न्यूनगंड नको, गरज सजग मार्गक्रमणाची

विवेक मराठी    08-Apr-2017
Total Views |

 

RSSजे शास्त्रशुध्द असते तेच टिकते. गॅलेलिओचे सिध्दान्त शास्त्रशुध्द होते, म्हणून टिकले. त्याचे विरोधक टिकले नाहीत. त्यामुळे संघ विरोधकांना कळला नाही म्हणून न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही. प्रकाश आंधळयांना दिसू शकत नाही, हा डोळसांचा दोष नसतो. ती आंधळयांची शारीरिक अक्षमता असते. परंतु ज्या सिध्दान्तावर संघ आजवर चालला, वाढला, ते शास्त्रीय स्वरूपात कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना कळले, तर त्यांचा अधिक परिणामकारक उपयोग होऊ शकतो. म्हणून ते कळणे महत्त्वाचे. सूर्यप्रकाश हा पडतच असतो, त्याचा नैसर्गिक उपयोग होतच असतो. पण शास्त्रीय माहितीतून त्या ऊर्जेचा अधिक चांगला उपयोग करता येऊ शकतो.

दिल्ली येथे प्रज्ञा प्रवाहाच्या बैठकीचा वृत्तपत्रात प्रकाशित झालेला आणि त्यावर झालेल्या वृत्तपत्रीय प्रतिक्रिया यावर वस्तुस्थिती स्पष्ट करणारा स्वतंत्र लेख या अंकात असल्याने त्याच्या अधिक तपशिलात जाण्याची गरज नाही. परंतु, गेली नव्वद वर्षे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या व केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे, तर जीवनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या संघासारख्या संघटनेचा भारतात वैचारिक क्षेत्रात तटस्थपणे अभ्यास झालेला नाही. जो झाला आहे, तो पूर्वग्रहदूषित आहे. स्वातंत्र्योत्तर काळात केवळ संघ हीच अशी संघटना आहे की राजकीय, वैचारिक विरोध असूनही सातत्याने तिचे काम वाढत गेले आहे. स्वातंत्र्याच्या वेळी काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी अशा पुरोगामी समजल्या जाणाऱ्या संघटना होत्या. आज त्यांचा प्रभाव ओसरलेला आहे. डार्विनच्या सिध्दान्ताप्रमाणे ज्या गोष्टी कालविसंगत असतात, त्या काळाच्या ओघात नष्ट होतात व ज्या कालसुसंगत असतात, त्याच टिकतात व वाढतात. वास्तविक पाहता या सिध्दान्तानुसार, 'पुरोगामी' समजल्या जाणाऱ्या चळवळींचा प्रभाव का ओसरत गेला व 'प्रतिगामी' संघाचा प्रभाव का वाढत गेला, हा प्रश्न देशातील विचारवंतांना व बुध्दिमंतांना पडायला हवा होता. पण आपली वैचारिक दिवाळखोरी लपविण्याकरिता, तेच निर्लज्जपणे ''संघाचा बौध्दिक विकास झाला आहे का?'' असा प्रश्न विचारू लागले आहेत. अशा प्रश्नाबद्दल न्यूनगंड निर्माण होण्याचे कारण नाही. परंतु यापुढे भारताचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, तर त्यासाठी ज्या नव्या बौध्दिक चिकित्सेच्या आराखडयाची गरज आहे, ते काम प्रसारमाध्यमांतून प्रकाशमान असलेल्या विद्यमान 'विचारवंत' व 'बुध्दिमंत' यांना करता येणे शक्य नाही, हे लक्षात घेऊन नवी वाट निर्माण करण्याची गरज मात्र नक्कीच आहे.

आधुनिक वैचारिक जग

आजच्या वैचारिक क्षेत्रात तीन प्रमुख प्रवाहांवर चर्चा सुरू असते. युरोपीय प्रबोधन काळात जी इहवादाधिष्ठित वैचारिक चर्चा सुरू झाली, त्यातून आजच्या विविध वैचारिक शाखांची निर्मिती सुरू झाली. त्यातूनच आधुनिक संस्थाजीवन तयार झाले. यातून वैचारिक चिकित्सेची परंपरा निर्माण झाली. या चिकित्सेतूनच युरोपीय प्रबोधन काळाच्या पूर्वीच्या इतिहासाकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन तयार झाले. त्यांना उजवे, डावे व सनातनी अशी नावे दिली गेली. ज्यांना युरोपीय प्रबोधन काळापूर्वीची सर्व धर्माधारित जीवनमूल्ये भाबडी, आधुनिकतेशी विसंगत, मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारी वाटत होती आणि त्याचबरोबर जे संपत्तिनिर्माणापेक्षा आर्थिक व सामाजिक समतेला अधिक महत्त्व देत, ते डावे विचारवंत समजले जातात. जे विचारवंत विषमतेला अपरिहार्य मानून अधिक संपत्ती निर्माण करण्याला अधिक महत्त्व देतात, त्यांना उजवे मानले जाते व जे पारंपरिक जीवनमूल्ये सांभाळण्यावर अधिक भर देतात, ते सनातनी मानले जातात. आज या सर्व वैचारिक रणांगणात पर्यावरणवादी, जागतिकीकरणवादी व त्यांचे विरोधक, नास्तिकवादी, अस्तित्ववादी असे अनेक जण शिरले आहेत. शत्रू कोण व मित्र कोण हे कळू नये अशी या क्षेत्रात वैचारिक रणधुमाळी माजली आहे. मुस्लीम समाजात जसे अनेक पंथ, उपपंथ आहेत व त्यांच्यात खरे मुस्लीम कोण याबद्दल सदैव हिंसक लढाया सुरू असतात; पण जेव्हा गैरमुस्लिमांशी लढण्याचा प्रश्न येतो, तेव्हा ते सर्व गट एकत्र येतात, तसे या सर्व गटांचे आपापसात प्रचंड वैचारिक संघर्ष सुरू असले, तरी ते 'सनातनी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संघाविरुध्द लढण्यास एकत्र येतात. कारण त्यांना संघ हे आधुनिक जगावरचे संकट वाटते.

इसवी सनाच्या सतराव्या शतकातील रेने देकार्त याने आधुनिक वैचारिक विश्वाला दिशा देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले असे मानले जाते. 'माझी विचारशक्ती हे माझ्या अस्तित्वाचे कारण आहे' व 'सर्व संशयातून मुक्त झाल्याशिवाय सत्याचे अस्तित्व सिध्द होत नाही' या त्याच्या दोन गृहीतकांनी विचारांची पूर्ण दिशा बदलली. आत्म्याच्या अस्तित्वापेक्षा बौध्दिक विचारांना व श्रध्देपेक्षा चिकित्सेला अधिक महत्त्व आले. अनुभूतिजन्य ज्ञान हे खरे ज्ञान नसून प्रयोगसिध्द, प्रत्यक्ष प्रमाणावर आधारित तर्कशुध्द ज्ञान हेच खरे, हा आधुनिक वैचारिक जगाचा पाया त्यातून निर्माण झाला. भावनिकतेतून, संवेदनशीलतेतून झालेले आकलन हे भाबडे व काल्पनिक मानले जाऊ लागले. याचा प्रभाव केवळ वैज्ञानिक क्षेत्रावरच नव्हे, तर कला, साहित्य यापासून राजकारण, समाजकारण अशा सर्व मानव्य शाखांवर पडला. त्यातून एक नवी जीवनदृष्टी तयार झाली. त्यालाच 'इहवाद' म्हटले जाऊ लागले. याचा अर्थ व्यक्त जगाला केंद्रित धरून केलेला विचार. यात पाप-पुण्य, स्वर्ग-नरक यासारख्या पारलौकिक श्रध्दांना स्थान नाही. या वैचारिक दृष्टीकोनातून आधुनिक संस्थाजीवन तयार झाले. यातूनच विविध राजकीय विचारसरण्या निर्माण झाल्या. त्यांनी पारंपरिक धर्माधारित संस्थाजीवनाला व सरंजामशाही राजनिष्ठेला कालबाह्य केले. राजनिष्ठेऐवजी आधुनिक राष्ट्रनिष्ठेला महत्त्व आले. आता जागतिकीकरणानंतर राष्ट्रनिष्ठेच्या पलीकडे जाणाऱ्या नव्या जागतिक मूल्यांचा शोध घेतला जात आहे. या उलगडत जाणाऱ्या वैचारिक नकाशावर संघाला नेमके कुठे बसवावे, याचे आकलन न झाल्याने संघासंबंधी वैचारिक तुच्छतागंड तयार झाला आहे. टाळताही येत नाही, समजतही नाही व त्यामुळे चिकित्सा करताही येत नाही, ही प्रसारमाध्यमांतील विचारवंत समजणाऱ्यांची अडचण समजून घेतली पाहिजे.

संघाची निर्मिती

संघाच्या जीवनदृष्टीची खोली आणि व्याप्ती समजून घेण्यासाठी संघाच्या स्थापनेच्या वेळची पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. इंग्रजांची राजवट स्थिर झाल्यानंतर इंग्रजी राजवटीच्या मागे असलेल्या आधुनिक संस्कृतीची, त्यामागच्या विचारांची, त्यातून उभ्या राहिलेल्या नव्या संस्थाजीवनाची जाणीव होऊ लागली. 1857सारखे एखादे स्वातंत्र्ययुध्द खेळून आपणाला स्वातंत्र्य मिळेल या भाबडेपणातून बाहेर येऊन, या नव्या संस्कृतीचा, त्यातील मूल्यांचा, नव्या संस्थाजीवनाचा स्वीकार केल्याशिवाय गत्यंतर नाही, याची समाजधुरीणांना जाणीव होऊ लागली. धार्मिक, आध्यात्मिक स्तरावर दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, वैचारिक स्तरावर न्या. रानडे, राजकीय स्तरावर लो. टिळक, गोखले, सामाजिक स्तरावर म. फुले, शाहू छत्रपती अशा अनेक बाजूंनी विचारमंथन होत होते. या परिवर्तनाच्या आवश्यकतेबरोबरच हजारो वर्षे ज्या सांस्कृतिक आधारावर इथला समाज टिकला, त्या संस्कृतीतील सामर्थ्याची व त्यातील दोषांची चर्चाही होत होती. जुन्यातील काय ठेवायचे, काय टाकायचे, नव्यातील काय घ्यायचे, काय टाळायचे, जे जुने टाकायचे आहे ते कसे टाकायचे व नवे घ्यायचे आहे ते कसे घ्यायचे, यावर विचारमंथन घडत होते. युरोपीय प्रबोधन काळात तिथे जे विचारमंथन झाले, त्याची छाया या विचारमंथनावर होती. त्याचबरोबर या राष्ट्रीय चळवळीचा, विचारप्रवाहाचा मुस्लीम चळवळीशी कसा मेळ घालायचा, हाही प्रश्न गंभीर होता. इंग्रजांनी देश आपल्याकडून घेतला अशी मुस्लीम समाजाची भावना होती. मुस्लीम बादशहांनी देशावर राज्य केलेले होते, त्याच्या आठवणी त्या समाजाच्या नेत्यांच्या मनात जाग्या होत्या. लोकशाही मूल्ये स्वीकारली की त्यातून मुस्लिमांची संख्या हिंदूंपेक्षा कमी असल्याने हिंदूंचे राजकीय महत्त्व वाढणार होते. नव्या भारताचे ते राज्यकर्ते बनणार होते. त्यामुळे मुस्लीम समाजात मोठी अस्वस्थता होती. हिंदू समाजाच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया व मुस्लीम समाजातील अस्वस्थता व त्यातून निर्माण होणारी हिंसक, धार्मिक प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवर संघाची स्थापना झाली.

रेने देकार्त याने ज्या तत्त्वांच्या आधारे आधुनिक विचारविश्वाचा पाया घातला, त्या सूत्रांचा त्याला साक्षात्कार झाला असे त्याने नमूद केले आहे. विज्ञान साक्षात्कारातून प्रकट होणाऱ्या सिध्दान्तांना मान्यता देत नसले, तरी अनेक वैज्ञानिक सूत्रे वैज्ञानिकांना साक्षात्काराद्वारेच अवगत झाली आहेत व नंतर ती प्रयोगाद्वारे सिध्द करण्यात आली आहेत. संघाची निर्मिती हा डॉ. हेडगेवारांना आधुनिक राष्ट्रनिर्मितीचा असाच झालेला साक्षात्कार होता, ज्याची तत्त्वे अनुभवांती हळूहळू समजण्याची प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक राष्ट्रातील चैतन्यतत्त्व समजून घेण्यासाठी जर्मन तत्त्वज्ञ हेगेलचे तत्त्वज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये जगाशी बांधून ठेवणारे जड तत्त्व असते व स्वातंत्र्याची आकांक्षा असणारे चैतन्यतत्त्व असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये हा संघर्ष सुरू असतो. पण ज्या व्यक्तींमध्ये हा संघर्ष त्याच्यापुरता मर्यादित न राहता समाजव्यापी करण्याची क्षमता असते, ते राष्ट्रपुरुष बनतात. प्रत्येक राष्ट्रामध्ये समाजाची स्वातंत्र्याकांक्षा जागृत करणाऱ्या राष्ट्रपुरुषांची जी परंपरा निर्माण होते, त्यातूनच त्या राष्ट्राचे चैतन्यतत्त्व तयार होते व त्यातून समाजाची समूहशक्ती जागृत होते. (हिंदूंमधील ब्रह्मकल्पनेतील चैतन्यतत्त्व हे कल्पनानिष्ठ, संदिग्ध, व्यक्तिनिष्ठ असल्याने व त्यामुळे निर्माण झालेल्या व्यक्तिनिष्ठ मोक्षभावनेमुळे तिथे आधुनिक इहवादी राष्ट्रजीवन तयार झाले नाही, असे हेगेलचे विवेचन आहे.) डॉ. हेडगेवारांनी संघाच्या कार्यपध्दतीतून राष्ट्रीय सामूहिक चैतन्यतत्त्व जागृत करून त्याआधारे परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न कोणत्याही एका विशिष्ट क्षेत्राशी निगडित नव्हता, तर सर्वव्यापी होता. तो अध्यात्मप्रवण नव्हता, तर इहवादी होता. तो मोक्षवादी, व्यक्तिनिष्ठ नव्हता, तर समूहभावना निर्माण करणारा होता. त्याची कार्यपध्दती पारंपरिक नव्हती, तर आधुनिक होती. इंग्रजांकडून तिचा स्वीकार करण्यात त्यांनी संकोच केला नाही. वैचारिक चर्चेपेक्षा अनुभूतिजन्य प्रेरणा व कृतिशीलता यावर त्यांचा भर होता. याचे संघाने स्वतंत्र शास्त्र तयार केले, ते गेल्या नव्वद वर्षांत यशस्वीपणे रुजविले, त्याची एक परंपरा व प्रभाव निर्माण केला. ते शास्त्र एक वस्तुस्थिती म्हणून समाजासमोर आहे. इतिहासाच्या कसोटीवर जे शास्त्रशुध्द असते तेच टिकते. गॅलेलिओचे सिध्दान्त शास्त्रशुध्द होते, म्हणून टिकले. त्याचे विरोधक टिकले नाहीत. त्यामुळे संघ विरोधकांना कळला नाही म्हणून न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही. प्रकाश आंधळयांना दिसू शकत नाही, हा डोळसांचा दोष नसतो. ती आंधळयांची शारीरिक अक्षमता असते. परंतु ज्या सिध्दान्तावर संघ आजवर चालला, वाढला, ते शास्त्रीय स्वरूपात कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना कळले, तर त्यांचा अधिक परिणामकारक उपयोग होऊ शकतो. म्हणून ते कळणे महत्त्वाचे. सूर्यप्रकाश हा पडतच असतो, त्याचा नैसर्गिक उपयोग होतच असतो. पण शास्त्रीय माहितीतून त्या ऊर्जेचा अधिक चांगला उपयोग करता येऊ शकतो.

नव्या वाटेची गरज

ज्याप्रमाणे साक्षात्कारातून लागलेले शास्त्रीय शोधही प्रयोगशाळेत सिध्द झाल्यानंतरच त्यांना मान्यता मिळते, त्याप्रमाणे साक्षात्कारातून निर्माण झालेल्या व प्रत्यक्ष अनुभवाच्या कसोटीवर सिध्द झालेल्या प्रयोगालाही सामाजिक शास्त्राचा वैचारिक दर्जा मिळायचा असेल, तर त्या प्रयोगाचाही चिकित्सक प्रक्रियेतून विचार करणे गरजेचे आहे. हेगेलने हिंदूंची ब्रह्मकल्पना कल्पनानिष्ठ, संदिग्ध, व्यक्तिनिष्ठ म्हटली असली, तरी तिच्यापर्यंत जाण्यासाठी पतंजलींनी सूत्रे तयार केली, जी आज जगमान्य झाली आहेत. राष्ट्रवादाच्या संदर्भात संघाचा विचार करण्यापूर्वी ऐतिहासिक वैचारिक विकासक्रमात हेगेलवर जो अन्याय झाला आहे, त्याचा प्रथम विचार करणे गरजेचे आहे. हेगेलने चैतन्यतत्त्वाच्या आधारे मानवी मुक्ततेची व त्यातून निर्माण झालेल्या सामूहिक राष्ट्रीय आकांक्षेची जी कल्पना मांडली, तिला माक्र्सवादाने छेद दिला. माक्र्सने भांडवलशाहीतील शोषक मजूर वर्गाच्या शोषणमुक्तीचा सिध्दान्त मांडताना हेगेलच्या द्वंद्वात्मक इहवादाचा आधार घेतला, पण त्याचे विवेचन हेगेलच्या बरोबर उलटे केले. व्यक्तीला स्वत:चे मन नसते, तर तो ज्या वर्गात असतो त्या वर्गीय भावनेचा ते एक भाग असते, असे त्याचे विवेचन होते. त्या विवेचनाच्या ओघात त्याने राष्ट्रवादाची 'शोषक वर्गाचे हत्यार, हुकूमशाही प्रस्थापित करण्याचा मार्ग' अशी संभावना केली. राष्ट्रवाद हा आक्रमक असतो व त्यामुळे युध्दे होतात अशी त्याची मीमांसा होती. जर्मनीमध्ये नाझी व इटलीमध्ये फॅसिझम या हुकूमशाही आणि विकृत राष्ट्रवादाच्या आविष्कारामुळे त्या मीमांसेवर लोकांचा विश्वास बसला. त्यातून सुरू झालेल्या दुसऱ्या महायुध्दामुळे माक्र्सच्या भाकितांना शास्त्रीय सिध्दान्ताचे स्वरूप आले. त्यामुळे हेगेलच्या स्वातंत्र्याकांक्षी राष्ट्रचैतन्यातील निर्मितिक्षमतेवर पुरेसे विचारमंथन झाले नाही. युरोपीय प्रबोधन काळात ज्याप्रमाणे धार्मिकतेकडे तुच्छतेने पाहिले गेले, तसेच राष्ट्रवादाच्या भावनेकडे पाहिले गेले. आधुनिक काळात, राष्ट्रीय प्रेरणेचे नवनिर्मितीत कोणते योगदान राहू शकते याचे सखोल व शास्त्रीय विवेचन झालेले नाही. दुसऱ्या महायुध्दानंतरच्या प्रारंभिक काळावर कम्युनिझमचा व नंतरच्या काळावर जागतिकीकरणाचा प्रभाव पडल्याने सर्व वैचारिक चर्चा त्याच अनुषंगाने होत राहिल्या. आता पुन्हा जागतिकीकरणाची प्रतिक्रिया म्हणून राष्ट्रवादाची चर्चा होत आहे. परंतु आधुनिक मानस, राष्ट्रीय परंपरा व एकविसाव्या शतकातील आव्हाने या संदर्भात राष्ट्रीय चैतन्यतत्त्वाचा नवआविष्कार कसा असेल, यावर पुरेशा गांभीर्याने विचारमंथन सुरूही झालेले नाही.


संघाकडे, 'राष्ट्रप्रेरणेचा निर्मितिक्षम आविष्कार' असे पाहण्याऐवजी 'मुस्लीमद्वेषावर उभी असलेली, एकविसाव्या शतकाचे भान नसलेली राक्षसी शक्ती' अशा दृष्टीने पाहण्याची सवय प्रसारमाध्यमांनी लावलेली आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्याची आकांक्षा सर्वव्यापी असली, तरी ती प्रकट होणारी तात्कालीन कारणे असतात. ज्या काळात संघ स्थापन झाला, त्या काळात मुस्लीम प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केले होते. त्या प्रश्नाच्या छायेखालीच या देशाचे शतकभराचे राजकारण चालले आहे. या प्रश्नातूनच देशाची फाळणी झाली व त्यातूनही स्वातंत्र्योत्तर काळात हा प्रश्न सुटला नाही. निर्भयता हा स्वातंत्र्याकांक्षेचा मूलधर्म आहे. मुस्लीम प्रश्नाचा व त्या अनुषंगाने सेमेटिक, धार्मिक अल्पसंख्याकांच्या सतत भीतीच्या छायेत विचार करायचा की निर्भयपणे, हा यातील प्रमुख मुद्दा आहे. संघ, भाजपा, हिंदुत्ववादी यांच्यावर बेछूटपणे टीका करणाऱ्या एका संपादकाला मदर तेरेसा यांच्यावर लिहिलेला अग्रलेख सपशेल मागे घेऊन माफी मागावी लागली आणि मुस्लिमांच्या भावना दुखविल्याबद्दल दुसऱ्या एका सेक्युलर वृत्तपत्राला दंगलीला भिऊन माफी मागावी लागली. या मानसिक गुलामगिरीच्या पार्श्वभूमीवर कोणी स्वाभिमानाची भाषा बोलले की ती द्वेषमूलक व जातीयवादी बनते. श्रीरामजन्मभूमी मंदिरासह हिंदू समाजाच्या अनेक मागण्या न्याय्य आहेत. पण 'जातीयवादी' म्हणून त्यांची वासलात लावली जात आहे. संघाच्या प्रेरणेतून अनेक शाळा, रुग्णालये, बँका, सेवाकार्ये उभी आहेत. अनेक ख्रिश्चनांनी, मुस्लिमांनीही त्यांचा लाभ घेतला आहे. संघाची प्रेरणा मुस्लीमद्वेषाची असती, तर हे कसे शक्य झाले असते? संघाने आपल्या कामातून सर्वव्यापी राष्ट्रप्रेरणेचे अनेक पैलू प्रकट केले आहेत. आपण काम करीत जावे, लोकांना ते आपोआप समजत जाईल असा विचार संघाने केला होता. ते लोकांना समजले आणि त्याची पावतीही लोकांकडून मिळत आहे. पण ते विचारवंतांना समजत नाही. याचे कारण आपल्या घरात काय घडते आहे यापेक्षा पश्चिमेकडे ते डोळे लावून बसले आहेत. पश्चिमेची नवनिर्मितिक्षमता संपली आहे, म्हणून हिंदू तत्त्वज्ञानाचा नव्या दृष्टीकोनातून तिथे अभ्यास सुरू आहे. असे दिसते की इतर अनेक प्रश्नांप्रमाणे हे शिवधनुष्यही उचलण्याची तयारी करून संघाला त्यात उतरावे लागेल. आपले समर्थन करण्यासाठी नाही. कारण जे स्पष्टीकरण मागत आहेत, त्यांना ते देण्याची आवश्यकता नाही व आता संघाला त्याची गरजही नाही. परंतु राष्ट्रप्रेरणेच्या आधारावर निर्माण होणाऱ्या व आंतरराष्ट्रीय सहजीवनाला पोषक ठरणाऱ्या, अनुभवसिध्द, नव्या सांस्कृतिक विचारांची जगाला गरज आहे.

शेवटचे पण महत्त्वाचे. संघावर दलितविरोधी असल्याचा आरोप केला जात होता. 1983 साली पुण्यात सामाजिक समरसता मंचाची स्थापना झाली. त्यानंतर मंचाने कार्यक्रमाचा जो धडाका लावला, तो पाहून तेथील डाव्या विचारांचे एक कार्यकर्ते म्हणाले, ''आपण संघाला डिवचले नसते तर बरे झाले असते. एकदा संघाचा रोड रोलर फिरायला लागल्यावर आपल्या पिपाण्या कुठे टिकणार?'' यावर अधिक भाष्याची गरज नाही.

kdilip54@gmail.com