मधुमेहावरचे उपचार सुरू करण्यापूर्वी...

विवेक मराठी    04-Apr-2017
Total Views |

मधुमेहाचे उपचार सुरू करण्याआधी वेगवेगळया बाबतीत नियमितपणा आणणं अत्यंत आवश्यक आहे. लांब पल्ल्याच्या कुठल्याही आजारात अशी शिस्त बाळगली नाही, तर उपचारांचा योग्य तेवढा फायदा पदरात पडत नाही. झोप, खाण्याच्या वेळा, पथ्य आणि औषधं सगळयाच विभागात वेळापत्रक बनवून त्याला चिकटून राहणं महत्त्वाचं आहे. मधुमेहावरचा इलाज तुमच्या मनाच्या निग्रहावर अधिक अवलंबून आहे.


धुमेहाने शरीरावर काय परिणाम होतो, अगदी एकांडया पेशींपासून ते मोठया इंद्रियांपर्यंत त्यातून कोणीही सुटत नाही, याची आता आपल्याला चांगलीच कल्पना आली. पण मधुमेह सुरुवातीपासूनच गंभीरपणे घेऊन त्यावर त्वरित उपाय करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण याहून वेगळं आहे. 'ग्ल्यायसेमिक मेमरी' हा प्रकार काय ते समजून घेतलं पाहिजे, मग आपण मधुमेहाच्या उपचारात निष्कारण चालढकल करणार नाही.

रक्तातलं ग्लुकोज वाढलं की हे जादा ग्लुकोज प्रोटीन्सना चिकटतं आणि ते प्रोटीन्स आपल्यासाठी निरुपयोगी होतात, हे आपल्याला कळलं आहे. पण जेव्हा मधुमेह झाल्या झाल्या व्यवस्थित उपचार सुरू करून ग्लुकोज पूर्णत: काबूत ठेवतात, तेव्हा प्रोटीन्स नॉर्मल राहणं साहजिक असतं. शरीर ही गोष्ट लक्षात ठेवत असलं पाहिजे. कारण एका खास पाहणीत असं दिसून आलं की अगदी सुरुवातीच्या काळात कडक पथ्यपाणी आणि औषधोपचार केल्याने फायदा होतो. त्या पाहणीतल्या दोन गटांपैकी एक आपलं ग्लुकोज सांभाळण्यामध्ये ढिलाधला राहिला व दुसऱ्याने आपलं ग्लुकोज काटेकोरपणे नॉर्मल राखलं. काही काळानंतर दोन्ही गट समान झाले. दोन्ही गटांच्या ग्लुकोज नियंत्रणात ढिल्या झाल्या. तरीही ज्यांचं ग्लुकोज सुरुवातीला नीट होतं, त्यांना मधुमेहाचे दुष्परिणाम नंतर बराच काळ झालेच नाहीत. याउलट सुरुवातीपासूनच जे ढिले होते, ज्यांचं ग्लुकोज वर-खाली होत होतं, त्यांना मात्र मधुमेहाचे दुष्परिणाम दिसू लागले. म्हणजे कुठेतरी शरीराने ग्लुकोज नॉर्मल असल्याचं लक्षात ठेवलं. यालाच आपण 'ग्ल्यायसेमिक मेमरी' म्हणतो.

असाच आणखी एक अभ्यास. अगदी आपल्या भारतातला. चेन्नई शहरात झालेला. यात निदान झाल्या झाल्या रुग्णांना इन्श्युलीनवर ठेवलं गेलं. नंतर लक्षात आलं की या मंडळींची सगळी औषधं बंद केली, मधुमेहावरचं कुठलंच औषध घेतलं नाही, तरी त्यांचं ग्लुकोज अगदी नॉर्मल आहे. 

या दोन्ही अभ्यासांनी एक गोष्ट स्पष्ट केली, ती ही की लवकर आणि व्यवस्थित उपचारांचा नक्कीच फायदा आहे. आता प्रश्न फक्त इतकाच की उपचार कशा प्रकारे करायचे?

पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ती ही की उपचार करण्यामागे आपला उद्देश काय आहे? केवळ ग्लुकोज नॉर्मल राखून सगळं काही आलबेल होईल ही खुळी कल्पना आहे. मधुमेह आणि हृदयरोग हातात हात धरून येतात. त्यामुळे ग्लुकोज नियंत्रणात राखण्याबरोबर हृदयाला इजा करू शकणाऱ्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यात प्रामुख्याने येतात ते रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल. तिन्हींवर सारखंच लक्ष ठेवलं पाहिजे. तिन्हींवर नियमित उपचार घेतले पाहिजेत. बऱ्याचदा कोलेस्टेरॉल किंवा रक्तदाब हव्या त्या पातळीवर आला, की त्यावरची औषधं बंद करण्याचा विचार केला जातो. हे चुकीचं आहे. ज्या क्षणी तुम्ही औषधं बंद करता, त्या क्षणापासून या दोन्ही गोष्टी पुन्हा पूर्वीच्या पातळीवर येतात, तुम्हाला झालेला फायदा केवळ तुमचं औषध सुरू असेपर्यंतच होतो, हे मनात ठसवलं गेलं पाहिजे.

सातत्य हा कुठल्याही दीर्घ पल्ल्याच्या आजाराचा परवलीचा शब्द आहे. मधुमेहदेखील त्याला अपवाद नाही. त्यामुळे मधुमेहाची तपासणी असो की त्यावरची औषधं घेणं असो, दोन्ही बाबतीत एक नियमितपणा, एक वेळ पाळण्याची वृत्ती अंगी बाळगली गेली पाहिजे, तरच उपचारांना योग्य ते यश मिळेल. अन्यथा फक्त पैशांची बरबादी होईल. कारण असे मधुमेहासारखे आजार बहुधा आयुष्यभराचे सोबती असतात. तापाप्रमाणे ते कायमचे निघून जात नाहीत. तापांचं बरं असतं. चार-पाच दिवस औषधं घेतली की त्यांचं मूळ कारण - म्हणजे रोगजंतू - यांचा नायनाट होतो. मग पुढे औषध घेण्याची गरज पडत नाही. मधुमेहावरची औषधं रक्तातलं ग्लुकोज नियंत्रणात ठेवण्याचं काम करतात, पण रक्तातलं ग्लुकोज ज्या कारणांमुळे वाढलं, त्यामागच्या कारणांचा बिमोड करत नाहीत. साहजिकच ती कायम घेणं अपेक्षित असतं. आज घेतलं, उद्या बंद केलं असं करून भागत नाही. औषध घेणं हा तुमच्या रोजच्या आयुष्याचा एक भाग बनवायला हवा.

रक्ताची तपासणीदेखील नियमित व्हायला हवी. बरेच जण एकदा डॉक्टरांनी लिहून दिलेलं औषध पुढचे कित्येक महिने घेत बसतात. मधुमेह हा सतत बदलणारा आजार आहे. आज जी ग्लुकोजची पातळी आहे, ती उद्या तशी असेलच याची खात्री देता येत नाही. आपल्या देशात केमिस्ट जुनी चिठ्ठी पाहून खुशाल औषध देतो. नव्या प्रिस्क्रिप्शनचा आग्रह धरत नाही. कदाचित त्यामुळेच आपल्याकडे मधुमेहात होणाऱ्या दुष्परिणामांचं प्रमाण लक्षणीय आहे. इतर देशांत असं चालत नाही. तिथं जितक्या दिवसांचं प्रिस्क्रिप्शन असेल, तितक्या दिवसांचंच औषध दिलं जातं. केमिस्ट सहज देतो म्हणून ते आपण घ्यायलाच हवं असं नाही. नियमित डॉक्टरी सल्ला आपल्या हिताचाच आहे. मग जाणूनबुजून आपल्याच पायावर दगड का मारून घ्या! केमिस्ट दुकान चालवतो. त्याला तुमचा आग्रह अव्हेरता येत नाही. पण आपलं हित आपणच जपायला हवं ना!

असा दंडक आहे की किमान तीन महिन्यांतून एकदा तरी डॉक्टरांना दाखवलं गेलं पाहिजे. तेही तुमचं ग्लुकोज नॉर्मल असेल तर. ग्लुकोज जादा असेल, तर यात बदल होऊ  शकतो. कधीकधी तर तीन-चार दिवसांनीसुध्दा रक्त तपासायला सांगितलं जाऊ  शकतं. रुग्णाला इन्श्युलीन चालू असेल, तर कित्येकदा दिवसातून सात वेळादेखील रक्त तपासण्याची पाळी येते. तुमच्या गरजेप्रमाणे कधी आणि किती वेळेला रक्त तपासायचं व उपचारात बदल करायचा, याचा निर्णय डॉक्टर घेतात. डॉक्टरी सल्ल्याला चिकटून राहणं हे आपलं प्रथम कर्तव्य मानायला हवं.

काही मंडळी उगीचच सारखं सारखं रक्त तपासून घेतात. स्वत:चं टेन्शन आणि खर्च वाढवतात. ज्या ज्या वेळी तुम्ही रक्तातलं ग्लुकोज तपासाल, त्या त्या वेळी आलेल्या रिझल्टवर काहीतरी कार्यवाही केली गेली, तरच तपासायला अर्थ उरतो. केली तपासणी, पाहिला आकडा आणि ठेवून दिला रिपोर्ट कपाटात... अशाने काहीच उपयोग नाही. फक्त कमीजास्त होणारे आकडे पाहून तणाव तितका वाढेल. थोडक्यात, रक्तातलं ग्लुकोज गरजेप्रमाणे तपासलं जायला हवं.

जेव्हा जेव्हा डॉक्टरांच्या दवाखान्यात जाल, तेव्हा तेव्हा कमीत कमी तुमचं वजन आणि तुमचा रक्तदाब पाहिला गेलाच पाहिजे. रक्तदाब झोपून न पाहता बसून पाहावा, असा जगन्मान्य प्रघात आहे. त्यामागे शास्त्रीय कारण आहे. जर तुमचा मधुमेह जुनापुराणा असेल, तर कित्येकदा झोपून, बसून आणि उभं राहून, तीन तीन प्रकारे रक्तदाब पाहणं आवश्यक ठरतं. पायमोजे काढून तुमचे तळपाय तपासले गेलेच पाहिजेत. पायांची जडणघडण बदलली आहे का, हे नीट समजावं म्हणून काही वेळा पायताणं निरखून पाहावी लागतात. पायताण कुठे कमी-जास्त झिजलंय किंवा कसं, याकडे लक्ष द्यावं लागतं. पायताणांची झीज पाहून डॉक्टरांना तुमच्या पायाच्या बदललेल्या प्रेशर पॉइंट्सची कल्पना येते. त्यावरून तुमच्या पायाला किती धोका आहे याचं त्रैराशिक मांडता येतं. मोठमोठया खर्चीक तपासांपेक्षा हा साधा मार्ग कितीतरी उत्तम माहिती देऊन जातो, म्हणून हे सांगणं.

तुम्हाला काही चिन्ह दिसत असतील, तर ती डॉक्टरांच्या नजरेला आणून दिली गेली पाहिजेत. काही लक्षणांना बरंच महत्त्व असतं. परंतु प्रत्येक वेळी त्यांच्याबद्दल डॉक्टरांशी चर्चा होतेच असं नाही. साधारण तुम्हाला चालताना दम लागत असल्यास त्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. त्यातही पूर्वीपेक्षा कमी अंतर चालून गेल्यावर अथवा थोडयाश्या पायऱ्या चढून गेल्यावर श्वास फुलायला लागला, म्हणजे नक्कीच ती बाब डॉक्टरांच्या नजरेला आणून द्यायला हवी. कारण अशा दम लागण्यामागे हृदयाचा प्रश्न असू शकतो. हृदयाचे जलद चालणारे ठोके दुर्लक्षून चालत नाहीत. हृदयाचे नियमित पडणारे ठोके आणि संयत हालचाल हृदयाचं आरोग्य उत्तम असल्याचं लक्षण आहे. परंतु त्यात अचानक झालेला बदल - विशेषत: तुम्ही आराम केल्यावरही जोशात चालणारी नाडी कुठेतरी काहीतरी बिघडलंय हे सांगते. घरी रक्तदाब तपासायची सोय असेल तर त्याचा जरूर उपयोग करावा, परंतु रक्तदाब हीदेखील सतत बदलणारी गोष्ट आहे हे लक्षात ठेवूनच. नाहीतर रक्तदाब जरा वर-खाली झाला की तुम्ही नको तितके अस्वस्थ व्हाल आणि त्यातून तुमचा रक्तदाब वाढवून घ्याल. 

असो. तर सांगायचं मुद्दा हा की प्रत्यक्ष मधुमेहाचे उपचार सुरू करण्याआधी वेगवेगळया बाबतीत नियमितपणा आणणं अत्यंत आवश्यक आहे. लांब पल्ल्याच्या कुठल्याही आजारात अशी शिस्त बाळगली नाही, तर उपचारांचा योग्य तेवढा फायदा पदरात पडत नाही. झोप, खाण्याच्या वेळा, पथ्य आणि औषधं सगळयाच विभागात वेळापत्रक बनवून त्याला चिकटून राहणं महत्त्वाचं आहे. मधुमेहावरचा इलाज तुमच्या मनाच्या निग्रहावर अधिक अवलंबून आहे, डॉक्टरी सल्ल्यावर कमी, हे मनावर ठसवलंत की तुमचं काम फत्ते झालंच म्हणून समजा.    

9892245272