'जंजिरे मेहरूब' आणि मी

विवेक मराठी    23-May-2017
Total Views |

मी त्याच्याकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, ''तरीही हा अजिंक्यच आहे. खचलंय त्याचं शेकडो वर्षांपूर्वीचं जुनं शरीर. पण कमावलेलं नाव मात्र अजूनही तसंच आहे. इतिहासाच्या पानांत, वर्तमानाच्या मनात आणि भविष्याच्या उदरात आमच्या ओळखी वर्षानुवर्षं कायम राहतील. तो... 'जंजिरे मेहरूब' आणि मी... 'त्याचं आयुष्य पाहिलेला एक जलदुर्ग.'


र मंडळी, आज मी तुम्हाला आम्हा दोघांची गोष्ट सांगणार आहे. त्याच्या गोष्टी फार ऐकल्या असतील तुम्ही. तितका प्रसिध्द आहेच म्हणा तो. त्याच्याबद्दल लिहिलेलं तुम्हाला सगळीकडे सापडेल. तीन-चारशे वर्षांपूर्वीच्या बखरींत, इतिहासाच्या पुस्तकांमध्ये, स्थानिक लोककथांमध्ये - इतकंच काय, तर विकिपीडियाच्या पेजवरसुध्दा. पण आमची ही गोष्ट तुम्हाला कुठे मिळायची नाही. गोष्ट कसली, आमच्या आयुष्याचीच कहाणी म्हणा ना!

तर आधी थोडंसं माझ्याबद्दल. मी असा मधोमध उभा आहे. काळयाशार खडकावर पाय घट्ट रोवून. डाव्या बाजूला पाहिलं की शांत, निवांत किनारा. त्याच्यावरची चमचमती वाळू. उजव्या बाजूला अथांग पसरलेला निळाशार समुद्र. किनाऱ्याला समुद्राच्या अथांगपणाचं आकर्षण, तर समुद्राच्या लाटांना किनाऱ्याच्या पूर्णविरामाची असोशी.

गेली कित्येक वर्षं या खडकावर उभं राहून समुद्राची वेगवेगळी रूपं बघतोय मी. कधी पुरुष पुरुष उंचीच्या उसळत्या लाटा, कधी पूर्ण निःशब्द - इतकं की एखाद्या ॠषीपेक्षाही धीरगंभीर, तर कधी रोरावत्या वाऱ्यासंगं आणखीनच खवळलेला. दर वेळी वेगळा दिसणारा, तरी आपला वाटणारा दर्या. आणि या दर्यात माझ्याच संगतीने आणखी एक जण असाच उभा आहे.

थेट माझ्या नजरेसमोर काही मैलांवर. माझ्यासारख्याच एका काळयाभोर खडकाच्या पाठीवर. माझ्याच नजरेसमोर बघता बघता उभा राहिला आणि मग मोठा झाला. कळत-नकळत त्याचंच नाव सर्वांच्या मुखी झालं. त्याने आधी स्वतःची ओळख निर्माण केली आणि मग वर्षानुवर्षं इथल्या मातीला, इथल्या इतिहासाला आणि इथल्या भूगोलाला त्याचीच ओळख मिळाली. आज कितीशे वर्षं झालीत. अजूनही माझ्या नजरेसमोरून त्याच्या उमेदीची वर्षं हटत नाहीत.

जशा काळयाशार बेटावर मी उभा आहे, तसंच एक बेट माझ्या नजरेच्या टप्प्यात पण काही मैल अंतरावर होतं. लांबरुंद पसरलेल्या त्या बेटावर बघता बघता तो उभा राहिला.

मला आठवतं, त्याच्या बांधणीच्या मनसुब्याची खलबतं माझ्याच सदरेवर झाली. त्याच्या महाद्वाराची रचना, बालेकिल्ल्याचं काम या साऱ्याचा मी साक्षीदार होतो. त्याच्या बांधकामाचं सगळं साहित्य गलबत भरून भरून माझ्या आवारात यायचं आणि मगच पुढे जायचं. शिसं वितळवून त्याचा पाया घातला गेलेला. भरभक्कम पायावर एकेक चिरा आणि घाशीव कातळ चढत गेले. चाळीस फूट उंचीच्या त्या दुर्गाच्या भिंतीपुढे खवळलेल्या समुद्रातल्या अकराळविकराळ लाटासुध्दा खुज्या वाटायच्या. माझ्या डोळयासमोर तो आकार घेत होता. 26 बुरूज बांधले गेले. एकेक बुरुजावर तोफा चढवल्या गेल्या. त्याचं बांधकाम पूर्ण झालं. माझ्या डोळयांसमोर एक अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग जन्म घेत होता. अथांग समुद्रालाही कवेत घेत तो उभा राहिला. एका दिवशी त्याच्या उन्नत मस्तकावर मालकाचं निशाण उभं राहिलं.

बघता बघता त्याची कीर्ती वाढू लागली. माझ्या आजूबाजूचा प्रदेशही त्याच्याच नावाने ओळखला जाऊ  लागला. तीस तीस पुरुष उंच लाटा अंगावर घेतानाचा त्याचा बेफामपणा, बुरुजांवरच्या कराल तोफांमधून सुटणाऱ्या तोफगोळयांचा बेलगामपणा, त्याच्यावर डौलाने फडकणाऱ्या निशाणाचा तोरा याच्या चर्चा रंगू लागल्या. बघता बघता तो 'मोठा' झाला. तो साधासुधा जलदुर्ग राहिला नाही. त्याचं मोल वाढलं. इतिहासकारांनी त्याच्या वर्णनाने आपल्या बखरी भरल्या. तो आपल्याचकडे असावा अशा इच्छेपोटी त्याच्यावर सत्ताधीश चालून जाऊ  लागले. कुणी दहा हजाराच्या फौजेने त्याच्यावर चालून गेलं, कुणी त्याच्या चाळीस फुटी अजस्र तटबंदीला शह द्यायचा प्रयत्न केला, तर कुणी भूमिगत भुयार खोदून त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला.. पण तो मात्र अजिंक्य राहिला. त्याच्या अभेद्यतेच्या कथा मग पुढे जाऊन आख्यायिका झाल्या. जिथे अथांग अशा समुद्राच्या अविरत लाटांच्या धडकांनी कधी तो ढळला नाही, तिथे हाडामांसाच्या माणसाची काय कथा? आताशा त्याच्यावर फडकणारं निशाण त्याच्या मालकाची मक्तेदारी नाही, तर त्याच्या अजिंक्यतेचा तोरा मिरवू लागलं. त्याच्या या साऱ्या आलेखाचा मी साक्षीदार होतो, अजूनही आहे.

बघता बघता डोळयांसमोर एखादा इतका मोठा होतो, नाव करतो, अजिंक्य राहतो आणि मग आभाळाच्याच नजरेला नजर देत दूरवर जाऊन पोहोचतो. हे सगळं आपल्या आजूबाजूलाही घडत असतंच. राजकारणात, कॉर्पोरेटमध्ये, रोजच्या आयुष्यात... मी फक्त त्याच्या प्रवासाचा एक साक्षीदार ठरलो. बघता बघता तो 'जंजिरे मेहरूब' झाला आणि मी??... मीही तसाच एक जलदुर्ग, पण माझं नाव इतिहासातल्या कुठल्यातरी बखरीत कुठल्याश्या पानावर लिहिलंय. ना मी ते शोधायचे कष्ट घेत, न इतिहास त्याविषयी फार काही बोलत. 'जंजिरे मेहरूब'सारखं कौतुक आमच्या नशिबी नाही.

कित्येकशे वर्षांपासून आम्ही असे एकमेकांसमोर उभे आहोत. 'जंजिरे मेहरूब' आणि मी. परवाच्याला एक समुद्रपक्षी त्याच्या अंगावरून उडत उडत आला आणि माझ्या ढासळत्या बुरुजावर येऊन बसला. मी त्याला विचारलं, ''कसाय रे आपला 'जंजिरे मेहरूब'?'' तो म्हणाला, ''तुझ्यासारखाच.'' मी चपापलो. म्हटलं, ''म्हणजे?'' तो समुद्रपक्षी म्हणाला, ''म्हणजे ढासळते बुरूज, खचलेल्या भिंती, कलथून पडलेले दरवाजे...'' खरंच असाच झाला असेल का तो? मला आठवला डौलाने फडकणारा अजिंक्यतेचा झेंडा. मला आठवले ह्याच्या मोहिमेवरून हताश होऊन मागे फिरणारे योध्दे. सलग तीनशे-साडेतीनशे वर्षं अपराजित राहिलेला हा जलदुर्ग. आता ढासळला असेल का आतून? पोखरून गेले असतील का त्याचे बुरूज? चाळीस फुटी उंच तटबंदीला पडली असतील का भगदाडं? गंजून गेल्या असतील का नेमक्या अंतरावरून शत्रूची गलबतं टिपणाऱ्या तोफा?? मी मी म्हणणाऱ्या सत्ताधीशांच्या रेटयापुढे न हटणारा, सर्वशक्तिमान काळाच्या रेटयापुढे गारद होईल का? माझ्या मनात प्रश्नांच्या लडी फुटू लागल्या. मी त्याच्याकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, ''तरीही हा अजिंक्यच आहे. खचलंय त्याचं शेकडो वर्षांपूर्वीचं जुनं शरीर. पण कमावलेलं नाव मात्र अजूनही तसंच आहे. इतिहासाच्या पानांत, वर्तमानाच्या मनात आणि भविष्याच्या उदरात आमच्या ओळखी वर्षानुवर्षं कायम राहतील. तो... 'जंजिरे मेहरूब' आणि मी... 'त्याचं आयुष्य पाहिलेला एक जलदुर्ग.'

(टीप : सदर लेख हा ललित लेख असून यातील ऐतिहासिक संदर्भ हे लेखाच्या सोयीनुसार वापरलेले आहेत.)

9773249697