समस्यांशी दोन हात

विवेक मराठी    18-Apr-2017
Total Views |

परिस्थिती हाताळणं, समस्या सोडवणं हे एक मूलभूत कौशल्य आहे. माणसाचं मन, शरीर अन् आजूबाजूची परिस्थिती यांच्या आंतरक्रियांतून घटना घडत असतात. जेव्हा घडणारी घटना अनुकूल असते, तेव्हा सारं काही व्यवस्थित असतं. माणूस अनपेक्षित घटना समोर आली की त्याला हाताळण्यासाठी तयार नसतो, तेव्हा ती समस्या ठरते. समस्या म्हणा वा संकट... त्या कुणाला हव्या असतात का? पण गंमत अशी की त्या कुणालाच टळल्या नाहीत.


पाहता पाहता व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचे रंग आपण आपल्या जीवनचित्रात भरत गेलो. खरं तर व्यक्तिमत्त्वाच्या विकासाची ही प्रक्रिया आजीवन सुरूच राहणार आहे. आपण अधिकाधिक सुंदर होतच राहणार, कारण या आंतरिक सौंदर्याची आपल्याला मनस्वी ओढ आहे.

हे सौंदर्य ज्या विशिष्ट गोष्टींतून व्यक्त होतं, त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे व्यक्तीची विचार प्रक्रिया अन् त्याचं प्रकटीकरण.

माणसाचे विचार त्याच्या वर्तनाला दिशा देतात अन् वर्तनानेच जीवन 'घडतं' किंवा 'बिघडतं', या विचारांच्या प्रवाहाला आज आपण व्यक्तिमत्त्वाच्या एका विशिष्ट पैलूतून पाहणार आहोत.

मनुष्याचं जीवन हे काही एकांगी, मुळमुळीत नाही. त्यात कधी सुख, आनंद आहे, तर कधी सुखापाठी पळणं आहे. कधी कसलासा शोध घेणं आहे, कधी निराशा तर कधी अनेक आश्चर्य आहेत आणि अगणित समस्या आहेत, संकटं आहेत.

या समस्यांशी दोन हात करता आले की आपलं माणूसपण उजळू लागतं.

हेलन केलर किंवा लुई ब्रेल यांनी अंधत्वाच्या संकटावर कायमची मात केली. हेलनना जन्मानंतर काही महिन्यांत, तर लुईस ब्रेल यांना वयाच्या तिसऱ्या वर्षी अपघाताने अंधत्व आलं. सामान्य शाळांत शिकणं नाकारलं गेलं. तरीही या दोन्ही व्यक्ती आयुष्यात लढत राहिल्या. मूकबधिर, अंध असणाऱ्या हेलन केलर या उच्चशिक्षण घेणारी जगातली पहिली महिला ठरल्या, तर अंधांना लिखित ज्ञानाच्या जगाचं दालन उघडणारी लिपी जगाला भेट देण्याचं महत्कार्य लुई यांनी केलं.

परिस्थिती हाताळणं, समस्या सोडवणं हे एक मूलभूत कौशल्य आहे. माणसाचं मन, शरीर अन् आजूबाजूची परिस्थिती यांच्या आंतरक्रियांतून घटना घडत असतात. जेव्हा घडणारी घटना अनुकूल असते, तेव्हा सारं काही व्यवस्थित असतं. म्हणजे तुम्ही खूप थकून घरी आलात, घराचं दार उघडं आहे, आत गेल्या गेल्या तुमचं छान स्वागत झालं, चौकशी झाली, पाणी, गरम वाफाळता चहा, नाश्ता यांची सरबत्ती झाली.... इथे सारं कसं सरळ अन् अपेक्षित घडलं. पण थकून भागून दोन जिने चढून वर आल्यावर घराचं दार बंद आणि त्यावर कधी नाही ते कुलूप दिसलं, मोबाइल लावला तर उचलला जात नाही किंवा संपर्क क्षेत्राच्या बाहेर पडलेला... समस्या इथे सुरू होते.

माणूस अनपेक्षित घटना समोर आली की त्याला हाताळण्यासाठी तयार नसतो, तेव्हा ती समस्या ठरते. समस्या म्हणा वा संकट... त्या कुणाला हव्या असतात का? पण गंमत अशी की त्या कुणालाच टळल्या नाहीत.

रामाला 14 वर्षं वनवासाला धाडावं ही कैकेयीचा मागणी दशरथासमोर भयंकर समस्याच होती, नाही का? पण रामाच्या योग्य निर्णयाने, धैर्याने ती सुटली, अन्यथा रामाच्या अन् भरताच्या काळातच 'महाभारत' घडलं असतं.

तर अशी ही समस्या... प्रत्येक मनुष्यमात्राच्या जीवनाचा अविभाज्य भाग. त्यामुळे 'समस्यांपासून पळणं वा समस्यांपुढे हतबल होऊन जाणं' यांना टाळून आलेल्या समस्यांवर, अडचणींवर मात करतच जीवन सुकर बनतं.

बहुतेक लोकांना वाटतं की केवळ मलाच खूप अडचणी येतात, जिथे जाईन तिथे काही ना काही समस्या असतातच, इत्यादी. पण खरं तर जिथे अडचण आहे, तिथे संघर्ष आहे आणि जिथे संघर्ष आहे तिथेच विकास आहे, प्रगती आहे.

कारण समस्या आपल्याला कार्यप्रवृत्त करतात. मानसशास्त्रीय भाषेत त्या Negative Reinforcer आहेत, म्हणजे त्या टाळण्यासाठी माणसं योग्य पध्दतीने काम करतात. तुम्ही एखादा कार्यक्रम आयोजित करता, तेव्हाच संभाव्य अडचणी विचारात घेता ना? मंत्रमुग्ध करणाऱ्या गायनाच्या एखाद्या मैफलीत अचानक वीजप्रवाह खंडित होऊ शकतो, त्या वेळी होणारा गोंधळ, वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आधीच दुसरी पर्यायी व्यवस्था केली जाते. हा अडथळा येईलच असं नाही, पण येऊ नये असं वाटत असेल तर 'येऊ शकेल' याचं भान ठेवून त्यानुसार जुळवाजुळव केली पाहिजे. आपल्या जीवनातदेखील आपण हे व्यावहारिक भान दाखवत असू, तर समस्या परिहाराचा पहिला पाठ आपण शिकलो.

एक म्हण जुन्या माणसांच्या तोंडी ऐकली - 'नदीत उतरण्यासाठी वहाणा काढाव्यात'. केवढं मोठं तत्त्वज्ञान त्यात दडलंय, ते आता लक्षात येतं.

थोडक्यात काय, तर संभाव्य अडचणींचा, धोक्यांचा, समस्यांचा अंदाज बांधता आला पाहिजे आणि त्यानुसार तयारी ठेवली पाहिजे.

कधीकधी लक्षात आलेल्या गोष्टी पुढे मोठया समस्येला जन्म देऊ शकतील हे समजत नाही. या गोष्टी छोटया वाटतात. त्यामुळे दुर्लक्षित राहतात आणि पुढे उग्र रूप धारण करतात. एका घोडयाच्या नालाकडे दुर्लक्ष केल्याने तो पडला, त्यामुळे घोडा पळून गेला, त्यामुळे रथ पडला, त्या रथातला सेनापती पडला आणि सेनापती पडला म्हणून सैन्य घाबरून पळू लागलं आणि म्हणूनच एका साम्राज्याचा ऱ्हास झाला. याकरिता लहानसहान गोष्टींकडे सजगपणे पाहून समस्या निर्माण होण्यापूर्वीच ती थांबवली पाहिजे.

जीवनात समस्या या विविध पेहराव करून येतात. एखाद्याला शारीरिक व्याधी जडतात, एखाद्याला चिंता, भीती, अपयश यांच्या छायेत जगणं नको वाटतं, तर काही व्यक्तींना आर्थिक चणचणीला सामोरं जावं लागतं.

आता अमोलचंच उदाहरण पाहा ना - प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून एका वर्षांपूर्वीच त्याची नियुक्ती झाली. पण वरिष्ठ आपल्यावर अन्याय करतात, आपल्याला पुरेशी 'स्पेस' देत नाहीत, चांगल्या कल्पनांना गुंडाळून ठेवलं जातं आणि त्यामुळे कामात समाधान नाही अशा समस्येने अमोल अस्वस्थ आहे.

रोहितचं वजन 100चा आकडा ओलांडून पुढे गेलं आहे. 30 वर्षांचा रोहित आयटी सेक्टरमध्ये काम करतो. कित्येक तास एका जागी बसून असतो. पण यातून ब्लडप्रेशर, चिंता, ताण या गोष्टी मन:शांती कुरतडू लागल्यात.

तर नंदिताला तिच्या सासरी राहणं अगदी नकोसं वाटू लागलंय. कितीही चांगलं वागलं तरी माझ्या चुका काढायला सासू तयारच. नवरा कधीच माझी बाजू उचलून बोलत नाही. सगळयांनी मला एकटं पाडलंय. रोज उठून नवं काहीतरी सहन करावं लागतं. कधी संपणार हे?

आपल्याला कोणी समजून घेत नाही ही काही व्यक्तींना समस्या असते, तर वृध्दापकाळात एकटेपणाच्या बेटावर मनात उठणारं काहूर ही समस्या भासते. एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विषय अवघड वाटतो, तर एखाद्या तरुणाला शिक्षणाला साजेशी नोकरी मिळण्यात समस्या येतात.

आपल्या अस्तित्वाबरोबरच वावरत असतात असंख्य समस्या. आपली परीक्षा घ्यायला सदैव तयारच असतात.

काही समस्या या सौम्य परिणाम देतात, तर काही गंभीर. काही समस्या क्वचित उद्भवतात, तर काही वारंवार... म्हणूनच त्यांचा योग्य अभ्यास करून आवश्यकतेनुसार निर्णय घेतले पाहिजेत.

एका पुस्तकातलं सुंदर वाक्य मनात कोरून ठेवावं - Problems are not 'Stop sings', they are our guidelines. हेच तर स्वीकारायचंय आपल्याला. समस्या आपल्याला मार्ग दाखवतात. आपण कुठे कमी पडलो ते सांगतात. समस्या म्हणजे अपयश नव्हे.

या समस्या येतात तरी कुठून बरं? तर त्या व्यक्ती आणि परिस्थिती याच्या क्रिया-प्रतिक्रियांचा परिपाक असतात. रामाला वनवासात पाठवलं या समस्येचं बीज दशरथाने कैकेयीला दिलेल्या मुक्त वरात आणि कैकयीच्या योग्य वेळ साधत स्वत:चा लाभ करून घेण्याच्या प्रवृत्तीत तर आहे. यावरून आपण इथे दोन गोष्टी निश्चित करू शकतो.

1) अडचणी या अचानक आल्या असं जरी आपण म्हणत असलो, तरी आपण जिथे लक्ष द्यायला, अंदाज बांधायला कमी पडलो त्या गोष्टींतून उद्भवल्या आहेत.

2) अडचणी, समस्या यांना यायला जसा मार्ग आहे, तसा जायलाही आहे.

आपण आता समस्यांना ओळखू या. आपल्या आयुष्यात भेडसावणाऱ्या प्रत्येक लहान-मोठया समस्यांची यादी बनवू या. योग्य शब्दांत त्यांना मांडल्याने त्या आपल्या नियंत्रणात आल्याची जाणीव होईल.

यानंतर त्याच्यासमोरच समस्या सोडवल्यावर कशी स्थिती असेल तेही विचारपूर्वक समोर मांडू या.

उदाहरणाच्या माध्यमाने आपण समजून घेऊ. नंदिताला सासरी त्रास होतो आहे. तिच्या जीवनात असमाधान आहे ही तिची समस्या आहे. ही समस्या सुटली तर काय घडेल बरं? तर नंदिताचा त्रास पूर्णपणे थांबेल आणि ती समाधानी असेल.

ही दोन टोकं पकडता आली, तर अडचणींचा गुंता हळूहळू उकलणं सोपं जातं.

आता या दोन टोकांना जोडणारे सारे पर्याय डोळयासमोर आणावेत. काय काय करता येईल बरं...? तर सासूशी तिच्यापेक्षा वरचढपणे भांडणं, तिला शांतपणे समजावणं, त्रयस्थ व्यक्तीच्या मध्यस्थीने समजावणं, ताकीद देणं, सहन करत राहणं, दुर्लक्ष करणं, नवऱ्याला त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा सांगणं व त्याचं पाठबळ मिळवणं, वेगळं राहणं, सासरहून निघून अन्यत्र जाणं, घटस्फोट घेणं इ. मनात येणारा प्रत्येक पर्याय लिहून काढावा. कदाचित तो खूप भयंकर अथवा फारच पोरकट वाटेल, पण आपण प्रत्येक पर्यायाचा विचार केला, तरच योग्य पर्याय निवडू शकतो.

यानंतरची पायरी अत्यंत महत्त्वाची आहे. निर्णय प्रक्रिया. गडबडीत पटकन निर्णय घेणं किंवा हतबलतेने निर्णय घेणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत आणि त्या टाळल्या पाहिजेत.

निर्णयाच्या क्षणी सर्व संभाव्य पर्याय समोर ठेवावेत आणि मग प्रत्येक पर्यायात लाभ-हानी याच गणित मांडायचं. त्या वेळी जो पर्याय सर्वात जास्त लाभांचा आणि ज्यातून स्वत:ला वा इतरांना कमी हानी असेल, तो निवडावा. यासाठी योग्य त्या व्यक्तींची, हितचिंतकाची मदत घ्यावी, सल्ला घ्यावा, पण निर्णय फक्त आणि फक्त स्वत:च घ्यावा.

काही निर्णय हे वरकरणी कटू असले, तरी काळाच्या ओघात ते योग्य आणि आवश्यक ठरणार असतात. त्यामुळे असे निर्णय विचारपूर्वक घ्यावे. केवळ आजचा फायदा सगळया परिस्थितीत उपयोगी ठरत नाही. पण आपण हा निर्णय का घेतला अन् हा निर्णय मला कसा समस्यामुक्त करेल, हे आपल्याला स्वत:ला आणि गरज भासेल तिथे इतरांना सांगता यावं.

तुम्ही एका विमानात आहात, त्यात 6 वर्षांचा एक मुलगा, एक डॉक्टर, एक शास्त्रज्ञ, एक गरोदर स्त्री, एक वृध्द व्यक्ती आणि एक शेतकरी असे सहा जण आहेत. तुमच्याकडे चारच पॅराशूट आहेत. तर ती तुम्ही कोणाला द्याल आणि का? विचार करून पाहा. हाच प्रश्न इतरांना विचारा. प्रत्येक व्यक्ती वेगळं Logic लावते अन् समस्या सोडवते. त्यामुळे एका समस्येला प्रमाणित असं उत्तर नाही. मग समस्या (दैनंदिन जीवनातल्या) सोडवायला हवी मर्मबुध्दी, असलेल्या गोष्टींचा योग्य वापर करण्याची कल्पकता, काळाची गरज ओळखण्याचं कौशल्य अन् अनुभवातून शिकण्याचं शहाणपण...

समस्या येणं अटळ आहे. पण एकच समस्या वारंवार येत असेल, तर आपल्यातील कमतरतांवर काम करायला पाहिजे. एखाद्या ऑफिसात वरिष्ठ त्रास देतात म्हणून आपण नोकरी बदलतो, तर तिथेही तेच... एकच गोष्ट समस्या म्हणून उभी राहत असेल, तर समस्या आपल्यात असण्याची शक्यता अधिक आहे. यासाठी स्वत:कडे डोळसपणे पाहणं शिकून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी परिस्थितीला दोष देणं प्रगतीला घातक आहे.

अनेकदा आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींसाठी ग्रह-ताऱ्यांना अपराध्याच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. पण आपल्या वर्तनाची, निर्णयाची, चुकांची जबाबदारी 'पूर्णत:' दुसऱ्यावर लादणं हे किती योग्य आहे?

व्यक्तिमत्त्व घडवायचं, तर मार्गदर्शक म्हणून यशस्वी व्यक्तींच्या चरित्राचा उपयोग करता येतो. या व्यक्तींना जितक्या जास्त समस्या आल्या, तितकं त्याचं व्यक्तिमत्त्व देखणं झालं. म्हणून समस्या येणं हे दुर्भाग्य न मानता त्यातून आपण शिकत जाणार आहोत. नजरेआड झालेल्या गोष्टी डोळयात अंजन घालून दृष्टी व्यापक करत आहेत, असं समजायला काहीच हरकत नाही.

एक किस्सा आठवला. एका चॅनलवर कार्टून फिल्म पाहिली होती. एका होडीमध्ये नरेंद्र मोदी, केजरीवाल अन् राहुल गांधी चालले होते. इतक्यात त्यांच्यासमोर एक राक्षस उभा राहिला अन म्हणाला, ''मी तुमची परीक्षा घेणार. तुम्ही कोणतीही वस्तू पाण्यात टाका, ती मला शोधता आली तर मी तुम्ही तिघांनाही पाण्यात टाकून देणार. नाही शोधता आली तर तुमचा दास बनेन.'' अट मान्य झाली. केजरीवालने सामान्य माणसाकडे असणारी चावी टाकली, तर राहुल गांधींनी मोबाइल टाकला आणि जिनने तो आणून दिला. आता दोघेही अपेक्षेने मोदींकडे पाहू लागले. मोदींनी (नेहमीच्या शैलीत) हसत-हसत खिशातून ऍस्पिरीनची गोळी काढली अन् पाण्यात टाकली. राक्षस विरघळलेली गोळी शोधताना थकून गेला अन्...

राजकारणाचा भाग बाजूला काढला, तरी समस्येला शांतपणे पाहणं, पुढचा विचार करणं, प्रत्येक पर्याय तपासून पाहणं, निर्णय घेणं, तो अंमलात आणणं आणि त्याची संपूर्ण जबाबदारी घेणं हे जमलं की समस्या आपल्या आपण मार्ग मोकळा करतील.

समस्या येत राहतील, पण मात खाईल तो माणूस कसला? जीवन ही एक लढाई आहे, संघर्ष आहे सत्-असत यांचा, यशापयशाचा, धैर्य अन् भीतीचा. आपल्यासाठी शस्त्रं स्वत:च शोधायची आहेत, पण ढाल मात्र प्रत्येकाकडे अाहे... प्रयत्नांची.

चला तर मग, आयुष्याकडे नव्याने पाहू या.

9273609555, 02351-204047