नंदुरबारचा आरोग्य महायज्ञ

विवेक मराठी    13-May-2017
Total Views |


नंदुरबार येथे नुकतेच सातपुडा आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. ना. गिरीश महाजन यांच्या जी.एम. फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून शिबिरामुळे हजारो आदिवासी बांधवांवर उपचार करण्यात आले.   

या आरोग्य महाशिबिरात सुमारे 2 लाख 60 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. 1200 रुग्णांवर वेगवेगळया प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यातील 369 जणांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यातील 49 आदिवासी रुग्ण दोन्ही डोळयांनी अधू होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांना दृष्टी प्राप्त झाली. 180 लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 762 रुग्णांच्या सीटी स्कॅन व एमआयआर तपासण्या करण्यात आल्या. कॅन्सरच्या दोघा रुग्णांवरदेखील येथे शस्त्रक्रिया करण्यात आल्या. काही रुग्णांना मुंबई, पुणे, नाशिक येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. शासनाच्या राजीव गांधी जीवनदायीसारख्या योजनांतून त्याचा खर्च केला जाणार आहे.

नंदुरबारमध्ये भव्य आरोग्य मोहीम राबविण्याची संकल्पना दोन वर्षांपूर्वीच मांडण्यात आली. त्यासाठी एका नियोजन समितीचे गठन करण्यात आले. या समितीत जी.एम. फाउंडेशनची टीम, लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व शासनाचा आरोग्य विभाग यांचा सहभाग होता. गेल्या दोन महिन्यांपासून नंदुरबार जिल्ह्यातील व सातपुडयाच्या जंगलातील पाडया-पाडयापर्यंत समितीचे कार्यकर्ते पोहोचले. दुर्गम व अतिदुर्गम भागापर्यंत पोहोचून तेथपर्यंत ही आरोग्य मोहीम पोहोचावी यासाठी संघाच्या माध्यमातून लागोपाठ 4-5 वेळा समन्वय समितीच्या बैठकांचे प्रत्येक तालुक्यात आयोजन करण्यात आले. त्या त्या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी चोख सेवा बजावत प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरुवातीच्या तपासण्या केल्या व उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना नंदुरबारच्या सातपुडा आरोग्य महाशिबिरात पुढील उपचारासाठी निवडले. एकेका प्राथमिक आरोग्य केंद्रात चारचारशे रुग्णांची तपासणी करण्यात आली.

नियोजन समितीतील कार्यकर्ते थेट गुजरातच्या व मध्य प्रदेशच्या सीमा भागातील, नर्मदाकाठावरील गाव व पाडयांपर्यंत पोहोचले. धडगाव तालुक्यातील असे असंख्य पाडे होते, ज्यांची भाषादेखील समजत नव्हती. त्यात आमदरी, खडकी, झापी, फलाई, सिंधी दिगर, बोरुम पाडा, आवशीबारी, दमण या गावांचा सभावेश होता. नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे 900 गावांतील सुमारे अडीच लाख आदिवासी, ग्रामवासी आरोग्य महाशिबिरात उपचारासाठी पोहोचले.

गाव-पाडयातून वनवासी, गावकरी आरोग्य शिबिरापर्यंत पोहोचावे यासाठी सुमारे 5 हजार वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. महाशिबिराच्या व्यवस्थेत सुमारे तीन हजार कार्यकर्ते, 2500 डॉक्टर - त्यात 100 महिला डॉक्टर होत्या. डॉक्टरांच्या मदतीसाठी इतर 2000 मदतनीस होते. तळोदा रस्त्याला लागून असलेल्या मैदानातील भव्य मंडपात हे आरोग्य शिबिर पार पडले. सकाळी 8 वाजताच शिबिराला सुरुवात झाली होती. मुंबई येथील जे.जे. रुग्णालयाचे प्रमुख
डॉ. तात्याराव लहाने, डॉ. श्रीमती रागिणी पारीख यांच्यासह राज्याच्या विविध भागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांच्या तपासण्या केल्या. डॉ. तात्याराव लहाने यांनी तर एकाच दिवसात सुमारे 1 हजार रुग्णांची तपासणी केली. शिबिरात उपस्थित सगळयांच्या भोजनाचीसुध्दा व्यवस्था येथे करण्यात आली होती. सर्व रुग्णांना केळी, बिस्किटे देण्यात आली.

या आरोग्य महाशिबिराच्या यशस्वितेसाठी स्वत: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावळ, जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी, माजी मंत्री, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, आरोग्यमित्र रामेश्वर नाईक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह राजू गावीत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, भाजपाचे कार्यकर्ते व प्रशासकीय यंत्रणेतील मंडळी यांनी प्रयत्न केले.

या आरोग्य महाशिबिरात दुर्गम भागातील आदिवासी बांधवांवर चांगले उपचार तर झालेच, तसेच यानिमित्ताने आलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांनी नंदुरबारात मेडिकल कॉलेजला मंजुरी देऊन या भागासाठी मोठी सोय निर्माण करण्याची पायाभरणीच केली. या महाशिबिराला रा.स्व. संघाचे क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आदींनी भेट दिली.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यात असे भव्य महाशिबिर मागच्या वर्षी आयोजित केले होते. सातपुडयातील आदिवासी बांधवांसाठी अशाच प्रकारच्या शिबिराच्या आयोजनाची गरज होती. या शिबिरामुळे आदिवासी समाजातील आरोग्याच्या क्लिष्ट समस्या समोर आल्या. बहुतांश आजार हे पोटाशी संबंधित होते. जागृतीच्या अभावामुळे 'सिकलसेल' हा सगळया सातपुडयातील जनतेचा होऊन बसलेला मुख्य आजार, आजही सुरू असलेले अघोरी उपचार या समस्या आदिवासींमध्ये आजही दिसतात. हे आरोग्य महाशिबिर त्यांच्यासाठी उपयोगी ठरल्याचे उपचारासाठी आलेल्यांनी सांगितले.   

 आरोग्य महाशिबिरात  सुमारे 1200 रुग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया व तपासण्या करण्यात आल्या. डॉ. तात्याराव लहाने, डॉ. पारीख, डॉ. जाधव यांच्याशिवाय नवापूर येथे नागपूरचे डॉ. गजभिये यांनी 100 एंडोस्कोपिक, 80 लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केल्या. कॅन्सरवरील शस्त्रक्रियांसाठी सुप्रसिध्द डॉ. हर्षद खान यांनी दोन ब्रेस्ट कॅन्सर शस्त्रक्रिया केल्या.

या आरोग्य महाशिबिरातील प्रत्येक रुग्णांवर नाशिक, नागपूर आणि पुणे येथे गरजेनुसार शस्त्रक्रिया केल्या जातील. यासाठी विविध उद्योगांकडून मिळणाऱ्या सीएसआर, मुख्यमंत्री निधी, आरोग्य योजना, राजीव गांधी योजना आदींच्या निधीचा वापर केला जाणार आहे. शिबिरानंतरही नाशिक येथील आरोग्य विद्यापीठातील वैद्यकीय पथक आगामी सहा महिने नंदुरबार जिल्ह्यात उपस्थिती देऊन आरोग्य सेवांचे सूक्ष्म नियोजन करणार आहे, अशीही माहिती ना. गिरीशभाऊ  महाजन यांनी दिली

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ना. गिरीशभाऊंचे आरोग्य सेवेतील सहकारी रामेश्वर नाईक, अरविंद देशमुख, पितांबर भावसार, ना. महाजन यांचे विशेष अधिकारी संदीप जाधव यांच्यासह बाबा चौधरी, राजू गावीत, वासुदेव महाजन, अमोल सोनार आदी स्थानिक प्रतिनिधींनी सर्व प्रकारचे नियोजन केले. अशा शिबिरांद्वारे जास्तीत जास्त रुग्णांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

मानेच्या मणक्यांच्या आजारामुळे मानदेखील हलविता येत नसलेला रमेश नावाचा एक अंध रुग्ण डोळयांच्या उपचारासाठी येथे आला. त्याच्या मानेचे मणके जसे फ्यूज झाले होते, तसा त्याला हृदयाचा आजारही जडलेला. त्यामुळे आतापर्यंत चार वेळा त्याच्या डोळयांच्या शस्त्रक्रियेसाठी नकार देण्यात आला होता. त्यामुळे डोळे असूनही संपूर्ण अंध आयुष्य जगणारा रमेश येथे पोहोचला. येथेही भूलतज्ज्ञांनी नकार दिल्यावर 'आंधळे जीवन म्हणजे मरणच, त्यामुळे शस्त्रकिया करताना मरण आले तर मला मंजूर आहे' असे म्हणत त्याने परिणामांची जबाबदारी स्वत:च स्वीकारली व शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. रमेशवर शस्त्रक्रिया यशस्वी झाली. एक आदिवासी महिला तर डोळयांच्या शस्त्रक्रियेला तयारच होईना. डॉक्टरांना दगड मारू लागली. मात्र शस्त्रक्रियेनंतर दिसू लागल्यावर मात्र ती खूश झाली. दारू प्याल्यास आंधळा होशील असे सांगितल्याने एका रुग्णाने आपण कायमची दारू सोडणार असल्याचे वचन दिले.

     8805221372