जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला

विवेक मराठी    30-May-2017
Total Views |

संघकामाच्या प्रवासात मी भोपाळला गेलो होतो. 'समरसता' या विषयाची भोपाळ नगराची बैठक होती. कार्यकर्त्यांचे एकत्रिकरण झाले होते. अनिल माधव दवे तेव्हा भोपाळ नगर प्रचारक किंवा विभाग प्रचारक असावेत. अशा बैठकीतील सर्व कार्यकर्त्यांची कायम ओळख राहतेच असे नाही. परंतु, अनिल दवे यांची ओळख आणि परिचय माझ्या स्मरणात राहिला. त्यांचे शांतपणे बोलणे, चेहऱ्यावर मधुर हास्य, चारचौघात उठून दिसणारा गोरा रंग, शोधक नजर, बैठकीत मोजके आणि मुद्दयाचे बोलणे यामुळे तेव्हा मला असे वाटले की, संघ कार्यकर्त्यांतील हा एक हिरा आहे.


निल दवे यांच्या अकाली मृत्यूची बातमी ऐकली आणि 'जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला' या गाण्याच्या ओळी आठवल्या. अनिल दवे यांची आणि माझी पहिली भेट जवळजवळ 15 वर्षांपूर्वी भोपाळला झाली. संघकामाच्या प्रवासात मी भोपाळला गेलो होतो. 'समरसता' या विषयाची भोपाळ नगराची बैठक होती. कार्यकर्त्यांचे एकत्रिकरण झाले होते. अनिल माधव दवे तेव्हा भोपाळ नगर प्रचारक किंवा विभाग प्रचारक असावेत. अशा बैठकीतील सर्व कार्यकर्त्यांची कायम ओळख राहतेच असे नाही. परंतु, अनिल दवे यांची ओळख आणि परिचय माझ्या स्मरणात राहिला. त्यांचे शांतपणे बोलणे, चेहऱ्यावर मधुर हास्य, चारचौघात उठून दिसणारा गोरा रंग, शोधक नजर, बैठकीत मोजके आणि मुद्दयाचे बोलणे यामुळे तेव्हा मला असे वाटले की, संघ कार्यकर्त्यांतील हा एक हिरा आहे. तो कालखंड मोदींच्या उदयाचा कालखंड होता आणि नकळत माझ्या मनात एक विचार चमकून गेला की, दवे उद्याचे मध्य प्रदेशचे मोदी आहेत. त्यानंतर त्यांच्याशी वेगवेगळया निमित्ताने संवाद होत राहिले. लवकरच त्यांची पाठवणी भाजपमध्ये झाली. मध्य प्रदेशच्या भाजपच्या मुखपत्रासाठी वर्षातून एकदा तरी ते मला लिहायला सांगत. संपूर्ण 'वंदे मातरम्'वर त्यांनी अंक काढला होता आणि त्यातील एक कडवे त्यांनी मला लिहायला दिले. तेव्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते दिग्विजय सिंग. ज्यांना 'दिग्विजय सिंग' म्हणण्याऐवजी 'वाचाळ सिंग' म्हणायला पाहिजे. कारण, ते अकलेचे तारे तोडणारी वक्तव्ये सतत करत असतात. 2003 साली मध्यप्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. दिग्विजय सिंगांचे सरकार दहा वर्षे मध्य प्रदेशात होते. त्यांच्या सरकारचे वर्णन करणारा एक शब्द दवे यांनी दिला. तो म्हणजे 'बंटाधार', म्हणजेच विकासकामांमध्ये दुष्काळच दुष्काळ निर्माण केला आहे. दिग्विजय सिंगांच्या काळातले मध्य प्रदेशातले रस्ते, वीज, जल व्यवस्था अन्य सार्वजनिक व्यवस्था सर्वच 'बंटाधार' होते. लोकांना ते बरोबर समजले आणि दिग्विजय सिंग असे काही आपटले की, पुढील दहा वर्षे त्यांना धड उभेही राहता आले नाही. आता फक्त त्यांचे तोंड चालते आणि ते 'बंटाधार' आहे.

  संघाचे प्रचारक राहिल्यामुळे संघटन कौशल्य अंगात मुरतं. मध्य प्रदेशच्या भाजपने त्याचा अनुभव घेतला. प्रचारक राहिल्यामुळे वक्तशीरपणा, कार्यकर्त्याला जपणे, सर्वांशी प्रेमळ संबंध ठेवणे आणि जे काम सांगितले जाईल ते सर्वशक्तीनिशी करणे हे कामही ओघाने आलेच. मुख्य धारेत लिहिणाऱ्यांना 'प्रचारक असणे म्हणजे काय' हे फारसे समजत नाही असो...

  लवकरच दवे राज्यसभेचे सदस्य झाले आणि केंद्रात भाजपचे शासन आल्यानंतर केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री झाले. नर्मदा हा त्यांचा अतिशय जिव्हाळयाचा विषय. भारतात कोणत्याही नदीची परिक्रमा केली जात नाही, फक्त नर्मदेची परिक्रमा केली जाते. दवेजी नर्मदेचे परमभक्त, त्यांनी ही यात्रा पूर्ण केली. एकदा आकाशमार्गानेही यात्रा पूर्ण केली. भोपाळमधील त्यांचे घर नर्मदा संग्रहालय झाले आहे. बहुधा त्यांच्या सांगण्यावरून मध्य प्रदेश शासनाने माझी नेमणूक 'भारत भवन' या ट्रस्टवर केली होती. पं. जसराज त्याचे अध्यक्ष होते. हेमामालिनी, राजदत्त इत्यादी नामवंत त्याचे सदस्य होते. दोन-तीन बैठका झाल्यानंतर माझ्या लक्षात आले की, तांत्रिक बैठका होण्यापलीकडे सदस्य म्हणून आम्हाला काही भूमिका नाही. अनिल दवेजींची भेट झाल्यानंतर त्यांना सर्व काही सांगितले. 'भारत भवन' क़ि्रयाशील होण्यासाठी या तांत्रिक बैठकांचा काही उपयोग नाही. न्यासी सदस्यांना महत्त्वाच्या भूमिका असल्या पाहिजेत. नंतर त्यांनी या विषयावर स्वतंत्र बैठक बोलावली होती आणि पुढे काय करता येईल याचा विचार केला होता. विषय ऐकला आणि सोडून दिला, असे त्यांनी केले नाही. 'शिवाजी आणि स्वराज्य' हे त्यांचे हिंदीतील पुस्तक त्यांनी मला भेट पाठविले. शिवाजी हा प्रत्येक मराठी माणसाचा जिव्हाळयाचा विषय. अनिल दवे काही महाराष्ट्रातील नाहीत. म्हणून पुस्तकात त्यांनी शिवाजी महाराजांविषयी काय लिहिले हे जाणून घेण्याची उत्सुकता माझ्या मनात निर्माण झाली. मी पुस्तक वाचून काढले. हे पुस्तक शिवाजी महाराजांचे भक्ती स्रोत नाही किंवा 'शिवाजी कोण होता?' असे शीर्षक देऊन शिवाजी महाराज हिंदू राजा नव्हता हे अफलातून सांगणारे पुस्तकही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 32 वर्षांच्या राज्य कारभारात स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराज यांनी काय केले हे अनेक पुराव्यांनिशी मांडणारे हे पुस्तक आहे. अशा प्रकारचे पुस्तक मराठी भाषेत नाही. पुस्तक वाचल्यानंतर त्याचा मराठी अनुवाद करावा, असे मला वाटले. महाराष्ट्रात 'जाणता राजा'च्या आशीवार्दाने 'मराठा शिवाजी'ची मोहीम धडाकेबंदपणे चालू झाली होती. शिवाजीराजांना मराठा राजा ठरवायचे, तर ब्राह्मणद्वेषाला पर्याय नाही. म्हणून दादोजी कोंडदेव यांची बदनामी ओघाने आली, राम गणेश गडकरींचा पुतळा फेकून देणे (ते ब्राह्मण नाहीत तरीही!) आलेच. अशा वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षांपूर्वी कल्याणकारी राज्याची 'सब का साथ सबका विकास'ची जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन जीवनमूल्ये रुजवण्याची लढाई कसे लढत होते, याचे चित्रण करणारे हे पुस्तक आहे. महाराजांची आर्थिक नीती, महाराजांचे जल धोरण, कृषी नीती, पर्यावरणाचे संरक्षण असे सर्व विषय प्रत्येक विधानाला पुरावा देत अनिल दवे यांनी मांडले. राष्ट्रीय दृष्टी असलेला संघस्वयंसेवक महापुरुषांचा कसा विचार करतो आणि त्याचा किती खोलवरचा अभ्यास करतो, हे या पुस्तकावरून दिसून येते. अनिल दवे यांनी 'सा.विवेक'तर्फे पुस्तकाची मराठी आवृत्ती प्रकाशित करण्याची अनुमती दिली. एक अट घातली- पुस्तक जसं हिंदीत आहे, तसंच प्रकाशित करा. म्हणजे पुस्तकाचे लेआऊट, चित्रे, कागदाची गुणवत्ता यात बदल करू नये. असे पुस्तक छापणे फार खर्चिक काम. त्यामुळे पुस्तकाची किंमत फार होत होती. मी त्यांना अडचण सांगितली. ते 'विवेक' कार्यालयात आले. सदर विषय त्यांनी समजून घेतला आणि पुस्तक निम्म्या किमतीत विकावे, असे ठरले. येणारा घाटा देणगीने भरून काढण्याचा विषय त्यांनी केला. तो त्यांनी पूर्ण केला.

गेल्या महिन्यात मी त्यांना फोन केला होता. 'महिको' या संस्थेचे प्रमुख बारवाले यांना त्यांची भेट हवी होती. बारवाले यांचा सुधारित बियाणे तयार करण्याचा व्यवसाय आहे. सध्या कृषी क्षेत्रात नवनवीन प्रकारची बियाणे येत असतात. त्यावर उलटसुलट चर्चा सुरू असतात. या बियाण्यांतून होणारे उत्पादन मनुष्य शरीराला हानिकारक आहे, असे काहींचे म्हणणे आहे. पर्यावरणाची खूप हानी होते, असे दुसरे सांगतात. म्हणून मलाही बारवाल्यांसोबत चर्चा करून हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. अनिल दवे यांची बारवाल्यांसोबत भेट ठरण्यापूर्वीच काळाशी त्यांची भेट ठरली आणि पुन्हा कधीही न भेटीला येण्याच्या प्रवासाला त्यांनी प्रस्थान केले.

vivekedit@gmail.com