लाल दिव्याची गोष्ट

विवेक मराठी    24-Apr-2017
Total Views |


केकाळचे राजे महाराजांचे वेगळेपण दाखविणारी सिंहासने, राजमुकुट, भरजरी पोषाख काळाच्या ओघात नष्ट होत आले. आपल्यावर राज्य करणारे राजे-महाराजे आपल्यासारखेच शारीरिक अवयव असणारे असले, तरी राज्य करण्याचा दैवी अधिकार त्यांना प्राप्त झालेला असतो, असे मानले जात असे. अजूनही इंग्लंडचा राजा किंवा राणी आपल्या राजेपणाची किंवा राज्ञीपदाची धुरा स्वीकारते, त्या वेळी तिच्यात ईश्वरी अंश प्रकट होतो असे मानले जाते. पण जसजशी लोकशाहीची प्रक्रिया दृढमूल होत गेली, तसतशी राज्यकर्त्यांच्या दैवी अधिकाराची कल्पना कालबाह्य होत गेली. आजही इंग्लंडच्या राजा किंवा राणीपदाच्या वेळी संस्कार होत असला, तरी त्याला श्रध्देपेक्षा अधिक कर्मकांडाचे स्वरूप आहे, कारण तिथल्या राजघराण्याला केवळ प्रतीकात्मक महत्त्व आहे. खरी सत्ता ही लोकनियुक्त पंतप्रधानांच्या हाती आहे. असे असले, तरी आपण शासक आहोत याचा राज्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी व लोकांनाही आपण शासित आहोत याची जाणीव करून देण्यासाठी ज्या अनेक साधनांचा वापर केला जात होता, तो म्हणजे त्यांच्या गाडीवरचा लाल दिवा. वास्तविक लाल रंग हा धोक्याचा इशारा म्हणून वापरण्याचे संकेत आहेत. पण या बाबतीत मात्र तो अधिकाराचा प्रतीक मानला गेला. मूठभरांचे अधिकार हा लोकांना असलेला धोका म्हणून ते प्रतीक वापरले गेले की काय... कळण्यास मार्ग नाही. पण जर असे असेल, तर ते ज्याने शोधून त्याचा पहिला वापर केला असेल, तो खरा द्रष्टा होता असे मानले पाहिजे.

राजकारणात पडल्यानंतर नगरसेवक, आमदार अशा पायऱ्या चढता चढता लाल दिवा मिळविणे ही पहिली महत्त्वाची 'लोकसेवेची' पायरी मानली जात होती. लाल दिव्याची गाडी, सायरनचा आवाज व भोवताली अंगरक्षकांचा गराडा यामुळे राज्यकर्त्यांना राज्यकरण्यासाठी आवश्यक असलेले हत्तीचे बळ येत असावे. हे बळ आल्यानंतर हत्ती कोणत्या दिशेने प्रवास करील हे सांगणे अवघड. पूर्वी जेव्हा आजच्या इतकी प्रत्येक निवडणुकीत सत्तेची उलथापालथ होत नसे, तेव्हा लाल दिव्याच्या बाबत आदरयुक्त धाकही होता. परंतु जेव्हा सत्ताधारी पक्ष लोकसेवेपेक्षा स्वत:च्या सेवेत अधिक गुंतू लागले आणि लोकांच्या अपेक्षांचा भंग होऊ  लागला, तेव्हा लाल दिव्याच्या अधिकाराकडे आदरापेक्षा तिरस्काराने पाहिले जाऊ  लागले. परवाच शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी आपल्या मस्तीचे जे प्रदर्शन केले, तसे अनेक प्रसंग आजवर घडले आहेत. माहितीचा अधिकार, न्यायालये, सोशल मीडिया, त्यातून होणारी लोकजागृती यामुळे राजकर्त्यांवर अनेक बंधने आली आहेत. तरीही सामाजिक जीवनात राजकारणाचे एक विशेष स्थान आहे. राज्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा प्रभाव जनसामान्यांच्या जीवनावर पडत असतो. त्यामुळे राज्यकर्त्यांच्या हाती असलेल्या अधिकारांचे महत्त्व कमी झालेले नाही. लोकशाही राज्यव्यवस्थेत तर निवडून आलेला राज्यकर्ता हा समाजाच्या समूहमनाचे प्रतिनिधित्व करीत असतो. जोवर सामाजिक समूहमनाचा विश्वास असेल, तोवरच तो राज्यकर्ता म्हणून राहू शकतो.

या लोकमान्यतेतून येणारा आत्मविश्वास हे राज्यकर्त्याचे खरे भांडवल असते. परंतु जेव्हा राज्यकर्ता म्हणून सत्तेवर आल्यावर त्याला आपल्या जबाबदारीचे भान राहण्याऐवजी अधिकारांचा कैफ चढतो, तेव्हा अशा निशाण्या अधिक महत्त्वाच्या वाटू लागतात. लाल बत्तीची गाडी ही अशीच एक महत्त्वाची निशाणी आता भूतकालात जमा झाली आहे.

जगावर जेव्हा समाजवादी विचारांचा प्रभाव होता, तेव्हा राजसत्ता हे समाजातील जवळजवळ एकमेव सत्ताकेंद्र होते. देशाची सर्व अर्थव्यवस्था तेव्हा सरकारच्या हाती केंद्रित झाली होती. कोणत्या उद्योगांना कसे परवाने द्यायचे यावर पूर्णपणे शासकीय नियंत्रण होते. त्यामुळे देशात कोणालाही काही करायचे असेल, तर सत्तेच्या जवळ जाण्याशिवाय पर्याय नसे. समाजवादाला उत्तर म्हणून युरोपीय देशात लोककल्याणकारी राज्याची संकल्पना आली. यात जनतेच्या हिताच्या अनेक जबाबदार्या सरकारने आपल्या अंगावर घेतल्या. त्यामुळे जिथे अविकसित अर्थव्यवस्था होत्या, तिथे या सुविधा मिळण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते मदतीला येत. असे कार्यकर्ते सांभाळणे हे सत्ताधारी नेत्यांचे प्रमुख काम असे. त्यामुळे लाल दिव्याशी असलेले संबंध कार्यकर्त्यांना सामाजिक स्थान मिळवून देत. जागतिकीकरण व त्याचा परिणाम म्हणून आलेल्या मुक्त अर्थव्यवस्थेमुळे सरकारवरचे अर्थव्यवस्थेचे अवलंबित्व संपले नसले, तरी कमी झाले आहे. त्याचबरोबर आता जसजसा प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे, तशा शासकीय निर्णयातील संबंधांचा भाग कमी होत आहे. पण अजूनही नोकरशाहीला आपल्या हातातील निर्णयशक्ती कमी होऊ  द्यायची नाही. त्यामुळे या तंत्रज्ञानातील सुधारणांचा लोकांच्या दृष्टीने जेवढा उपयोग व्हायला पाहिजे, तसा होत नाही. तो जसजसा अधिक व्हायला लागेल, तसतसे लोकांचे अवलंबित्व आणखी कमी होत जाईल. पूर्वी दिल्लीत प्रत्येक मोठया उद्योगपतींसाठी काम करणारे मध्यस्थ होते. नीरा राडियांसारखे मध्यस्थ कोणाला मंत्री करायचे यापासून निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकीत असत. आज त्यांची सद्दी संपली आहे. निश्चित नियम असणे आणि त्या नियमानुसार कार्यपध्दती असणे हे खरे तर चांगल्या प्रशासनाचे लक्षण असते. पण केवळ नियमाने कामे झाली तर आपले महत्त्व काय? या भीतीने अधिकारावर असलेल्या लोकांना पछाडलेले असते. त्यामुळे लाल बत्तीची परंपरा संपणे हे बाह्य लक्षण आहे. अधिकाधिक लोकसहभाग असणारा पारदर्शक कारभार हे खरे तर अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे. यासाठी जो अधिकाराचा अहंकार आड येतो, तो कमी करण्याकरिता या निर्णयाचा उपयोग झाला तरी तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.