नवीन पर्व के लिये...

विवेक मराठी    25-Apr-2017
Total Views |


'नवीन पर्व' नेमके कोणते आहे व त्याकरिता आवश्यक असलेल्या 'नवीन प्राणांचे' स्वरूप कोणते आहे, याचा शोध घेत असताना जगातील विविध संस्कृतींचे स्वरूप कोणते आहे? त्यांची गुणवैशिष्टये कोणती आहेत? त्यांच्या मर्यादा कोणत्या आहेत? त्याचप्रमाणे, हिंदू संस्कृतीचे स्वरूप, वैशिष्टय व मर्यादा कोणत्या आहेत? असे अनेक प्रश्न आपल्यापुढे निर्माण होतात. हिंदू सांस्कृतिक परंपरा पाच हजार वर्षांतरही जिवंत आहे हे तिचे सामर्थ्य, पण गेल्या हजार वर्षांत तिला आधी मुस्लीम व नंतर इंग्रज आक्रमणाला बळी पडावे लागले, हे तिचे दौर्बल्य कशातून निर्माण झाले? आपले सामर्थ्य टिकवून हे दौर्बल्य कसे दूर करता येईल? गेल्या दोनशे वर्षांत यावर बरेच विचारमंथन झाले आहे. संघ हाही याच विचारमंथनाचा एक भाग आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवकांची व्यक्तिमत्त्वे घडविण्यात संघसंस्कारांच्या पर्यावरणाचा मोठा सहभाग असतो. स्वयंसेवकांच्या सुप्तमनावर त्याचे जे संस्कार होतात, त्यांचा परिणाम संपूर्ण जीवनावर होतो. या संस्कारांच्या पर्यावरणात संघातील पद्यांना मोठे स्थान आहे. यातील अनेक पद्ये अशी आहेत की ज्यांचा शब्दार्थ कदाचित लगेच कळू शकतो, पण त्याचा खरा अर्थ जीवनातील अनुभवांनुसार उलगडत जातो. 'नवीन पर्व के लिये, नवीन प्राण चाहिये' हे असेच एक पद्य आहे. 'नवीन पर्व' नेमके कोणते आहे व त्याकरिता आवश्यक असलेल्या 'नवीन प्राणांचे' स्वरूप कोणते आहे, याचा शोध घेत असताना जगातील विविध संस्कृतींचे स्वरूप कोणते आहे? त्यांची गुणवैशिष्टये कोणती आहेत? त्यांच्या मर्यादा कोणत्या आहेत? त्याचप्रमाणे, हिंदू संस्कृतीचे स्वरूप, वैशिष्टय व मर्यादा कोणत्या आहेत? असे अनेक प्रश्न आपल्यापुढे निर्माण होतात. हिंदू सांस्कृतिक परंपरा पाच हजार वर्षांतरही जिवंत आहे हे तिचे सामर्थ्य, पण गेल्या हजार वर्षांत तिला आधी मुस्लीम व नंतर इंग्रज आक्रमणाला बळी पडावे लागले, हे तिचे दौर्बल्य कशातून निर्माण झाले? आपले सामर्थ्य टिकवून हे दौर्बल्य कसे दूर करता येईल? गेल्या दोनशे वर्षांत यावर बरेच विचारमंथन झाले आहे. या विचारमंथनातूनच समाजपरिवर्तनाच्या अनेक चळवळी निर्माण झाल्या. संघ हाही याच विचारमंथनाचा एक भाग आहे.

जगावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक संस्कृती निर्माण झाल्या, परंतु त्या काळाच्या ओघात अस्तंगत झाल्या. भारताची तुलना करण्यासारखी फक्त चीनची संस्कृती आहे. ती प्राचीन असली, तरी आजचा चीन तिच्याशी नाते सांगणारा नाही. कदाचित येत्या काही वर्षांनी ही स्थिती बदलू शकते. हिंदू संस्कृती काळाच्या ओघात टिकून राहिली, याची दोन कारणे आहेत. कालानुरूप बदलण्याची क्षमता हे त्याचे पहिले कारण असून हा बदल होत असतानाही संस्कृतीचा मूळ गाभा टिकवून ठेवण्याची क्षमता हे दुसरे कारण आहे. त्यामुळे, या संस्कृतीतील परिवर्तनशील भाग कोणता व मूळ गाभ्याचा भाग कोणता याची चिकित्सा करणे आवश्यक ठरते. या दृष्टीने गेल्या दोनशे वर्षांतील विचारमंथनाचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे. या परिवर्तनाचे पाच प्रमुख प्रवाह आहेत. पहिला आत्यंतिक सनातन्यांचा. पारंपरिक चतुर्वर्णाधिष्ठित हिंदू समाजव्यवस्था परिपूर्ण असून त्यात यत्किंचितही बदल करणे म्हणजे ईश्वरनिर्मित सामाजिक परंपरेत केलेला मानवी हस्तक्षेप ठरेल, ईश्वराच्या इच्छेमुळे इंग्रजी राज्य आले आहे, त्याची इच्छा असेपर्यंत राहील व नंतर जाईल, त्यामुळे कोणत्याही प्रकारे या समाजव्यवस्थेत हस्तक्षेप करणे हे पाप आहे अशी भूमिका असणारा आत्यंतिक सनातनी वर्ग होता. दुसरा वर्ग हा वेदांचे अधिष्ठान कायम ठेवून पण कालानुरूप परिवर्तन आवश्यक आहे असे मानणारा होता. स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद आदी या गटात येतात. तिसरा वर्ग हा वेदप्रामाण्य न मानता पण हिंदू सुधारणावादी परंपराच्या आधारे परिवर्तन झाले पाहिजे अशी भूमिका असणारा होता. या प्रवाहाच्या अंतर्गत अनेक उपप्रवाह होते. मध्ययुगीन भक्तिसंप्रदाय या आधुनिक मानवतावादी समाजाचा गाभा बनू शकतो, अशी न्या. रानडे यांनी मांडणी केली. म. गांधींचा समावेशही याच गटात करावा लागेल. पारंपरिक हिंदू समाजव्यवस्थेत आमूलाग्र बदल करून तत्त्वज्ञानाची पुनर्मांडणी केल्याशिवाय नवा शोषणमुक्त हिंदू समाज तयार होणार नाही, असे प्रतिपादन करणारा चौथा गट होता. हिंदू संस्कृतीची मूल्ये कालबाह्य झाली असून युरोपीय प्रबोधन काळात उदारमतवादापासून कम्युनिझमपर्यंत जो विचारप्रवाह उत्पन्न झाला आहे, त्याचा स्वीकार केल्याशिवाय या समाजाला भवितव्य नाही असे मानणारा पाचवा प्रवाह होता. वास्तविक पाहता, बुध्दिवादाच्या आधारे हिंदू समाजाची पुनर्रचना करण्याचा आग्रह धरणारे स्वा. सावरकरही याच गटात मोडतात... हे वास्तव स्वीकारणे स्वयंघोषित पुरोगामी व बरेचसे सावरकरवादी यांना अवघड वाटेल. परंतु डॉ. हेडगेवारांनी स्वीकारलेला मार्ग या पाचही मार्गांपेक्षा वेगळा होता. भारताच्या सांस्कृतिक पर्यावरणात तोच अधिक यशस्वी ठरला, याचा अनुभव आज येत आहे. त्याची कारणमीमांसा करण्यापूर्वी सांस्कृतिक जडणघडणीच्या प्रक्रियेचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.


चैतन्य व व्यवस्था

प्रत्येक सजीवामध्ये जडतत्त्व व चैतन्यतत्त्व असते. माणसाव्यतिरिक्त अन्य प्राण्यांना त्याची 'जाणीव' नसते. माणसामध्ये असलेल्या या जाणिवेच्या विकासातूनच मानवी संस्कृतीचा विकास झालेला आहे. मानवी संस्कृतीतील चैतन्यतत्त्व सामूहिक समाजमनाच्या स्वरूपात असते. समाजात सुप्तावस्थेत असलेल्या चैतन्यतत्त्वाशी ज्या व्यक्ती संवाद करू शकतात, त्याला आवाहन करू शकतात, त्यांच्याकडे त्या समाजाचे नेतृत्व येते. जे नेते सामाजिक कर्तृत्वशक्ती फुलवू शकतात, तेच त्या समाजाला प्रगतिपथावर नेऊ शकतात. त्याचबरोबर काही समाजांनी आपल्या सामाजिक व्यवस्था अशा निर्माण केलेल्या असतात, की त्यांची प्रगती केवळ एखाद्या नेत्यावर अवलंबून राहत नाही. किंबहुना काही किमान पात्रता अंगी असल्याशिवाय त्या समाजात कोणी नेतृत्वपदी पोहोचू शकत नाही. आणि कोणतीही व्यक्ती नेतृत्वपदी पोहोचली, तरी त्या पदासाठी जे नियम आहेत त्याचे तिने पालन केले नाही, तर ती त्या पदावर टिकू शकत नाही. आजच्या काळात अमेरिका हे व्यक्तिनिरपेक्ष व्यवस्थेचे उत्तम उदाहरण आहे. राष्ट्राध्यक्ष कितीही कर्तृत्ववान असला, तरी त्याला अधिकाधिक चार वर्षांचे दोन कार्यकाळ सत्तेवर राहता येते. चीनमध्येही अध्यक्षासाठी पाच वर्षांच्या दोन कार्यकाळांची मर्यादा आहे. सामूहिक मनाला आवाहन करून परिवर्तन करता येते. त्या परिवर्तनाला अनुसरून त्या समाजामध्ये ज्या व्यवस्था निर्माण होतात, त्या आधारे त्या परिवर्तनात स्थिरता आणता येते. त्यामुळे समूहमन आणि व्यवस्था यांच्यात एक जैविक नाते तयार होते. या नात्यात मन आणि व्यवस्था यांचे संबंध कसे असतात, त्यावर त्या संस्कृतीचे स्वरूप ठरत असते.

जगात तीन प्रमुख सांस्कृतिक प्रवाह आहेत. हिंदू संस्कृतीत मनाला प्राधान्य आहे व व्यवस्थेला आनुषंगिक मानले आहे. जन्माधिष्ठित चतुर्वर्णव्यवस्था हे हिंदू समाजाचे वैशिष्टय आहे असे हिंदू समाजातील सनातनी व हिंदू समाजाचे विरोधक असे दोघेही मानतात. पण इतिहासात मागोवा घेताना कोणत्याही कालखंडात ती कशा प्रकारे प्रत्यक्षात आली होती हे निश्चितपणे सांगणे अवघड आहे. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्या व्यवस्थेला धाब्यावर बसविणारी उदाहरणे इतकी आहेत की ही व्यवस्था फारतर मार्गदर्शक तत्त्वे आहेत असे म्हणता येते. महाभारताच्या युध्दात तर कौरव-पांडवांच्या क्षत्रियांसोबत द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्यासारखे ब्राह्मण, कर्णासारखा सूतपुत्र केवळ लढलेच नाही, तर कौरवांचे सेनापतीही झाले. घटोत्कचासारखे अनार्यही क्षत्रियांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. त्यानंतर जी आचारप्रधान जातव्यवस्था आली, तिचे पालन मात्र अधिक कठोरपणे झाले. जन्माधिष्ठित जातव्यवस्थेच्या विरोधात बौध्द अवैदिक परंपरा निर्माण झाली. या परंपरेत जन्माधिष्ठिततेपेक्षा नीती आणि आत्मसंयमातून शरीरावर स्वामित्व मिळवून पारमार्थिक ध्येय साधता येते, याला महत्त्व दिले गेले. मध्ययुगीन काळात भक्तिमार्गाच्या आधारे अवैदिक व वैदिक परंपरांचा समन्वय साधणारी भक्तिपरंपरा निर्माण झाली. जवळजवळ एकाच कालखंडात देशभरातील जवळजवळ सर्व प्रांतांत व भाषांत तिथल्या लोकभाषांत भक्तीचा महिमा सांगणारे संत निर्माण झाले. या परंपरेत वेदांचा आदरही होता, पण त्याद्वारा आलेला जन्माधिष्ठित वर्ण व जातिव्यवस्थेतील उच्चनीचता नाकारलेली होती. या सर्व कालखंडात जो सामाजिक प्रवाह तयार झाला, त्याची कठोरपणे अंमलबजावणी करणारी कोणतीही एखादी विशिष्ट व्यवस्था नव्हती. ज्या स्मृती होत्या, त्या मार्गदर्शक स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे हिंदू समाजव्यवस्थेचा वेगवेगळया तऱ्हेने अर्थ लावता येणे शक्य झाले आहे. प्रत्येकाला आपला मुद्दा सिध्द करण्याकरिता जेवढी उदाहरणे मिळतात, तेवढीच त्याविरुध्दही मिळतात. समूहमनाचे प्रवाहीपण व व्यवस्थेतील लवचीकता हे त्याचे कारण आहे.

युरोपीय प्रबोधन काळातून जी संस्कृती निर्माण झाली, त्यात व्यवस्थेला अधिक महत्त्व दिले गेले व मनोभावना ही व्यवस्थेवर अवलंबून असते हे गृहीत धरले गेले. त्यामुळे समाजात बदल घडवायचा असेल तर व्यवस्थेत बदल घडवून आणला पाहिजे, या दृष्टीने पाश्चात्त्य विचारपरंपरा निर्माण झाली. या विचारपरंपरेतून व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, बुध्दिनिष्ठा, कायद्यासमोर सर्व समान, सामाजिक न्याय, इहवादी राज्य अशा अनेक संकल्पना निर्माण झाल्या. माणसाच्या सर्व व्यवहाराचे तर्कबुध्दीच्या आधारावर प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे विश्लेषण करता आले पाहिजे हा या विचारपरंपरेचा गाभा होता. वैज्ञानिक शोध, त्यातून निर्माण झालेली औद्योगिक संस्कृती व त्याचसोबत निर्माण झालेली ही नवी इहवादी संस्कृती यामुळे युरोपचे स्वरूपच बदलून गेले. आधुनिक राष्ट्रवाद हा या विचारप्रवाहातूनच निर्माण झाला. या नवराष्ट्रवादाने युरोपीय देश सामर्थ्यवान बनले. एकेकाळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर प्रभाव टाकणारे भारत, चीन या स्पर्धेत मागे पडले. या विचारप्रवाहातून मुक्त अर्थव्यवस्थेपासून कम्युनिझमपर्यंत अनेक विचारसरणी निर्माण झाल्या. त्यामुळे विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत जगावर विविध विचारसरणींनी प्रभाव गाजविला. दुसरे महायुध्द ही आक्रमक राष्ट्रवाद विरुध्द लोकशाही अशी लढाई आहे, असे अमेरिका व इंग्लंड यांनी म्हटले. दुसऱ्या महायुध्दानंतर अमेरिकन व युरोपीय स्वातंत्र्यवाद विरुध्द कम्युनिझम असे शीतयुध्द झाले. मात्र विसाव्या शतकाच्या अखेरीस हे युध्द संपले. आता जागतिकीकरणाच्या असफल प्रयत्नानंतर पुन्हा नवराष्ट्रवादाचे युग निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

तिसरा सांस्कृतिक प्रवाह हा सेमेटिक धर्मपरंपरेतून निर्माण झालेला आहे. हे जग ईश्वरनिर्मित असल्याने इतर सर्व गोष्टीबरोबरच मन आणि व्यवस्था यांचा परस्पर संबंध हा परमेश्वरानेच ठरवून दिलेला असल्याने त्यात मानवी हस्तक्षेपाला कोणतीही जागा नाही, असे सेमेटिक धर्मपरंपरा मानते. हे सर्व संबंध प्रेषितांद्वारे प्रकट झाले आहेत व ते धर्मग्रंथात नमूद केले गेले आहेत. यात माणूस कोणताही बदल करू शकत नाही हे सेमेटिक धर्माचे गृहीत कृत्य आहे. आपल्या प्रेषिताचा संदेश जगभर पोहोचविणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य असल्यामुळे सेमेटिक धर्माची प्रत्येक व्यक्ती हे धर्मप्रसाराचे माध्यम बनते. यातून सेमेटिक धर्म मानणाऱ्या सर्व समाजालाच आपल्या जगण्यासाठी एक हेतू प्राप्त होतो. त्यामुळे सेमेटिक धर्मावर श्रध्दा असणारी व्यक्ती व समाज हे स्वभावत:च विस्तारवादी बनतात. अपरिवर्तनीय मूल्य व समाजव्यवस्था आणि स्वाभाविक विस्तारवाद या दोन गोष्टी सेमेटिक संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. हिंदू संस्कृतीतील कालानुक्रमे झालेले मानसिक परिवर्तन किंवा युरोपीय प्रबोधन कालातील विचार प्रवाहातून घडणारे व्यवस्था परिवर्तन या दोन्ही गोष्टी, सेमेटिक धर्मसंस्कृतीच्या दृष्टीने ईश्वराच्या क्षेत्रात केलेला मानवी हस्तक्षेप आहे. त्यामुळे त्याला त्यांचा विरोध असतो.

भारतावरील परिणाम

भारतामध्ये वैदिक, अवैदिक, भक्ती आदी अनेक विचारप्रवाहांतून एक समूहमन तयार झाले होते. त्यावर व्यक्तिगत मोक्षवादाचा पगडा होता. परंतु त्यातून एखादी केंद्रित व्यवस्था निर्माण झाली नाही. अशी जाणीवपूर्वक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे चाणक्य, विद्यारण्य स्वामी किंवा शिवाजी महाराज हे अपवाद. अन्य सर्व राजांचे राज्यविस्तार हे त्यांच्या त्यांच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेतून झालेले. भारतावर ग्रीक, शक, हूण आदी लोकांची आक्रमणे झाली. पण तीही व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेतून झाली होती. त्यामागे विशिष्ट सांस्कृतिक विचार नव्हता. त्यामुळे या आक्रमक जातीही भारताच्या विविधतापूर्ण समाजव्यवस्थेत सामावून गेल्या. त्यांचा नेमक्या कोणत्या जातीत किंवा वर्णात समावेश केला गेला, याचा पत्ताही आता लागत नाही. त्यामुळे सुप्त मनात एकात्मभाव असलेली, परंतु व्यवहारात कोणतीही समानता नसणारी, विसविशीत राजकीय, सामाजिक धार्मिक, आर्थिक धाग्याने बांधलेली हिंदू समाजरचना तयार झाली. तिच्यात प्रवाहीपणा होता, जिवंतपणा होता, पण सर्व समाज म्हणून ऐहिकदृष्टया एक राहण्याकरिता लागणाऱ्या व्यवस्थेचा किंवा तशा मानसिकतेचा अभाव होता. सर्व देशावर राज्य करू शकेल, असे सुदृढ सत्ताकेंद्र भारताच्या इतिहासात अपवादानेच आढळेल. जोवर भारताचा बाह्य संस्कृतींशी निकटचा संबंध आला नाही, तोवर सर्व ठीक होते. पण इस्लामी आक्रमणाच्या रूपाने सेमेटिक धर्माच्या संस्कृतीशी व ब्रिटिश सत्तेच्या रूपाने युरोपीय संस्कृतीशी संबंध आला, त्यांच्या वर्चस्वाखाली राहावे लागले, तेव्हा त्याची उत्तरे कशी शोधायची हा प्रश्न निर्माण झाला.

ब्रिटिश येण्याअगोदर जवळजवळ आठशे वर्षे भारत इस्लामी आक्रमणाशी लढा देत होता. ब्रिटिश सत्ता सुस्थिर होण्यापूर्वी मराठयांनी आणि शीखांनी मुस्लीम राजकीय सत्तेचा प्रभाव कमी करत आणला होता. पण ज्याप्रमाणे धर्माचा प्रश्न आला की मुस्लीम समाजाची सामूहिक मानसिकता जागी होऊन त्यातून सामूहिक शक्ती जागृत होत होती, तसे हिंदू समाजात घडत नव्हते. आपणा सर्वांना मिळून एक समाज म्हणून आपला धर्म, संस्कृती वाचविण्यासाठी एकत्र लढायचे आहे, हा समूहभाव त्यामागे नव्हता. ब्रिटिश आले, तेव्हा आधुनिक राष्ट्रवादाचा भारताला परिचय झाला. मुस्लीम समाज जसा धर्मभावनेने एकत्र बांधला गेला होता, तसेच ब्रिटिश राष्ट्रभावनेने एकमेकाशी बांधले गेले होते. इंग्लंडसारख्या छोटया देशात आधुनिक राष्ट्रवादाच्या तत्त्वज्ञानाने जग जिंकण्याचे सामर्थ्य निर्माण केले होते.

धर्मभावनेने संघटित झालेला आक्रमक समाज व आधुनिक राष्ट्रवादाच्या भावनेतून सामर्थ्यवान झालेले इंग्लंड ही दोन वेगळया स्वरूपातील आव्हाने हिंदू समाजासमोर उभी होती. ब्रिटिशांची सत्ता घालवून देण्यासाठी हिंदू आणि मुस्लीम समाजाने एकत्र आले पाहिजे, या भूमिकेतून लखनौ करारापासूनचे प्रयत्न डॉक्टरांनी पाहिले होते व त्यातील व्यर्थताही त्यांना जाणवली होती. हिंदू समाजाच्या आजवरच्या परंपरेत असे आव्हान उभे राहिले नव्हते. त्यामुळे केवळ इतिहासाकडे पाहून त्यात या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासारखी नव्हती. म्हणून संघस्थापनेचे महत्त्व सांगताना ते म्हणतात,

'कल्पना हीच की ऐतिहासिक काळातसुध्दा अखिल भारतीय स्वरूपाचे संघटनेचे प्रयत्न झाले नाहीत, ते आता व्हावेत. त्याचप्रमाणे आपल्या हातून इतिहासकाली व वर्तमानकाली घडलेल्या चुका पुन्हा होऊ न देण्याचा मनाशी विचार करून व शत्रूमध्ये वसत असलेल्या गुणांचेही अनुसरण करून, अखिल भारतीय संघटनेचा प्रयत्न करावा या दृष्टीने स्वयंसेवक संघ काढला. शत्रूमध्ये वसत असलेल्या गुणांचे अनुकरण करण्यात मला बिलकुल कमीपणा वाटत नाही.' त्यामुळे या नवीन संकटपर्वातून मार्ग काढण्यासाठी नवीन 'प्राण' हवे होते व ते शत्रूंमधील सामर्थ्यकेंद्रांना आत्मसात करून होणार होते.

kdilip54@gmail.com