दीप अंतरीचा...

विवेक मराठी    04-Apr-2017
Total Views |

सगळया अडथळयांना पार करून यशाच्या दारात घेऊन जातं. काय असतं बरं ते? ती असते अंत:प्रेरणा काहीतरी मिळवण्याची. काही ध्येय खडतर असली, तरी स्वयंप्रेरणेमुळे ती गाठणं अगदी सहज घडतं. अंत:प्रेरणेत आपला आतला आवाज सतत घुमत राहतो अन् तसं काम आपल्याकडून आपणच करून घेतो. माणसाच्या मनाची तात्पुरती मागणी म्हणजे इच्छा, पण प्रेरणा येते ती निग्रह आणि पराकाष्ठा यांचे पंख घेऊन... रोजचा दिवस नवा आहे. कालच्यापेक्षा 'आज' अधिक सुंदर आहे आणि आज नंतर येणारा 'उद्या' अधिक देखणा असेल.

व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे भानात राहो।

मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची।

तरुणाईचा लाडका कवी संदीप खरे याच्या लेखणीतून उतरलेली खणखणीत कविता. वीररसाने आणि तितकीच जगण्याच्या तत्त्वज्ञानाने भारावून टाकणारी.

जशी आपण ती कविता ऐकत जातो, तशी मनात असलेली इवलीशी ठिणगी तेज:पुंज सूर्यासारखी विशाल होत जाते. बाहूंत बळ संचारतं. बाहुबळासोबत ज्यांच्यात दुर्दम्य इच्छाशक्ती वास करते, तेच जगाच्या इतिहासाला आकार देत आलेत. मग भले त्यांच्या पाठीशी कुणी उभं राहो अथवा नाही!

जेव्हा सगळं संपलंय असं जगाला वाटू लागतं, तेव्हाच तनामनात असं काहीतरी संचारतं आणि ते सगळया अडथळयांना पार करून यशाच्या दारात घेऊन जातं. काय असतं बरं ते? ती असते अंत:प्रेरणा काहीतरी मिळवण्याची, त्यासाठी कष्टांचे डोंगर उपसण्याची ऊर्मी.

व्यक्तिमत्त्वाच्या विकासपथावर आज आपण या प्रेरणेबाबत बोलणार आहोत.

लहान मूल रडू लागतं. त्याला शब्दांची भाषा अवगत नसली, तरी आपल्याला विशिष्ट गोष्ट हवी आहे हे त्याला समजत असतं. ती वस्तू मिळवण्यासाठी ते रडण्याचा आधार घेतं आणि जोपर्यंत वस्तू मिळत नाही, तोपर्यंत ते रडतच राहतं. कारण त्याची 'प्रेरणाच' त्याला तसं वागायला भाग पाडते.

थोडक्यात सांगायचं, तर वर्तनामागची कार्यशक्ती म्हणजे प्रेरणा. काहीतरी मिळवायचं आहे, गाठायचं आहे असा आवाज अंतर्मनात घुमत राहतो अन् त्या आवाजाने एक अद्भुत शक्ती शरीर-मनात निर्माण होते. ती व्यक्तीकडून अपेक्षित दिशेने प्रयत्न करून घेते आणि जोपर्यंत ते लक्ष्य गाठलं जात नाही, तोपर्यंत आपल्या अस्तित्वाला व्यापून राहते.

काही व्यक्तींमध्ये ही प्रेरणा आश्चर्यकारक रितीने काम करत असते. सावरकरांनी मार्सेलिसच्या समुद्रात घेतलेली उडी किंवा एक भगवी कफनी ओढून शिकागोच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत स्वामी विवेकानंदांचं टिकून राहून हिंदू भूमीला सन्मान मिळवून देणं हे या अद्भुत शक्तीनेच घडवलं.

मुघलांच्या राज्याला उलथवून लावावं असं अनेकांना वाटायचं. ती इच्छा झाली. पण या इच्छेचं प्रेरणेत रूपांतर झालं ते जिजाऊंच्या मनात. इच्छा अन् प्रेरणा यात अंतर आहे.

माणसाच्या मनाची तात्पुरती मागणी म्हणजे इच्छा. पण प्रेरणा येते ती निग्रह आणि पराकाष्ठा यांचे पंख घेऊन... व्यवहारातलं एक उदाहरण म्हणजे भारत भ्रष्टाचारमुक्त झाला पाहिजे ही इच्छा झाली, पण यासोबत जर माझं काम लवकर व्हावं म्हणून मी कुठेही वस्तुरूप, पैसे वा अधिकार यांचा वापर करून भ्रष्टाचाराला साथ देत नसेन, तरच ती प्रेरणा होईल.

माणसाच्या मनात ध्येयपूर्तीचा संकल्प जागवण्याची आणि तो सत्यात उतरवण्याची शक्ती प्रेरणेत आहे. प्रेरणा आपल्याला उत्साह देते. अडचणींचा सामना करायला शिकवते. परिस्थितीतून मार्ग काढायला शिकवते.

अशाच काही प्रेरणा सर्वच प्राणिमात्रांत दिसतात. उदा., 'जगण्याची प्रेरणा'.

प्रत्येकाला जगायचं असतं. त्यामुळेच भयंकर ताप सहन करत प्रत्येक प्राणी पुढे सरकत असतो. एखादा विद्यार्थी कॉलेज, क्लास, आर्थिक संकट यांच्या विळख्यात अडकला, एखाद्या व्यक्तीचा बॉस ऑफिसमध्ये त्रास देत असला, कामाचा फार ताण असला किंवा कुणाला 8 तासांच्या नोकरीसाठी रोज 4 तास रेल्वेने प्रवास करावा लागत असला, तरी माणूस ते सहन करतो. आयुष्यातले अनेक त्रास माणसं झेलतात, अगदी आश्चर्यकारकपणे, ती या जगण्याच्या प्रेरणेतून.

प्रेरणेतून कृती जन्म घेते. एकदा एक उच्च मध्यमवर्गीय माणूस काही कामानिमित्त एका गावात गेला. जाताना त्याने बिसलरीच्या दोन बाटल्या सोबत घेतल्या. उन्हाच्या कडाक्याने दोन्ही बाटल्या दुपार होतानाच संपून गेल्या, पण तहान तर शांत बसेना. मग त्याने इतका वेळ टाळलेलं गावकडचं 'नॉनफिल्टर्ड' मडक्यातलं पाणी पिण्याचं ठरवलं. तो प्यालाही... आणखी पुढे गेल्यावर वस्ती विरळ होत गेली. जवळचं पाणी संपलेलं, तहान मी म्हणत होती. त्या ठिकाणचं पाण्याचं दुर्भिक्ष पाहून तर त्याला ग्रामपंचायतीच्या प्लास्टिकच्या टाकीतलं पाणीसुध्दा सुखद वाटलं. कारण काय? तर परिस्थिती जशी बदलत गेली, तशी प्रेरणा अधिक जोमाने काम करू लागली. अशा वेळी माणूस कितीही जुळवाजुळव करायला तयार होतो, कारण त्याच्यापुढे एकच ध्येय असतं - त्या विशिष्ट प्रेरणेची मागणी पूर्ण करणं.

प्रेरणा हा एक Activating Force आहे. ती हुशार कावळयाची गोष्ट आठवते ना तुम्हाला? मडक्यात पाणी आहे अन् कावळयाला तहान! अशा वेळी कावळयाचं तर्कशास्त्र जोमाने काम करू लागलं. त्याने परिस्थितीचं निरीक्षण केलं अन् त्यातूनच दगड मडक्यात टाकण्याचा प्रयोग सुरू केला. यश की अपयश हे त्याला निश्चित माहीत नव्हतं. पण तर्काच्या आधारे प्रयत्न मात्र अथक केले आणि खरंच पाणी वर आलं. तहान भागली. ही तहान होती म्हणूनच मडकं, दगड, पाण्याला एका यशस्वी प्रयोगात बांधण्याची मर्मदृष्टी त्या कावळयाला मिळाली.

कदाचित तो अपयशी झाला असता, तर त्याने वेगळया पध्दतीने प्रयत्न केले असते.

अर्थात, प्रत्येकाच्या यशामागे ही प्रेरणाच असते. वास्तविक प्रेरणा ही सकारात्मकच असते. प्रेरणा माणसाच्या प्रयत्नांना योग्य दिशा देत त्या व्यक्तन्नीचं ध्येय पूर्ण करून घेते आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा आणि ती व्यक्ती ज्या समाजाचा घटक आहे, त्याचाही लाभ घडवून आणते.

पण काही वेळा एखाद्या व्यक्तीचं, व्यवस्थेचं, समाजाचं नुकसान करण्यासाठी कसून प्रयत्न चालतात. या गोष्टींना नैतिक आधार नसतात, पण तरीही त्यामागे ही ऊर्जा मात्र असते, तेव्हा अशा प्रेरणा नकारात्मक किंवा Distructive असतात.

आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ. भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रजी राजवटीत तत्कालीन संसदेवर हल्ला केला, तसाच अफजल गुरूनेही भारताच्या संसदेवर हल्ला केला. घटनेत साम्य तर आहे, पण वेगळी आहे ती कृतीमागची प्रेरणा.

भगतसिंग आदींना इंग्रजांच्या डोळयात अंजन घालायचं होतं की, आमच्यावर राज्य करणाऱ्या सिंहासनाला हलवून सोडण्याची क्षमता आमच्या तरुण मनगटात आहे. योग्य वेळी सशस्त्र क्रांती तिच्या लाल रंगाने ही जुलमी राजवट उधळून देईल.

आईच्या हातापायात पडलेल्या मणामणांच्या बेडयातून तिची मुक्तता करण्याची दुर्दम्य ऊर्मी क्रांतिकारकांच्या, देशभक्तांच्या हृदयात उठत होती. जीवनाच्या आहुती स्वातंत्र्याच्या होमकुंडात अर्पण करताना सुखावत होती, ती होती सकारात्मक प्रेरणा.

तर आपला मानबिंदू असलेल्या संसदेवर हल्ला चढवणारी ती प्रेरणा होती नकारात्मक प्रेरणा. शक्तिशाली असूनही सोज्ज्वळ, सामोपचारी भूमिका घेणाऱ्या सिंहाच्या आयाळीला हात घालणारी...

आपल्या आयुष्यात असणाऱ्या असंख्य प्रेरणा या सकारात्मक आहेत ना? त्यांच्यातून आपला आणि आवतीभोवतीच्या जगाचा, समाजाचा लाभच होतो ना? याचा साकल्याने विचार केला पाहिजे.

काही ध्येय खडतर असली, तरी स्वयंप्रेरणेमुळे ती गाठणं अगदी सहज घडतं. पण काही ध्येयांबाबत व्यक्तीमध्ये स्वयंप्रेरणा फारशी नसते. अशा वेळी काही घटक - उदा., बक्षीस, भेट (Reward, incentive) यांचा वापर करून त्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रेरणा बाहेर असतात, वातावरणात असतात. याकरिता त्यांना बाह्यप्रेरणा म्हणतात.

अंत:प्रेरणेत आपला आतला आवाज सतत घुमत राहतो अन् तसं काम आपल्याकडून आपणच करून घेतो. तर बाह्यप्रेरणेबाबत असं घडतं की, आपण शांत असतो. आतला आवाजही शांत असतो. उदा., आपल्याला एखाद्या दिवशी जेवणाची इच्छा नसते. आपण जेवण्याचा विचारही करत नसतो. अशात आपल्या जिवलग मित्राचा वा मैत्रिणीचा फोन येतो, ''आपण तुझं जेवण झालं की मग भेटू'' की, तुम्हाला आश्चर्यकारकपणे नको असलेलं अन्न गोड लागतं. आपण का जेवलो? तर जेवण ही गोष्ट मित्राची भेट या गोष्टीशी जोडली गेली. थोडक्यात, आपल्यामध्ये बाहेरून आत अशी एखादी लहर दौडत येते की माणूस खडबडून जागा होतो. कारण ही लहर येताना माणसाला सुखावणारं, त्याला हवंहवंसं वाटणारं काहीतरी शब्दरूप, वस्तुरूप, परिणामस्वरूप मिळण्याचं दार उघडून देते.

एखादा विद्यार्थी खूप कष्ट करत शिकतो आहे. सखोलपणे प्रत्येक विषयाचा अभ्यास करतो. कारण त्याला शिकायचं असतं. स्वत:ला सिध्द करायचं असतं. ते बळ त्याला आतून सहज मिळत राहतं. ही अंतःप्रेरणा माणसाला भारून टाकते. ध्येय मिळवण्याच्या प्रवासात अखेरपर्यंत साथ देते. कारण तो त्या व्यक्तीच्या स्वत्वाचाच भाग असतो. त्याबद्दल माणसाला आत्मीयता असते. त्यामुळे कठीण परिस्थितीतसुध्दा माणूस पाय रोवून उभा राहू शकतो.

सातवीमध्ये शिकणारा एक मुलगा आहे. अभ्यासाचा त्याला फार आळस. वडिलांकडे सारखा गिअरच्या सायकलचा हट्ट धरत होता. वडील त्याला म्हणाले, ''हे बघ बाळा, जर तुला या परीक्षेत सगळया विषयात 'अ' श्रेणी मिळाली, तर नक्की गिअरची सायकल मिळेल.'' सायकलला अभ्यासाशी जोडण्याची वडिलांची युक्ती कामी आली. मुलाला अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले. खरं तर मुलाला अभ्यासात फारसा रस नसायचाच, पण त्याने अभ्यास थांबवला की डोळयासमोर 'गिअरची सायकल' दिसायची आणि तो चार्ज झालेल्या बॅटरीसारखा लगेच अभ्यासाला लागायचा.

वरील दोन्ही उदाहरणांत मुलाला चांगले गुण मिळतात, पण त्यानंतरच्या गोष्टीत नक्कीच वेगळेपणा जाणवेल.

पहिल्या मुलाला गुणांसाठी गुण मिळाले. त्याची प्रेरणा द्विगुणित होईल. तो पुढच्या परीक्षेत अधिक प्रयत्न करेल; पण दुसरा मुलगा - ज्याला सायकल हे बक्षीस दाखवून अभ्यास करण्याची प्रेरणा बाहेरून दिली, तो मात्र पुढील परीक्षेत अभ्यास करेल का? हे सांगता येत नाही. कारण ज्यासाठी (सायकलसाठी) त्याने अभ्यास केला, ते मिळालं आहे.

माणसाला दोन्ही प्रकारच्या प्रेरणा उपयुक्तच असतात. पण अंत:प्रेरणा अधिक असेल, तेवढं ते व्यक्तिमत्त्व ठामपणे उभं असतं. अंतःप्रेरणा ही ताऱ्यांसारखी स्वयंसिध्द असते, तर बाह्यप्रेरणांना बाह्य गोष्टींची Rewardsची आवश्यकता असते. मग या गोष्टी मिळाल्या की ती प्रेरणा संपते किंवा त्या गोष्टी मिळाल्या नाहीत, तर 'कोल्ह्याला द्राक्षं आंबट' न्यायाने ती प्रेरणा नाहीशी होते.

एखादा तरुण देशभक्तांचं चरित्र वाचतो. देशासाठी काम करणाऱ्या व्यक्तींकडे पाहून, एखाद्या विशिष्ट स्थळाला भेट देऊन त्याच्या मनाला स्वत:ला झोकून देऊन असंच काम करण्याची प्रेरणा मिळते. असे अनेक अनुभव आपल्यालाही येतात. पण ती बाह्यप्रेरणा हळूहळू अंत:प्रेरणेत रूपांतरित झाली पाहिजे. तसं झालं तरच ते ध्येय गाठण्याचा खडतर प्रवास करताना तो तरुण टिकून राहू शकतो. अशीच एक कथा. एक आध्यात्मिक गुरूने आपल्या विश्वासू शिष्याला आश्रमात उत्तराधिकारी नेमायचं ठरवलं आणि त्याला म्हणाले, ''आजूबाजूच्या गावात जाऊन 100 तरुण मिळवून आण तुझ्या सहकार्यासाठी.'' शिष्याला आश्चर्यच वाटलं. इतके तरुण कशाला? पण तो आज्ञेप्रमाणे गावागावात गेला. प्रेरक प्रवचनांतून शंभर तरुण भारावून गेले आणि घरदार सोडून त्याच्याबरोबर यायला निघाले. पहिल्या रात्री एका देवळाबाहेर मुक्काम पडला. सकाळी उठून पाहतो, तर त्यातले वीस जण आपल्या घरी निघून गेले होते. चार दिवसांच्या प्रवासात कारणाकारणांनी गळती सुरू राहिली आणि शेवटी केवळ एकच तरुण त्याच्यासह गुरूंकडे पोहोचला. म्हणजे बाह्यप्रेरणेला अंत:प्रेरणेत रूपांतरित करण्याची प्रक्रिया केवळ एकाच तरुणात झाली.

अर्थात एखादी गोष्ट करताना आपण हळूहळू त्या गोष्टीकडेच आपलं लक्ष केंद्रित केलं, तर अपयश, निराशा, कंटाळा टाळता येईल.

तर अशी ही प्रेरणेची दोन रूपं. ती कुणाला कशातून मिळेल हे मात्र व्यक्तिसापेक्ष आहे. बाह्यप्रेरणांकडून हळूहळू आपला प्रवास अंत:प्रेरणेकडे होतो आहे म्हणजे आपला विकास होतो आहे, असं समजावं.

आता आपल्या अशा साऱ्या प्रेरणा आपण लिहून काढू या. भौतिक गोष्टी, सुख, यश, संपत्ती, समाधान, नावलौकिक, प्रशंसा, नावीन्य, आदर, प्रेम अशा स्वरूपाच्या प्रेरणा असतात.

यातल्या किती प्रेरणा मनाच्या गाभाऱ्यातून आल्या आहेत, तर किती प्रेरणा बाहेरच्या चमचमणाऱ्या जगातून आल्या, हे समजून घेऊ या.

आपल्या प्रेरणांना असणारे अडथळे समजून घेऊ या. उदा., आरोग्याच्या तक्रारी, नियोजन नसणं, नकारात्मक भावना, परिस्थितीतून येणारे अडथळे आणि त्यावर काम करू या.

आपल्या व्यक्तिमत्त्वाला एका उंचीवर घेऊन जाणारी ही प्रेरणा आपल्याला काही सांगते आहे. ऐका बरं -

'मला तुमच्याशी बोलायचं आहे. काही माझ्याबद्दल, तर काही तुमच्याबद्दल. माझ्यातून लहान-मोठी ध्येय जन्म घेत असतात. मी तुमची ऊर्जा आहे. जिथे जिथे कर्तृत्वाच्या गाथा घडतात, तिथे मी सावलीप्रमाणे आहेच. मी सर्वत्र आहे. वनवासींच्या सेवेसाठी, लक्ष्मीचा वरदहस्त लाभावा अशी कौटुंबिक स्थिती (चार चार डॉक्टर्स एकाच कुटुंबात असणं) असतानाही गवताच्या झोपडीत राहणं पसंत करणाऱ्या डॉ. प्रकाश आमटेंच्या हृदयात मीच तर आहे.

मीच आहे माणसाची जिद्द, चैतन्य. तशीच मी वाहत आलेय नदीसारखी अव्याहत इतिहासाच्या पानापानांतू, संस्कृतीच्या अभिमानातून. मी आहे गाभा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा. म्हणूनच आज तुमच्याकडून काही मागणार आहे. तुम्हाला काही सांगणार आहे. पुन्हा एकदा नव्याने स्वत:कडे पाहा.

साऱ्या विश्वातली अद्भुत गोष्ट आहे तुमच्याकडे... अहो, तुमचं शरीर. यामुळेच तर तुम्ही सारे कर्तृत्वाकडे झेपावता. विधात्याची म्हणा वा निसर्गाची ही अमूल्य भेट आहे तुमच्याकडे. यासाठी अभिनंदन तुमचं. त्याची छान काळजी घ्या. त्याला सुदृढ, आरोग्यसंपन्न करा.

खरं सांगू, आयुष्य फार सुंदर आहे. किती ज्ञात-अज्ञात माणसं आपल्याला सुखी करण्यात गुंतलेत ना... तो ट्रेनचा मोटरमन, तो हॉटेलमधला स्वयंपाकी, कधी पाहतो का आपण... असे अनेक जण-जे अन्न खातो ते विकणारे शेतकरी, औषध बनवणारे, कपडे विणणारे सारे सारे तुम्हाला भरभरून देतात.

आनंद लपलाय छोटया छोटया गोष्टींत. तो शोधायचा आहे तुम्हाला. त्या आनंदाच्या लाटांवर स्वार होऊन पाहा तर खरं...

एकदा स्वत:ची ओळख झाली की मग परिस्थितीची मागणी हुशारीने पूर्ण करू शकाल.

माणूस त्याच्या चुकांमधूनच शिकत आला. प्रगती करत आला. त्यामुळे खुल्या मनाने चुका स्वीकारत जा. त्याचा अभ्यास करा आणि त्यातून नवं होत राहा.

कधी अपयश आलं, तर येऊ द्या. स्वीकारा त्याला. पुन्हा नव्याने सुरुवात करा. 'थकलात तर क्षणभर विसावा घ्या. पण पुन्हा पंख पसरून उडण्यासाठी...'

परिस्थिती बदलत नसेल, तर स्वत:मध्ये बदल करत यशापर्यंत नक्की पोहोचता येईल. बघा ना, तीन चेंडू अाहेत आपल्याकडे. लोखंडाचा - तो खाली पडला तर काय होईल? जमिनीला किंवा लादीला भेदण्याचाच स्वभाव त्याचा. मातीचा चेंडू खाली पडला तर स्वत: फुटेल. पण रबरी चेंडू जितक्या वेगाने खाली आपटेल, तितक्याच ताकदीने पुन्हा वर उसळेल. त्या रबरी चेंडूसारखं बनण्याचा प्रयत्न करत राहा.

आपल्या ध्येयांची, ती गाठण्यासाठी असलेल्या मार्गांची सतत उजळणी करत राहा.

आजूबाजूला असलेल्या प्रेरणादायी व्यक्ती, घटना यांच्याकडे डोळसपणे पाहिलं तर डोळयांवरच्या अनेक पट्टया गळून पडतील. वेगळा किंवा वेगळया पध्दतीने विचार करण्याची सवय विकसित करणं तुमच्यावरच आहे.

स्पर्धा तर अनिवार्य आहे. पण सकारात्मक स्पर्धेचा भाग बना. स्वत:च्या भावना समजून घ्या. त्यांना न्याय द्या, पण त्यांच्या आहारी जाऊ नका.

नेहमी सकारात्मक, काहीतरी घडवणारा विचार करण्याची सवय लावा. सकारात्मक वातावरणातच प्रेरणेचं बीज अंकुरतं.

आपल्या यशाचं स्वागत करा आणि इतरांच्या यशाचं कौतुक करा.

सुरुवात नेहमी सोप्या गोष्टींनी केली, तर हळूहळू आपला आत्मविश्वास, उत्साह वाढेल आणि अंत:प्रेरणा जागी होईल आणि मग अधिक कठीण गोष्टीदेखील सहज गाठता येतील.

आपल्या स्वप्नांना, ध्येयांना रोज पूर्ण होताना मनश्चक्षूंनी पाहा. त्यावर पूर्ण विश्वास ठेवा. आपल्या यशापयशाचं गमक आपल्या आतच आहे, याची अनुभूती घ्या.

जो विचार कराल, तेच तुम्हाला मिळेल.. म्हणून नेहमी चांगलाच विचार करा.

संकटांना न घाबरता तोंड द्या. एकदा आपण लढायचं ठरवलं तर रणनीती अंत:स्फूर्तीने मिळत जाईल.

एखाद्या विद्यार्थ्याला 'सायंटिस्ट' बनायचं आहे, तर तो काय करू शकतो? तर त्याच्या खोलीत त्याने शास्त्रज्ञांचे फोटो लावावेत.  'मी सायंटिस्ट बनलो आहे' हे वाक्य लिहून सहज दिसेल अशा ठिकाणी लावावं, त्याची उजळणी करावी. यामुळे तो कधी थकला, निराश झाला, तर या गोष्टी त्याला प्रेरणा देतील.

तुम्ही रायगड चढण्यास सुरुवात करता. वर मान करून पाहता तर आकाशाला भिडलेली कमान दिसते आणि वाटतं - 'बापरे, अजून एवढं चढायचं आहे?' अशा वेळी थोडं थांबा अन् मागे वळून पाहा. बरं एवढं चढून आलो ही गोष्ट तुम्हाला उत्साह देईल.

नियोजनाने प्रयत्न करत राहा. कुणी आपल्याबद्दल वाईट बोलतील, दोष देतील तरी जोपर्यंत तुम्ही स्वत:बद्दल नि:शंक आहात तोपर्यंत त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका.

रोजचा दिवस नवा आहे. कालच्यापेक्षा 'आज' अधिक सुंदर आहे आणि आज नंतर येणारा 'उद्या' अधिक देखणा असेल.

मशालीकडे पाहून तो अनाम कवी तुम्हाला काय सांगतोय बरं!

आल्या जरी कष्टदशा अपार

न टाकिती धैर्य तथापि थोर ।

केला जरी पोत बळेची खाले

ज्वाळा तरी ते वरती उफाळे ।

मी आहे क्षणोक्षणी तुम्हाला यशाशी जोडायला. तुमची अंत:प्रेरणाचा फक्त तुम्हाला सांभाळून न्यायचा आहे हा मनाच्या गाभाऱ्यात लावलेला दिवा... तुमच्या व्यक्तिमत्त्वाला प्रकाशमान करण्यासाठी...

लेखिका समुपदेशक आहेत.

982387971

suchitarb82@gmail.com