घर अभंग ठेवण्याचा विचार

विवेक मराठी    12-Apr-2017
Total Views |


डॉ. बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीचे समाप्तीचे हे वर्ष आहे. अशा वेळी त्यांच्या या मौलिक कार्याचा विचार करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल. अस्पृश्यांचा प्रश्न संपविण्याचे अनेक मार्ग बाबासाहेबांपुढे होते. त्यातील जालीम मार्ग हिंदू धर्माचा त्याग करून कोणत्याही परकीय धर्माचा स्वीकार करणे हा होता 1924 साली बार्शी येथे भरविण्यात आलेल्या बहिष्कृत हितकारणी सभेतील भाषणात बाबासाहेबांनी याचा विचार मांडला. परधर्मात जाऊन अस्पृश्यता संपली असती, परंतु घरातील फूट आणखी वाढली असती आणि घर टिकले नसते. घर टिकविणे हा बाबासाहेबांपुढे अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता.

 'ज्या घरात फूट आहे, ते घर टिकू शकत नाही.' डॉ.  बाबासाहेबांनी अब्राहम लिंकन याचे हे वाक्य अनेक वेळा उद्धृत केले आहे. 16 जून 1858. स्प्रिंगफिल्ड येथे रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन होते. या अधिवेशनात लिंकनचे भाषण झाले. अमेरिकेच्या सामाजिक आणि राजकीय दुफळी करणाऱ्या गुलामांच्या प्रश्नांचा वरील वाक्याला संदर्भ होता. या वाक्याला जोडून दुसरे वाक्य असे आहे - अर्धे गुलाम आणि अर्धे मुक्त, अशी अवस्था शासन दीर्घकाळ सहन करू शकणार नाही. बाबासाहेबांपुढे संदर्भ होता देशातील जातीय दुफळीचा. सहा कोटी अस्पृश्य आणि उर्वरित स्पृश्य ही दुफळी आपले घर एक ठेवणार नाही. आपले घर याचा अर्थ आपला देश. आपला देश अभंग कसा राहील? देशात सामाजिक ऐक्य कसे निर्माण होईल? हे ऐक्य निर्माण करण्यासाठी अस्पृश्यतेची रूढी कशी संपविता येईल? हा बाबासाहेबांपुढचा ज्वलंत प्रश्न होता.

डॉ. बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीचे समाप्तीचे हे वर्ष आहे. अशा वेळी त्यांच्या या मौलिक कार्याचा विचार करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल. अस्पृश्यांचा प्रश्न संपविण्याचे अनेक मार्ग बाबासाहेबांपुढे होते. त्यातील जालीम मार्ग हिंदू धर्माचा त्याग करून कोणत्याही परकीय धर्माचा स्वीकार करणे हा होता. 1924 साली बार्शी येथे भरविण्यात आलेल्या बहिष्कृत हितकारणी सभेतील भाषणात बाबासाहेबांनी याचा विचार मांडला. परधर्मात जाऊन अस्पृश्यता संपली असती, परंतु घरातील फूट आणखी वाढली असती आणि घर टिकले नसते. घर टिकविणे हा बाबासाहेबांपुढे अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता.

महाड चवदार तळयाच्या सत्याग्रहात त्यांनी अस्पृश्यतेमुळे सर्व समाजाचे कसे नुकसान झाले आहे याची मांडणी केली. अस्पृश्यतेमुळे केवळ अस्पृश्य समाजच वाईट अवस्थेत गेला आहे असे नसून अस्पृश्यतेमुळे सर्व समाजाची नीतिमत्ता ढासळली आहे. महाड चवदार तळयाचा सत्याग्रह हा सत्यासाठी केलेला आग्रह आहे, आणि सत्य म्हणजे ज्यात सर्वांचे सार्वत्रिक कल्याण आहे, ते सत्य होय, अशी सत्याग्रहाची व्याख्या केली. प्रारंभापासून त्यांची एवढी व्यापक भूमिका राहिली.

घर एक ठेवण्यासाठी त्यांनी जो लढा दिला, तो पूर्णपणे अहिंसक लढा होता. हातात शस्त्र घ्या आणि आपल्याला विरोध करणाऱ्यांना जिवंत ठेवू नका असे त्यांनी आपल्या अनुयायांना कधीही सांगितले नाही. जे परिवर्तन करायचे आहे ते अहिंसक मार्गानेच करावे लागेल. हिंसेचा त्यांनी धिक्कार केला. कम्युनिस्टांचा मार्ग हिंसेचा आहे. आर्थिक समता आणण्यासाठी कम्युनिस्ट हिंसेला मुख्य स्थान देतात, म्हणून त्यांनी कम्युनिझमही नाकारला. इस्लामची समता चांगली खरी, परंतु जो मुसलमान झाला त्याच्यापुरतीच ती मर्यादित असते, गैरमुसलमानांना मुसलमान काफिर समजतात. म्हणून बाबासाहेबांनी त्यांचाही त्याग केला आहे.

घर एक ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे त्यांनी अहिंसक लढयाचा मार्ग स्वीकारला, तसा घर एक ठेवण्यासाठी एक तात्त्वि आधारही दिला. बाबासाहेब सांगत की, ''स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही माझ्या जीवनाची तत्त्वत्रयी आहे आणि ही तत्त्वत्रयी मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली नसून माझे गुरू भगवान गौतम बुध्द यांच्या शिकवणीतून ती मी घेतली आहे.'' त्यांचा लढा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांच्या प्रस्थापनेसाठी होता. समता म्हणजे समानता नव्हे किंवा एकसारखेपणा नव्हे, हे त्यांना समजत होते. समतेचा त्यांचा अर्थ जन्मतः प्रत्येक मनुष्याला कधीही काढून न घेता येणारे असे अधिकार आहेत. राज्यसत्ता, समाजव्यवस्था, धर्मव्यवस्था यांना या अधिकारांवर अतिक्रमण करण्याचा अधिकार नाही. माणसांची प्रतवारी करता येत नाही आणि विषमतेच्या तत्त्वांवर समाजाची रचना उभी करता येत नाही.

प्रत्येकाला आपल्या जीवनाचे सुख शोधण्याचा अधिकार आहे, ते त्याचे स्वातंत्र्य आहे. त्यासाठी स्वतःची गुणवत्ता वाढविणे, स्वतःच्या आवडीच्या व्यवसायाचे स्वातंत्र्य, स्वतःला अभिव्यक्त करण्याचे स्वातंत्र्य हा प्रत्येक व्यक्तीचा मौलिक अधिकार आहे. या अधिकारावर कोणत्याही प्रकारची कृत्रिम बंधने असता कामा नयेत, असे बाबासाहेबांचे मत होते. माणसे जन्मतःच समान असली तरी त्यांच्या क्षमता समान नसतात. काही सबळ असतात, काही दुर्बळ असतात. या सर्वांना जीवनसंग्रामात भाग घ्यावा लागतो. अशा वेळी डार्विनचा सिध्दान्त सामाजिक व्यवस्थेवर लादता येत नाही. जो सक्षम तो टिकेल, असे म्हणता येत नाही. जो दुर्बळ आहे तोही टिकला पाहिजे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. म्हणून समता आणताना समान क्षमता असणाऱ्या लोकांचा वेगळा विचार करावा लागतो आणि विषम क्षमता असणाऱ्या लोकांचा वेगळा विचार करावा लागतो. सकारात्मक कृती करून त्यांना सर्वांच्या बरोबरीने आणण्याची कृती करावी लागते.

आपली राज्यघटना निर्माण करीत असताना डॉ. बाबासाहेबांनी आपले दुभंगलेले घर एकसंध कसे राहील याचा फार गंभीर विचार केला आहे. पं. नेहरू यांनी घटना समितीपुढे 13 डिसेंबर 1946 रोजी उद्देशक ठराव मांडला. या ठरावात स्वातंत्र्य आणि समता हे दोन शब्द आहेत, परंतु बंधुता हा शब्द नाही. डॉ. बाबासाहेबांनी 'बंधुता' या शब्दाची त्यात भर घातली. आज आपण जी उद्देशिका वाचतो, त्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय असे  शब्द आहेत, हे बाबासाहेबांच योगदान आहे.

स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तीन तत्त्वांची एक मूर्ती आहे. प्रत्येक तत्त्वाचा वेगळा विचार करता येत नाही. ही तिन्ही तत्त्वे परस्परसंलग्न आणि अभिन्न आहेत. बाबासाहेब सांगतात की, जर आपल्याला घर एक ठेवायचे असेल तर भारतात राहणाऱ्या सर्वांनी बंधुभावाने राहिले पाहिजे. प्रत्येक भारतीयाने दुसऱ्या भारतीयावर सख्ख्या भावाप्रमाणे प्रेम केले पाहिजे. ही प्रेमभावना भारतीयांना एकमेकांशी जोडणारे सिमेंट आहे. ही प्रेमभावना असेल तर दुसऱ्याचा विचार आपोआपच केला जाईल. दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचे किंवा समतेचे अपहरण कुणीही करणार नाही. स्वातंत्र्य आणि समता यांची हमी आपली राज्यघटना देते. या दोन्ही अधिकारांवर अतिक्रमण झाल्यास न्यायालयात जाऊन न्याय मागता येतो. परंतु तेवढयाने काम भागण्यासारखे नाही. स्वातंत्र्य आणि समता टिकायची असेल, तर सार्वत्रिक बंधुभावना हवी. बंधुभावना कायद्याने देता येत नाही, ती संस्काराने देता येते. संस्कार देण्याचे काम सत्धर्माचे आहे.

आपल्यापूर्वी आणि आपल्याबरोबर मध्यपूर्वेतील, दक्षिण आशियातील अनेक देश स्वतंत्र झाले. वसाहतवादाच्या आणि साम्राज्यवादाच्या जोखडातून मुक्त झाले. परंतु यापैकी एखादा अपवाद सोडल्यास कोणत्याही देशात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आली नाही आणि लोकशाहीदेखील टिकविता आली नाही. मध्यपूर्वेतील सगळे देश इस्लाम मानणारे आहेत, पण तेच आज गृहयुध्दात भाजून निघत आहेत. पाकिस्तानात मुसलमान मुसलमानांनाच मारतात, श्रीलंकेतील तामिळ-सिंहली संघर्ष संपलेला नाही. भारतात सर्व प्रकारची विविधता असूनही आपण एक आहोत, आपल्याला एक राहायचे आहे, आपल्याला देश एक ठेवायचा आहे, ही भावना अतिशय प्रबळ आहे. बाबासाहेबांसारख्या राष्ट्रपुरुषाला त्याचे श्रेय द्यावे लागते.

vivekedit@gmail.com