शेततळयांनी समृध्द होणार जळगाव

विवेक मराठी    23-May-2017
Total Views |


लहान व मोठया शेतकऱ्यांना शेततळे तयार करण्याच्या योजनेचा लाभ घेता यावा, म्हणून प्रशासनाने शेततळे मंजुरीचे धोरण लवचीक ठेवले आहे. कारण लहानातल्या लहान दोन एकर क्षेत्र असलेल्या व मोठया म्हणजे दहा एकर व त्यापेक्षा अधिक क्षेत्र बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता यावा, हा त्यामागील हेतू आहे. शेततळयाच्या आकारमानानुसार 22 हजारापासून 50 हजारापर्यंत अनुदान मंजूर केले जाते. खान्देशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ लागले आहेत.

ळगाव जिल्ह्यात हतनूर व वाघूर वगळता मोठे धरण नाही. इतर लहान-मोठया धरणांचाही शेती सिंचनापेक्षा पिण्याच्या पाण्यासाठी वापर अधिक. नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा व धरणगाव तालुक्यातील बऱ्याच भागांतील शेतीच्या सिंचनासाठी उपयुक्त गिरणा धरण मोठे असले, तरी ते भरण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील बराचसा भाग शाश्वत सिंचनापासून वंचित राहतो.

650 ते 700 मि.मि.पर्यंत पडणारा शिवारातला पाऊस अधिकाधिक प्रमाणात शिवारातच थांबविता यावा व गरज पडेल तेव्हा पिकाला सिंचनासाठी त्या पाण्याचा उपयोग करता यावा, यासाठी शेतकऱ्यांपासून ते शासनापर्यंत सगळयांनीच कंबर कसली आहे. मागेल त्याला शेततळे तयार करण्याची शासनाने दिलेली मुभा ही ग्रामीण व शेतकरी जीवन समृध्द करणारी ठरू पाहत आहे.

मोठमोठी धरणे आता शेतांपेक्षा शहरांची तहान भागविण्यापुरती उरली आहेत. दिवसेंदिवस शहरे फुगत चालली असल्याने पाण्याची गरजही वाढली आहे. त्यामुळे सिंचनासाठी निर्माण झालेली धरणे पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवली जाऊ लागली आहेत. महाराष्ट्रात धरणांद्वारे सिंचन व्यवस्था फारच तोकडी आहे. त्यात कितीही वाढ केली तरी शेतीची तहान ही धरणे भागवू शकत नाहीत, हे लक्षात आले आहे. परंतु सिंचनाशिवाय शेतकऱ्यांची प्रगती होऊच शकत नाही.

सध्या महाराष्ट्रातील सुमारे 80 टक्के शेती कोरडवाहू - म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने या भागातल्या शेतकऱ्यांनी खोदलेल्या विहिरीही कोरडयाठाक पडल्या आहेत. अशा शेतीला शेततळी संजिवनी ठरू शकणार आहेत. विविध प्रकारच्या शेततळयांमुळे शेतकरी आपल्या पिकांना संरक्षित पाणी देऊन उत्पादन वाढवू शकणार आहेत.

शेततळयांचे प्रकार

लहान व मोठया शेतकऱ्यांना शेततळे तयार करण्याच्या योजनेचा लाभ घेता यावा, म्हणून प्रशासनाने शेततळे मंजुरीचे धोरण लवचीक ठेवले आहे. कारण लहानातल्या लहान - दोन एकर क्षेत्र असलेल्या व मोठया म्हणजे दहा एकर व त्यापेक्षा अधिक क्षेत्र बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता यावा, हा त्यामागील हेतू आहे. शेततळयाच्या आकारमानानुसार 22 हजारापासून 50 हजारापर्यंत अनुदान मंजूर केले जाते. त्यानुसार पुढील 7 प्रकारची शेततळी तयार करता येतात. शेततळयांच्या लांबी-रुंदीत बदल करता येतो, परंतु त्यांची खोली 3 मीटरच असते. त्यांचे आकारमान व त्यात साठणारा जलसाठा पुढीलप्रमाणे - 30 # 30 मीटर शेततळे असेल, तर त्यात 2196 टीसीएम पाणीसाठा होतो. 30 # 25 मीटर शेततळयात 1791 टीसीएम, 25 # 25 आकाराच्या शेततळयात 1461 टीसीएम,25 # 20 मीटर शेततळयात 1131 टीसीएम, 20 # 15 मीटर आकारात 0.621 टीसीएम, 15 # 15 मीटर आकाराच्या शेततळयात 0.441 टीसीएम इतका जलसाठा होतो. शेतकरी वरीलपैकी कोणत्याही प्रकारच्या शेततळयाची निवड करू शकतात.

खान्देशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ लागले आहेत. जिल्ह्यात येत्या काळात 2 हजार शेततळी निर्मितीचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. त्यासाठी 4 कोटी 29 लाख रुपये इतका निधी लागणार असून त्यापैकी 2 कोटी 68 लाख निधी खर्च झाला आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 1221 शेततळी पूर्ण झाली आहेत. यासाठी शासनाने जिल्ह्यातील लाभधारक शेतकऱ्यांना सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी तत्काळ वितरित केला आहे. शेततळयांना जलयुक्त शिवारशी जोडले असल्याने या कामांना गती मिळाली आहे. त्यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात कृषी विभागाने व सिंचन विभागाने गावोगावी ग्रामसभा घेऊन शेततळे घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित केले.

शेततळे मंजूर करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ते aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल करतात. शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी तालुका पातळीवरील कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी सहकार्य करतात.

शेततळयात मत्स्यपालन

सिंचनासाठी शेततळयाचा वापर जसा यशस्वी ठरतो, तसाच शेतकऱ्यांनी मत्स्यपालनासाठीही करावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मत्स्यबीजाची निवड करण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. त्रिस्तरीय मत्स्योत्पादनासाठी प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी 40 # 40 मीटर लांब-रुंद व 5 मीटर खोल शेततळे तयार करावे लागते. सध्या शेतकरी सिंचनासाठीच शेततळयाचा अधिक उपयोग करत असून मत्स्योत्पादनाकडे त्यांचा कल 'नाही'त जमा आहे.

8805221372