घडवण्याचं व्रत

विवेक मराठी    03-May-2017
Total Views |

आज अनेक व्यवसाय, पायाभूत सेवासुविधा, अन्यही अनेक गोष्टी वेल्डिंग आणि वेल्डर्सवर अवलंबून आहेत. भरपूर आर्थिक नफा करून देणारं हे क्षेत्र हे तरुणांसाठी करिअरचा उत्तम पर्याय ठरू शकतं. वेल्डिंगचं हे दुर्लक्षित कार्यक्षेत्र आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेली अनेक वर्षे सतीश सावंत आपल्या 'इन्स्टिटयूट ऑफ वेल्डिंग ऍंड टेस्टिंग टेक्नॉलॉजी'च्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. तरुणांनी स्वत:मधील कौशल्यांचा विकास करून, करिअर म्हणून त्यांचा विचार करावा यासाठी देशभरात 'स्किल इंडिया'अंतर्गत वेगवेगळया स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. या निमित्ताने सावंत यांच्या संस्थेचा आणि वेल्डिंग या कार्यक्षेत्राचा हा आढावा.

"यएकम' - अर्थात दोन गोष्टी जोडणं, एकरूप करणं. वेल्डिंगला संस्कृतमध्ये हा प्रतिशब्द वापरला जातो. मोठमोठया इमारती असोत वा महाकाय जहाजं, रुग्णालय असोत वा शाळा, साधे रस्ते असोत, रेल्वे असो वा अत्याधुनिक मेट्रो रेल्वे असो, यातली एकही गोष्ट धातूचे तुकडे जोडल्याशिवाय पूर्णत्वाला येत नाही. कारण जिथे जिथे धातूची जोडणी आहे, तिथे वेल्डिंगला पर्याय नाही. या क्षेत्राचं वाढतं महत्त्व आणि येत्या काळात उघडलं जाणारं संधीचं दालन या गोष्टी सतीश सावंत यांच्या लक्षात आल्या आणि अधिकाधिक मुलामुलींनी अशा संधींचा फायदा घ्यावा, यासाठी त्यांनी 2008 साली 'इन्स्टिटयूट ऑफ वेल्डिंग ऍंड टेस्टिंग टेक्नॉलॉजी'ची स्थापना केली. तत्पूर्वी मुंबईच्या इन्स्टिटयूट ऑॅफ मेकॅनिकल इंजीनिअरिंगमधून पदवी प्राप्त केल्यानंतर सतीश यांनी अडवाणी ऑर्लिकॉन कंपनीत पाच वर्षं, त्यानंतर लार्सन ऍंड टूब्रो कंपनीत सोळा वर्षं नोकरी केली. वेल्डिंग या विषयात सेंट्रल टर्निंग इन्स्टिटयूटमधून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी वरील कंपन्यांसह अनेक नामांकित कंपन्यांमध्ये अध्यापनही सुरू केलं. याच काळात इंग्लंड, अमेरिका, जर्मनी या देशांत जाऊन वेल्डिंग तंत्रज्ञानाशी संबंधित प्रशिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळाली. दीर्घ अनुभवाच्या पाठबळावरच त्यांनी स्वत:च्या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.

वेल्डिंग ही केवळ दुसऱ्या अनुभवी माणसाबरोबर काम करत करत शिकण्याची कला नसून ते तंत्रशुध्द शास्त्र आहे. आज घरगुती स्तरापासून ते सर्वच उद्योग व्यवसायांच्या क्षेत्रांत अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून मोठया प्रमाणावर वेल्डिंगचं काम केलं जातं. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण आज त्यांच्या इन्स्टिटयूटच्या माध्यमातून दिलं जातं. वेल्डिंगचं काम करणाऱ्या अल्पशिक्षित वेल्डरपासून ते अभियंत्यापर्यंत सर्वांनी हे प्रशिक्षण घेणं आवश्यक असल्याचं सतीश सावंत सांगतात. वेगवेगळया बांधकामांसाठी लागणारा धातू वेगळा, तद्वत त्याचं वेल्डिंगही वेगळं असतं. त्याचप्रमाणे वेल्डिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ते मजबूत झालं आहे की नाही हे पाहणंही गरजेचं असतं. वेल्डिंगची सहनक्षमता तपासणं याला टेस्टिंग म्हणतात. या इन्स्टिटयूटमध्ये वेल्डिंग आणि टेस्टिंग असं दोन्ही प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. आज अनेक कंपन्यांमध्ये वेल्डिंगचं काम केलं जातं. ते नीट झालं आहे की नाही, हे तपासण्यासाठी लागणारी टेस्टिंग यंत्रणा ही अतिशय खर्चीक तर असतेच, शिवाय त्यासाठी अनुभवाचीही गरज असते. अशा कंपन्यांना संस्थेतर्फे 'थर्ड पार्टी इन्स्पेक्शन सर्विसेस'ची सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाते. रिलायन्स, लार्सन ऍंड टूब्रो, महिंद्रा ऍंड महिंद्रा यासारख्या नामांकित कंपन्या या सेवेचा आज लाभ घेत आहेत.

विद्यार्थ्यांसाठी तसेच कंपन्यांसाठी या विषयाशी संबंधित कार्यशाळांचंही आयोजन केलं जातं. एन डी टी लेव्हल 1 आणि 2 म्हणजेच नॉनडिस्ट्रक्टिव्ह इव्हॅल्युएशन - अर्थात केलेलं वेल्डिंग हे नीट झालं आहे की नाही, याची ढोबळ चिकित्सा सुरुवातीच्या टप्प्यावर केल्यानंतर वेल्डिंग केलेलं ते यंत्र न तोडता स्कॅनिंग, दुर्बिणीच्या साहाय्याने तपासणी, अल्ट्रासाउंड तपासणी आदी तपासण्या केल्या जातात. बेंड टेस्ट, धातू किती मऊ  आहे, तो धातू किती ताण सहन करू शकतो अशा वेल्डिंगपूर्व चाचण्याही संस्थेत अद्ययावत यंत्रांच्या साहाय्याने केल्या जातात आणि ही सर्व यंत्रे संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने चालवली जातात. अनेक मोठमोठया कंपन्या वेल्डिंगपूर्व चाचण्या करण्यासाठी संस्थेकडे येतात. या चाचण्यांचं प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांनाही दिलं जातं.

यंत्राच्या निर्मितीतील, बांधकामातील वेल्डिंगचं काम हे प्रकल्पाच्या कागदावर काढण्यात आलेल्या चित्रापासून, ज्याचं वेल्डिंग करायचं आहे तो धातू कोणता आहे हे समजून घेण्यापासून सुरू होतं आणि संपतं ते वेल्डिंगच्या मजबुतीच्या सर्व चाचण्या झाल्यानंतरच. त्यामुळे अभियंते, ड्राफ्ट्समन यांच्यापासून वेल्डिंगनंतर चाचणी करणाऱ्या सर्वांनाच वेल्डिंगच्या तंत्रशुध्द प्रशिक्षणाची गरज असते. अभियंते, ड्राफ्ट्समन यांच्या कामातील वेल्डिंगच महत्त्व आणि त्यांनी त्या अवकाशातून स्वत:च्या कामाचा केलेला विचार या गोष्टी वेल्डिंगची प्रक्रिया पूर्ण आणि अचूक होण्यात महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे वेल्डिंग करणारी व्यक्ती एकच असली, तरी ती प्रकल्पावर काम करणाऱ्या संपूर्ण समूहाची जबाबदारी असते, असं सावंत यांना वाटतं. वेगवेगळया कंपन्यांमधील अभियंते तसंच तंत्रज्ञांसाठी आणि व्यवस्थापकांसाठी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम, वेल्डिंग डिझाइन, वेल्डिंग ऑॅडिट, स्ट्रक्चरल वेल्डिंग, आर्क वेल्डर्स, रेझिस्टन्स वेल्डर्स, रोबोटिक अर्क वेल्डिंग आणि रिपेअर मेंटेनन्स अभ्यासक्रम संस्थेतर्फे उपलब्ध करून दिले जातात. रेल्वे, शिपिंग, पेट्रोकेमिकल्स, खाणकाम, बांधकाम, पायाभूत सेवा-सुविधा अशा अनेक क्षेत्रांत लोकांना या अभ्यासक्रमाचा पुरेपूर फायदा होतो. आज परदेशात वेल्डिंग क्षेत्रात मुलींचा आकडा मोठा आहे. वेल्डिंग हे वय, शिक्षण, मुलगा-मुलगी असा लिंगभेद या सगळया मर्यादांच्या पलीकडे जाऊन उत्तम आर्थिक लाभ करून देणारं कार्यक्षेत्र आहे. कोणत्याही वयोगटाची, कितीही शिक्षण झालेली व्यक्ती हा कोर्स करू शकते. कोर्स पूर्ण झाल्यावर संस्थेकडून प्रमाणपत्र मिळतं. महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व अभ्यासक्रम महाराष्ट्र सरकारने प्रमाणित केलेले असल्यामुळे नोकरीची हमीही असते. हे सर्व अभ्यासक्रम आज इंग्लिशसह हिंदी भाषेतही उपलब्ध आहेत. 'थर्ड पार्टी इन्स्पेक्शन सर्विसेस'ची सुविधा संस्था उपलब्ध करून देत असल्यामुळे अनेक मुलांना या माध्यमातून चांगल्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या लागल्या आहेत.

येत्या काळात संस्थेचा देशभरात विस्तार करण्याचा सतीश सावंत यांचा मानस आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा अभ्यासक्रम आणि संस्थेचे कार्य पोहोचावे, अनस्किल्ड लेबर्स हा वेल्डर्सबाबत समाजात असलेला चुकीचा समज पुसला जावा, अर्थार्जन करू इच्छिणाऱ्या सर्वच मुला-मुलींनी याद्वारे स्वत:ची आणि देशाची प्रगती साधावी असं त्यांना वाटतं. सतीश सावंत यांना आज साउथ आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड,  सिंगापूर अशा अनेक देशांतून प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी आमंत्रण येत असतं आणि तेही देशा-परदेशात जाऊन प्रशिक्षण देतात. दक्षिण आफ्रिकेत तर संस्थेची स्वत:ची शाखादेखील सुरू झाली आहे. आजवर अकरा हजार विद्यार्थी संस्थेत शिकून निरनिराळया नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत आणि चांगलं वेतनही मिळवत आहेत. आपल्या जवळपास पन्नास सहकाऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांनी त्यांना शिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे.

तरुणांनी प्रशिक्षित व्हावं, स्वत:ला रोजगारक्षम बनवावं, स्वत:च्या संधी स्वत:च निर्माण कराव्यात, उच्चशिक्षित होऊन स्वत:चा लौकिक सिध्द करावा, यासाठी ते गेली अनेक वर्षं झटत आहेत. त्यांच्या इन्स्टिटयूटने उघडून दिलेलं कौशल्य विकासाचं हे नवं दालन नव्या पिढीला चेतना देईल आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीतही भर घालेल, यात शंका नाही.

 

वेल्डिंग कौशल्य - अर्थप्राप्तीचं उत्तम साधन

''कोणत्याही देशाच्या प्रगतीचा आलेख हा तिकडे असणाऱ्या पायाभूत सुविधा, उद्योग क्षेत्रातील उलाढाली यावर मोजला जातो. ही सर्व क्षेत्रं देशाच्या प्रगतीत मोलाची भर घालतात. पायाभूत सेवासुविधा, उद्योग जगत, संरक्षण खाते या सर्वच क्षेत्रात आज वेल्डर्सना मागणी आहे. कारण जिथे जिथे धातूची जोडणी आहे, तिथे तिथे वेल्डरला मागणी असतेच. भारतात हे क्षेत्र दुर्लक्षित राहिल्यामुळे आज उद्योग क्षेत्राच्या बहराच्या काळात परदेशातून वेल्डर्स मागवावे लागतात. माननीय पंतप्रधानांनी काळाची गरज ओळखून स्किल डेव्हलपमेंटचा विचार देशासमोर मांडला आहे. कारण त्यामुळे देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारे सर्व कुशल कामगार देशातच मिळतील आणि त्याद्वारे देशातील लोकांनाच रोजगार उपलब्ध होईल. अंगी कलात्मकता आणि एकाग्रता असेल, तर आजमितीला वेल्डिंग हे कमी वेळात शिकता येणारं व त्याद्वारे उत्तम अर्थप्राप्ती करून देणारं कौशल्य आहे. वेल्डिंग हे उत्तम अर्थप्राप्तीचं साधन ठरू शकतं. संस्थेतून शिकून बाहेर पडलेली अनेक मुलं-मुली आपापल्या क्षेत्रात डॉलर्समध्ये मोठया आकडयांचे पगार घेत आहेत.''

- सतीश सावंत, संस्थापक-संचालक

 

दृष्टीकोन बदलण्याची गरज

''वेल्डिंगची आणि वेल्डरची गरज प्रत्येक क्षेत्रात आहे. सध्याच्या आधुनिक युगाची ती गरज आहे. आजची तरुण पिढी कोणतंही काम करण्यास सक्षम आहे. तंत्रज्ञानाशी तिची नाळ जोडलेली आहे. अशा वेळी वेल्डिंगसारख्या कौशल्याची त्याला जोड मिळाली, तर त्यांना त्यांच्या करिअरची नवी आणि वेगळी वाट सापडेल. फक्त त्यासाठी आपला या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणं गरजेच आहे.''

- नरेंद्र सिंग, मुख्य सल्लागार आणि ट्रेनर

mmrudula.rajwade@gmail.com