ताणही येणार नाही.

मागे पडलेली क्लिनिकल निदान पध्दती

माझ्या पिढीतल्या डॉक्टरांचा क्लिनिकल निदानावर जास्त विश्वास आहे. एखाद्या रुग्णाच्या आजाराचं क्लिनिकली निदान करून त्याच्याशी संबंधित तेवढयाच चाचण्या करायला सांगण्याची आमची पध्दत. कारण क्लिनिकली निदान करण्यासाठी आमचा रुग्णांबरोबर आवश्यक तेवढा संवाद असतो. हल्ली मात्र रुग्णाशी संवाद साधण्यापेक्षा ढीगभर चाचण्यांवरून निदान करण्याकडे डॉक्टरांचा कल असतो. डॉक्टरांकडे गेलं की 15-20 चाचण्यांची एक छापलेली यादीच आपल्या हातात देण्यात येते आणि रुग्णाला त्या करूनही घ्याव्या लागतात. खरं तर क्लिनिकल निदान, तात्पुरतं निदान, संबंधित निदान आणि शेवटचं पण निश्चित निदान असं हे चार टप्प्यांवर रुग्णाचं निदान होणं अपेक्षित असतं. निदान पक्कं असेल तर त्याचे उपचार शास्त्रात लिहिलेले आहेत. रुग्णतपासणीची मूळ पध्दतीच सध्या बदलून गेली आहे. डॉक्टर्स सध्या रुग्णांवर उपचार करत नसून तपासण्यांमधून पुढे आलेल्या निकालांवरच जास्त उपचार करतात, असं आपण म्हणू शकतो. Its a sad demise of clinical diagnosis - अर्थात क्लिनिकल निदान पध्दती मृत झाली आहे असं मी माझ्या भाषणात नेहमी सांगतो. (भारंभार चाचण्यांच्या नव्या निदान पध्दतीत आर्थिक हितसंबंधांचा भाग किती, हा आणखी वेगळा लेखाचा विषय ठरेल.)


या सगळया पार्श्वभूमीवर धुळयाच्या घटनेबाबत रुग्णाच्या मनावर असलेल्या ताणाचा विचार आपण करू शकतो. जेव्हा रुग्ण आणि त्याचे नातेवाईक द्विधा मनःस्थितीत असतात, तेव्हा त्यांना मानसिक आधार हवा असतो आणि तो डॉक्टरकडून त्याची अपेक्षा करत असतो. अशा वेळी आपल्या प्रकृतीची नेमकी स्थिती रुग्णाला माहीतच नसेल आणि रुग्णाच्या नातेवाइकांबरोबर चर्चा करण्याची डॉक्टरांचीही इच्छा नसेल, तर त्यांचं चिडणं स्वाभाविक नाही का? वैद्यकशास्त्र हे गणितीय विज्ञान नाही. दोन अधिक दोन बरोबर चार अशी गणितं इथे मांडता येत नाहीत. रुग्णाच्या नातेवाइकांना आजाराचं स्वरूप, त्यातली जोखीम, या आजारातून बरं होण्याची सर्वसाधारण शक्याशक्यता शांतपणे समजावून सांगता आली पाहिजे. रुग्णाबरहुकूम रोगाचं स्वरूप, त्याच्या नातेवाइकांची वागण्याची तऱ्हा भिन्न असणार आहे हे डॉक्टरांनीही लक्षात ठेवायला हवं.

वैद्यकशास्त्रातील क्लिनिकल निदान संस्कृती लयाला जात चालली आहे, तशीच आणखी एक संस्कृती विरत चालली आहे, ती म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर्स अर्थात फॅमिली डॉक्टर. फॅमिली डॉक्टर हा कुटुंबाचा मित्र, सखा आणि तत्त्वज्ञ असे. अनेक गोष्टी त्याच्या सल्ल्याने केल्या जात असत. फॅमिली डॉक्टरचा घरातल्यांशी संवाद असे. त्यामुळे घरातल्या प्रत्येकाच्या प्रकृतीची त्याला ओळख असे. आज डॉक्टर होण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला विशेषज्ञ, एम.डी. व्हायचं असतं. त्यामुळे एम.बी.बी.एस. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना नष्ट होत चालली आहे. केवळ 8 ते 10 टक्के एमबीबीएस जीपी (जनरल प्रॅक्टिशनर) म्हणून काम करत आहेत. अनेकदा होमिओपॅथ आणि वैद्य हे फॅमिली डॉक्टर म्हणून भूमिका बजावतात. बऱ्याचदा रुग्णांचीही स्पेशालिस्टकडेच जाण्याची इच्छा असते. मात्र आपला फॅमिली डॉक्टर जेवढया मोकळेपणे आपल्याशी बोलतो, तेवढया मोकळेपणाने स्पेशलिस्ट बोलू शकत नाही. यामागचं कारण उघड आहे. आपली त्याच्याशी जुजबी ओळख असल्यामुळे आपण त्याच्याबरोबर 'कम्फर्टेबल' नसतो. पण ही गोष्ट लोकांच्या लक्षात येत नाही.

पालकांचा निरर्थक अट्टाहास - विसंवादाचं एक कारणच

वैद्यकीय क्षेत्राकडे समाजसेवेचं व्रत म्हणून पाहिलं जातं. आज अनेक मुलं वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतात. त्यासाठी आईवडील लाखो रुपयेदेखील मोजतात. पण त्या मुलाला खरंच डॉक्टर व्हायचं आहे का याचा विचार केला जातो का? मी माझ्या मुलाला डॉक्टरच करणार हा अनेकदा आईवडिलांचाच अट्टाहास असतो. मग त्याचा रस कशातही का असेना. अनेकदा पालकच जबरदस्ती मुलांना वैद्यकीय क्षेत्रात जायला लावतात, असं आमच्या लक्षात आलंय. त्यासाठी सीईटीसारख्या परीक्षांच्या अगि्दिव्यातून त्यांना जावं लागतं. मुळात अशी एखादी वस्तुनिष्ठ स्वरूपाची प्रवेश परीक्षा मुलांचं या क्षेत्रातलं भवितव्य ठरवू शकते, याबद्दलच माझ्या मनात संदिग्धता आहे. एखाद्या मुलाला खरोखरच डॉक्टर व्हायचं आहे, पण त्याला या प्रवेश परीक्षेत गुण कमी मिळाले, तर त्याला प्रवेशासाठी भरपूर पैसा ओतावा लागणार हे उघड. दुसरीकडे मुलाला डॉक्टर करण्याच्या इच्छेपायी आईवडील वाट्टेल तेवढा पैसा ओतायला तयार होतात. पुढे मग त्याच्या डॉक्टरकीला माणुसकीऐवजी व्यावसायिक आयाम जोडले जातात.

ब्रिटिशांनी अनुदानं देऊन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं सुरू केली. मी शिकत असताना जिथे सरकारी महाविद्यालयांत 480 रुपये फी होती, तेव्हा खासगी महाविद्यालयांत मात्र ती काही हजारांत होती. जेव्हा एखाद्या गोष्टीचं मूल्य ठरवलं जातं, तेव्हा निर्मिती, पुढील सर्व टप्प्यांवर होत जाणारे बदल ते अगदी विक्रीपर्यंत सर्व गोष्टींचा विचार केला जातो. आपण जर या क्षेत्राला मेडिकल प्रोफेशन अर्थात वैद्यकीचा व्यवसाय म्हणत असू, तर व्यावसायिक म्हणवल्या जाणाऱ्या या सगळया घटकांचा अंतर्भाव फीमध्ये होणार हे उघड आहे. सध्या 'मागणी तसा पुरवठा'चा जमाना आहे. व्यवसायासाठी लागणाऱ्या सगळया क्लृप्त्या या क्षेत्रातही वापरल्या जातात. पण यामुळे लोकांचा या क्षेत्राकडचा ओढा मात्र कमी होताना दिसत नाही. वैद्यकीय व्यवसायाला कट प्रॅक्टिससारख्या गैरप्रकारांची कीड लागण्यामागेही अशीच व्यावसायिक कारणं दिसून येतात. यासाठी तथाकथित मेडिकल सोशल वर्कर्सचा अनेकदा रुग्णालयांकडून वापर केला जातो. 

ज्या मुलांना या क्षेत्रात स्वतःहून यायचं असतं, त्यांचेही पुन्हा दोन गट पडतात. 1. क्लिनिकल मेडिसिन अर्थात रुग्णांशी संबंधित 2. नॉन क्लिनिकल मेडिसिन अर्थात औषध कंपन्यांसाठी संशोधक. रुग्णांशी संबंधित डॉक्टरकीविषयी आपण बोललोच. जे विद्यार्थी आमच्याकडे सीईटी पास होऊन प्रवेशासाठी येतात, ते जात्याच हुशार असतात. आम्ही एकदा तुलना करून बघायचं ठरवलं. सध्याच्या काळात जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयाचा ऍडमिशनचा कटआऊट जवळपास 94-95 टक्के आहे. एवढी हुशार आणि लाखो रुपये खर्च करून डॉक्टर झालेली अनेक मुलं आज वेगवेगळया क्षेत्रांत नशीब आजमावताना दिसत आहेत. काळाची गरज म्हणून माझ्या परिचयाचाच एक डॉक्टर मुलगा आज दहावी-बारावीचे क्लासेस घेतो. साधं वैद्यकीय पत्रकारिता हा विषय घेऊनही एखाद्याचं पूर्ण करिअर होऊ शकतं. याचाच अर्थ केवळ प्रॅक्टिसिंग डॉक्टर असणं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातलं करिअर नव्हे, तर असेही पर्याय लोकांसमोर उपलब्ध असतात. पण पालक अनेकदा मुलांच्या मनाचा विचारच करत नाहीत. त्यांच्यासाठी प्रॅक्टिसिंग डॉक्टर असणं हीच कौतुकाची गोष्ट असते. आपल्या समाजात मूल डॉक्टर किंवा इंजीनिअर होणं ही पालकांचा अहं सुखावणारी घटना असते. इच्छा नसतानाही पालकांच्या हट्टाखातर रडतराव घोडयावर बसल्यासारखा जर एखादा मुलगा डॉक्टर होत असेल, तर त्याच्या मनात रुग्णाविषयी आपुलकी, ममत्व, जबाबदारी या भावनांची रुजवात होईल कशी?

हल्ल्यांमागे अनेक कारणं

अनेकदा या हल्ल्यांमध्ये निवासी डॉक्टरांनाच दुखापत होते असं आपल्या ऐकण्यात/वाचनात येतं. कारण हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या संतप्त नातेवाइकांच्या तावडीत तेच सापडतात. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला आहे. सरकारी रुग्णालयात सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी व्यवस्था होती. रुग्णांना भेटण्याची वेळ ठरलेली असे. पण समाजातील तथाकथित प्रतिनिधी आपल्या लवाजम्यासह रुग्णालयात येतात, तेव्हा मात्र या सगळया नियमांचा बोऱ्या उडतो. अशा वेळी अन्य रुग्ण व त्यांचे नातेवाईक पॅनिक होतात. दुसरीकडे आपला नातेवाईक जर रुग्णालयात असेल, तर प्रत्येक जण त्याच्या बाबतीत संवेदनशील झालेला असतो. त्यात सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे डॉक्टर-रुग्ण संवादाची वानवा हेही या पॅनिक होण्याला कारण असतं. अशा वेळी रुग्णाच्या तब्येतीत काही कमी-जास्त झालं आणि जर निवासी डॉक्टर त्याचं पुरेसं स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत, तर त्यांच्यावर हल्ला होतो. विशेषतः एखादा रुग्ण दगावला, तर निवासी डॉक्टरवरची जबाबदारी वाढते. आपण आपल्या एखाद्या जवळच्या नातेवाइकाच्या निधनानंतर त्याच्या घरातल्यांशी जशा सांत्वनपर भाषेत बोलतो, तशा समजूतदार भाषेत रुग्णाच्या नातेवाइकांशी बोलणं गरजेचं असतं. तुम्ही डॉक्टर म्हणून अतिस्पष्टपणे ही गोष्ट रुग्णाच्या नातेवाइकांना सांगितलीत, तर ते पॅनिक होणं स्वाभाविक असतं. रुग्णावर चालणारे उपचार हे मुख्य तज्ज्ञ, निवासी डॉक्टर आणि नर्सेस या तीन पातळयांवर चालणारं काम आहे. निवासी डॉक्टर म्हणून यातलं तुमचं काम काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तज्ज्ञांनी फाइलवर लिहून दिलेली औषधं देण्याचं, रुग्णाची काळजी घेण्याचं काम नर्सेस अतिशय आपुलकीने करतात. अर्थात यासाठी वेळेवर राउंड घेऊन रुग्णाची तब्येत तपासणं, तब्येतीची आणि उपचारांची कल्पना निवासी डॉक्टरांना देणं हे काम मुख्य डॉक्टरांनी करणं गरजेचं असतं. निवासी डॉक्टरची मुख्य जबाबदारी असते ती रुग्णाच्या नातेवाइकांशी सुसंवाद साधण्याची. डॉक्टर-रुग्ण सुसंवाद नसल्यामुळे गैरसमज होतात आणि अनेकदा अशा हल्ल्यांमध्ये त्याची परिणती होते. खरं तर वैद्यकीय शिक्षण झालेल्या प्रत्येकाने 'प्रोफेशनल एथिक्स' हे पुस्तक वाचायला हवं असं मला वाटतं. यूकेमध्ये त्यांनी आखलेल्या नियमावलीनुसार रुग्णांबाबतची प्रत्येक गोष्ट नातेवाइकांना सांगितली पाहिजे असं अपेक्षित असतं. पण आपल्याकडे तसं नाही करता येणार. कारण ते समजून घेण्याइतकं प्रत्येकाचं शिक्षण असेल असं नाही. ते त्या माणसाला समजेल असंच सांगितलं पाहिजे. व्यावसायिक पातळीवर कसं वागावं याचे थेट असे कुठलेच नियम दुर्दैवाने आपल्याकडे दिसून येत नाहीत.

मी महाराष्ट्रातल्या अगदी गावभागापासून, आदिवासी पाडयांपासून सर्वत्र फिरलो. रुग्ण डॉक्टरांकडे देव म्हणून पाहत असतो असं मला नेहमी जाणवतं. आज जवळपास 80-85 टक्के डॉक्टर्स हे एम.डी. किंवा एम.एस. करतात. सगळे एम.डी., एम.एस. होतात आणि त्याला सुपरस्पेशालिटीचं लेबल लागतं. आणि असं लेबल लागलेल्यांकडेच जावं अशी रुग्णांचीही समजूत होते. आज खरं तर माहितीचा स्फोट झालेला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून हवी ती सगळी माहिती आज आपल्या एका क्लिकवर आलेली आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण ही माहिती मिळवू शकतो ना? मग त्यात देवत्व कुठून आलं? माध्यमांच्या आधाराने आपण सगळी माहिती मिळवणं शक्य असताना डॉक्टरकडे गेल्यानंतर 'ते फसवतात' अशी तक्रार करण्यात काहीही हशील नाही. आपणच जीपीकडे जायचं सोडून मोठया रुग्णालयातल्या स्पेशालिस्टकडे गेलेलो असतो. आज पंचतारांकित रुग्णालयात आपण गेलो तर अर्थातच त्यांनी दिलेली चिठ्ठी, दिलेला संपर्क हा त्याच स्तरावरचा असणार. मग खर्च जास्त होतो अशी तक्रार कशी करून चालेल?

मार्डचा प्रवास - वेतनवाढ ते सुरक्षेचा प्रश्न

मार्ड - महाराष्ट्र असोसिएशन फॉर रेसिडेंट डॉक्टर्स या संस्थेची स्थापना मी केली, तेव्हा मुख्य प्रश्न होता तो वेतनाचा. सुरुवातीच्या काळात निवासी डॉक्टरांना वेतन होतं ते केवळ 198 रुपये. अनेकदा असं व्हायचं की आईवडिलांनाच एमबीबीएस झालेल्या डॉक्टर मुलांना पैसे पाठवायला लागायचे. पहिलं आंदोलन झालं ते पगारवाढीच्या तक्रारीसाठी. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तो प्रश्न मार्गी लावला आणि पगार 198चा थेट 450 रुपये झाला. आणखी एक तक्रार म्हणजे येथील निवासाची सोय. एका खोलीत तीन तीन डॉक्टरांना राहावं लागतं. एकाला जरी रुग्णालयातून 'कॉल' आला, तरी बाकीच्यांची झोपमोड ठरलेली. अजूनही अनेक सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरांच्या राहण्याची चांगली आणि पुरेशी सोय नाही. सध्याच्या काळातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा. निवासी डॉक्टरांइतकीच महत्त्वाची व्यक्ती म्हणजे नर्स. एकवेळ डॉक्टर संपावर गेले तरी काम चालू राहील, पण नर्सेस संपावर गेल्या तर मात्र रुग्णालयाचं पूर्ण काम ठप्प होईल.

निवासी डॉक्टरांवरील हल्ले थांबावेत म्हणून नुकताच मार्डचा मोठा संप झाला. हजारो डॉक्टरांनी त्यात सहभाग नोंदवला. या संपाच्या काळात शेकडो लोक गेल्याचं माध्यमातून पुढे आलं. या बातम्यांमधील एक चूक मला लक्षात आणून द्यावीशी वाटते. शिकाऊ डॉक्टर असा बातम्यांमध्ये उल्लेख केला जातो. हे डॉक्टर्स एम.बी.बी.एस. झालेले रजिस्टर्ड डॉक्टर आहेत, एम.डी.-एम.एस. करतायत. माझी कायमच राज्य सरकारकडे मागणी असते की दर वर्ष-सहा महिन्यांनी मार्डसोबत बैठक करावी आणि त्यांच्या मागण्यांचा आढावा घ्यावा. तसं होत नसल्यामुळेच मार्डला आपल्या हक्कांसाठी संपावर जावं लागतं. संप का करावे लागतात? महानगरपालिकेची ही रुग्णालयं अनुदानित आहेत. डॉक्टरांचेही प्रश्न असतात, त्यांच्याही मागण्या असतात याकडे मात्र पालिकेचं लक्ष नाही. ते लक्ष वेधून घेण्यासाठी मार्डला मैदानात उतरावं लागतं. जसजसा महागाई हप्ता वाढतो, तसतसा पगारही वाढला पाहिजे ही सुरुवातीपासून आमची मागणी होती. ज्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा केरळ राज्याच्या अर्थसंकल्पापेक्षा मोठा आहे, त्या पालिकेत वैद्यकीय क्षेत्र दुर्लक्षित राहतं हे दुर्दैव.

मार्डचा संप, डॉक्टरांच्या मागण्या, त्यांचे प्रश्न, संपामुळे होणारं नुकसान अशा घटना नेहमीच बातम्यांचा विषय होतात. पण हा विषय केवळ बातम्यांमध्ये दिसतो तेवढा छोटा नाही. अनेक कंगोरे असलेला हा संवेदनशील असा सामाजिक घटक आहे. त्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न.   

शब्दांकन - मृदुला राजवाडे