साज संघशक्तीचा

विवेक मराठी    23-May-2017
Total Views |

ज्या संस्थांत, संघटनांत प्रत्येक सदस्याचं म्हणणं, सूचना ऐकून घेतल्या जातात, त्यांचा सारासार विचार होऊन त्यानुसार योग्य निर्णय घेतले जातात, ती संस्था, संघटना भरभराटीला येते. संघपरिवाराशी जोडलं गेल्यावर एक मूलभूत तत्त्व मला टीमबाबत शिकायला मिळालं. बैठकीमध्ये प्रत्येकाचं मत मांडण्याची संधी मिळते. चर्चा होतात, पण एकदा का निर्णय झाला की तो प्रत्येक जण खुल्या दिलाने स्वीकारतो आणि मग त्याच्या अंमलबजावणीला यथाशक्ती हातभार लावला जातो.


मे महिन्याची सुट्टी लागलेली, गावाकडे ओढीने धाव घेणारी नातवंडं घराच्या अंगणात रमू लागली. अशाच एका अंगणातली गोष्ट ही... खेळ सुरू झालेला. पण खेळता खेळता काही वाद झाला आणि मुलांची भांडणं सुरू झाली. आवाज वाढलेले ऐकून 'आजीलाच' घरातल्या साऱ्यांनी मुलांना समजवण्यासाठी बाहेर पाठवलं. आजी बाहेर आली, तशी जो तो आजीकडे तक्रार दाखल करू लागला. आजी म्हणाली, ''तीन म्हणेपर्यंत सारे शांत झालात ना, तरच मी प्रत्येकाचं म्हणणं ऐकणार.'' आजीने एक-दोन म्हणताच सारे चिडीचूप.

मग आजीने प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं. गणपतीची शाडूची माती घेऊन मुलं काही ना काही बनवत होती. पण कुणाचा कुणाला मेळ नव्हता. 'तू माझी माती घेतली, तू माझी आयडिया घेतली' इ. असे वाद सुरू झाले. आजीच्या सारं लक्षात आलं. तिने मुलांना एक कल्पना सांगितली. ''हे पाहा मुलांनो, दोन गट करा आणि गटाने काम करा. पाहू कोणाचं छान होतंय.'' ही कल्पना सर्वांनाच आवडली. दोन गटात 12 जण विभागले गेले. आपल्या जागा निश्चित झाल्या. प्रत्येक गटाने एक थीम घेतली. एका गटाने 'गावातील जीवन' यावर मातीकाम करायचं ठरवलं, तर दुसऱ्या गटाने सूर्यमाला आणि पृथ्वीवरून झेपावणारं अवकाशयान तयार करण्यास सुरुवात केली. दोन तास मुलं रमून गेली. मघाशी तक्रार करणारी मुलं खांद्यावर हात टाकून एकमेकाला मदत करत होती आणि आजीच्या मुत्सद्दीपणाचं घरात कौतुक सुरू होतं.

आजीने दोन तासांनी साऱ्या मंडळींना अंगणात बोलावलं आणि मुलांच्या या कलेला साऱ्यांनीच दाद दिली. आजी म्हणाली, ''काय रे मुलांनो, मघाशी अंगण डोक्यावर घेणारे ते तुम्हीच ना? मग एकदम काय झालं असं की सगळे तुमचं कौतुक करताहेत?'' मुलांनी विचार करून उत्तर दिलं. ''आम्हाला आमच्या टीमला जिंकवायचं होतं. त्यामुळे भांडण सोडून आम्ही एकमेकांना विचारून काम करत होतो आणि किती मजा आली आजी. वेळ कसा गेला कळलंच नाही आणि एकटयाने करण्यापेक्षा सर्वांनी केलं, त्यामुळे थीमपण मस्त झाली.''

आजी म्हणाली, ''अरे, हे जे खेळात केलंत ना, हेच आपल्या रोजच्या जीवनातही करा. एकत्रित काम केलं की छान होतं की नाही...?''

 खरंच, आजीचा हा सल्ला खरं तर तुम्हा-आम्हा सर्वांनाच लागू पडणारा आहे. एकत्र येऊनच चांगल्या कामांना आकार देता येतो. या कलियुगात ईश्वर कुणा माणसाच्या, प्राण्याच्या रूपात प्रकट होणार नाही, तर एकत्रित प्रयत्नांतून, सांघिक भावनेच्या प्रकटीकरणातून तो साकारणार आहे.

तर अशी ही 'संघ'भावना आपल्याला खूप खूप बळ देते. तसं पाहिलं तर अगदी लहानपणापासून आपण ही 'संघवृत्ती' जोपासतच असतो. म्हणजे बघा हं, आपल्या घरी राहणारे, आपल्याशी बोलणारे, खेळणारे - इतकंच काय, घरातले 'माऊ', 'भूभू' हे सारे सारे आपली पहिली टीमच असतात.

मग मूल जसं मोठं होतं, तसं त्याच्याशी खेळणारे सवंगडी त्याला मिळतात आणि मग ज्यांच्याशी त्यांचं छान जमतं त्यांचा एक वेगळा गट बनतो. मग दोन गटात स्पर्धा रंगतात. दुसऱ्या गटापेक्षा वरचढ ठरविण्यासाठी व्यूहरचना तयार होतात. एकमेकांच्या कमतरता भरून काढण्यासाठी सहज प्रयत्न होतात आणि यातून मिळते एक अनोखी शक्ती - 'मी एकटा नाही, त्या संपूर्णाचा मी एक भाग आहे. ते संपूर्ण माझ्याविना अपूर्ण आहे आणि माझ्या अपूर्णतेला ते पूर्ण करत आहे' ही अव्यक्त भावना हळूहळू मनाशी पक्की होत जाते.

यानंतर शाळेत, महाविद्यालयात निमित्तानिमित्ताने अशा समूहाचे आपण सदस्य बनतो. खेळाच्या संघात नृत्य वा तत्सम कलाविष्काराच्या संघात किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या एखाद्या समूहात काम करू लागतो. हातात हात गुंफून काम करताना आपलं बळ दहा पटीने वाढतं.

शिक्षणानंतर स्वाभाविकच आपण या जगाच्या पटलावर एका परीक्षेत उतरतो. आपलं शिक्षण, आवड आणि संधी यांचा मेळ घालत आपल्या करिअरची निवड करतो आणि तिथेही एका समूहाचे सदस्य म्हणून काम करू लागतो. कधी समूहाचे सदस्य तर कधी त्याचे प्रतिनिधी, संचालक... पण समूहाच्या अस्तित्वाशी आपलं अस्तित्व कायमचं जोडलं जातं.

बघा ना, अगदी उतारवयातही माणसं आराम करत न बसता एखादा क्लब, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ, भजनी मंडळ, आजी-आजोबा कट्टा अशा समूहाचा सदस्य होऊन राहण्यातच आनंद मानतात.

थोडक्यात सांगायचं, तर माणूस समाजशील प्राणी आहे. तो एकटयाचं जग वसवणं पसंत करीत नाही. मग समूहात राहून स्वत:चं आणि इतरांचं कल्याण करण्याचा जो आपला नैसर्गिक गुण आहे, तो समजून घेत योग्य पध्दतीने जोपासला तर 'ज्योतीने ज्योत लागावी' तसं सारं मंगलच होईल. पटतंय ना?

आपण प्रवासात जातो, बाजारात जातो, तिथे आपल्याभोवती अनेक माणसं असतात. खूप गर्दी असते. आपण त्या गर्दीचा एक बिंदू असतो; पण त्याला काही आपला समूह म्हणता येत नाही, कारण तिथे प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र उद्दिष्ट असतं. याउलट जर घरातील चार व्यक्ती काही कार्यक्रमाची खरेदी करायला बाजारात गेल्या, वेगवेगळया ठिकाणी खरेदी केली, तर तो एक समूह किंवा Team आहेत. कारण त्या साऱ्यांचं एक विशिष्ट ध्येय आहे. त्यासाठी त्या सर्वांनी नियोजन केलं असणार. कामाचं वाटप करून मगच ते बाजारात येणार आणि त्या साऱ्यांच्या प्रयत्नांनी ठरवलेलं काम पूर्ण होणार. हेच आहे समूह कार्य किंवा ‘Team work’.

सीताहरण झाल्यावर रामाने सीतेला आणण्यासाठी लंकेत जाण्याचं ठरवलं, परंतु समुद्रातून पलीकडे जाणं हे एक आव्हान होतं. ते एकटयाने पेलण्यासारखं नव्हतं. मग यासाठी वानरसेनेला आवाहन करण्यात आलं. सर्व जण एकत्र आले. प्रत्येकाच्या क्षमता, कमतरता समजून घेत चर्चा, मंथन झालं आणि मग सारे जण अथक परिश्रमात गढून गेले. सागरालाही माघार घ्यावी लागली असा अद्भुत सेतू उभारला गेला.

असंच एक जवळचं उदाहरण पाहू या. एखाद्या व्यक्तीवर शस्त्रक्रिया केली जाते, तेव्हा ती केवळ एक सर्जन करतो का? नक्कीच नाही, तर त्याची एक team असते. त्यात तो सर्जन, ऍनास्थेशिऑलॉजिस्ट (भूलतज्ज्ञ), त्याला सहकार्य करणारी एखादी नर्स, सर्जनला सहकार्य करणारे ज्युनिअर डॉक्टर्स, नर्स, ऑपरेशन थिएटर आणि सर्व साधनं वेळोवेळी निर्जंतुक ठेवणारे कर्मचारी, रुग्णाच्या हालचालींवर देखरेख ठेवणारे, ठरावीक तपासण्या करणारे टेक्निशियन हे सारे त्यात समाविष्ट असतात.

या साऱ्याचं उद्दिष्ट एकच असतं - समोरील रुग्णाची शस्त्रक्रिया यशस्वी करून त्याला नवं जीवन देणं. हे समूहाचं पहिलं वैशिष्टय. जेव्हा टीममधील प्रत्येकाचं ध्येय एकच असतं, तेव्हाच ते एका दिशेने काम करतात.

आता या शस्त्रक्रियेच्या उदाहरणाबाबत आणखी काय काय गोष्टी लक्षात येतात ते पाहू या.

या टीममध्ये असणाऱ्या व्यक्ती या शिक्षणाने, अनुभवाने, वयाने, आर्थिक क्षमतेने अगदी भिन्न आहेत, पण प्रत्येकाचं काम एकमेकाला पूरक आहे. प्रत्येक जण या कामातली स्वत:ची जबाबदारी लक्षात घेऊन काम करत आहे. या साऱ्यांचं काम इतरांवर अवलंबून आहे. त्यामुळे कुणाच्या कामातील यशाबाबत इतरांना नकळतदेखील असूया वाटत नाही.

त्यांनी शस्त्रक्रियेच्या आधीच आवश्यक तयारी, नियोजन केलं आहे. कोणाला काय सांगावं, कुणी कधी काय करायचं हे निश्चित केलं आहे. यांचा परस्परांवर विश्वास आहे. शस्त्रक्रियेदरम्यान ही टीम खुणांनी, क्वचित शब्दांनी संवाद साधत असते. आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे प्रत्येकाला पूर्णपणे माहीत आहे. त्यांच्या कामात अनोखा ताळमेळ (Cordination) असतो.

कोणत्याही समूहाला यशस्वीपणे वाटचाल करायची, तर आवश्यक असते ती शिस्त. प्रत्येक समूहाचा एक स्वभाव असतो. त्याचे स्वत:चे काही नियम असतात. त्या नियमांचं पालन करणं हा या शिस्तीचाच एक भाग आहे. अर्थात हे नियम सर्वानुमते केलेले आणि सुटसुटीत असणं अपेक्षित आहे.

एकमेकांशी बोलता येईल असं मोकळं वातावरण समूहात असलं, तर निर्णयाच्या वेळी सर्वांचा सहभाग मिळतो.

प्रत्येक समूहाची विशिष्ट रचना असते. त्यात कोणी एक नायक असतो. समूहाने त्याच्यावर विश्वास दाखवत अंतिम अधिकार त्याला दिलेले असतात. त्यामुळे त्या व्यक्तीमध्ये गुणग्राहकता, संयम, सदसद्विवेक, सर्वांप्रती समभाव, आदर, उत्तम संवाद कौशल्य, सर्वांना एकत्रित बांधणारी नीती हे गुण असणं किंवा ते विकसित करणं ही या नेत्याची/नायकाची जबाबदारी आहे. कारण नेताच तर समूहाचं प्रतिनिधित्व करतो.

एकाच ध्येयाने एकत्र आलेल्या लोकांचा एक समूह बनतो, पण समूहातील प्रत्येकाचा रस वेगवेगळया गोष्टींत असला, तर...? कुटुंब हेदेखील एक समूहच आहे. पण जर त्यातील प्रत्येकाचं सुख वेगवेगळया गोष्टीत असेल, तर आणि सर्वांना जोडणारं असं काहीच समान उद्दिष्ट नसेल, तर ते कुटुंब म्हणून यशस्वी होऊ शकेल का?

अनेकदा समूहात काम करताना वैयक्तिक हेवेदावे मध्ये येतात. त्यामुळे नुकसान मात्र संपूर्ण समूहाचं होतं. म्हणूनच 'वयं पंचाधिकं शतं' या उक्तीप्रमाणे जेव्हा आपण एखाद्या नव्या गोष्टीकडे झेपावण्यासाठी एकत्र येऊ, तेव्हा वैयक्तिक गोष्टींना मागे ठेवता आलं पाहिजे.

यावरून मला बाबांनी सांगितलेला एक किस्सा आठवला. आमच्या गावात जमिनीवरून दोन व्यक्तींमध्ये वाद सुरू होते. त्यांची केस राजापूरच्या कोर्टात सुरू होती. त्या वेळी गाडया नव्हत्या. त्यांना कोर्टात चालत जावं लागे. केस असेल त्या दिवशी दोघे जण एकत्रच बाहेर पडत. जवळची शिदोरी एखाद्या ओढयापाशी बसून एकत्रच खात. गप्पागोष्टी करत कोर्टात पोहोचत. तिथे मात्र पक्के विरोधक बनून भांडत, पण पुन्हा येताना एकत्रच घरी येत. आहे की नाही team spiritचं उत्तम उदाहरण!

काही टीम सुरुवातीला छान काम करतात, पण काही वेळा प्रत्येक घटकाला समूहापेक्षा मोठं व्हावं असं वाटू लागतं. कधी प्रत्येक सदस्याचा परस्परसंवाद होईल असं वातावरण त्या समूहात नसतं, आपल्यावर अन्याय होतोय असं काही जणांना वाटू लागतं. अंतर्गत वाद वाढू लागतात आणि ते एकत्रित अस्तित्वाला खिळखिळं करतात. फितुरीची किती उदाहरणं आपल्या इतिहासात दिसतात. त्यांच्या मुळाशी हीच 'समूहापेक्षा आपण मोठं होण्याची' वृत्ती दिसते. याकरिता समूहाला पुढे नेणाऱ्या नेत्याची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. आणि तितकीच महत्त्वाची प्रत्येक सदस्याची भूमिका.

एखाद्या टीममध्ये मनमानी सुरू झाली की त्याचे तुकडे होणं निश्तिचत... त्यामुळे सदस्य हा समूहाचं एक अंग आहे, पण संपूर्ण समूह हा एका सदस्यापेक्षा जास्त मोठा आणि उपयुक्त आहे याची जाणीव प्रत्येकाला असेल, तरच तो समूह टिकतो. वाढतो.

आपण ज्या टीमचे भाग आहोत, त्यातील प्रत्येकाने एकसारखाच विचार केला पाहिजे, मतं तंतोतंत जुळलीच पाहिजेत असा अट्टाहास टाळला पाहिजे. आपल्यापेक्षा वेगळी मतंदेखील ऐकून घेणं, स्वीकारणं हा संस्कार टीममध्ये होत असतो. प्रत्येकाला त्याचं स्वत:चं मत आहे आणि ते मांडण्याची त्याला पूर्ण मोकळीक आहे हे 'आदर्श समूहाचं' वैशिष्टय आहे. कारण त्या मतांवरील चर्चेतूनच निर्णय आकार घेत असतात.

ज्या संस्थांत, संघटनांत प्रत्येक सदस्याचं म्हणणं, सूचना ऐकून घेतल्या जातात, त्यांचा सारासार विचार होऊन त्यानुसार योग्य निर्णय घेतले जातात, ती संस्था, संघटना भरभराटीला येते. संघपरिवाराशी जोडलं गेल्यावर एक मूलभूत तत्त्व मला टीमबाबत शिकायला मिळालं. बैठकीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची संधी मिळते. चर्चा होतात, पण एकदा का निर्णय झाला की तो प्रत्येक जण खुल्या दिलाने स्वीकारतो आणि मग त्याच्या अंमलबजावणीला यथाशक्ती हातभार लावला जातो. खरं तर हे तत्त्वच संघाच्या भक्कम अस्तित्वाचं एक प्रमुख कारण आहे. अर्थात याकरिता आपल्या समूहावर अतूट विश्वास असणंदेखील आवश्यक आहे.

ऑफिसमध्ये एखाद्या प्रोजेक्टची टीम असते. पण जर त्यांचा एकमेकांत योग्य प्रकारे संवाद नसेल. परस्परांबाबत आदर नसेल, तर... त्यांच्यात स्पर्धा असेल, तर... टीममधील लोक एकमेकांना अपयशी करण्यासाठी प्रयत्न करत असतील, तर...? त्यांच्या टीममध्ये छोटे छोटे 'गॉसिपिंग ग्रूप' असतील, तर... तर त्यांची स्थिती त्या गोष्टीतल्या लोकांसारखीच होईल. रस्त्यामध्ये पडलेला एक दगड हटवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. दगडाच्या चारी बाजूंना उभं राहून ते दगडाला ढकलू लागले. शक्ती खर्च होत होती, पण दगड काही जागचा हलेना.

आपण विविध समूहांचे सदस्य म्हणून वावरताना पुढील गोष्टींवर काम करू या -

l आपण ज्या समूहांचे सदस्य आहोत, त्यांचे उद्देश समजून घेऊन ते लिहून काढू या.

l त्या उद्देशांपर्यंत पोहोचण्याकरिता आपल्यातील क्षमता, सद्गुण यांची यादी करू या.

l समूहातील सर्वांशी समानतेने व्यवहार करतो का? वैयक्तिक गोष्टींना मध्ये आणत नाही ना? याचा विचार करू या.

l आपल्या टीममधील प्रत्येकाच्या क्षमता व कमतरता यांचा मोकळेपणाने विचार करू या.

l समूहात संवाद आहे का, परस्परांबाबत आदर आहे का? याचा विचार करून आपल्या व्यवहारातून तो आदर विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करू या.

l हेतू शुध्द असेल, तर वाणी, भाषा, देहबोली सारे शुध्दच असतात व त्यातून कुणालाही न दुखवता आपलं मत मांडता येतं.

l व्यक्तिहितापेक्षा समूहहित महत्त्वाचं मानून काम करणं ही काळाची गरज ओळखू या.

l आपण ज्या विविध समूहांचे सदस्य असतो, त्या प्रत्येक समूहाची रचना, संस्कती, कार्यपध्दती भिन्न असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे हा वेगळेपणा सावधपणे हाताळू या.

एखादी टीम म्हटलं की डोळयांसमोर सहज उभी राहते ती आकाशाच्या पार्श्वभूमीवर एका विशिष्ट पध्दतीने उडणारी पक्ष्यांची माळा... कसे उडतात ना ते, एक बिंदूतून निघणाऱ्या दोन तिरक्या रेषांप्रमाणे किंवा V for Victoryचा संदेश देणारेच भासतात कधीकधी. खरं तर असं एकत्रित उडण्याने आपली क्षमता दुपटीहून अधिक वाढते, हे त्या मुक्या जीवांना कसं कळतं कोणास ठाऊक. पण एकाच ध्येयासाठी ते उडतात. मधला पक्षी दिशा दर्शवत सर्वांना घेऊन जातो आणि एखाद्या सेनापतीप्रमाणे हवेच्या सर्वाधिक विरोधाला तोंड देत आपल्या टीमला पुढे नेतो. तो थकला की मागे येतो, त्याची जागा दुसरा पक्षी घेतो. हे असंच ईप्सित स्थळी पोहोचेपर्यंत सुरू राहतं. खरं तर सारे समूहाचे सदस्यच, पण समूहाची आवश्यकता ओळखून एकाने पुढाकार घ्यावा आणि त्याला साऱ्यांनी पाठबळ द्यावं, ही कला या पक्ष्यांकडून आपण आत्मसात करायला हवी असं मनोमन वाटतं.

आपल्या प्रत्येकात निसर्गाने वा परमेश्वराने काहीतरी विशेष दिलंय. पण आपण त्या गुणाला एकटेच न्याय देण्यास अपुरे असतो, तेव्हा अनेकांच्या योगदानाने त्या गुणाचं प्रकटीकरण होतं आणि तो गुण आपल्याला प्रतिष्ठा मिळवून देतो.

एखाद्या गाण्याचं पाहा ना. शब्दांच्या कळया उमलत जातात, त्याला समुधुर संगीताचा साज चढतो अन् अनेकांच्या एकत्रित प्रयत्नाने एखादं अजरामर गीत साकार होतं.

समूहाचं जीवनातलं महत्त्व समजून घ्यायला हवं. आपल्याला सुरक्षितता देणाऱ्या आपल्या समूहाचे, प्रत्येक सदस्याचे धन्यवाद मानले पाहिजेत.

ससा-कासवाने शर्यत सोडून या समूहाची महती जाणली अन् कासव नदीतून सशाला पाठीवर घेऊन पोहत गेलं, तर चढणीच्या अवघड वाटेवर सशाने आपली जबाबदारी चोख बजावत कासवाला पाठीवर घेतलं. अगदी छोटयाशा गावात राहणाऱ्या शेतकऱ्यालादेखील काठयांची जुडी मुलांना तोडायला सांगून हे एकीचं बळ काळाची गरज म्हणून मुलांसमोर मांडावंसं वाटलं.

जे शेतकऱ्यांला जाणवलं, जे ससा-कासवाला कळलं, ते संघ बनून परस्परांना स्वीकारत, संवाद साधत, विश्वास जपत, एकमेकांना पूरक होतं. एका विशाल ध्येयाकडे जाण्याचं हे मूल्य आपणही आपल्या जीवनात स्वीकारू या आणि समूहाच्या सप्तरंगाचा साज जीवनचित्रामध्ये भरू या...   

(लेखिका समुपदेशक आहेत.)

9273609555, 02351-204047

suchitarb82@gmail.com,