नवीन औषधं

विवेक मराठी    11-May-2017
Total Views |

आता सगळयात नवी म्हणता येतील अशा औषधांनी एंट्री घेतली आहे. एस जी एल टी 2 इन्हिबिटर गटाची ही औषधं विचारांचं एक वेगळंच दालन, उपचारांचा एक वेगळाच दृष्टीकोन समोर घेऊन आली आहेत. या गटातल्या औषधांच्या शेवटी ग्लीफ्लॉझीन हे बिरुद असतं. सध्या या गटाची कॅनाग्लीफ्लॉझीन, डॅपाग्लीफ्लॉझीन आणि एम्पाग्लीफ्लॉझीन अशी तीन औषधं मिळतात.

बाजारात आताशा मधुमेहाच्या नवनव्या औषधांची झुंबड उडाली आहे. त्यामुळे त्या औषधांविषयी जाणून घेणंदेखील महत्त्वाचं आहे. यातला सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या औषधांचा गट 'डी पी पी फोर इन्हिबिटर' या नावाने ओळखला जातो. या औषधांचं कामकाज कसं चालतं ते पाहणं चांगलंच रोचक आहे. एका साध्या प्रयोगाने या औषधांच्या शोधाचं दालन अचानक उघडून दिलं. शोधकर्त्याच्या लक्षात आलं की आपण तोंडाने ग्लुकोज घेतलं, तर बीटा पेशी फार जास्त इन्श्युलीन बनवतात. याउलट ग्लुकोज जर इंजेक्शनने नसेत दिलं, तर खूपच कमी - म्हणजे जवळपास एक तृतीयांशच इन्श्युलीन बनवतात. आतडयांतून स्रवणारा कुठलातरी पदार्थ याला कारणीभूत असावा, हा त्यांचा विचार पुढच्या प्रयोगांनी सार्थ ठरवला. या पदार्थांना, हॉर्मोन्सना त्यांनी नाव दिलं 'इनक्रेटिन हॉर्मोन्स'. आपण जेवायला बसलो आणि समोर कितीही चविष्ट, आवडीचं व लज्जतदार जेवण असलं, तरी काही काळाने आपलं पोट भरतं. मग एक घास घेणंदेखील शक्य होत नाही. पण हॉस्पिटलमधली व्यक्ती तिला बऱ्याच ग्लुकोजच्या बाटल्या चढवल्या गेल्या, तरी नको म्हणत नाही तेसुध्दा याच हॉर्मोन्समुळे, हेदेखील कळलं. 

बीटा पेशींवर फारसा ताण न येता तयार होणाऱ्या जादा इन्श्युलीनचा मधुमेह नियंत्रणात राखण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो, हे समजल्यावर शास्त्रज्ञ गप्प बसणं शक्य नव्हतं. पण हे हॉर्मोन बनवून औषध म्हणून त्याचाच वापर करण्यात एक अडचण होती. शरीरात असलेला डी पी पी फोर नावाचं एन्झाइम केवळ एक-दोन मिनिटांत या हॉर्मोनची शकलं बनवून त्याला निष्प्रभ करत होतं. कुठल्याही रुग्णाला चोवीस तास हॉर्मोन देत राहणं अशक्य होतं. या अडचणींवर मात करण्याचे दोन मार्ग शास्त्रज्ञांना दिसले. पहिला म्हणजे ज्यावर डी.पी.पी. फोर एन्झाइम आपला प्रभाव दाखवू शकणार नाही, असं इनक्रेटिन हॉर्मोन प्रयोगशाळेत तयार करणं किंवा त्या डी पी पी फोर एन्झाइमलाच बूच लावणं, जेणेकरून शरीरात तयार झालेलं इनक्रेटिन हॉर्मोन एक-दोन मिनिटांत निरुपयोगी होणार नाही, बराच वेळपर्यंत ते रक्तात फिरत राहील आणि अतिरिक्त इन्श्युलीन बनवण्याचं आपलं काम जोमात करत राहतील. 

 हुशार शास्त्रज्ञांनी दोन्ही प्रकारची औषधं बनवली. डी पी पी  फोर एन्झाइमला दाद न देणाऱ्या नव्या इनक्रेटिनसारख्या औषधांना त्यांनी नाव दिलं 'इनक्रेटिन मिमेटिक'. या गटातली तीन औषधं सध्या भारतीय बाजारात मिळतात. बरीच महाग आहेत. शिवाय ती इंजेक्शनने घ्यावी लागतात. पण या औषधांचा एक फायदा म्हणजे यांनी वजन थोडंसं का होईना कमी होतं. एक्झेनाटाइड दिवसातून दोनदा जेवणापूर्वी किमान तासभर आधी घ्यावं लागतं, तर लिक्झिसेनाटाइड आणि लिराग्लुटाइड दिवसातून एकदा. या सगळयाच औषधांचा एक दुष्परिणाम जवळपास 60% लोकांमध्ये दिसतो. मळमळ होणं, प्रसंगी वांत्याही होणं या गोष्टी सररास दिसतात. हळूहळू त्या कमी कमी होत जातात, असा दावा कंपन्या करतात. त्यात तथ्य आहे. पोटफुगी असलेल्यांनी ही औषधं सहसा घेऊ नयेत. कारण या औषधांनी आतडयांचं आकुंचन-प्रसरण मंदावतं. पोटफुगी अधिकच वाढण्याची भीती असते. ही औषधं तितकीशी लोकप्रिय झाली नाहीत, कारण ही इंजेक्शनने द्यावी लागतात. आपल्या लोकांना मुळातच इंजेक्शनचा तिटकारा आहे.

डी पी पी फोर एन्झाइमलाच बूच लावून नैसर्गिकरित्या शरीरात बनणाऱ्या इनक्रेटिन हॉर्मोन्सना अधिक काळपर्यंत जीवनदान देण्याचं काम डी पी पी फोर एन्झाइम इन्हिबिटर गटातली औषधं करतात. यात वांत्या किंवा मळमळ फारशी होत नाही, कारण केवळ शरीरात बनलेली इनक्रेटिन हॉर्मोन्सच उपलब्ध असतात. तेवढया प्रमाणात असलेल्या या हॉर्मोन्सची शरीराला सवय असते. म्हणून कदाचित या औषधांनी फारसे दुष्परिणाम होताना दिसत नाहीत. फक्त नियमित दारू पिणाऱ्या लोकांना ही औषधं देताना थोडी सावधगिरी बाळगावी लागते. कारण यात पॅन्क्रियाटायटिस नावाचा होणारा क्वचितच गंभीर प्रश्न उद्भवू शकतो. औषधं सुरू असताना पोटाच्या वरच्या भागात सतत दुखू लागलं, तर ते डॉक्टरांच्या ताबडतोब लक्षात आणून द्यावं हे चांगलं.

तोंडावाटे देता येणाऱ्या या औषधांच्या गटाने बरीच लोकप्रियता मिळवली आहे. या गटातल्या सर्व औषधांच्या नावाच्या शेवटी ग्लिप्टीन असतं. सध्या या गटातली सिटा, व्हिलडा, लीना, जेमी, टेनेली, आणि सॅक्सा अशी सहा ग्लिप्टीन उपलब्ध आहेत. पैकी टेनेली हे इतर औषधांपेक्षा स्वस्त असल्याने बाजारात चांगलीच धूम माजवत आहे.   

नव्या औषधांपैकी ब्रोमोक्रिप्टीन हे औषध बाजारात तितकंसं रुजलं नाही. कदाचित याचे दुष्परिणाम याला कारणीभूत ठरले असावेत. तसं म्हणायला गेलं, तर हे औषध नवं म्हणता येणार नाही. गेली कित्येक वर्षं ते दुकानात होतंच. पार्किन्सन वा कंपवातात ते वापरलं जायचं. त्याने रक्तातलं ग्लुकोज कमी होतं, म्हणून ते मधुमेहातही वापरण्याची परवानगी हल्लीच दिली गेली. परंतु अचानक येणारी भोवळ, छोटया छोटया रक्तवाहिन्यांचं होणारं आकुंचन अशा काही परिणामांमुळे ते वापरताना डॉक्टर हात आखडता घेऊ लागले. रक्तवाहिन्यांचं आकुंचन झाल्याने हातांची बोटं काळीनिळी पडतात, रेनॉड फेनॉमेना होतो. क्वचित हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आकुंचनामुळे हार्ट ऍटॅक व्हायची भीती निर्माण होत असल्याने डॉक्टर ते वापरताना कचरू लागले. सुदैवाने हे सगळं फार लोकांमध्ये होत नाही. पण इतर औषधं उपलब्ध असल्याने डॉक्टरांना फारशी अडचण जाणवली नाही.

आता सगळयात नवी म्हणता येतील अशा औषधांनी एंट्री घेतली आहे. एस जी एल टी 2 इन्हिबिटर गटाची ही औषधं विचारांचं एक वेगळंच दालन, उपचारांचा एक वेगळाच दृष्टीकोन समोर घेऊन आली आहेत. सर्वच माणसांच्या मूत्रपिंडात घडणाऱ्या गोष्टीचा ती उपयोग करतात. तुम्हा-आम्हा सगळयांच्या मूत्रपिंडातून रक्तातलं ग्लुकोज गाळलं जातं. पण ते सर्व ग्लुकोज पुन्हा शोषलं जातं. ज्या वाटेतून ते पुन्हा रक्तात येतं, ती वाट म्हणजे एस जी एल टी नावाचं चॅनेल. नॉर्मल माणसांमध्ये रक्तातच मर्यादित ग्लुकोज असतं. त्यामुळे या चॅनेलची मर्यादा मूत्रपिंडाने गाळलेलं सगळं ग्लुकोज पुनश्च शोषून घेण्याइतकी सक्षम असते. मधुमेह झाल्यावर रक्तातच खूप जास्त ग्लुकोज असतं. ते सगळंच्या सगळं पुन्हा शोषून घेणं या चॅनेलच्या क्षमतेबाहेर असतं. साहजिकच थोडंसं ग्लुकोज शोषून झाल्यावर उरलेलं लघवीतून बाहेर फेकलं जातं. हे एक प्रकारे अन्न लघवीतून फुकट गेल्यासारखं असतं. अशा प्रकारे अन्न मोफत गेल्याने मधुमेहात माणसांची वजनं कमी होत जातात.

याच तत्त्वाचा फायदा ही नवी औषधं करून घेतात. ती या चॅनेललाच बूच मारतात. त्यामुळे लघवीतून बाहेर टाकलेलं ग्लुकोज पुन्हा रक्तात शोषलं जात नाही, ते थेट लघवीतून उत्सर्जित केलं जातं. रक्तात पुन्हा शोषलं न गेल्याने ग्लुकोज आयतंच कमी होतं. आपलं काम होतं. मधुमेह नियंत्रणात येतो.

अन्नातून रक्तात आलेलं ग्लुकोज असं वाया जातं, म्हणून ही औषधं घेणाऱ्यांचं वजन थोडंसं घटतं. शिवाय लघवीतून वाया जाणाऱ्या ग्लुकोजला विरघळवण्यासाठी पाणी लागतं. म्हणजे या औषधांनी लघवी जास्त होते. लघवी अधिक झाली, त्यातून थोडे क्षार निघून गेले की रक्तदाब अल्पसा का होईना, खाली येतो. कारण सोडियम या क्षाराचा आणि रक्तदाबाचा घनिष्ठ संबंध असतो. या गटातल्या औषधांच्या शेवटी ग्लीफ्लॉझीन हे बिरुद असतं. सध्या या गटाची कॅनाग्लीफ्लॉझीन, डॅपाग्लीफ्लॉझीन आणि एम्पाग्लीफ्लॉझीन अशी तीन औषधं मिळतात. तिन्ही बरीच महाग आहेत. लघवीत वारंवार होणारी इन्फेक्शन हा या औषधांचा दुष्परिणाम योग्य रुग्ण निवडून कमी करता येतो. या औषधांसोबत सोबत पुरेसं पाणी पिणं आवश्यक असतं. शिवाय जी माणसं ही औषधं घेतात, त्यांनी आपलं ग्लुकोज तपासायला लॅबोरेटरीमध्ये जाताना लघवी नेण्यात अर्थ नसतो. रक्तातलं ग्लुकोज नॉर्मल असतानाही त्यांच्या लघवीत ग्लुकोज दाखवलं जातं, कारण मुळात तोच या औषधांचा मूलभूत गुणधर्म आहे.

दिवसेंदिवस मधुमेहाचं प्रमाण इतकं वाढतंय की नवनवी औषधं आणणं गरजेचं आहे. त्याला प्रत्यवाय नाही. म्हणून वेगवेगळया पातळयांवर जोमात संशोधन सुरू आहे. परंतु अजून इतर औषधं बाजारात यायला बराच कालावधी लोटावा लागेल.

9892245272