मंतरलेले तीन दिवस

विवेक मराठी    04-May-2017
Total Views |

नुकतेच गडकरी रंगायतन, ठाणे येथे 29वे स्वा. सावरकर साहित्य संमेलन संपन्न झाले. 'स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन' असे नाव असले, तरी तशा अर्थाने हे साहित्य संमेलन नव्हते. या संमेलनामुळे साहित्य एक शास्त्र आहे, हे प्रकर्षाने जाणवले. मंतरलेल्या तीन दिवसांचा हा परिणाम तात्कालिक नाही राहणार, कारण हिंदुजागृती आज आपल्या अस्तित्वरक्षणाचा विषय आहे, हे एकदा लक्षात घेतले की या मार्गावरून चालण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.

प्रिल 21,22,23 रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे 29वे स्वा. सावरकर साहित्य संमेलन संपन्न झाले. सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र साठे यांनी मला सांगितले की यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला उपस्थित राहायचे आहे. असे मला सांगण्याचा रवींद्र साठे यांचा अधिकार असला तरी मी त्यांना म्हणालो, ''नसत्या जबाबदारीत तू मला टाकू नकोस. मी संघपध्दतीने सावरकर विचार जगणारा जरी असलो, तरी मी सावरकरांचा अभ्यासक नाही, हे तुला माहीत आहे.'' पण रवींद्र साठे याने हसत हा विषय बाजूला ठेवला आणि तुम्हाला उपस्थित राहायचे आहे अशी आज्ञा सोडली, मी तिचे पालन केले.

अध्यक्ष म्हणून तीन दिवस संमेलनातील उद्घाटन सत्रापासून समारोपाच्या सत्रापर्यंत सर्व सत्रांत उपस्थित राहिलो. दोन सत्रांत भाषणे केली. तीन दिवस मंतरलेल्या वातावरणात राहण्याचा विलक्षण अनुभव घेतला. साहित्य संमेलनाचे नाव जरी 'स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन' असे असले, तरी तशा अर्थाने हे साहित्य संमेलन नव्हते. साहित्य एक शास्त्र आहे. साहित्य संमेलनामध्ये साहित्यमूल्य, साहित्याची सामाजिकता, साहित्यातील देशीकता, साहित्य आस्वाद म्हणजे काय? रसिकता म्हणजे काय? काव्यगुण म्हणजे काय? साहित्यातील विविध प्रकारांची वैशिष्टये काय? अशा साहित्यशास्त्राशी एक ना अनेक निगडित विषयांची चर्चा करावी लागते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचीदेखील या गुणपट्टीने चर्चा, चिकित्सा करता येते. परंतु या संमेलनात जे विविध विषय ठेवले होते, त्यांचा तशा अर्थाने साहित्याशी काही संबंध नव्हता. म्हणून जरी हे साहित्य संमेलन असले, तरी ते खऱ्या अर्थाने 'सावरकर विचार संमेलन' होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराची ऊर्जा किती प्रचंड आहे, याची अनुभूती तीन दिवसांच्या ऊर्जाकोषात राहिल्यानंतर मला झाल्याशिवाय राहिली नाही. सावरकरांची कवने पाठ असणे आणि ती बहुतेक साहित्यप्रेमी मराठी माणसाला पाठ असतात आणि त्याचा गहन अर्थ समजणे सोपे नाही.

उदाहरणार्थ -

* तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण

* नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरतभूमिचा तारा॥

प्रसाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी॥

* अनेक फुले फुलती। फुलोनिया सुकोन जाती॥

कोणी त्यांची महती गणती ठेविली असे।

मात्र अमर होय ती वंशलता। निर्वंश जिचा देशाकरिता॥

* स्वतंत्रते भगवती। त्वामहं यशोयुतां वंदे॥

जी गीते गायली जातात, त्यांचे असे होते की गाण्याची चाल आपल्याला आवडते, ठेका आवडतो आणि आपण ती गुणगुणतो; गाण्यांच्या शब्दांकडे, शब्दांत लपलेल्या अर्थाकडे आणि कवीच्या भावविश्वाकडे आपण साधारणतः जात नाही. या संमेलनात सावरकरांचा शब्द, सावरकरांचे काव्य म्हणजे काय ऊर्जा आहे, हे अनेकांनी आपापल्या परीने उलगडून दाखविले. अभिनेते शरद पोंक्षे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सावरकरांच्या गीताचा कार्यक्रम सादर केला. एका-एका गीताचे सादरीकरण आणि त्यापूर्वी त्याचे केले जाणारे भाष्य यामुळे ते गीत, गीत न राहता शब्दरूप भावगंध व्यक्त करणारे एक-एक लेणे झाले होते. 'अरे! हे गीत तर आपण खूप वेळा ऐकले, पण या गीताचा इतका खोलवरचा अर्थ आहे हे यापूर्वी कधी ध्यानातच आले नाही.' अशी ऐकणाऱ्याची प्रतिक्रिया झाली.

भारताची संरक्षणसिध्दता, अल्पज्ञात सावरकर, सावरकरांचे साहित्यविश्व, भारतातील समाजसुधारणा - विविध प्रयत्न, सावरकर आजच्या संदर्भात, सावरकरांवरील आक्षेप आणि निराकरण असे परिसंवादाच्या सत्रांचे विषय होते. या विषयांवरूनच लक्षात येईल की परिस्थितीच्या संदर्भात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची प्रासंगिकता कोणती आहे, हे श्रोत्यांनी नीट जाणून घ्यावे अशी संयोजकांनी अपेक्षा केली होती. यातील कोणते सत्त्व उजवे आणि कोणते डावे याचा निर्णय करणे फारच कठीण. भारताची संरक्षणसिध्दता हे परिसंवादाचे पहिलेच सत्र एअर मार्शल भूषण गोखले आणि कमांडर सुबोध पुरोहित, अरविंद कुळकर्णी यांनी एका उंचीला नेऊन ठेवले. त्या उंचीवरून कुठलेही सत्र खाली आले नाही. याचे प्रमुख कारण असे की बोलणारा प्रत्येक वक्ता आपल्या विषयातील तज्ज्ञ होता. परंतु नुसती तज्ज्ञता असून चालत नाही. काय मांडावे याचे चिंतन, मनन करावे लागते आणि श्रोत्यांना समजेल अशा भाषेत मांडावे लागत असते. आपल्या विद्वत्तेच्या प्रदर्शनाने रंगाचा बेरंग होतो, त्या मोहात कुणी पडले नाही. भारताची हवाई संरक्षणसिध्दता आणि सागरी संरक्षणसिध्दता खूप सक्षम आहे असे श्रोत्यांना सुखाविणारे विधान करण्याच्या मोहात दोन्ही वक्ते पडले नाहीत. त्यांनी सैन्यशास्त्राच्या दृष्टीने आपण नेमके कोठे आहोत आणि आपले शत्रुदेश कुठे आहेत आणि त्यांच्यापेक्षा आपण कोणत्या कोणत्या बाबतीत सरस आहोत याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण केले आणि ही सरसता वीर सावरकरांच्या विचारांशी आपली नाळ कशी मांडते हेही सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेसच्या सत्तेवर पोसलेल्या आणि पैशावर माजलेल्या विकाऊ विद्वानांनी अत्यंत गलिच्छ आरोप केलेले आहेत. सावरकरांनी माफीनामे लिहून दिले, सावरकर हिंसावादी होते, सावरकर मुस्लीमद्वेष्टे होते, स्वातंत्र्य आंदोलनात सावरकरांचा काही सहभाग नाही, 1937नंतर त्यांनी इंग्रजांना सहकार्य केले, ते गांधीद्वेष्टे होते, गांधी खुनात त्यांचा सहभाग होता, असे भन्नाट आरोप काँग्रेसतर्फे सातत्याने केले जातात. त्यामागे एक राजकारण आहे. काँग्रेसने 1920सालापासूनच आपल्याला हिंदू विचारांशी संघर्ष करायचा आहे ही भूमिका घेतली. 'जे जे हिंदू ते ते निंदू' हे काँग्रेसचे धोरण झाले. नेहरू त्याचे सेनापती झाले. नेहरू सावरकरांचे पराकोटीचे द्वेष्टे होते. तो वारसा काँग्रेस आजही चालवीत आहे. हा वारसा देशाला 'काँग्रेसमुक्त' करणारा आहे, हे दीडशहाण्या काँग्रेसच्या लक्षात येत नाही.

या सर्व आरोपांना अत्यंत तर्कशुध्द उत्तरे देण्याचे काम शंतनू रिठे, ऍड. किशोर जावळे, श्रीरंग गोडबोले, गजानन नेरकर आणि अरविंद कुळकर्णी यांनी केले. या सर्वांची भाषणे काळजीपूर्वक ऐकत असताना आरोप किती जरी बिनबुडाचे असले, खोटे असले, मूर्खपणाचे असले, तरी त्याला तर्कशुध्द उत्तर कसे द्यायचे? याचे आकलन मला झाले. प्रत्येक वक्त्याने वर दिलेले आरोप खोडून काढताना खंडन करणारे जबरदस्त पुरावे दिले. हे सर्व पुरावे लेखी आहेत आणि त्यांची अधिकृतता किंवा विश्वासार्हता नाकारणे अशक्य आहे. सावरकर म्हटले की ज्याला जुलाब सुरू होतात, असाच वर्ग हे नाकारण्याची हिम्मत दाखवू शकतो. या वेळी माझ्या मनात विचार आला की, जी तरुण पिढी आता सावरकरांचा अभ्यास करते आहे, त्या पिढीने आजच्या काळाच्या दृष्टीने सावरकरांवरील आक्षेप आणि त्याची तर्कशुध्द उत्तरे याचे उत्तम अध्ययन केले पाहिजे आणि जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे या विषयाची मांडणी केली पाहिजे.

माधव खाडिलकर लिखित 'अनादी मी अनंत मी' हा नाटयवाचनाचा कार्यक्रम साभिनय सादर करण्यात आला. जो कार्यक्रम सादर केला त्याचे एका वाक्यात वर्णन करायचे तर, 'कान शब्द ऐकत होते आणि डोळे अश्रूंना वाट करून देत होते.' स्वातंत्र्यवीरांच्या 'उत्तरक्रिया' नाटकातील वेडया महिलेचा अभिनय वेदश्री ओक खाडिलकर हिने सादर केला आणि तिचा संवाद जो ऐकेल तो जन्मात कधीही पानिपत विसरणार नाही. या एका संवादावर शेकडो पानिपत कादंबऱ्या ओवाळून टाकाव्यात इतक्या ताकदीचा हा संवाद आहे. सावरकरच असे लिहू शकतात. कारण सावरकर हा हजारो मेगावॅट ऊर्जेचा स्रोत आहे. पानिपतची जखम किती खोल आहे आणि सावरकरांच्या हृदयात ती किती खोल होती हे जाणवते.

सावरकरांच्या व्यक्तित्त्वाचे असंख्य पैलू आहेत. क्रांतिकारक सावरकर, तत्त्वज्ञ सावरकर, महाकवी सावरकर, राजकारणी सावरकर, भाषाशुध्दिकार सावरकर, साहित्यिक सावरकर, समाजसुधारणेचे तत्त्व सांगणारे सावरकर, विज्ञानवादी सावरकर. या साहित्य संमेलनाचे वैशिष्टय असे की, सावरकरांच्या या विविध पैलूंवर अनेक वक्त्यांनी अभ्यासपूर्र्ण प्रकाश टाकला. तसा समग्र सावरकर विषय पचायला कठीणच. यात सावरकरांचा दोष नाही, कारण सावरकरांनी जे मांडले, ते समाज आणि राष्ट्राच्या हिताचे मांडले. सावरकरांवर बोलताना ऍड. किशोर जावळे म्हणून गेले, ''समाजाला सावरकर पचविता आले नाहीत किंवा पचविता येत नाहीत, हा काही सावरकरांचा दोष नाही, समाजानेच आपले मानस बदलण्याचे ठरविले पाहिजे.'' अनेकांची भाषणे ऐकत असताना सारखे सारखे जाणवत होते, ते म्हणजे हिंदू समाजाला बलशाली आणि विजयी करण्याची ताकद सावरकरांच्या विचारामध्ये अफाट आहे. परंतु ते जर आचरणात आणले गेले नाहीत, आणि केवळ भाषणात अथवा पुस्तकात राहिले तर त्याचा काही उपयोग नाही. सावरकर हा ऐकण्याचा जसा विषय आहे, तसाच तो चोवीस तास जगण्याचा विषय आहे.

एकोणतिसावे सावरकर साहित्य संमेलन या वेळी प्रसिध्दीमाध्यमांनी गाजविले. प्रसिध्दीमाध्यमांना त्याबद्दल धन्यवाद द्यायला हवेत. काहींनी स्वभावाप्रमाणे विकृत लिहिले, काहींनी चांगल्या बातम्या दिल्या. 'निंदकाचे घर असावे शेजारी' या उक्तीप्रमाणे ज्यांनी टीकाटिप्पणी केली, त्यांनीही सावरकरांची सेवाच केली असे म्हटले पाहिजे. कारण विरोध झाल्याशिवाय चेतना निर्माण होत नाही. म्हणून विरोधकही आपल्या विरोधाने सकारात्मक चेतना निर्माण करतात. उद्घाटनाच्या सत्राला भाजपाचे अध्यक्ष अमितजी शहा उपस्थित होते आणि समारोपाला शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे उपस्थित होते. या दोघांच्या उपस्थितीमुळे संमेलन प्रसिध्दीच्या प्रकाशझोतात आले. दोघांच्याही भाषणांना भरपूर प्रसिध्दी मिळाली. अमित शहा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर भन्नाट टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. तो अनेकांना झोंबला. काँग्रेसला अधिकच झोंबला. ते स्वाभाविकच आहे. परंतु या दोन्ही वक्त्यांनी एका मर्यादेचे काटेकोरपणे पालन केले. राजकारणावर त्यांनी एक चकार शब्द उच्चारला नाही. दोघांनीही सावरकरांविषयी आपले विचार मांडले. प्रथम श्रेणीच्या अशा राजकीय नेत्यांबरोबर बसण्याची मला सवय नाही. मला ती हौसदेखील नाही. परंतु या दोन्ही नेत्यांचा जो तासा-तासाचा सहवास लाभला, त्यात ते नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच मला अधिक वाटले. त्यांच्या वागण्यात कसलाही डामडौल नव्हता आणि गप्पा मारताना दोन मित्र जसे आपसात बोलतील, तशी त्यांची वागणूक होती. राजकीय नेत्यांची ही दर्शने फार सुखद असतात. सावरकर या एका लोहचुंबकामुळे असे नेते व्यासपीठावर आले, हे या संमेलनाचे वैशिष्टय.

सावरकरांना भारतरत्न किताब द्यावा ही मागणी उद्घाटन आणि समारोपाच्या सत्रातही झाली. केंद्रात भाजपाचे सरकार आहे, त्यामुळे ही मागणी आज ना उद्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. योग्य वेळी त्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात येईल असे समजायला काही हरकत नाही. पण मनात विषय असा येतो की, सावरकरांना भारतरत्न मिळाल्यामुळे काय होणार आहे? त्याची सकारात्मक अनेक उत्तरे आहेत. मातृभूमीचे विभाजन हे सावरकरांचे शल्य आहे. ज्या सिंधूवरून आम्ही हिंदू झालो, ती सिंधू नदी शत्रूच्या ताब्यात गेली आहे. अजूनही संपूर्ण देशात ज्या भव्य प्रमाणात हिंदुतेजाचे प्रकटीकरण व्हायला पाहिजे, तेवढे झाले नाही, अस्पृश्यतेचा नायनाट झालेला नाही, बुवाबाजी व अंधश्रध्दा कमी झालेल्या नाहीत, सावरकरांचा हा वारसा आहे. या संमेलनाने या वारशाची आठवण मला तरी सातत्याने करून दिलेली आहे. तो वारसा पुढे नेणे हेच एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. मंतरलेल्या तीन दिवसांचा हा परिणाम तात्कालिक नाही राहणार, कारण हिंदुजागृती आज आपल्या अस्तित्वरक्षणाचा विषय आहे, हे एकदा लक्षात घेतले की या मार्गावरून चालण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.

vivekedit@gmail.com