पेला पूर्ण भरावा लागेल

विवेक मराठी    22-May-2017
Total Views |

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, नक्षलवाद्यांचा प्रश्न पूर्वी होता तसाच आहे, लोकसंख्या वेगाने वाढते आहे आणि जन्माला येणारा प्रत्येक जीव शिक्षण, आरोग्य, रोजगार, सुरक्षा याची मागणी करतो, दलित चळवळीतील बुध्दिवाद्यांच्या मनात भाजपा शासनाविषयी अनेक प्रश्न आहेत, पंचवीस कोटी मुसलमानांचा राज्यसत्तेतील सहभाग अतिशय अल्प आहे. हे सगळे प्रश्न असंतोषाची दारूची कोठारे आहेत. आज ती सुप्त आहेत. त्यांना काडी लावण्याचे प्रयत्नही अनेक लोक करताना दिसतात. हे सर्व प्रश्न भाजपा कसे हाताळणार आहे, यावर पुढील निवडणुकीतील त्यांचे यश खूपशा प्रमाणात अवलंबून राहील.


रेंद्र मोदी यांच्या शासनकाळाला 26 मे 2017 रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. अनेक अपेक्षांचे गाठोडे घेऊन पंतप्रधान मोदी सत्तेवर आले. संसदीय लोकशाहीचे, मंत्रीमंडळाचे नेतृत्व पंतप्रधानांना करावे लागते, यामुळे शासनाच्या बरे-वाईटपणाची जबाबदारी पंतप्रधानांच्या शिरावर येत असते. सरकारची समीक्षा म्हणजे पंतप्रधानांच्या कार्यशैलीची समीक्षा होत असते. अशी समीक्षा पहिल्या वर्षापासूनच चालू झाली आहे. तीन वर्षांनंतर या समीक्षेत दोन भाग होतात. पहिल्या भागात 'गेल्या तीस वर्षांतील सर्वोत्तम पंतप्रधान' म्हणून मोदी यांना मान्यता देणारा पहिला वर्ग आहे. दुसऱ्या भागात आतापर्यंत झालेल्या सर्व पंतप्रधानांत सर्वात वाईट पंतप्रधान अशी प्रतिक्रिया देणाराही एक वर्ग आहे.

या दोन्ही प्रतिक्रिया वास्तवाला धरून नसल्यामुळे त्यांचा गंभीरपणे विचार करावा असे नाही. सत्य या दोघांत कुठेतरी आहे. त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. अमूल्य गांगुली हे भाजपाचे समर्थक नाहीत, संघविचारधारेचे कट्टर विरोधक आहेत. इकॉनॉमिक टाइम्सच्या एप्रिल 16, 2016च्या अंकात त्यांचा एक लेख प्रकाशित झालेला आहे. पहिल्याच परिच्छेदात ते म्हणतात, ''दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदी यांनी तेव्हा निर्माण केलेल्या सर्व अपेक्षांची पूर्तता केली नसली, तरी भारताला आधुनिक आणि आर्थिकदृष्टया प्रगत करण्याच्या संदर्भात ते सर्वोत्तम व्यक्ती आहेत.'' जन्मभर ज्याने संघविचारधारेवर टीकाच टीका केली आहे तो जेव्हा असे प्रशंसोद्गार काढतो, तेव्हा ते गंभीरपणे घ्यावे लागतात. जाता जाता एक गोष्ट नमूद करून ठेवतो, ती म्हणजे अमूल्य गांगुली विकाऊ पत्रकार नाहीत.

रूपर्ट मर्डोक यांची अशी दुसरी प्रतिक्रिया आहे. हे जगभरातील दूरचित्रवाहिन्यांचे सम्राट आहेत. 2015 साली ते म्हणतात, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या स्वातंत्र्यानंतरचे उत्तम धोरणे आखणारे सर्वोत्तम नेते आहेत.'' रूपर्ट मर्डोक यांना नरेंद्र मोदी यांची अशी स्तुती करण्याचे काही कारण नाही, ते तसे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये मोडणाऱ्यांपैकी एक आहेत. अमेरिकेतून दोन आठवडयांतून एकदा प्रसिध्द होणारे फोर्ब्स नावाचे नियतकालिक आहे. 24 डिसेंबर 2016च्या अंकात या नियतकालिकातील एक लेख नरेंद्र मोदी यांच्यावरील आहे. संदर्भ त्यांच्या अमेरिकन दौऱ्याचा आहे. फोर्ब्स म्हणतो, ''एकाच पिढीत भारत आर्थिकदृष्टया विकसित देश होईल, भारत हे शक्य करून दाखवील, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे म्हणणे खरेच आहे. लोकांना उत्तम प्रकारचे जीवन जगता यावे यासाठीच तर अर्थव्यवस्था आहे.''

साधारणतः आपल्या वाचनात न आलेल्या या प्रतिक्रिया आहेत. राहुल गांधी, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, मायावती, सीताराम येच्युरी, शरद पवार इत्यादींच्या प्रतिक्रिया मराठी वर्तमानपत्रातून येत असतात आणि त्या सर्व प्रतिक्रिया नकारात्मक असतात, राजकीय असतात आणि काही वेळेला मूर्खपणाच्या असतात. म्हणून त्या सगळया येथे देऊन जागा खाण्याचे काही कारण नाही. नमुन्यादाखल शरद पवारांची प्रतिक्रिया देतो. 11 मे रोजी मुंबईत ते म्हणतात, ''देशातील अल्पसंख्याकांच्या मनात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाबद्दल चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे.'' ज्याने हिंदू दहशतवाद हा शब्द शोधला, त्यांच्याकडून यापेक्षा वेगळया प्रतिक्रियेची अपेक्षा करणेही चूक आहे.

वर दिलेल्या काही प्रतिक्रिया आणि राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यावरून 14 मे 2014ला देशात जे परिवर्तन झाले आणि त्यानंतर  26मेला जे शासन अधिकारावर आले, याची योग्य समीक्षा होत नाही. चांगल्या आणि वाईट या दोन्ही प्रतिक्रिया परिस्थितीजन्य प्रतिक्रिया आहेत. प्रतिक्रिया देणाऱ्यांचे जे मत झालेले आहे, ते त्यांनी अनुभवलेल्या परिस्थितीवरून झालेले आहे. ते सार्वत्रिक सत्य मानता येत नाही. काही वर्षांपूर्वी जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत सोनिया गांधींचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. आजच्या परिस्थितीत त्यांचे नाव जगातील दुर्बळ महिलांच्या पंगतीत कदाचित पहिल्या क्रमांकावर जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वोत्तम पंतप्रधान आहेत, हे मत असेच आहे. उद्या त्यांच्या शासनाकडून एखादी घोडचूक झाली तर हे मत त्यांच्याविरुध्द होईल. म्हणून अशा मतांच्या आधारावर समीक्षा करता येत नाही.

केंद्रात भाजपाचे शासन येण्यापूर्वी चार प्रकारची गंभीर संकटे देशापुढे होती. 1. अस्मितेचे संकट 2. नेतृत्व संकट 3. विश्वासार्हतेचे संकट 4. चारित्र्यऱ्हासाचे संकट. (इंग्लिशमध्ये याला 'क्रायसिस ऑफ आयडेंटिटी', 'क्रायसिस ऑफ लीडरशिप', 'क्रायसिस ऑफ क्रेडिबिलिटी' आणि 'क्रायसिस ऑफ कॅरेक्टर' असे म्हणतात) आम्ही कोण आहोत? नेहरू-गांधीनी आम्हाला हिंदी ठरविले, इंदिरा गांधींपासून आमची ओळख सेक्युलर झाली आणि सोनिया-मनमोहन यांच्या काळात आम्ही कोण? हा फार मोठा प्रश्न निर्माण जाला. सर्वसत्ताधीश सोनिया इटालियन रोमन कॅथलिक, पंतप्रधान मनमोहन सिंग धड हिंदी बोलू शकत नाहीत, उर्दूची शेरोशायरी त्यांना पाठ, तुलसीरामायण सपाट. त्यांना सल्ला देणारी सर्व कम्युनिस्ट मंडळी, देश-देव-धर्माचे शत्रू. देश झपाटयाने ख्रिश्चन होणार का? आपले अस्तित्व संपणार का?अशा प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मोदी पंतप्रधान झाले. देशातील सामान्य हिंदूने आपल्या एकेका मताने वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन टाकली.

नेतृत्वाचे संकट डॉ. मनमोहन सिंगपासून सुरू होते. दुर्दैवाने डॉ. मनमोहन सिंग कळसूत्री बाहुली पंतप्रधान ठरले. त्यांची जागा घेणारे राहुल गांधी बालिश राजकारणी ठरले. पंतप्रधानपदावर डोळा असणारे मुलायमसिंग, लालूप्रसाद, मायावती यांच्यावर त्यांच्या जातीपलीकडे कोणाचा विश्वास नाही. अशा काळात एक चहाविक्रेत्याचा मुलगा, दीर्घकाळ संघाचा प्रचारक राहिलेला, देशाला समर्पित असा नवीन चेहरा लोकांपुढे आला. नरेंद्र मोदी यांनी गमावलेला विश्वास पुन्हा मिळविला. त्यांचे चारित्र्य स्वच्छ आहे, त्यांना एक दृष्टी आहे, आधुनिक व्हायचे म्हणजे काय करायला पाहिजे हे त्यांना चांगले समजले आहे, आणि अफाट कार्यशक्ती आहे. दिवसाचे अठरा-अठरा तास काम करूनही ते ताजेतवाने असतात. तीन वर्षांत सुट्टी घेण्याचेही त्यांच्या कधी मनात आले नाही. म्हणून सामान्य माणसाला असे वाटते की, माणूस प्रामाणिक आहे, स्वच्छ आहे आणि कार्यक्षम आहे. लोकांचा त्यांच्यावर फार मोठा विश्वास आहे.

नोटबंदीच्या काळात या विश्वासाचे प्रत्यंतर आले. नोटबंदीचा सर्वांनाच खूप त्रास झाला. सामान्य माणसाला तर खूप झाला. रोजंदारी करणाऱ्याला, फळे-भाजीविक्रेत्याला, स्टेशनवर हमाली करणाऱ्याला याचा फटका बसला. तो त्याने आनंदाने सहन केला. दांडी सत्याग्रहानंतर भारतातील प्रत्येक माणसाला स्पर्श करणारा जर अन्य कोणता विषय झाला असेल, तर तो नोटबंदीचा आहे. दांडी सत्याग्रह मिठासाठी होता आणि नोटबंदी चलनातून काळा पैसा गायब करण्यासाठी होता. सामान्य माणसाला त्याचा अर्थ उत्तम प्रकारे समजला. नोटबंदीचे हे सगळयात मोठे यश आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांची दुसरी कारकिर्द अनेक प्रकारच्या घोटाळयांनी गाजली. शेवटच्या काही वर्षांत तर दर पंधरा दिवसांनी किंवा महिन्यांने एकेकाच्या भानगडी बाहेर यायला लागल्या. लाखो कोटी रुपयांपासून ते शेकडो कोटी रुपयांपर्यंतची भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येऊ लागली. अण्णा हजारे यांनी त्याविरुध्द दिल्लीत उपोषण केले, तेव्हा सगळा देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता. आपले राजकीय नेते असे भ्रष्टाचार करू लागले, तर देशाचे वाटोळे व्हायला फार काळ लागणार नाही. पैशाच्या लालचेमुळे इतिहासकाळात आपलेच लोक शत्रूला फितूर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याची पुनरावृत्ती होणार काय? अशीदेखील भीती निर्माण झाली.

अशा काळात नरेंद्र मोदी यांनी लोकांना स्वच्छ प्रशासनाचे अश्वासन दिले. 'मी पैसा खात नाही आणि कुणाला खाऊ देत नाही' हे त्यांनी गुजरातमध्ये सिध्द करून दाखविले. केंद्रात शासन येऊन आता तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षांत केंद्रातील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याचे कोणाचे धाडस झालेले नाही. या तीन वर्षांत लाखो-कोटींचे व्यवहार झालेले आहेत. शस्त्रास्त्रांची खरेदी झालेली आहे, माहिती तंत्रज्ञानातील व्यवहार झालेले आहेत, पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. त्यात भ्रष्टाचार झाला आहे असे म्हणण्याचे धाडस अजून कुणी केलेले नाही. नरेंद्र मोदी शासनाने तीन वर्षांत ही विश्वासार्हता निर्माण केली आहे.

चारित्र्यऱ्हासाचे संकट असेच भयानक असते. व्यक्तिगत जीवनातील चारित्र्यऱ्हास त्या व्यक्तीला संकटात आणतो आणि त्या व्यक्तीवर असलेले कुटुंबदेखील संकटात सापडते. सार्वजनिक जीवनातील चारित्र्यऱ्हास सार्वजनिक जीवन नासून टाकते. छगन भुजबळ सध्या तुरुंगात आहेत. त्यांनी सार्वजनिक जीवनात कैक हजार कोटींचा घोटाळा केला. आज त्यांची राजकीय कारकिर्द संपल्यात जमा आहे. केंद्रीय मंत्रीमंडळातील आणि विविध राज्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री आपले सार्वजनिक जीवन शुध्द राखण्याचा प्रयत्न करतात. काही जण क्षणिक मोहाला बळी पडतात, परंतु तो मंत्रीमंडळाचा स्वभाव नसतो. या घटना अपवादात्मक समजल्या जातात.

नरेंद्र मोदी शासनाने गेल्या तीन वर्षांत या चारित्र्यऱ्हासाच्या संकटातून राजसत्तेला बाहेर काढले आहे. देशातील सर्व स्तरांतून भ्रष्टाचार निर्मूलन करणे त्यांना शक्य झालेले नाही. परंतु भ्रष्टाचार हा शिष्टाचार नाही आणि भ्रष्टाचाऱ्यांना क्षमा नाही, हा संदेश पुरेशा ताकदीने सार्वजनिक जीवनात गेलेला आहे. या तीन संकटांतून देशाला बाहेर काढण्याचे नरेंद्र मोदी शासनाचे यश हे कोणत्याही आकडेवारीत मोजता येण्यासारखे नाही. देशाचा जीडीपी किती वाढला, परकीय चलनाची गंगाजळी किती वाढली, निर्यात व्यापार किती वाढला, रोजगार किती वाढला, गुन्हेगारी किती कमी झाली, याचे आकडे देता येतात, परंतु गुणात्मक परिणामाची मोजदाद कोणत्याही आकडेवारीत करता येत नाही. आणि या बाबतीत असे म्हणायला हरकत नाही की, स्वातंत्र्यानंतर प्रथमच देश गुणात्मक परिणामाच्या वाटेवर चालू लागला आहे. यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानाला असे परिवर्तन घडवून आणता आले नाही.

आपला देश महासत्ता झाला पाहिजे असे स्वप्न अनेक मंडळींनी ठेवले. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी तर त्याचा आराखडा मांडला आहे. आपले शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, उद्योजक, व्यापारी, देशभक्त कलावंत आपआपल्या परीने देशाला महान करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. महासत्तेचे दोन निकष सांगितले जातात. पहिला निकष आर्थिक समृध्दीचा आहे आणि दुसरा निकष आधुनिक सैनिकी सामर्थ्याचा आहे. रशियाकडे सैनिकी सामर्थ्य प्रचंड होते, परंतु आर्थिक दिवाळखोरीने रशिया कोसळला. अमेरिकेकडे दोन्ही आहेत. चीन झपाटयाने त्या दिशेने चालला आहे. भारताचीही त्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे. परंतु भारत केवळ सैनिकी सामर्थ्यावर, आर्थिक सामर्थ्यावर महासत्ता बनू इच्छित नाही. भारताचे ते जागतिक मिशन होऊ शकत नाही.

भारताचे जागतिक मिशन 'ज़गाला युध्द नको, बुध्द हवा' या एका वाक्यात सांगता येते. बुध्द याचा अर्थ मानवधर्म. मनुष्या-मनुष्यातील प्रेम, सद्भावना आणि समरसता यांचेच नाव धर्म असे आहे. हा विश्वधर्म जगाला देणे आणि 'हे विश्वची माझे घर' अशी अनुभूती सर्व ठिकाणी निर्माण करणे, सारे विश्व हा मानवजातीचा एक परिवार आहे, म्हणून सर्वांनी परस्परपूरक आणि परस्परावलंबी जीवन जगणे आवश्यक आहे. देशादेशात सामंजस्य, सुसंवाद, सहकार्य आणि वैश्विक सहमती निर्माण करणेदेखील आवश्यक आहे. भारताला हे करायचे आहे. केंद्रातील भाजपा शासनाला आपल्या जागतिक कर्तव्याची पूर्णपणे जाणीव आहे. आपला योग, आपला आयुर्वेद आणि आपली कौटुंबिक मूल्ये ही जगाला अत्यंत आवश्यक झालेली आहेत. स्वातंत्र्यानंतर शासकीय पातळीवर प्रथमच त्यांचा प्रचार होत आहे. आपण आपल्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच तमोयुगातून प्रकाशयुगाकडे अापण वाटचाल करू लागलो आहोत. सारा भारत त्यात हळूहळू सहभागी होत आहे. युवा पिढी आपल्या युवाशक्तीने आणि भविष्याच्या आकांक्षाने भारावून मार्गक्रमण करू लागली आहे. तीन वर्षांतील हे यश डोळे दिपवून टाकणारे नसले, तरी डोळयावरची काजळी नक्कीच दूर करणारे आहे.

दोन वर्षांनंतर सार्वत्रिक निवडणुका येतील. वर दिलेले यश जसे आहे तसे करायच्या गोष्टीही खूप राहिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, वनवासी क्षेत्रातील नक्षलवाद्यांचा प्रश्न पूर्वी होता तसाच आहे, लोकसंख्या वेगाने वाढते आहे आणि जन्माला येणारा प्रत्येक जीव शिक्षण, आरोग्य, रोजगार, सुरक्षा याची मागणी करतो, दलित चळवळीतील बुध्दिवाद्यांच्या मनात भाजपा शासनाविषयी अनेक प्रश्न आहेत, पंचवीस कोटी मुसलमानांचा राज्यसत्तेतील सहभाग अतिशय अल्प आहे. हे सगळे प्रश्न असंतोषाची दारूची कोठारे आहेत. आज ती सुप्त आहेत. त्यांना काडी लावण्याचे प्रयत्नही अनेक लोक करताना दिसतात. हे सर्व प्रश्न भाजपा कसे हाताळणार आहे, यावर पुढील निवडणुकीतील त्यांचे यश खूपशा प्रमाणात अवलंबून राहील. पेला अर्धा भरला आहे, अर्धा रिकामा आहे. पेला पूर्ण भरण्याची वाटचाल पुढील दोन वर्षांत करावी लागेल.   vivekedit@gmail.com