तीन तलाक आणि मुस्लीम मुखंडांचा कांगावा

विवेक मराठी    13-May-2017
Total Views |


(भाग - 1)

तीन तलाकच्या मुद्दयावरून सध्या देशात वादळी चर्चा सुरू आहे. आपल्या या प्रथेच्या समर्थनार्थ मुस्लीम संस्थांचे मुखंड पेटून उटले आहेत. मात्र याबाबतचे कायदे आणि मुस्लीम धर्माच्या इतिहासातील त्याचे अस्तित्व यांच्या अभ्यासाच्या आधारे या मुद्दयाचे खंडन करता येईल. सदर लेखाच्या माध्यमातून ते करण्याचा प्रयत्न केला असून दोन भागात हा लेख प्रकाशित करत आहोत.

भारतात सध्या तीन तलाकचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका खंडपीठासमोर दि. 11 मेपासून त्याची सुनावणी सुरू होणार आहे. या खंडपीठाकडून एका झटक्यात, 3 सेकंदापेक्षा कमी अवधीत एका लग्नाला, एका महत्त्वाच्या कराराला मुठमाती देणाऱ्या या प्रथेला संपवायचे की चालू ठेवायचे या प्रश्नाची तड लागणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्या निकालाचे वरील खंडपीठापुढे होणाऱ्या सुनावणीत महत्त्व असणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात न्या. प्रकाश केसरवानी यांच्यासमोर चाललेल्या या खटल्यात आकील जमील या आरोपीने आपल्या पत्नीचा प्रथम हुंडयासाठी छळ केला. त्याला जेव्हा हुंडा मिळाला नाही, तेव्हा त्याने एका झटक्यात तीन वेळा तलाक उच्चारून काडीमोड घेतला. त्या कृत्याविरोधात त्याच्या पत्नीने आरोपपत्र दाखल केले होते.

इस्लाममध्ये लग्न हा पती-पत्नी या दोघांमधील करार समजला जातो. लग्नाच्या वेळी मुल्ला आणि नातेवाइकांच्या साक्षीने हा करार करत असताना वधूकडून तीन वेळा 'कुबुल' करून घेतले जाते. असा करार केवळ नवऱ्याकडून एकतर्फी कसा रद्द केला जाऊ शकतो? असा प्रश्न अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) या सुन्नी मुस्लिमांच्या आणि जमात उलामा इ हिंद या दोन महत्त्वाच्या संस्थांमधील मुखंडांपुढे टाकला आहे (दि. 9 मे 2017). एकतर्फी तलाक हा मुस्लीम महिलेच्या मूलभूत हक्कांच्या, तसेच समानतेची वागणूक देणारे कलम 14 आणि जीवनाच्या हक्काचे कलम 21 यांचा भंग करणारा असल्याचे या निकालात नमूद केले आहे. जर तलाकपीडित महिलेला पुन्हा घरी परतून जुन्या नवऱ्याबरोबर नांदायचे असेल, तर तिला नवे लग्न करून नव्या पतीबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित करून, पुन्हा तलाक घेऊन मगच जुन्या नवऱ्याशी लग्न करता येते. या प्रथेला 'हलाला' म्हणतात. असे हलाला लग्न तलाक देण्यासाठी ठरवून केले जाते. असे हलाला लग्न करणे व काडीमोड घेणे हे महिलेसाठी उपमर्दकारक आणि तिच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे आहे, असे न्यायालयाने नमूद केले आहे. न्या. केसरवानी असेही म्हणतात की, भारतातील सर्व नागरिकांना - त्यात मुस्लीम महिलाही आल्या - घटनेने मूलभूत हक्क दिलेले आहेत. कुठल्याही प्रथेच्या अथवा रितीच्या आडून त्या हक्कांची पायमल्ली करता येणार नाही, हे अभिप्रेत आहे.

अज्ञान-तिमिर युगातली (Age of ignoranceमधील) प्रथा

इस्लाममध्ये पै. महंमदांनी इस्लाम स्थापन करण्यापूर्वीच्या काळाला अज्ञान-तिमिराचा काळ - जहिलिया म्हणण्याची प्रथा आहे. त्या काळातील पूर्वापार चालत आलेल्या अनेक कुप्रथा पै. महंमदांनी इस्लाममध्ये बंद केल्या. तीन तलाकची प्रथासुध्दा त्या जहिलिया काळातील आहे. याचे अनेक पुरावे कुराण आणि हदीस या मुस्लिमांना पवित्र असलेल्या ग्रंथांमधून आले आहेत.

खुद्द पै. महंमदांनी आयुष्यातच आपल्या पत्नीला तलाक दिल्याचा प्रसंग आहे. त्यांनी तसे करू नये आणि तलाक देण्याची पध्दती, एक तलाक दिल्यानंतर किती काळ जाऊ द्यावा इ.चे दैवी मार्गदर्शन करणारी पूर्ण सुरा, एका पूर्ण अध्यायाप्रमाणे पवित्र कुराणात आली आहे. ती सुरा अत-तलाक क्र. 65 असून त्यात आयत क्र. 1-7मध्ये तलाक देण्याची पध्दती कशी असावी याचे विवेचन आहे. प.कु. सटीप भाषांतर The Study Quran करणारे सय्यद होसेन नस्र (S. H. Nasr, 2015) टिपेत नोंदवितात की, प.कु. 65-1 ही आयत जेव्हा पै. महंमदांनी आपली पत्नी हफसा हिला तलाक दिला, त्या वेळी अवतरित झाली आहे. इथे नोंदवायला पाहिजे की, ही आयत तलाकच्या प्रसंगाला धरून अवतरली आहे, हे हिंदी, उर्दू भाषांतरे नोंदवीत नाहीत. दुसरे भाषांतरकार अहमद रजा कादरी नोंदवितात की, ही आयत अब्दुल्ला बीन उमर यांच्या संदर्भात अवतरित झाली. एकंदरीत पूर्ण सुरेतील मजकूर पाहता, एकतर्फी 'तीन तलाक' ही प्रथा इस्लामपूर्व काळापासून चालू असून इस्लामनंतरही सुरूच राहिली आहे. विशेषतः ती सुन्नी मुस्लिमांमधील पंथोपपंथांत प्रचलित आहे. पै. महंमदांच्या उत्तरायुष्यात त्यांना पत्न्यांमधील सवतिमत्सराचा ताप सहन करावा लागला. ते इतके उद्विग्न होऊन गेले की, त्यांनी कितीतरी दिवस एकान्तवास पत्करला. त्या वेळी त्यांच्या अनुयायांमध्ये मोठी चलबिचल निर्माण झाली. त्या वेळी पै.नंतर झालेले दुसरे खलिफा उमर यांनी पै. महंमदांच्या पत्न्यांना तंबी दिली की, पै. महंमद त्यांना तलाक देतील व नंतर त्यांना सध्यापेक्षा उत्तम पत्न्या मिळू शकतील. ही तंबी चांगलीच लागू पडली. पै. महंमदांच्या पत्न्यांनी आपसात समेट केली आणि पैगंबर एकान्तवासातून परत आले. उमर यांनी धमकी  दिल्याप्रमाणे तो एकतर्फी तलाक झाला असता. Life of Muhammad या विस्तृत चरित्रात लेखक मुहंमद हुसैन हायकल यांनी या प्रसंगाचे सविस्तर वर्णन (पृ. 433-440) दिले आहे. या प्रसंगावरून लक्षात येते की एकतर्फी तलाक देण्याची प्रथा ही इस्लामपूर्व असून, नंतरही ती चालूच राहिली.

पै. महंमदांचा तीन तलाकला विरोध

पै. महंमदांच्या चरित्रातील हजारो घटनांचे, आठवण स्वरूपात संकलन करणारे हदीस ग्रंथ लिहिले गेले. या हदीस ग्रंथांमध्ये काही हदीस - उदा., सहिही अल बुखारी, सहिही मुस्लीम इ. विश्वसनीय मानले जातात. त्या हदीस ग्रंथांमध्ये, तीन तलाकच्या विरोधात पै. महंमद कसे उफाळून येत, त्यांचा राग कसा तीव्र असे, याचे प्रसंग नमूद केले आहेत. असेच एक दोन प्रसंग पाहण्यासारखे आहेत.

इब्न ओमर याने नमूद केल्याप्रमाणे पै. महंमद म्हणाले, ''कायदेशीररित्या वैध असलेली, पण अल्लाला अगदी न आवडणारी गोष्ट तलाक आहे.'' (अबू दाऊदची हदीस)

तलाक केव्हाही आणि कसाही देता येत नाही. तसाच तो एका झटक्यातही देता येत नाही. त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. त्या काळाला इद्दत म्हणतात. अब्दुल्ला बीन उमरची स्वत:ची आठवण नोंदली गेली आहे.

एकदा अब्दुल्ला बीन उमरने प्रत्यक्ष पै. महंमदांना सांगितले की, त्याच्या पत्नीची मासिक पाळी सुरू असताना त्याने तिला तलाक दिला आहे. ते ऐकताच पै. महंमद अतिशय संतापले. त्यांनी आज्ञा केली, ''तिला (पत्नीला) परत घे आणि (स्वत:च्या) घरी ठेव, जोवर तिची पाळी पूर्ण होत नाही. त्यानंतर परत एकदा तिची पाळी येऊन पूर्ण होऊ  दे. त्यानंतर जर तुला तलाक देण्याची इच्छा असेल, तर तिच्याशी पुन्हा शरीरसंबंध प्रस्थापित करण्यापूर्वी तलाक दे. अल्लाने तलाकसाठी या काळाची तरतूद केली आहे.'' (सर्वानुमते स्वीकारलेली Agreed हदीस)

वरील हदीसमध्ये अनेक गोष्टी लक्षात येतात. अब्दुल्ला बीन उमर हा आपल्या पत्नीला तलाक देऊन, पै. भेटीला येण्यापूर्वी आपल्या पत्नीला घरातून घालवून आला होता. मासिक पाळी सुरू असताना तलाक देता येत नाही. प.कु. 65-1मध्ये पत्नीला तलाक देताना केवळ स्वीकार्य - prescribed काळातच तो देता येतो. रजस्राव न आलेल्या मुली अथवा रजोनिवृत्त झालेल्या वयस्क महिला यांच्यासाठी तो विहित काळ तीन महिन्यांचा आहे, तर इतर महिलांसाठी तो तीन रजोदर्शनांचा आहे. जर महिला त्या वेळी गर्भवती असेल, तर तिचे बाळंतपण होईपर्यंतचा आहे. (सुरा अत-तलाक 65-4). तलाक घेतानाची कार्यपध्दती कशी असावी, याचे मार्गदर्शन प.कु. 65-2मध्ये स्पष्टपणे दिले आहे. त्याप्रमाणे, मग जेव्हा त्या आपल्या (इद्दतच्या) मुदतीच्या समाप्तीला पोहोचतील, तेव्हा त्यांना एकतर चांगल्या रितीने (आपल्या विवाहबंधनात) रोखून ठेवा अथवा चांगल्या रितीने त्यांच्यापासून विभक्त व्हा आणि दोन अशा व्यक्तींना साक्षीदार बनवा, जे तुमच्यामध्ये न्यायनिष्ठ असतील आणि (हे साक्षीदार बनणाऱ्यांनो) अल्लाहसाठी साक्ष ठीकठाक द्या. (भाषांतर - दिव्य कुरआन 65-2).

वर दिलेल्या आयतेच्या भाषांतरातून कळते की एका झटक्यात विवाहबंधन तोडणे हे अल्लाला संमत नाही; एवढेच नव्हे, तर विवाहविच्छेद घडण्यापूर्वी तीन गोष्टींची पूर्तता केली पाहिजे. या तीन गोष्टी आहेत -

1) प.कु.प्रमाणे जो वैध काळ असेल, त्याच वेळी तलाक देता येतो.

2) इद्दत ज्याप्रमाणे लागू असेल, तो काळ जाऊ देणे. दरम्यानच्या काळात जर संबंध सुधारले, तर पती-पत्नी परत एकत्र नांदू शकतात.

3) जर विवाहविच्छेद होणार असेल, तर तो सच्च्या, प.कु.प्रमाणे वागणाऱ्या दोन साक्षीदारांच्या उपस्थितीतच निर्णय लागावा.

यापैकी कुठलीही बाब अब्दुल्ला बीन उमरने पाळली नव्हती. त्याने प.कु.ची पवित्रता मोडली होती. यावरून पै. महंमद त्याच्यावर केवळ संतापलेच नाहीत, तर त्यांनी पत्नीला परत घरात घेण्यासाठी त्याला आज्ञा केली.

तीन तलाकच्या विरोधात महिला संघटना एका हदीसचा पुरावा देतात. ती रोकानाह बीन अबू यझीद याच्या स्वत:च्या बाबतीत घडलेली घटना आहे.

रोकानाहने त्याची पत्नी सोहैमा हिला न मोडता येणारा तलाक दिला. त्याने ती गोष्ट पै. महंमदांना सांगितली आणि म्हणाला की, ''अल्लाची शपथ, माझ्या मनात फक्त एक तलाक म्हणण्याव्यतिरिक्त विचार नव्हता.'' तेव्हा अल्लाच्या पैगंबरांनी त्याला विचारले, ''तुला एकच तलाक द्यायचा होता ना?''  रोकनाह म्हणाला, ''अल्लाची शपथ माझा एकदा तलाक (म्हणण्या) व्यतिरिक्त दुसरा हेतू नव्हता.'' अल्लाच्या पैगंबरांनी त्याच्या पत्नीला नांदायला परत पाठविले. नंतरच्या काळात रोकानाहने दुसऱ्यांदा हजरत उमरच्या काळात आणि तिसऱ्यांदा ह. ओस्मानच्या काळात पत्नीला तलाक दिला. (अबू दाऊद, तिरमिझी आणि इब्न माजा यांनी नमूद केलेली हदीस. याचा अर्थ ती सर्वांना स्वीकारार्ह आहे.)

वरील हदीस भारतातील मुस्लीम मुखंडांचा मुखभंग करणारी आहे. वरील हदीसप्रमाणे रोकानाहने त्या वेळच्या रिवाजाप्रमाणे  एका झटक्यात तीनदा तलाक म्हणून विवाहविच्छेद तर केलाच आणि पत्नीला टाकून दिले. त्याला नंतर पश्चात्ताप झाला. तो पैगंबरांना भेटायला व सल्ला घ्यायला गेला. पैगंबरांनी पत्नीला परत घेण्याची तिथल्या तिथे आज्ञा केली. त्या वेळेला इद्दत अथवा हलाला इ.चा प्रश्न उद्भवला नाही. त्यांनी रोकानाहकडून एकच वदवून घेतले की जरी त्याने तीनदा तलाक दिला, तरी त्याच्या मनात एकदाच तलाक म्हणावा असे होते. भारतात मुस्लीम पंथीयांमध्ये बरेलवी आणि देवबंदी हे प्रमुख विचारधारा बाळगणारे पंथ आहेत. त्यापैकी देवबंदी हे कट्टर, आजकाल अरबीकरणाकडे झुकलेले आणि वहाबी विचारसरणीचे असतात. त्याचे एक मासिक निघते - इस्टर्न क्रिसेंट. त्यात प्रश्नोत्तरांच्या रकान्यात वर दिलेल्या प्रसंगाप्रमाणेच प्रसंग दिला आहे. इ.क्रि.च्या ऑक्टो. 14च्या अंकात पृ. 49वर प्रसिध्द झालेल्या प्रश्नोत्तरांचा हा किस्सा मुळातूनच वाचण्यासारखा आहे -

प्रश्नकर्ता - मी 'तलाक तलाक तलाक' म्हणून माझ्या पत्नीला तलाक दिला. पण अल्लाशपथ माझ्या मनात एकदाच तलाक म्हणायचे होते, तीन तलाक नाही. मी तीनदा म्हणण्याचे कारण तिला (पत्नीला) धमकावण्यासाठी आणि तलाकवर जोर देण्यासाठी होते. (शेख महंमद कैय्युम, नवी मुंबई याचा प्रश्न)

उत्तरकर्ता - जर कोणी (पती) पत्नीला तीन तलाक देतो तर ते तीन तलाकच धरले जातील. पण जर पतीने एकच तलाक म्हटला आणि त्यावर जोर देण्यासाठी दोन अथवा तीनदा तो पुन्हा उच्चारला, तरी तो एकच तलाक धरला जाईल. (संदर्भ रद् उल मुहतर 2.460) वरच्या बाबतीत हा तलाक एकच आणि 'तलाक-इ-रजाई' होईल. म्हणजे पती-पत्नी हलाला न करता पुन्हा एकत्र नांदू शकतील. बायकोला सतत दबावाखाली ठेवण्यासाठी हा प्रकार केला जातो.

(क्रमश:)

9975559155