अमेरिकेचा सीरियावर हल्ला -आधीच मर्कट, तशातच मद्य प्याला

विवेक मराठी    14-Apr-2017
Total Views |

 अमेरिकेच्या अपेक्षेप्रमाणे या हल्ल्यामुळे बशर अल अस्सादचे स्थान डळमळीत होण्याऐवजी बळकट होण्याला मदत झाली. अस्सादच्या विरोधात जागतिक तसेच स्थानिक पातळीवर जनमत तयार होऊन त्याला न्यायालयात खेचण्याची मोठया प्रमाणावर मागणी होण्यापूर्वीच ट्रंप महाशयांनी उतावीळपणा करून जो भरकटलेला हल्ला करविला, त्यातून सामान्य नागरिकांचे जे जीव गेले, त्यामुळे या हल्ल्यामागचे लक्ष्यसुध्दा भरकटले. या हल्ल्यानंतर लगेच रशियाचे संरक्षणमंत्री अस्सादच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. आता सीरियावर जर असा हल्ला झाला, तर रशिया-अमेरिका थेट एकमेकांविरोधात उभे राहतील. हे कोणत्याही दृष्टीने हितावह नाही. ते कळून घेण्याची बौध्दिक कुवत ट्रंपमध्ये आहे काय, हा मोठा प्रश्न जगापुढे आहे.


दि. 3 एप्रिलच्या मंगळवारी जगातील कोटयवधी प्रेक्षकांनी दूरदर्शनवरील बातम्यांमधून खान शेखौन येथे झालेल्या रासायनिक हल्ल्यानंतरची हृदयद्रावक दृश्ये पाहिली. मोठी माणसे, मुले, तान्ही बालके रासायनिक हल्ल्यानंतर श्वासाश्वासासाठी तडफडत होती. बशर अल अस्सादच्या सैन्याने बंडखोर सैन्याच्या भूभागावर केलेल्या या हल्ल्यात सुमारे एेंशी जिवांचा तडफडून मृत्यू झाला. त्यात डझनावारी बालके होती. हा हल्ला नागरी वस्तीवर झाला. तुर्की तपासणीप्रमाणे या हल्ल्यामध्ये सरीन नावाचा अत्यंत विषारी वायू वापरण्यात आला होता. या हल्ल्याचा सर्व जगातून निषेध करण्यात आला. सीरियाचा हुकूमशहा बशर अलअस्साद याला या हल्ल्यासाठी जबाबदार धरून त्याच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात मानवताविरोधी नृशंस कृत्यांसाठी खटला भरण्याची मागणी करण्यात आली. यापूर्वी 2013मध्येही अस्सादच्या सैन्याने रासायनिक हल्ला केला होता. त्या वेळी तो हल्ला कोणी केला याची शहानिशा करून हल्लेखोरांना शिक्षा दिली गेली नव्हती. अमेरिकेचे त्या वेळचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी कच खाल्ली होती. त्यांना हात आवर असे सांगणाऱ्यात सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा टि्वटर संदेश होता. सप्टेंबर 2013च्या संदेशात डोनाल्ड ट्रम्प यांनी, 'असा हल्ला हा वर नेणारा नसून देशाला रसातळाला नेणारा' असल्याचे विधान केले होते. या हल्ल्यानंतर रशियाने सीरियातील संघर्षात जातीने लक्ष घालत बशर अल अस्सादला भरघोस पाठिंबा दिला. त्याच्या मदतीसाठी सैनिकी व दारूगोळा इ. मदत पाठविली. त्याला युध्दतंत्राची मदत केली. त्यातून अस्सादची सत्ता टिकवून बळकट करण्याचे धोरण रशियाने अवलंबिले.

भरकटलेला हल्ला

रासायनिक हल्ला झाल्यापासून काही तासाच्या अवधीत डोनाल्ड ट्रंप कामाला लागले. त्यांनी आपली सैनिकी प्रशासन यंत्रणा आणि सल्लागार मंडळ यांची सभा बोलावून सीरियाविरोधात काहीतरी मोठी कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याचे कारण देण्यात आले की तडफडणारी मुले आणि बालके पाहून ट्रंप यांचे हृदय पिळवटले. तीन दिवसांच्या आत कारवाई ठरवून अमेरिकेच्या दोन युध्दनौका भूमध्य समुद्रात पोहोचल्या. त्यांनी लगेच शुक्रवार दि. 7 रोजी अल शायरात येथील विमानतळावर टोमाहॉक क्षेपणास्त्रांनी जोरदार हल्ला केला. हे ठिकाण निवडण्याची दोन कारणे होती. कारण येथूनच उड्डाण करून खान शेखौनवर हल्ला झाला. तसेच याच ठिकाणी सरीन रसायनाचा मोठा साठा असण्याची बातमी होती. पुन्हा असा रासायनिक हल्ला होऊ नये यासाठी अल शायरत हे विमानतळ विमानोड्डाणासाठी निकामी करण्याचा उद्देश होता. या हल्ल्याचे वृत्त येताच अमेरिकेत आणि अमेरिकेच्या मित्र देशांकडून त्या कारवाईचे जोरदार स्वागत झाले. त्यात सौदी अरेबिया आणि जवळच्या आखाती देशांचा सहभाग होता. अस्सादचे मित्र असलेल्या रशिया आणि इराण यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्याला लेबनान, पॅलेस्टाइन यांनी पाठिंबा दिला.

हा हल्ला भरकटलेला ठरला. अमेरिकेने प्रक्षेपित केलेल्या एकूण 59 क्षेपणास्त्रांपैकी केवळ 23 क्षेपणास्त्रे ठरविलेल्या लक्ष्याचा वेध घेणारी ठरली. इतर अनेक क्षेपणास्त्रे भरकटत गेली. युध्दतंत्राच्या कार्यक्षमतेचा विचार केल्यास असे क्षेपणास्त्रांचे मोठया प्रमाणावर भरकटणे त्या यंत्रणेचे अपुरेपण आणि अपयश दर्शविते. त्यानंतर आलेल्या अहवालाप्रमाणे काही विमानांचा विध्वंस झाला असला, तरी विमानतळाची धावपट्टी सुरक्षित आणि वापरण्यायोग्य राहिली. तेथे असलेल्या रासायनिक शस्त्रसाठयाचे काय झाले, याबाबत काहीच माहिती बाहेर आली नाही. ज्याप्रमाणे इराकच्या आक्रमणानंतर रासायनिक शस्त्रास्त्रांच्या संदर्भात अमेरिकेचा विचका झाला होता, तसाच प्रकार आता घडेल की काय अशी शंका आहे. असे वाटते की या हल्ल्याच्या निमित्ताने अमेरिकेने प्रगत केलेल्या काही क्षेपणास्त्र तंत्रांची, त्यांच्या कार्यक्षमतेची चाचणी घेतली असावी. कारण रशियानेही पूर्वी सीरियातील काही ठिकाणांवर हल्ला करताना कास्पियन समुद्रातून नवी प्रगत क्षेपणास्त्र टाकून त्यांची चाचणी घेतली होती.

अमेरिकेच्या अपेक्षेप्रमाणे या हल्ल्यामुळे बशर अल अस्सादचे स्थान डळमळीत होण्याऐवजी बळकट होण्याला मदत झाली. अस्सादच्या विरोधात जागतिक तसेच स्थानिक पातळीवर जनमत तयार होऊन त्याला न्यायालयात खेचण्याची मोठया प्रमाणावर मागणी होण्यापूर्वीच ट्रंप महाशयांनी उतावीळपणा करून जो भरकटलेला हल्ला करविला, त्यातून सामान्य नागरिकांचे जे जीव गेले, त्यामुळे या हल्ल्यामागचे लक्ष्यसुध्दा भरकटले. या हल्ल्यानंतर लगेच रशियाचे संरक्षणमंत्री अस्सादच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आणि अस्सादच्या भूभागावर हवाई हल्ला प्रतिरोधक यंत्रणा अधिक बळकट करण्याची योजना आखण्याची घोषणा केली. यापुढे असा अचानक हल्ला करणे अमेरिकेच्या लष्कराला महागात पडू शकेल. अमेरिका आणि रशिया यांच्यात हवाई हल्ल्यांच्या संदर्भात जो समझोता झाला होता, तो मोडीत काढला असल्याचे रशियाने जाहीर केले. आता सीरियावर जर असा हल्ला झाला, तर रशिया-अमेरिका थेट एकमेकांविरोधात उभे राहतील. हे कोणत्याही दृष्टीने हितावह नाही. ते कळून घेण्याची बौध्दिक कुवत ट्रंपमध्ये आहे काय हा मोठा प्रश्न जगापुढे आहे. रशियाने प्रतिहल्ल्यासाठी नौदल नौका मेडिटरेनियन समुद्रात तैनात करण्यासाठी रवाना केल्याचे वृत्त आहे.

निर्णायक युध्द - Armageddon

बायबलच्या नव्या करारातील शेवटच्या अध्यायांमध्ये निकराचा निर्णायक संघर्षाचा उल्लेख आहे. त्यात पॅलेस्टाइनमधील मेडीग्गो या स्थळाचा उल्लेख आहे. युफ्राटिस नदी शुष्क होऊन पूर्वेकडून आक्रमण होऊन स्थानिक संस्कृती नष्ट होण्याचे भाकीत त्यात केले आहे. तसाच निर्णायक संघर्ष सध्या सिरिया, इराक, पॅलेस्टाइन या देशांमध्ये सुरू आहे. हा संघर्ष ख्रिश्चन-मुस्लीम असा नसून मुस्लीम धर्मांतर्गतच आहे. या देशांमधून पूर्वीची हुकूमशाही व्यवस्था मोडकळीस येण्याची चिन्हे दिसताच शिया-सुन्नी संघर्ष उफाळून आला. या देशांचे जमातवार विभाजन झाले. प्रत्येक पंथीय दुसऱ्या पंथाच्या लोकांना काफीर ठरवून त्यांची कत्तल करण्यात मग्न आहे. या संघर्षात दोन्हीकडून काफिरांची कत्तल होताना सर्व जग पाहते आहे. On either side the kafirs are dying. हा संघर्ष वाढविण्यासाठी सुन्नीचा म्होरक्या सौदी अरेबिया व आखाती मित्र देश आणि शियांचा म्होरक्या इराण, लेबनॉन, हेजबोल्ला इ. संघटनासह उतरले आहेत. वेळ आली, तर सीरियाच्या पूर्वेकडून रशियाच्या हवाई संरक्षणात इराणी सैन्याची चढाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सौदी अरेबिया व मित्र देश अस्साद विरोधातील सुन्नी बंडखोरांना पूर्वीपासून मदत करत आहेत. यानंतर ते प्रत्यक्ष सैनिकी हस्तक्षेप करू पाहतील.

मध्यपूर्वेतील या अकटोविकट संघर्षात गेल्या 5-6 वर्षांच्या कालावधीत सुमारे पाच लाखांचे बळी गेले आहेत. दीड कोटी लोकांना त्यांच्या राहत्या ठिकाणांवरून परागंदा व्हावे लागले आहे. यामागे त्या समाजांमधील सामाजिक प्रवृत्ती आहेत. इस्लाममध्ये खलिफाच्या मध्यवर्ती राज्याची संकल्पना आहे. तिचे आधुनिक काळातील पर्यवसान हुकूमशाहीत झालेले दिसते. इस्लामी देशांतील जनता हुकूमशहाला सहज स्वीकारते. मुल्ला-मौलवी लोकशाहीचा धिक्कार करत ठिकठिकाणच्या हुकूमशहांच्या पाठीशी उभे राहतात. धार्मिक पाठबळ देऊन त्यांचे स्थान बळकट करतात. हे हुकूमशाह नंतर शिरजोर होऊन जनतेलाच नाडतात. त्यांच्या दडपशाहीतून बाहेर पडण्यासाठी जनतेला जो संघर्ष करावा लागतो, त्यातून दुसरा हुकूमशहा निर्माण होतो. त्याला पंथिक संघर्षाचा, शिया-सुन्नी संघर्षाचा रंग मिळतो. आज मध्यपूर्वेतील आणि आफ्रिकेतील इस्लामी देशांमधून तेच चित्र विदारकपणे प्रकटते आहे.

इस्लामी-मुस्लीम समाजात जणू बालपणांपासून काफिरद्वेषाचे - Kafirophobiaचे बाळकडू मिळत राहते. जो आपल्या पंथाचा, आपल्या बिरादरीचा नाही, त्याला काफिर ठरवून त्याचा नि:पात करण्याचा जणू धर्महक्क (?) प्रत्येक सच्च्या (?) मुसलमानाला मिळतो. त्यातूनच हे नृशंस नरसंहार घडणारे संघर्ष उभे राहत आहेत. त्याला आता अतिरेकी संघटनांची जोड मिळाली असल्याने संपूर्ण इस्लामी जगत निर्णायक संघर्षाच्या - Armageddonच्या दाराशी उभे राहिले आहे. इस्लाममध्ये बदल झाला तरच त्यावर तोडगा निघेल. अन्यथा जगसुध्दा त्यात होरपळेल. मुस्लीम समाजामध्ये उम्मा आणि एकवटलेली खिलाफत याला आव्हान देणारी चळवळ निर्माण व्हावी. कोणीही काफिर नसून सर्वांना कायद्याच्या चौकटीत राहून स्वेच्छेने जगण्याचा हक्क आहे, हे स्वीकारण्याची मानसिकता आणण्याची गरज गैरमुस्लीम समाजांनी स्थानिक मुस्लीम समाजांवर बिंबविण्याची निकड आहे. त्यातूनच लोकशाही आणि परस्पर सामंजस्याची भूमिका इस्लाममध्ये निर्माण होईल. 2047पर्यंत इस्लाममध्ये असे विधायक परिवर्तन घडावे यासाठी सूत्रबध्द नियोजन केले पाहिजे.

मुत्सद्देगिरीचा अभाव

ज्या तडकाफडकीने ट्रंपनी सीरियावर हल्ला करण्याचा उतावीळपणा दाखवला, त्यावरून त्यांच्यातील मुत्सद्देगिरीचा अभावच जगापुढे आला. या हल्ल्यानंतर झालेल्या G7च्या बैठकीदरम्यान इटली, फ्रान्स इ. देशांनी रशियाला एकटे न पाडता सामोपचाराचा सल्ला देत ट्रंप यांचे कान उपटले असेच म्हणता येईल. यातून अस्सादची काळी कृत्ये मागे पडून तोच ठिकाणावर राहणे योग्य ठरेल असा सूर निघाला.

अमेरिकेजवळ तरी कुठे अस्सादला पर्याय आहे? सद्दाम आणि गड्डाफी यांना हटविल्याचे फार मोठे परिणाम जगाला - विशेषत: युरोपातील देशांना भोगावे लागत आहेत. पूर्ण नियोजनाअभावी मोकाट सुटलेल्या सैनिकी जथ्यांमधून काफिरद्वेष उफाळून येऊन इसिससारखी नरराक्षसी संघटना उभी राहिली. अस्साद गेल्यास तसेच पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरच ट्रंप यांच्यामध्ये मुत्सद्देगिरीचा आणि शहाणपणाचा अभाव दिसत आहे. जर वेळ आलीच तर त्यांना निवडून आणण्याचे षड्यंत्र रचणारी रशिया त्यांच्यावर राजकीय गैरवर्तणुकीची (Impeachment) कारवाई करविण्याचे षड्यंत्र करू शकेल. हे सर्व पाहता एक सुभाषित आठवते -

'मर्कटस्थ सुरापानं। तस्य वृश्चिकश्च दंशके

तन्मध्ये भूत संचार:। यद्वातद्वा भविष्यति॥'

आधीच माकड, त्यात दारूने झिंगला, त्याला विंचू चावला आणि त्याच्यात भूत संचार झाला तर काय होईल, याची कल्पना करवत नाही.

अमेरिकेत ट्रंपसारखा उथळ अध्यक्ष, त्याचे परस्परविरोधात ठाकलेले नातेवाईक आणि सल्लागार यांच्यात काहीतरी करण्याची खुमखुमी आणि उतावीळपणा पाहता अमेरिकेच्या भवितव्याची कल्पना करवत नाही.

9975559155