इन्श्युलीनचे प्रकार

विवेक मराठी    16-May-2017
Total Views |

इन्श्युलीनपैकी बराच मोठा भाग शरीरातले इतर अवयव काढून घेतात आणि उरलेला भाग यकृताच्या वाटयाला येतो. हा फरक छोटासा वाटला, तरी त्याचा एकंदर शरीरावर होणारा परिणाम मोठा आहे. दुसरं म्हणजे बीटा पेशी चोवीस तास इन्श्युलीन बनवतात, परंतु सतत थोडं थोडं इन्श्युलीन शरीरात सोडणारा एक इन्श्युलीन पंप सोडला, तर तुम्ही-आम्ही जे इन्श्युलीन घेतो, ते दिवसातून ठरावीक वेळेलाच टोचतो. कमीत कमी एक, तर जास्तीत जास्त पाच-सहा वेळेलाच ते घेतलं जातं.

बाजारात अनेक प्रकारची इन्श्युलीन उपलब्ध आहेत. त्यामुळे वेगवेगळया प्रकारची इन्श्युलीन असतात असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. परंतु हे खरं नाही. इन्श्युलीन हे एकच आहे. त्याचे मिळणारे प्रकार केवळ एकाच प्रोटीनच्या गुणधर्मात लहानसहान बदल घडवून बनवलेले आहेत. साहजिकच हे काय गौडबंगाल आहे, एकाच प्रोटीनचे इतके प्रकार कसे काय मिळू शकतात? हा प्रश्न कोणाच्याही मनात येणं स्वाभाविक आहे. यामागचं इंगित समजून घेण्यासाठी आपल्याला इन्श्युलीनच्या शरीरातल्या एकंदर वाटचालीविषयी जरा खोलात शिरावं लागेल.

प्रथम शरीरात तयार होणारं इन्श्युलीन आणि आपण औषध म्हणून जे टोचून घेतो ते बाहेरून दिलं जाणारं इन्श्युलीन यातला फरक समजून घ्यायला हवा. शरीरात जे इन्श्युलीन बनतं, ते आपण खाल्लेल्या अन्नाशी जोडलेलं असतं. तुम्ही आम्ही जेवलो, ते अन्न पचलं आणि त्या अन्नातली पाचक रसांनी वेगळं काढलेलं ग्लुकोज रक्तातून बीटा पेशींमध्ये पोहोचलं की पुढचा कार्यभाग सुरू होतो. नेमकं जितकं ग्लुकोज रक्तात आलेलं आहे, बरोब्बर तितकंच इन्श्युलीन बीटा पेशी बनवतात. बीटा पेशी बनवत असलेल्या इन्श्युलीनमध्ये सूक्ष्म नेमकेपणा असतो. त्यामुळे नॉर्मल माणसांचं ग्लुकोज योग्य त्या पातळीवर राहतं. ना वर जात, ना खाली येत.

बीटा पेशींनी बनवलेलं इन्श्युलीन पहिल्यांदा थेट पोहोचतं ते यकृतात (लिव्हरमध्ये). यकृत हेच आपल्या रासायनिक घडामोडींचा गाभा आहे. रक्तातलं ग्लुकोज वापरणं, अतिरिक्त ग्लुकोजची ग्लायकोजेन स्वरूपात साठवण करणं आणि तरीही ग्लुकोज शिल्लक राहिलं, तर तिचं चरबीत रूपांतर करणं इत्यादी कामं तिथेच होत असतात. त्यामुळे आतडयातून शोषलेलं ग्लुकोज आणि त्या पाठोपाठ बीटा पेशींनी बनवलेलं इन्श्युलीन सगळयात पहिल्यांदा तिथे जाणं खूप महत्त्वाचं ठरतं. वैद्यकीय भाषेत आम्ही त्याला 'फर्स्ट पास' असं म्हणतो. यकृत हा इन्श्युलीनचा 'फर्स्ट पास' झाला. साहजिकच, बनलेल्या इन्श्युलीनपैकी बराच मोठा भाग यकृत काढून घेतं आणि उरलेला भाग शरीरभर फिरण्यासाठी रक्ताच्या मुख्य प्रवाहात येतो.

जेवणातलं ग्लुकोज नेमकं किती, हे हेरून तितकंच इन्श्युलीन बीटा पेशींनी बनवणं हे पूर्ण सत्य नाही. आपण काहीही खात नसतानादेखील अत्यंत अल्प प्रमाणात इन्श्युलीन बनत असतं. चोवीस तास ही प्रक्रिया चालू असते. रक्तातलं ग्लुकोज कमी करणं हे अशा अल्प प्रमाणात बनणाऱ्या इन्श्युलीनचं मुख्य काम नसतं. त्याचं काम असतं उपाशीपोटी रक्तात ग्लुकोज ओतणाऱ्या ग्लुकॅगॉन या हॉर्मोनवर बारीक नजर ठेवणं, त्याला उतू-मातू न देणं. कारण ग्लुकॅगॉनचा अतिरेक झाला, तर रित्या पोटीचं ग्लुकोज वाढू शकतं. निसर्ग ही रिस्क घेत नाही. इन्श्युलीन व ग्लुकॅगॉन या दोन हॉर्मोन्सना एकमेकांशी भिडवून कुणालाच डोईजड होऊ  देत नाही. चोवीस तास रित्या पोटीचं आणि जेवणानंतरचं ग्लुकोज योग्य पातळीत राखतं. चोवीस तास अल्प प्रमाणात बनणाऱ्या इन्श्युलीनला आम्ही 'बेसल इन्श्युलीन' म्हणतो, तर जेवणानंतर अचानक मोठया प्रमाणात रक्तात ओतल्या जाणाऱ्या इन्श्युलीनला 'प्रांडियल  इन्श्युलीन'. आपण जेव्हा बाहेरून दिल्या जाणाऱ्या इन्श्युलीनची चर्चा करू, तेव्हा दोन्हींचा अर्थ अधिक स्पष्ट होईल.

औषध म्हणून इंजेक्शनने दिल्या जाणाऱ्या इन्श्युलीनमध्ये आणि निसर्ग बनवत असलेल्या इन्श्युलीनमध्ये काही मूलभूत फरक आहेत. बाहेरून दिलं जाणारं इन्श्युलीन मुळात त्वचेखाली दिलं जातं. यकृत हा त्याचा 'फर्स्ट पास' नसतो. ते प्रथम जातं केंद्रीय रक्ताभिसरणाचा एक भाग बनून. साहजिकच, दिलेल्या इन्श्युलीनपैकी बराच मोठा भाग शरीरातले इतर अवयव काढून घेतात आणि उरलेला भाग यकृताच्या वाटयाला येतो. हा फरक छोटासा वाटला, तरी त्याचा एकंदर शरीरावर होणारा परिणाम मोठा आहे. दुसरं म्हणजे बीटा पेशी चोवीस तास इन्श्युलीन बनवतात, परंतु सतत थोडं थोडं इन्श्युलीन शरीरात सोडणारा एक इन्श्युलीन पंप सोडला, तर तुम्ही-आम्ही जे इन्श्युलीन घेतो, ते दिवसातून ठरावीक वेळेलाच टोचतो. कमीत कमी एक, तर जास्तीत जास्त पाच-सहा वेळेलाच ते घेतलं जातं. या ठरावीक वेळेला टोचलेल्या इन्श्युलीनला बेसल आणि प्रांडियल अशा शरीरात तयार होणाऱ्या दोन्ही इन्श्युलीन प्रकारांशी मेळ साधायचा असतो.

आपल्या शरीरात होणारं, फक्त दोन-चार मिनिटं टिकणारं आणि त्यानंतर शरीरातल्या एन्झाइम्सकडून विनाश केलं जाणारं इन्श्युलीन सतत घ्यावं लागेल. दिवसातून काही वेळा घेऊन अशी दोन्ही कामं ते करू शकणार नाही. कारण मुळात ते तितका वेळ टिकणारच नाही. यावर तोडगा म्हणून इन्श्युलीन कंपन्यांनी इन्श्युलीनच्या रेणूत काही बदल केले आणि आपला कार्यभाग साधला.

हे बदल करताना रक्तातलं ग्लुकोज कमी करण्याची इन्श्युलीनची ताकद तशीच राखणं गरजेचं होतं. म्हणजे इन्श्युलीन रेणूचा जो भाग ग्लुकोज कमी करण्याच्या कामात सहभाग घेतो, तो बदलून चालणार नव्हतं. परंतु रेणूच्या इतर, कमी महत्त्वाच्या भागात बदल घडला, तर अडचण नव्हती. इन्श्युलीन कंपनीत काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी तसं केलं आणि इन्श्युलीनचे अनेक प्रकार बनवले.

त्वचेखाली दिलं जाणारं इन्श्युलीन एका विशिष्ट प्रकारे वागतं. इन्श्युलीनचे सहा रेणू एकत्र येतात आणि वैद्यकीय भाषेत ज्याला 'हेक्झामर' म्हणतो ते तयार होतात. हे रक्तात ताबडतोब शोषलं जाऊ शकत नाहीत. हेक्झामरचे मोठे रेणू त्वचेखालच्या छोटया छोटया रक्तवाहिन्या भेदून आत प्रवेश करू शकत नाहीत, त्यांचं रक्ताभिसरण होत नाही. रक्तात शोषलं जायला ते रेणू सुटे सुटे, एकल, एकटे (मोनोमर) किंवा फार तर दुकटे (डायमर) व्हावे लागतात. म्हणजे इन्श्युलीन घेतलं की ते ताबडतोब काम सुरू करत नाही. त्यासाठी काही वेळ जावा लागणार. त्वचेखालचं इन्श्युलीन पुरेशा प्रमाणात रक्तात यायला किती वेळ लागतो, यावर ते कधी आणि किती वेळासाठी काम करणार हे ठरतं. इन्श्युलीनचे कण सुटे व्हायला दोन तास लागले, तर ते दोन तास काम करील आणि आपल्याला दर दोन तासांनी इन्श्युलीन घ्यावं लागेल. तेच चोवीस तास लागले, तर दिवसातून फक्त एकदाच इन्श्युलीन घेऊन काम भागेल. इथे हेही लक्षात येईल की ग्लुकोज 100 असलं, तरी डॉक्टर इन्श्युलीन घ्यायला का सांगतात. कारण त्यांना माहीत असतं की इन्श्युलीन ताबडतोब काम करत नाही. थोडया वेळाने तुम्ही जे खाणार आहात त्यावर ते आपला असर दाखवणार असतं. म्हणून आता किती ग्लुकोज आहे त्याच्याकडे लक्ष न देता खाल्ल्यावर किती ग्लुकोज रक्तात येऊ शकतं, यावर या घडीला इन्श्युलीन द्यायचं की नाही ते ठरतं. दुर्दैवाने बरेच जण आताचं ग्लुकोज बघून घाबरतात आणि सांगितलेलं इन्श्युलीन घेणं टाळतात.

इन्श्युलीन बनवणाऱ्या कंपन्यांनी इन्श्युलीनच्या त्वचेखाली बनवण्याच्या गुणधर्मात बदल केले. त्यातून इन्श्युलीनचे अनेक प्रकार निर्माण झाले. नेहमीचं इन्श्युलीन - ज्याला रेग्युलर इन्श्युलीन म्हटलं जातं - तीन ते चार तासात आपला प्रभाव दाखवायचं. पण आपण जेवण जेवलं की रक्तात ग्लुकोज त्या मानाने जलद - म्हणजे दीड-दोन तासात यायचं. हे योग्य नव्हतं. म्हणून इन्श्युलीन बनवणाऱ्या कंपन्यांनी इन्श्युलीन रेणूत असे बदल केले की इन्श्युलीनचे एकल कण एकमेकांचे हात घट्ट पकडणारच नाहीत. त्यांचे हेक्झामर पटकन विघटित होतील. इन्श्युलीन त्वरित दीड-दोन तासात रक्तात येईल, खाण्यातून येणाऱ्या प्रांडियल ग्लुकोजशी त्याचा व्यवस्थित मेळ बसेल. त्यातून प्रांडियल इन्श्युलीनचा तिढा सुटला. आपल्या नैसर्गिक, शारीरिक इन्श्युलीन गुणधर्मासोबत बाहेरून दिलेल्या इन्श्युलीनचं गणित बऱ्यापैकी फिट्ट बसलं. याला त्यांनी नाव दिलं 'अल्ट्रा फास्ट ऍक्टिंग इन्श्युलीन'. सध्या बाजारात अशा प्रकारची तीन वेगवेगळया कंपन्यांनी बनवलेली, लिस्प्रो, ग्लुलायसिन आणि अस्पार्ट अशी तीन अल्ट्रा फास्ट ऍक्टिंग इन्श्युलीन उपलब्ध आहेत.

याउलट त्वचेखाली घेतलेलं इन्श्युलीन जास्त काळ काम करत राहिलं, तरच ते शरीरात बनणाऱ्या बेसल इन्श्युलीनशी साधर्म्य सांगू शकेल. म्हणजे हेक्झामरच्या सहा इन्श्युलीन रेणूंनी आपापले हात घट्ट पकडायला पाहिजेत. हेदेखील शास्त्रज्ञांना शक्य झालं. सुरुवातीला त्यांनी रेग्युलर इन्श्युलीनच्या द्रावणात थोडं झिंक टाकलं. त्यातून लेंटे आणि अल्ट्रा लेंटे इन्श्युलीन तयार झाली. पण या गोष्टींमुळे नेमकेपणा येत नव्हता. इन्श्युलीन काही व्यक्तींमध्ये आठ तास काम करायचं, तर काहींमध्ये पंधरा-सोळा तास. अशाने इन्श्युलीन देण्याची नेमकी वेळ ठरवता येत नव्हती. म्हणून हे इन्श्युलीन कालबाह्य झालं. त्यांची जागा प्रोटामिन घातलेल्या एन पी एच इन्श्युलिनने घेतली. हे दहा ते चौदा तास काम करतं. दिवसातून किमान दोनदा घ्यावं लागतं. पण शास्त्रज्ञ एवढयावर समाधानी नव्हते. त्यांनी चोवीस तास काम करतील अशी इन्श्युलीन बनवली. त्यातून ग्लार्जिन आणि डेटिमीर नावाची इन्श्युलीन उदयाला आली.

हा सिलसिला असाच चालू आहे. आठवडयातून एकदा, महिन्यातून एखाद वेळी घेता येतील अशी इन्श्युलीन लवकरच बाजारात येतील अशी शक्यता झाली आहे.

9892245272