आधुनिक राष्ट्रवाद व नव - राष्ट्रवाद

विवेक मराठी    23-May-2017
Total Views |


राष्ट्रवादासंदर्भात जी पूर्वग्रहदूषित व्याख्या विकसित झाली आहे, त्याच आधारे भारतातील घडामोडींचे मूल्यमापन केले जात आहे. मोदी सरकारच्या टीकाकारांच्या हे लक्षात येत नाही की ब्रेक्सिट, ट्रंप, मरीन ली पेन हे सर्व व मोदी यांच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. त्यांच्याप्रमाणे मोदी यांचे नेतृत्व हे प्रतिक्रियात्मक नव-राष्ट्रवादाच्या क्षणिक लाटेतून उत्पन्न झालेले नसून नव्वद वर्षांच्या व चार पिढयांच्या सकारात्मक राष्ट्रवादाच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झाले आहे.

ब्रेक्सिट व ट्रंप यांचा विजय या घटनांनंतर फ्रान्सच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. फ्रान्सच्या निवडणुका दोन टप्प्यात होतात. पहिल्या टप्प्यात जे उमेदवार पहिल्या दोन क्रमांकांची मते मिळवितात, त्यांच्यात दुसऱ्या फेरीची निवडणूक होते. दुसऱ्या फेरीत मॅक्रॉन यांनी उजव्या विचारांच्या मरीन ली पेन यांचा पराभव केल्याने सध्यातरी जागतिकीकरणाच्या पुरसर््कत्यांना आनंदाचे भरते आले आहे. सध्यातरी म्हणण्याचे कारण मरीन ली पेन यांना जवळजवळ चाळीस टक्के मते मिळाली आहेत. जर मॅक्रॉन यांना फ्रान्ससमोरील प्रश्न सोडविण्यात अपयश आले, तर तिथले राजकीय चित्र बदलू शकते. ज्याला आज 'अतिउजवे' या शब्दाने हिणविले जाते, ती विचारधारा लोकप्रिय होण्याची जी महत्त्वाची कारणे आहेत, त्यांची गांभीर्याने चिकित्सा केली जात नाही. मुक्त व्यापाराचा व खुल्या सीमांचा आग्रह धरणारे जागतिकीकरण व स्थलांतरितांना मानवतेच्या दृष्टीकोनातून आश्रय दिला पाहिजे असे सांगणारा उदारमतवाद या दोन्ही गोष्टी व्यवहारात का अपयशी ठरत आहेत, यावर ते चर्चा करायला तयार नाहीत. जागतिक मंदी हटविण्यासाठी जागतिकीकरण हाच रामबाण उपाय आहे असे सांगितले जात होते. परंतु ती अपेक्षा फोल ठरली असून त्यातून जागतिकीकरणाचा लाभ मिळालेला एक वर्ग सर्व देशात निर्माण झाला आहे. प्रसारमाध्यमे, विद्यापीठे यांच्यावर या वर्गाचा प्रभाव आहे आणि त्यांचे हितसंबंधही त्यात गुंतले आहेत. त्यामुळे जागतिकीकरणाला विरोध म्हणजे संकुचिततावाद असे समीकरण त्याने तयार केले आहे. त्याचबरोबर इस्लामी जगतातील दहशतवादी कारावायांमुळे लक्षावधी लोक निर्वासित झाले आहेत. या कारवाया कोणत्या प्रवृत्तीतून घडत आहेत, याची चिकित्सा न करता अशा निर्वासितांना आसरा देणे म्हणजे उदारमतवाद असे समजले जात आहे. अशा निर्वासितांच्या माध्यमातून दहशतवादी प्रवृत्ती वेगवेगळया देशांत प्रवेश करीत आहेत. या दोन्ही कारणांमुळे जागतिकीकरण व उदारमतवाद यांच्या विरोधात प्रतिक्रियात्मक वातावरण तयार झाले आहे. याला 'उजव्या प्रवृत्ती' म्हटले जाते. आता त्याला 'नव-राष्ट्रवाद' असेही नाव मिळाले आहे. हा नव-राष्ट्रवाद भावनिक व आत्मसुरक्षेच्या भावनेतून निर्माण झालेला प्रतिक्रियात्मक राष्ट्रवाद असल्याने त्यातूनही आजच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील असे नाही. पण या जागतिक घडामोडींनी नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे, हे मात्र निश्चित.

जगातील सर्व प्रश्नांचे आपल्यापाशी उत्तर आहे, असा ठाम दावा करीत विसाव्या शतकात अनेक विचारसरणी उभ्या राहिल्या. मात्र त्या शतकाअखेर फक्त मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणारी जागतिकीकरणाची विचार प्रणाली तेवढीच शिल्लक राहिली. मानवी हक्कांवर आधारलेला उदारमतवाद व अर्थव्यवस्थेला व उद्योगांना चालना देणारी मुक्त जागतिक बाजारपेठ या दोन्ही आकर्षित करणाऱ्या संकल्पना होत्या. परंतु या दोन्ही गोष्टी यशस्वी व्हायच्या असतील, तर जागतिक स्तरावर समान सांस्कृतिक मूल्यधारणा निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर केवळ नफ्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या जागतिक बाजारपेठेत जे स्पर्धात्मक वातावरणात टिकू न शकणारे घटक आहेत, त्यांचे शोषण होणार व जागतिकीकरणाला विरोध सुरू होणार हे निश्चित होते. यात आश्चर्याची गोष्ट एवढीच घडली की ही प्रक्रिया अविकसित देशात सुरू होण्याऐवजी विकसित अमेरिके त व युरोपमधल्या ग्रामीण भागात सुरू झाली. त्यामुळे जगभरातील सर्व देशांतील समाजात जागतिकीकरणाला पाठिंबा देणारे व त्याच्या विरोधी असणारे अशी फूट पडली आहे. सर्वच प्रकारच्या तंत्रज्ञानातील - विशेषत: संपर्क तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जग झपाटयाने एकत्र येत आहे. पण ते एकत्र येत असताना त्याचसोबत मानवी मनाचा, संस्कृतीचा जो विकास व्हायला पाहिजे, तो झालेला नाही. आज पर्यावरणासह विविध क्षेत्रांत अनेक आंतरराष्ट्रीय संस्था उभ्या राहिलेल्या आहेत, त्यांच्या परिषदा होत आहेत. पण त्यातून जगात जे चाललेले अंत:संघर्ष आहेत, त्यांची पुरेशी दखल घेतली गेलेली नाही. यामुळे प्रतिक्रियात्मक राष्ट्रवाद निर्माण झालेला आहे, त्याच्यापाशीही स्वत:चा असा कोणताही स्पष्ट पर्यायी कार्यक्रम नाही. स्टीफन हॉकिन्स यांनी शंभर वर्षांनंतर उल्कापाताने पृथ्वी नष्ट होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे. जगातील संघर्ष आणि वाढत जाणाऱ्या प्रहारक्षमता पाहता नष्ट होण्यासाठी मानवजात कशा स्वरूपात शिल्लक राहिली असेल, असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ  शकतो. पण आजवर मानवजातीवर अनेक संकटे आली, तरी माणसाच्या शहाणपणाने विध्वंसक प्रवृत्तीवर मात केली आहे.

आधुनिक राष्ट्रवादाचे स्वरूप

आधुनिक राष्ट्रवादाची संकल्पना गेल्या चार-पाचशे वर्षांत युरोपमध्ये जन्मली व युनोच्या रूपात तिचा जगाने स्वीकार केला आहे. जगातील प्रत्येक नागरिक कोणत्या ना कोणत्या देशाचा नागरिक असून त्या देशातील घटनेच्या अंतर्गत असलेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ  शकतो. देश लहान असो वा मोठा, त्याच्या सार्वभौमत्वाची व अधिकृत सीमांच्या रक्षणाची हमी युनोने दिलेली असते. प्रत्यक्षात त्याचे किती पालन होते ही गोष्ट बाजूला ठेवली, तरी हा मुद्दा एक मूलभूत तत्त्व म्हणून मान्य केला गेला आहे. परंतु असे असले, तरी आधुनिक राष्ट्रवादाची सूत्रे सर्व देशांतील समाजात रुजली आहेत असे नाही. त्यामुळे अनेक देश महत्त्वाकांक्षी नेत्यांचे बळी बनलेले आहेत. त्यामुळे आधुनिक राष्ट्रवादाच्या भावनेचा विकास कसा झाला, यावर थोडी नजर टाकली पाहिजे.

राष्ट्रवादाच्या अनेक व्याख्या आहेत. त्यांच्या तपशिलात न जाता असे म्हणता येईल की एक स्वायत्त व सार्वभौम समाज म्हणून राहण्याची एखाद्या समाजाची सामूहिक इच्छा म्हणजे राष्ट्रवाद. मुळात माणसाला समाज म्हणून एकत्र राहावेच असे का वाटते? याची अनेक उत्तरे संभवू शकतात. या सर्व उत्तरांचे तीन गटांत वर्गीकरण करता येईल. सर्व माणसामध्ये एकच आत्मतत्त्व असल्याने ते जागृत आत्मतत्त्वच व्यक्तीला समाजाशी जोडते, असे हिंदू परंपरा व तत्त्वज्ञान मानते. ईश्वराने हे जग निर्माण केलेले असल्याने व मानव समाज ही त्याची सर्वात आवडती निर्मिती असल्याने खास प्रेषित पाठवून माणसाला एक समाज म्हणून राहण्याकरिता त्याने नियमावली घालून दिलेली आहे व तिचे पालन करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे, असे सेमेटिक धर्म मानतात. तर जीवनविषयक संघर्षात माणूस दुबळा असला, तरी टोळीच्या संघटित मानसिकतेतून समाजनिर्मितीपर्यंतचा त्याने जो प्रवास केला, यामुळे त्या संघर्षात मानवजात यशस्वी झाली, असे डार्विनच्या सिध्दान्ताच्या आधारे विज्ञानवादी स्पष्ट करतात. युरोपमध्ये जो आधुनिक राष्ट्रवादाचा प्रवास झाला, तो ख्रिश्चन धर्मश्रध्दांच्या पार्श्वभूमीवर झाला. सेमेटिक धर्मश्रध्दा किती बळकट असतात, यासाठी ज्यू समाजाचे उदाहरण पुरेसे आहे. गेली अनेक शतके हा समाज देशोदेशात विभागला गेला, अनेक अत्याचारांचा धनी झाला, त्याची ससेहोलपट झाली. पण आपणाला स्वातंत्र्य मिळाले, त्या सुमारास ज्यू समाजाला त्याच्या धर्मश्रध्देतून स्वत:चे असे स्वतंत्र राष्ट्र मिळाले. इस्रायलची निर्मिती हे सेमेटिक धर्मश्रध्देतून निर्माण झालेली समाजनिर्मितीची प्रक्रिया किती बळकट असू शकते याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

युरोपमध्ये जशी वैज्ञानिक क्रांती झाली, तसे तेथील वैचारिक वातावरण बदलू लागले. एक तर आपल्यापाशी मानवी मुक्ती देण्याचा एकाधिकार आहे असा दावा करणाऱ्या चर्चमध्ये भ्रष्टाचाराने थैमान मांडले होते. एका मागोमाग लागत गेलेल्या शोधांमुळे बायबलप्रणीत कथा खोटया ठरत होत्या. इतिहासातील काही घटना या इतिहासाला निर्णायक वळण देत असतात. 1347 व 48मध्ये युरोपमध्ये प्लेगने थैमान मांडले. 'ब्लॅक डेथ' या नावाने ती साथ ओळखली जाते. या साथीत अनेक देशांतील एक तृतीयांशाहून अधिक लोक बळी पडले. या साथीवर धर्मश्रध्दा मात करू शकत नाही, हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आले. याचा परिणाम चित्रकला, संगीत आदी कलांवरही पडला. धर्मश्रध्देला ओहोटी लागण्याची जी अनेक कारणे घडली, त्यात याचा समावेश आहे. वैज्ञानिक शोधानंतर निसर्गाची गूढे उलगडू लागली. निसर्ग कोणत्या नियमांनी चालतो, हे माणसाच्या लक्षात येऊ  लागले. एकदा हे नियम लक्षात आल्यानंतर निसर्गाला आपल्या कामाला जुंपता येऊ  शकते हेही त्याच्या लक्षात आले. भाबडया धर्मश्रध्देपेक्षा डोळस वैज्ञानिक बुध्दीचा प्रभाव वाढला. त्याचा बौध्दिक आत्मविश्वास वाढला. याचे सर्वंकष परिणाम झाले.

एकेकाळी धर्मश्रध्देवर समाजाचा व्यवहार चालत असे. त्याचबरोबर राजालाही ईश्वराचा प्रतिनिधी मानले जात असे. परंतु जेव्हा ईश्वराच्या श्रध्देवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले, तेव्हा स्वाभाविकच त्या आधारे ज्या श्रध्दा उभ्या होत्या, त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यातून अशा श्रध्दांच्या आधारे समाजाचे नियमन करण्याऐवजी ते विवेकवादाच्या आधारावर केले पाहिजे, अशी नवी जाणीव निर्माण झाली. ईश्वराला टाळून समाज परस्पराशी करारभावनेने बांधला जाऊ  शकतो, या दृष्टीने नवी संस्कृती निर्माण होऊ  लागली. प्रत्येक देशाची घटना हा समाजातील परस्परसंबंधांचा आधार बनला. असा करार करण्याच्या व त्याची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेत सर्व समाजाचा सहभाग असला पाहिजे, यातून लोकशाहीची संकल्पना विकसित झाली. जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही मूलभूत हक्क आहेत व त्या हक्कांचे संरक्षण करणे हा या सामाजिक कराराचा गाभा असला पाहिजे, याचा आग्रह धरला जाऊ लागला. धर्मग्रंथांपेक्षा लोकांच्या सामूहिक शहाणपणातून सार्वजनिक हिताचे निर्णय घेतले गेले पाहिजेत अशी लोकप्रतिनिधित्वाची व्यवस्था विकसित होऊ  लागली. ईश्वरभक्तीचे क्षेत्र व्यक्तिगत श्रध्देपुरते मर्यादित राहिले पाहिजे, असे बंधन घातले गेले. यातून आधुनिक राष्ट्रवादाची संकल्पना निर्माण झाली. परंतु ज्या पश्चिम युरोपमध्ये ही प्रक्रिया विकसित होत होती, तिथेच त्या विकासक्रमाने विकृत वळणे घेतली व त्यातून ही संकल्पना बदनाम झाली.

हुकूमशाही - आक्रमक राष्ट्रवाद

पश्चिम युरोपमध्ये आधुनिक राष्ट्रवादाची भावना जसजशी विकसित होत होती, त्याचसोबत औद्योगिक क्रांतीही घडत होती. उत्पादनाच्या यांत्रिकीकरणामुळे तेथील उत्पादनक्षमता प्रचंड वाढली. ती भागविण्याकरिता मोठया प्रमाणात कच्चा माल आवश्यक होता व त्यातून तयार झालेला पक्का माल खपविण्याकरिता बाजारपेठा आवश्यक होत्या. हुकमी स्वस्त कच्चा माल पुरविण्यासाठी व पक्क्या मालासाठी हुकमी बाजारपेठ मिळावी, म्हणून ब्रिटन, फ्रान्स यांनी आफ्रिकी व आशियाई देशांत आपल्या साम्राज्याचा विस्तार सुरू केला. ब्रिटन, फ्रान्स यांना वसाहती मिळाल्या, तशा जर्मनीला मिळाल्या नाहीत. त्यामुळे स्लाव्ह देशात आपल्याला साम्राज्यविस्तार करण्याची परवानगी मिळावी, अशी जर्मनीची मागणी होती. ती पुरी करून इंग्लंडला युरोपमध्ये आपल्या प्रतिसर््पध्याला बळ प्राप्त करून द्यायचे नव्हते. युरोपमधील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माक्र्सने 'राष्ट्रवाद म्हणजे भांडवलशाहीने घेतलेला बुरखा आहे' असे विवेचन केले. सरंजामशाहीच्या युगात धर्माच्या तत्त्वज्ञानाने शोषित वर्गाला अफूच्या गुंगीत ठेवून शोषणाची जाणीव होऊ  दिली नाही, तेच काम भांडवलदारी व्यवस्थेत राष्ट्रवाद करीत आहे, असे त्याचे प्रतिपादन होते. ब्रिटन, फ्रान्स यांचा साम्राज्यवादी राष्ट्रवाद व त्याच्या विरोधातील जर्मनी व इटली यांचा आक्रमक - हुकूमशाही राष्ट्रवाद असे राष्ट्रवादाचे दोन चेहरे विसाव्या शतकात जगासमोर आले. त्यामुळे दुसऱ्या महायुध्दानंतर कम्युनिझमचा वैचारिक प्रभाव वाढत गेला. परंतु रशिया व चीन या दोन्ही प्रमुख देशांतील कम्युनिस्ट अर्थव्यवस्था कोसळून पडल्याने तो प्रभाव संपला. हे घडत असतानाच युरोपमध्ये दुसऱ्या महायुध्दानंतर स्पर्धेऐवजी सहकार्याची, युरोपीय व्यापारी महासंघाची स्थापना झाली. त्याद्वारे युरोपीय सहकार्याची क्षेत्रे वाढतच गेली. त्याचाच परिणाम जागतिक स्तरावर जागतिकीकरणाची संकल्पना राबविण्यात झाला.

एक काळ असा होता की जागतिकीकरण हे प्रत्येक आर्थिक प्रश्नावर एकमेव उत्तर आहे असे मानले जात असे. पण युरोपमध्येही ग्रीसने युरोपीय महासंघापुढे प्रश्नचिन्ह निर्माण केले. तूर्त त्यातून मार्ग काढला गेला असला, तरी तिथले प्रश्न सुटलेले नाहीत. एकेकाळी युरोप, अमेरिका व जपान यांनी जगाचे आर्थिक नेतृत्व केले. आता हे देश थकले आहेत व चीनचे अध्यक्ष क्षि जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने आंतरराष्ट्रीय विस्तारवादाची सूत्रे हाती घेतली आहेत. आजवर भारत-पाक प्रश्नात अमेरिका व ब्रिटन यांची सहानुभूती पाकिस्तानच्या बाजूने राहिली असली, तरी त्यांचे या क्षेत्राशी प्रदेशिक हितसंबंध नव्हते. एका बाजूला ऑॅस्ट्रेलिया, न्यूझिलंड, इंग्लंड, अमेरिकेसकट सर्वत्र वाढणारा नव-राष्ट्रवाद व चीनचा वाढता विस्तारवाद यामुळे नवे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यातच आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवजात प्रबळ झाली असली, तरी व्यक्तीच्या स्तरावरील असुरक्षितता वाढली आहे. चीनमध्ये हुकूमशाही असल्याने तिथल्या सरकारला याचा त्रास कमी आहे. परंतु भारतात लोकशाही असल्याने एका बाजूला आंतरिक अस्थिरता व दुसऱ्या बाजूला हुकूमशाही चीनचा विस्तारवाद या दोन्ही प्रश्नांच्या चिमटयात भारत सापडला आहे. काश्मीरचा वाढत जाणारा प्रश्न ही त्याची फक्त  झलक आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादासंदर्भात जी पूर्वग्रहदूषित व्याख्या विकसित झाली आहे, त्याच आधारे भारतातील घडामोडींचे मूल्यमापन केले जात आहे. मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर जे लेख प्रकाशित होत आहेत, त्यातील त्यांच्यावर टीका करणाऱ्या अनेक लेखांचा मथितार्थ एकच आहे व तो म्हणजे मोदी सरकारवर टीका केल्यानंतर त्या टीकेला सरकार उत्तर देण्याच्या आधीच सरकारचे टीकाकार अशा लेखकांवर तुटून पडतात. मोदी सरकारच्या टीकाकारांच्या हे लक्षात येत नाही की ब्रेक्सिट, ट्रंप, मरीन ली पेन हे सर्व व मोदी यांच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. त्यांच्याप्रमाणे मोदी यांचे नेतृत्व हे प्रतिक्रियात्मक नव-राष्ट्रवादाच्या क्षणिक लाटेतून उत्पन्न झालेले नसून नव्वद वर्षांच्या व चार पिढयांच्या सकारात्मक राष्ट्रवादाच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झाले आहे. मोदींवर हल्ला झाल्यावर प्रतिहल्ला करणारे मोदींच्या सत्तेचे व्यक्तिश: लाभार्थी नाहीत. मोदींसह ते सर्व जण देशाची समान स्वप्ने पाहत आहेत. ती स्वप्ने कोणती आहेत हे समजावून घेतल्याशिवाय विस्तारवादी, हुकूमशाही - आक्रमक राष्ट्रवाद व संघाने व्यवहारात जगलेला राष्ट्रवाद यातील फरक लक्षात येणार नाही.        

  kdilip54@gmail.com