मधुमेहावरची औषधं

विवेक मराठी    11-Apr-2017
Total Views |

मधुमेहाच्या प्रकारानुसार तोंडी औषधे घ्यायची की इन्श्युलीनचं इंजेक्शन हे ठरवलं जातं. शेवटचा पर्याय म्हणून इन्श्युलीन असा अर्थ लावणं चुकीचं आहे. तोंडावाटे घ्यायच्या औषधांपैकी सर्वात आघाडीवर आहे ते मेटफॉर्मिन. मेटफॉर्मिननंतर जास्त प्रमाणात आता सल्फोनिल  आणि नॉन सल्फोनिल युरिया गटातल्या औषधांचा वापर केला जात आहे.

धुमेहाचा निदान झाल्यावर प्रश्न येतो तो उपचारांचा. रक्तातली ग्लुकोजची पातळी तितकीशी वाढलेली नसेल, तर व्यायाम आणि आहाराने ती नियंत्रित करण्याचा प्रयत्न किमान तीन महिने तरी व्हायला हवा, असा पाश्चात्त्य डॉक्टरांचा आग्रह असतो. त्यासाठी करावा लागणारा जीवनशैलीतला बदल फार लोक फार काळ करू शकत नाहीत, असा बहुतेक डॉक्टरांचा अनुभव आहे. पण तरीही व्यायाम आणि सुयोग्य आहार या दोन गोष्टी मधुमेहाच्या उपचारांचा पाया म्हणूनच गणल्या जायला हव्यात. प्रत्येक वेळी रुग्ण आला की डॉक्टर त्यांच्या जीवनशैलीचा पाठपुरावा करणारच आणि तो त्यांनी करायलाच हवा.

त्यानंतर आली औषधांची पाळी. इथे तोंडी घ्यायची औषधं की इन्श्युलीनचं इंजेक्शन हा वाद सर्वप्रथम उभा राहील. काय सुरू करायचं हे दोन गोष्टींवर अवलंबून असतं. मधुमेह कुठल्या प्रकारचा आहे हा पहिला मुद्दा. टाइप वन मधुमेहात शरीर इन्श्युलीन बनवतच नाही. त्यामुळे तिथे वाद होण्याचं काहीच कारण नाही. इन्श्युलीन तिथे पर्यायच नाही. ते दिलं गेलं नाही, तर रुग्ण जिवंत राहूच शकत नाही. दुर्दैवाने आपल्याकडे रुग्ण कुणाचंही काहीही ऐकतात आणि तोंडी उपचार करायला सुरुवात करतात. त्यामुळे कधी त्यांच्यावर हॉस्पिटल गाठण्याची पाळी येते, तर कधी किटोऍसिडोसिस होऊन - रक्तातलं ऍसिडचं प्रमाण वाढून -  रुग्ण सिरियस झाल्याने आय.सी.यू. गाठावं लागतं. तेव्हा एक निक्षून सांगावं लागतंय की टाइप वन मधुमेह असेल, तर कृपया रुग्णाच्या जिवाशी खेळू नका. डॉक्टर सांगतील त्याकडे जराही दुर्लक्ष करू नका. फक्त आणि फक्त इन्श्युलीनचीच कास धरा.

इतरही वेळी केव्हा इन्श्युलीन द्यावं याचे काही संकेत ठरलेले आहेत. एखादी स्त्री गरोदर असताना तिला मधुमेह झाल्याचं कळलं, किंवा ज्ञात मधुमेही स्त्रीला दिवस गेले, तर तत्काळ तोंडी औषधं थांबवून इन्श्युलीन देणं योग्य समजलं जातं. अर्थात काही तोंडी औषधांनी गर्भावर परिणाम होत नसल्याचं अनेक अभ्यासांमध्ये सिध्द झालंय. पण तरीही बहुतेक डॉक्टर विषाची परीक्षा पाहत नाहीत. इन्श्युलीन गर्भारपणात अत्यंत सुरक्षित असल्याने त्याचाच आग्रह धरतात. मेटफॉर्मिन आणि ग्लायक्लाझाइड ही दोन औषधं बऱ्यापैकी सुरक्षित मानली जातात.

शस्त्रक्रियेसारख्या कुठल्याही कारणासाठी - अगदी दातांवरच्या शस्त्रक्रियेसाठीदेखील - मधुमेह फार जलद आटोक्यात आणायची गरज असते, तेव्हा इन्श्युलीनला पर्याय उरत नाही. ग्लुकोज कमी करण्याची इन्श्युलीनची शक्ती अमर्याद असल्याने ते वापरणं कधीकधी अपरिहार्य ठरतं. या यादीत आय.सी.यू.त भरती असलेले आणि तोंडाने काहीही खाऊन शकणारे, शरीरात खूप इन्फेक्शन असणारे ही मंडळी प्रामुख्याने येतात. किंबहुना इन्श्युलीन हीच अशा प्रकारच्या आजारात प्राथमिकता असावी. काही पाश्चात्त्य मार्गदर्शक तत्त्वं रक्तातली ग्लुकोजची पातळी 250च्या वर गेल्यावर इन्श्युलीन सुरू करण्याचा सल्ला देतात.

आपल्या देशात मात्र बहुतेक रुग्ण ग्लुकोज बरंच जास्त असतानादेखील इन्श्युलीनला नाक मुरडतात. त्यांचा एक गैरसमज आहे. इन्श्युलीन एकदा सुरू केलं की ते कायमचं मागे लागतं असं त्यांना वाटतं. परंतु यात तथ्य नाही. गरोदरपणात नऊ  महिने, आय.सी.यू.मध्ये थोडेसे दिवस आणि कधीकधी तर एखाद-दोन दिवसांसाठीसुध्दा इन्श्युलीन दिलं जातं. त्यामुळं इन्श्युलीन म्हणजे आता सर्व उपचार थकले, शेवटचा पर्याय म्हणून इन्श्युलीन दिलं जातंय असा अर्थ लावणं चुकीचं आहे. इंजेक्शनचीच भीती वाटणारे कमी नाहीत. पण आताची पेनच्या साहाय्याने घ्यायची इंजेक्शनं जराही दुखत नाहीत. पोटावर घेतली तर ती जवळपास वेदनारहित म्हणता येतील. तेव्हा उगीचच इन्श्युलीन नाकारणं योग्य नाही. अनेकदा असंही होतं की इन्श्युलीनचं नाव काढलं की माणसं अक्षरश: डॉक्टर बदलतात; इतर कुठल्याही औषधांकडे वळतात, पण इन्श्युलीन घेणं टाळण्याचा प्रयत्न करतात. याचा नक्कीच पुनर्विचार करण्याची आज गरज आहे. कारण इन्श्युलीन हे मधुमेहासाठी एकच नैसर्गिक औषध आहे. त्याचे शरीरावर कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत. इतर सर्व केमिकल्स आहेत. निसर्गाच्या जवळ जाणं केव्हाही श्रेयस्कर.

टाइप टू मधुमेहात मात्र अपवादात्मक परिस्थितीत इन्श्युलीन लागतं. बहुतेक वेळेला गोळयांनी काम भागतं. या तोंडावाटे घ्यायच्या औषधांपैकी सर्वात आघाडीवर आहे ते मेटफॉर्मिन. मधुमेहाशी दूरान्वयानेही संबंध सांगणाऱ्या यच्चयावत संघटना मेटफॉर्मिनपासून मधुमेहाचे उपचार सुरू करण्याचा सल्ला देतात. ज्याला आपण 'फर्स्ट लाईन ट्रीटमेंट' म्हणतो, ती मेटफॉर्मिनचीच समजली जाते. अर्थात या औषधाच्या काही मर्यादा आहेत. काही लोकांना यामुळे शौचाला होतं. अशांना मेटफॉर्मिन देता येत नाही. मूत्रपिंडाचं काम व्यवस्थित चालत नसेल, तरी हे देणं योग्य नव्हे. शिवाय काही लोकांना यापासून बी व्हिटॅमिनची कमतरता जाणवू शकते. म्हणूनच मेटफॉर्मिन चालू असताना एखाद्याचं हिमोग्लोबिन कमी झालेलं दिसलं, तर ते बी जीवनसत्त्वाच्या अभावी नाही ना, याची खातरजमा करून त्याप्रमाणे उपाययोजना करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

आणखी एक गोष्ट - बऱ्याचदा रुग्णांना सीटी स्कॅन किंवा एमआरआय करायला सांगितलं जातं. अशा तपासण्यांदरम्यान रुग्णांना डाय दिला जातो. हे नसेतून दिलं जाणारं एक इंजेक्शन असतं. तेही मूत्रपिंडाद्वारे बाहेर फेकलं जातं. मेटफॉर्मिन आणि हे डायचं इंजेक्शन एकाच वेळी देण्यात धोका असतो. मूत्रपिंड निकामी होऊ  शकतं. सावधानता म्हणून असल्या तपासांच्या आधी दोनेक दिवस मेटफॉर्मिन थांबवण्याचा आणि दोन दिवसांनंतर मूत्रपिंड ठीकठाक असल्याची खात्री करून घेऊन मगच ते पुन्हा सुरू करण्याचा प्रघात आहे. प्रत्येक रुग्णाने हे लक्षात ठेवावं आणि आपल्या डॉक्टरांना मेटफॉर्मिन घेत असल्याची आठवण करून द्यावी, हे श्रेयस्कर. साहजिकच मधुमेहामुळे मूत्रपिंड खराब झालं असेल, तर मेटफॉर्मिन जपून वापरायला हवं. क्रिएटिनिन 1.5च्या पुढं गेलं की वापरू नये, असं पूर्वी ठसवलं गेलं होतं. आता काही पाहण्या यावर शंका उपस्थित करताहेत आणि मूत्रपिंड बरंच निकामी होईपर्यंत ते वापरायला हरकत नाही, याकडे जग झुकतं आहे. इथे हेसुध्दा मुद्दाम सांगितलं पाहिजे की केवळ मधुमेहासाठी वापरलं जात नाही. काही मुलींमध्ये पाळीच्या समस्यांवरदेखील ते लिहून दिलं जातं. मेटफॉर्मिनचं मुख्य काम इन्श्युलीन रेझिस्टन्स कमी करण्याचं असतं. त्यामुळे शरीर बनावट असलेलं इन्श्युलीन अधिक चांगलं काम करू लागतं. म्हणूनच मेटफॉर्मिनमुळे रक्तातलं ग्लुकोज फार जास्त-कमी होणं शक्य नसतं.

मेटफॉर्मिननंतर जास्त प्रमाणात वापरतात ती सल्फोनिल युरिया गटाची औषधं. यांचा शोध तसा अचानक लागला. सल्फा गटाची औषधं जंतुनाशक म्हणून वापरली जात असताना त्यातल्या एका औषधाने रुग्णाचं ग्लुकोज खूप कमी होऊन तो घामाघूम होत असल्याचं पाहून संशोधक सावध झाले. त्यांना युरेका म्हणण्याची पाळी आली. कारण अचानक मधुमेहावरचं औषध त्यांच्या हाती लागलं होतं. या गटात अनेक औषधं आहेत. अगदी जुन्या औषधांचे दुष्परिणाम जास्त होते. ती फर्स्ट जनरेशन औषधं आता बरीचशी कालबाह्य झालेली आहेत. जगातल्या बहुसंख्य देशात त्यांचं उत्पादन बंद झालं आहे. आता सेकंड किंवा थर्ड जनरेशनची औषधं प्रामख्याने वापरली जातात. आपल्या बीटा पेशींना हे औषध चिकटतं आणि त्यांना अधिकाधिक इन्श्युलीन बनवण्यास भाग पाडतं. गंमत म्हणजे तुमचं रक्तातलं ग्लुकोज किती आहे याची पर्वा न करता ही औषधं त्यांना इन्श्युलीन बनवत राहायला उद्युक्त करतच राहतात. यातून आवश्यकतेपेक्षा जास्त इन्श्युलीन बनण्याचा धोका असतो. हे अतिरिक्त इन्श्युलीन ग्लुकोज खूपच खाली आणू शकतं, रुग्णला हायपोग्लायसेमिया होऊ  शकतो. हाच या औषधांचा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे. क्वचित, अगदी क्वचित सल्फाची ऍलर्जी असणाऱ्या काही मंडळींना या गटाच्या औषधांची ऍलर्जी होऊ शकते. प्रत्यक्षात हे ऍलर्जी होणं बरंच पुस्तकी वाटतं, कारण तसा दुष्परिणाम खूप दुर्मीळ आहे. काही जण या गटाच्या औषधांच्या हृदयावरील परिणामाची चर्चा करताना दिसतात. या औषधांमुळे हृदयाचा रक्तपुरवठा अचानक कमी झाल्यावर हृदय ज्या क्षमतेने त्याचा सामना करील, ती त्याची क्षमता कमी होते असं म्हणतात. या विवादामध्ये सत्यता किती आणि स्वस्त व अत्यंत गुणकारी अशा औषधांना बदनाम करण्याचा भाग किती, हे ठरवणं कठीण आहे.

याच गटाचं चुलत भावंड म्हणजे नॉन सल्फोनिल युरिया गटातली औषधं. यातली मुख्य गोष्ट अशी की या औषधांमध्ये सल्फा नसल्याने त्यांची ऍलर्जी होण्याची शक्यता सुतरामही नसते. अन्यथा ही दोन्ही भावंडं एकसारखंच काम करतात आणि त्यांचे दुष्परिणामसुध्दा डिट्टो आहेत.

9892245272