मैत्रीचं मोल जाणणारा सुहृद - दत्तात्रेय म्हैसकर

विवेक मराठी    27-May-2017
Total Views |


एका राजकीय नेत्याशी, वजनदार राजकीय नेत्याशी झालेली मैत्री ही साहजिकच समाजात चर्चेचा विषय झाली. त्या चर्चेच्या झळा आम्हां दोघांनाही बसल्याच. पण त्यामुळे आमच्यात कधी अंतराय निर्माण झाला नाही. नितीनजी आणि माझ्यातील मैत्रीचं नातं जोडण्यातली नैसर्गिक सहजता आणि अंतर्बाह्य साधेपणा हा महत्त्वाचा दुवा. म्हणूनच त्यांच्याबरोबर वावरताना, बोलताना कधीही दडपण येत नाही. काळाच्या ओघात आमच्या स्नेहाने औपचारिकतेच्या मर्यादा ओलांडल्या आणि तो दोघांपुरता मर्यादित न राहता दोन कुटुंबांमध्ये स्नेहाचे बंध निर्माण झाले. हे नातं दृढ होण्यात सौ. कांचनवहिनींचा स्वभावही कारणीभूत आहे.

 'आमच्या दोघांची ओळख होण्याला निमित्त ठरला तो, बी.ओ.टी. तत्त्वावर बांधण्यात आलेला देशातला पहिला राष्ट्रीय महामार्ग. एक मंत्री आणि एक व्यवसायिक अशी ती ओळख होती. दोघेही परस्परांना प्रथमच भेटत होतो. त्याआधी एकमेकांविषयी माहितीदेखील नव्हती. तरीही आणि वयात बऱ्यापैकी अंतर असतानाही व्यावसायिकतेच्या सीमा ओलांडत आमच्याही नकळत  दोघांमध्ये गाढ मैत्री झाली. या मैत्रीने दोघांच्या कुटुंबांनाही स्नेहाच्या धाग्याने जोडलं ते कायमचं.'

साप्ताहिक विवेकच्या मा. नितीनजी गडकरी विशेषांकासाठी, दोघांमधल्या मैत्रीचा इथवरचा प्रवास जागवताना आयडियल रोड बिल्डर्सचे संस्थापक संचालक श्री. दत्तात्रय म्हैसकर यांच्या डोळयांच्या कडा अनेकदा ओलावल्या. त्यांच्या आठवणींचं हे शब्दरूप.

भारतात तोपर्यंत 'बांधा, वापरा, हस्तांतरित करा' या तत्त्वाने रस्तेबांधणीला सुरुवात झाली नव्हती. राज्यातल्या महामार्गावरील टोलवसुलीचं कंत्राट आमच्याकडे होतं. अतिशय खराब स्थितीतल्या महामार्गांसाठी प्रवाशांकडून टोल वसूल करायचा, म्हणजे त्यांच्या शिव्या खाण्याची तयारी ठेवायची. टोल देताना प्रवासी बोटं जरी सरकारच्या नावाने मोडत असले, तरी ते सगळं झेलावं लागायचं टोल वसुली करणाऱ्या आम्हांला. शिवाय प्रवाशांचा रागही अनाठायी नव्हता, याचीही कल्पना होती. महामार्गांची खरोखरच दैन्यावस्था होती. यावर काहीतरी उपाय करायला हवा, या विचारातून 'बांधा, वापरा, हस्तांतरित करा' या तत्त्वावरचा हा प्रकल्प आम्ही तत्कालीन केंद्र सरकारला सादर केली. 'टोलमधला अर्धा हिस्सा आम्हांला द्या, आम्ही रस्ते नव्याने बांधून देतो, त्यांची देखभालही करतो' ही त्यामागे भूमिका होती. हा प्रकल्प केंद्राने मंजूर केला. मात्र तो ज्या महामार्गाच्या पुनर्बांधणीसाठी मंजूर झाला होता, तो महामार्ग ज्या राज्यातून जातो, त्या राज्याच्या संबंधित मंत्र्यांची परवानगी मिळवणं आवश्यक होतं. त्या वेळी राज्यात युतीकडे सत्ता होती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची सूत्रं होती नितीन गडकरी यांच्याकडे. तोवर मला त्यांचं नावही माहीत नव्हतं की त्यांची राजकीय-सामाजिक पार्श्वभूमीही माहीत नव्हती. त्यांच्यापर्यंत हा प्रकल्प, त्यामागचा विचार आणि त्याचं वेगळेपण पोहोचवणं गरजेचं होतं. व्यक्तिगत भेट मिळाली, तर ते शक्य होणार होतं. ही भेट घडवून आणली आम्हां दोघांना चांगलं ओळखणाऱ्या एका व्यक्तीने. या प्रकल्पामागचं तत्त्व, त्याची गरज आणि राज्याची परवानगी मिळाली तर देशातला तो पहिला प्रकल्प ठरेल, हे सगळं मी नितीनजींना तपशिलात सांगितलं. त्यांनीही ते खूप रस घेऊन ऐकलं. नवनव्या प्रयोगासाठी उत्सुक असणाऱ्या आणि त्यासाठी धडाडीने पावलं उचलणाऱ्या नितीनजींनी या प्रकल्पाचं महत्त्व जाणलं. त्यांना ती संकल्पना अतिशय आवडली. म्हणाले, ''आपण टी.व्ही. हप्त्यावर घेतो. फ्रीजही घेतो. मात्र त्या पध्दतीने रस्ता बांधून घेणं हा नवीन प्रयोग आहे. करायला आवडेल.'' त्यानंतर मला ही कल्पना कशी सुचली ते त्यांनी जाणून घेतलं. ते मोकळेपणे बोलत असल्याने मीही कोणत्याही दडपणाशिवाय हा विचार सुचण्यामागचं वास्तव सांगितलं. ''केंद्रानेही या कल्पनेला हिरवा कंदील दाखवल्याने ते प्रपोजल मंजूर होऊन आलं आहे. पण हा महामार्ग आपल्या राज्यातून जात असल्याने तुमची आणि मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळणं गरजेचं आहे.'' हे सर्व ऐकल्यावर नितीनजींनी या कामात पूर्ण सहकार्याची हमी दिली. तातडीने तशी पावलंही उचलली. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमधल्या संबंधितांशी बोलण्याची तयारीही दर्शवली. त्या वेळी केंद्रात हे खातं जगदीश टायटलर यांच्याकडे होतं. महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिल्यामुळे लगेचच या संबंधातला त्रिपक्षीय करार नवी दिल्लीत झाला. वास्तविक प्रत्यक्ष मंत्री हजर राहण्याची गरज नसतानाही या कराराच्या वेळी नितीनजी आमच्याबरोबर तिथे उपस्थित होते. ''अशा प्रकारचा देशातला पहिला प्रयोग आपल्या राज्यात होतोय, तर हा करार माझ्यासाठी विशेष आहे. मी तुमच्याबरोबर दिल्लीत येणार'' अशी त्यांची त्यामागची भूमिका होती. देशातला पहिलाच प्रयोग असताना, त्या वेळी चालू असलेल्या पितृपक्षाचाही बाऊ न करता या करारावर सर्व संबंधितांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. ज्या दिवशी हा करार प्रत्यक्षात आला, त्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक वर्तमानपत्रांमध्ये या प्रकल्पाची माहिती देणाऱ्या बातम्या छापून आल्या होत्या. ते काम नितीनजींनी केलं होतं. मला याची काही कल्पनाही नव्हती. या सगळया बातम्यांची कात्रणं आमच्या रेकॉर्डसाठी पाठवून देण्याची व्यवस्थाही त्यांनी केली. अशा प्रकारच्या पहिल्याच प्रयोगात गडकरींनी मंत्री म्हणून विशेष लक्ष घातल्याने तो यशस्वीपणे तडीस गेला.

पहिल्या यशानंतर, 'बी.ओ.टी.' तत्त्वावरची 6 राष्ट्रीय महामार्गांची कामं आयडियल रोड बिल्डर्सला मिळाली. या कामांनी उद्योग जगतात आमची एक नवीन ओळख निर्माण केली. नवनवीन आव्हानं पेलण्याची आणि अनोख्या क्षेत्रातही प्रयोग करण्याची इच्छा या यशाने आयआरबी उद्योग समूहात निर्माण केली आणि त्यासाठी गडकरी यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि भरघोस पाठिंब्यामुळे या इच्छेला मूर्त रूप मिळालं. या कामांमुळे, व्यवसायाच्या पलीकडचं स्नेहाचं नातं आम्हां दोघांमध्ये निर्माण झालं, ते कायमसाठी.


नितीनजींच्या प्रोत्साहक पाठिंब्यामुळेच रस्ते बांधणीच्या क्षेत्रात काम करणारी आयआरबी कंपनी पूल बांधण्याच्या क्षेत्रात प्रवेश करती झाली. 

या सगळया प्रवासात नितीनजींमध्ये असलेली धडाडी, ताकद बघायला मिळाली. जसजसे ते राजकीय क्षेत्रात पुढे पुढे जाऊ लागले, तसतशी ही धडाडी, नवनवे प्रयोग करण्याचा उत्साह वाढतच गेला.

एका राजकीय नेत्याशी, वजनदार राजकीय नेत्याशी झालेली मैत्री ही साहजिकच समाजात चर्चेचा विषय झाली. त्या चर्चेच्या झळा आम्हां दोघांनाही बसल्याच. पण त्यामुळे आमच्यात कधी अंतराय निर्माण झाला नाही. आमच्या मैत्रीबाबत प्रसारमाध्यमांनी टीकेचा सूरही लावला. त्यांचा पूर्ती उद्योग अडचणीत असताना मी यथाशक्ती मदत केली. ज्या व्यक्तीने ओळखदेख नसतानाही, माझ्यावर विश्वास ठेवून 'बी.ओ.टी.'सारख्या प्रयोगाला पाठिंबा दिला, त्यांना अडचणीच्या प्रसंगी मित्र म्हणून शक्य ती मदत करणं हे मला माझं कर्तव्य वाटलं, तर यात वावगं ते काय?'

नितीनजींनी नवं स्वप्न दाखवायचं, लागेल ती मदत करायची आणि आम्ही त्या स्वप्नाचा जागेपणी पाठपुरावा करायचा हे जणू तोवर ठरूनच गेलं होतं. रस्ते आणि पूल बांधणीत स्थिरावल्यावर माझ्यासमोर नितीनजींनी प्रस्ताव ठेवला तो पॉवर प्लँट उभारण्याचा. त्यासाठी लागणारा कच्चा माल त्यांच्या साखर कारखान्यातून पुरवला जाणार होता आणि प्लँटसाठी लागणारी जागा मिळवण्याकरितासुध्दा प्रयत्न करण्याचं आश्वासन नितीनजींनी दिलं होतं. त्यामुळे नव्या उत्साहात आम्ही नागपुरात पॉवर प्लँटची उभारणी करू लागलो. नितीनजींनी आवश्यक ती मदत केली. 135 मेगावॅट विजेची निर्मिती करू शकणारा पॉवर प्लँट उभा करायचं नक्की झालं. मात्र त्या वेळी राज्य सरकारने 270 मेगावॅट विजेची निर्मिती करणारा पॉवर प्लँट उभा करण्यास सुचवलं. त्यानंतर प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेल्यावर केंद्रीय उर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ''270 मेगावॅट काय, 540 मेगावॅट क्षमतेचा प्लँट तुम्ही उभारायला हवा.'' असं करत 135 मेगावॅट क्षमतेच्या जागी 540 मेगावॅट क्षमतेचा पॉवर प्लँट उभा राहिला. तोही काटेकोर नियोजन आणि त्याप्रमाणे कार्यवाही करत विक्रमी वेळेत, म्हणजे 3 वर्षांत उभा राहिला. नितीनजी आणि सौ. कांचनवहिनी यांच्या उपस्थितीत आम्ही पॉवर प्लँटचा शुभारंभ केला. मात्र हे सगळं चालू असताना आमच्याकडून एक चूक झाली होती. त्याच सुमाराला, म्हणजे 2012 साली केंद्र सरकारने असा अध्यादेश (जी.आर.) काढला होता की, ज्यांना आपल्या प्लँटमध्ये तयार झालेली वीज विकायची असेल, त्यांनी 'पॉवर पर्चेस ऍग्रीमेंट'मध्ये सहभागी झालं पाहिजे. प्लँटची उभारणी करण्याच्या गडबडीत ते आमच्याकडून राहून गेलं. मात्र तयार झालेली वीज विकताना हा करार झालेला असणं बंधनकारक आहे. मात्र बरेच प्रयत्न करूनही, आजतगायत कोणाहीबरोबर असा करार होऊ न शकल्याने 540 मेगावॅट क्षमतेच्या आमच्या प्लँटमध्ये वीजनिर्मिती होऊ शकलेली नाही. त्या वेळेला 1300 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेला हा प्लँट अद्यापही कार्यान्वित झालेला नाही. केंद्राबरोबर वा एखाद्या राज्याबरोबर असा करार करण्याबाबत आम्ही तर प्रयत्नशील आहोतच, त्याचबरोबर आमच्याबरोबर नितीनजीही त्या प्रयत्नात आहेत. आपण यांना हा प्लँट उभारायला आग्रह केला, आणि अद्याप तो सुरू होऊ शकला नाही ही गोष्ट त्यांच्या मनाला लागून राहिली आहे.

नितीनजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते. एकदा संघाचं अखिल भारतीय अधिवेशन नागपूरला होतं. ''तू काय मदत करणार?'' नितीनजींनी मला विचारलं. मी म्हटलं, ''तुम्ही सांगाल ती मदत करणार. काय करू? सांगा.'' पावसाच्या दिवसात ते अधिवेशन होणार होतं. त्यांनी आम्हांला, नागपूरच्या ज्या मैदानात अधिवेशन होणार होतं त्या मैदानाचं सपाटीकरण करून द्यायला आणि मंडप उभारून द्यायला सांगितलं. त्यांनी कायमच आपुलकीच्या भावनेने, एक स्नेही म्हणून अशी मदत मागितली. त्यांच्या मनात यापेक्षा दुसरा भाव नव्हता, आम्हांलाही अशा कामात आपला हातभार लागतो आहे याचा आनंद होता. त्यामुळेच संघकार्याला मदतीच्या बाबतीत 'त्यांनी सांगायचं आणि मी करायचं' असं कायम धोरण राहिलं, आजही आहे.

एकदा नागपुरातल्या प्रचारकार्यातला 250 स्वयंसेवकांच्या प्रवासासाठी त्यांनी मला 18 सायकली देण्यास सुचवलं. या सायकलींमुळे वेळ आणि श्रम वाचल्याने हे स्वयंसेवक आत्तापेक्षा जास्त काम करू शकतील, हा त्यामागे नितीनजींचा विचार होता. तो विचार माझ्या मनाला इतका स्पर्शून गेला की त्यांच्या मागणीपेक्षा दुप्पट सायकली आम्ही घेऊन दिल्या. सायकली दिल्यावर ते मला म्हणाले, ''तुम्ही इतकं चांगलं काम केलं आहे की हे सर्व जण तुम्हांला त्यासाठी दुवा देतील.''

नितीनजींचे मला भावणारे अनेक गुण आहेत. त्यांची धडाडी आणि त्याला साजेसं कर्तृत्व हे तर आहेच, त्याचबरोबर मैत्रीचं नातं जोडण्यातली नैसर्गिक सहजता आणि अंतर्बाह्य साधेपणा. म्हणूनच त्यांच्याबरोबर वावरताना, बोलताना कधीही दडपण येत नाही.

काळाच्या ओघात आमच्या स्नेहाने औपचारिकतेच्या मर्यादा ओलांडल्या आणि तो दोघांपुरता मर्यादित न राहता दोन कुटुंबांमध्ये स्नेहाचे बंध निर्माण झाले. हे नातं दृढ होण्यात सौ. कांचनवहिनींचा स्वभावही कारणीभूत आहे. त्यांच्या तिन्ही मुलांच्या लग्नाचं निमंत्रण सौ. कांचनवहिनींनी आमच्या डोंबिवलीच्या घरी येऊन केलं. इतका आपलेपणा आणि अगत्य या नात्यात आहे. मात्र, आमच्यात नातं मैत्रीचं असलं तरी माझं वयाने ज्येष्ठ असणं ते कधी विसरत नाहीत. त्यांच्या घरून निघताना, आम्हांला अवघडल्यासारखं झालं तरी ते दोघं दर वेळी आम्हां उभयतांच्या पाया पडतात. माझ्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमालाही मुंबईच्या भर पावसात ते सहकुटुंब उपस्थित राहिले.

मैत्रीचं मोल जाणणारा आणि ते जपणारा असा सुहृद भाग्यात असावा लागतो, त्या दृष्टीने मी भाग्यवंत आहे असंच म्हणेन.

 

जमिनीवर पाय असलेलं दांपत्य

नितीनजींच्या इथवरच्या यशस्वी कारकिर्दीत कांचनवहिनींचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून सौ. कांचनताई उभ्या आहेत असं म्हटलं, तर ते वावगं ठरणार नाही. नितीनजी राजकारणात व्यग्र असताना कांचनताईंनी घरची आघाडी तर समर्थपणे सांभाळलीच, मुलांवर चांगले संस्कार केले आणि नितीनजींच्या सामाजिक कामातही त्यांचं योगदान आहे. जीवनात अनेक मानसन्मान प्राप्त होऊनही, सगळी सुखं हात जोडून उभी असतानाही, 'पाय जमिनीवर असलेलं दांपत्य' असं मी त्या दोघांचं वर्णन करीन. आजच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळं होण्याच्या काळात ही विशेष कौतुकास्पद गोष्ट आहे.

- सौ. सुधा म्हैसकर अध्यक्षा- म्हैसकर फाउंडेशन

 

(शब्दांकन - अश्विनी मयेकर)