बने, हे बघ आपचे सरकार!

विवेक मराठी    05-May-2017
Total Views |

शी वेंधळयासारखी बघतेस काय बने? अर्थ कळला नाही का? अगं, जे सरकार धड जनतेचेही नसते आणि सदस्यांचेही नसते, फक्त एकाच माणसाचे असते, ते सरकार म्हणजे 'आपचे' सरकार.

ये अशी इकडे माझ्या मागून, तिकडून जरा सांभाळूनच ये हो. काळोख आहे तिथे. काय म्हणालीस? तो ढगळ शर्ट घातलेला, मफलर गुंडाळलेला माणूस कोण आहे? काय हे बने, तू पेपर वाचत नाहीस का? अगं, तो बावळट दिसणारा दिसणारा माणूस म्हणजेच प्रामाणिकता शिरोमणी, श्री संत केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री. कोण रे तो कोपऱ्यातून हळूच 'मुर्खमंत्री' असं कुजबुजतोय? बने, तू तिकडे लक्ष देऊ नकोस. बघ नीट.

त्या काळोख्या कोपऱ्यात बसून मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल टि्वटरवरून पंतप्रधान मोदींना शिव्या देत आहेत. काय म्हणतेस? ते दररोज असं का करतात? अगं, व्रत आहे ते त्यांचं. सकाळी उठून मोदींना उद्देशून एखादं ट्वीट केल्याशिवाय ते पाणीसुध्दा तोंडात घेत नाहीत म्हणे. काय विचारतेस? त्यांच्या मागे विजेची बटणं असूनसुध्दा ते काळोखात का बसलेत? अगं, घाबरतात ते बटण दाबायला. त्यांना वाटतं त्यांनी इथे त्यांच्या कार्यालयात विजेचं बटण दाबले, तर तिकडे पंतप्रधान मोदींच्या ऑॅफिसमध्ये उजेड पडेल, कारण मोदींनी विजेची बटणंसुध्दा हॅक केलेली आहेत.

काय म्हणतेस? आम आदमी पक्षाचं निशाण तर झाडू, मग केजरीवालांनी मागे ती एवढी मोठी रंगीत शिडी कशाला ठेवली आहे भिंतीला टेकवून? अगं, तो झाडू पक्षाची निशाणी आहे, पण ती शिडी म्हणजे साक्षात केजरीवालांचं प्रतीक आहे. बघ, त्या शिडीच्या पायऱ्यांवर लिहिलेली नावं वाच, म्हणजे कळेल तुला. पहिलं नाव आहे ते अण्णा हजारे ह्यांचं. अण्णांच्या 'भ्रष्टाचार-विरोधी' आंदोलनाचा शिडीसारखा वापर करून केजरीवाल 2012मध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आले, म्हणून शिडीच्या पहिल्या पायरीला त्यांनी पांढरा रंग दिलाय आणि नाव लिहिलंय 'अण्णा'. केवढा हा गुरूबद्दलचा आदर नाही का? काय म्हणतेस? ती उपरणं बांधलेली दुसरी पायरी कुणाचं प्रतीक? अगं, नाव वाच की. लिहिलंय ना तिथे स्वच्छ, 'योगेंद्र यादव'. हे तेच योगेंद्र यादव आहेत, जे नेहमी टीव्हीवर जायचे आपची बाजू मांडायला. 2015मध्ये दिल्लीत निवडून आल्यावर कसा मस्त काटा काढला की नाही केजरीवालांनी त्यांचा? ती तिसरी पायरी दिसतेय ना? जिच्यावरती वकिलाचा काळा कोट टांगलाय? त्या पायरीवर नाव आहे प्रशांत भूषण यांचं. आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य होते ते. पण केजरीवालांनी अगदी बाउन्सर लावून, धक्का-बुक्की करून त्यांना पक्षाच्या कार्यकारिणीच्या मीटिंगमधून हाकलून दिलं. आहे की नाही मज्जा? केजरीवाल म्हणे त्या शिडीला जिवापाड जपतात.

पूर्वी केजरीवाल धरणं धरायचे. धरणं म्हणजे काय माहीत आहे ना तुला? काय म्हणालीस? पाठयपुस्तकात वाचलं होतंस की धरणं ही आधुनिक भारताची मंदिरं आहेत? अग बने, ती धरणं वेगळी. त्यांत प्यायचं पाणी असतं, आणि आपल्या महाराष्ट्रातल्या धरणात तर वेगळंसुध्दा पाणी असतं. हे धरणं वेगळं. तू कशी आईपाशी आइसक्रीमचा हट्ट धरतेस आणि आई तुझा हट्ट पुरवेपर्यंत जमिनीवर हात-पाय आपटून भोकांड पसरतेस? मुख्यमंत्र्यांचं धरणं तसं असायचं.

काय विचारलंस? केजरीवाल कुठे गेले, आत्ता तर इथे होते? अगं काळजी करू नकोस, आता दिल्ली नगरपालिका निवडणुकीत दाणकन पडला ना त्यांचा पक्ष, म्हणून 'अंतर्गत सर्व्हे' करायला गेले असतील कुठेतरी. किती कामं त्यांच्यामागे! कधी धरणं धरायचं, कधी प्रामाणिकपणाची सर्टीफिकेटं वाटायची, कधी लोकांच्या डिग्य्रा चेक करायच्या, कधी सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा मागायचा, कधी ईव्हीएमच्या नावाने खडे फोडायचे, कधी 'आज दुपारी पराठा खाऊ की इडली?' ह्या विषयावर एसेमेसद्वारे जनमत मागवायचं, कधी हातात झाडू घेऊन फोटो काढायचे. कधी पंजाबला जाऊन खलिस्तान्यांबरोबर 'भारत तोडो'चा खेळ खेळायचा. कधी गोव्याला जाऊन लोकांना मासळी आणि फेणी फुकट देतो म्हणून सांगायचं. कधी चित्रपटांचे रिव्ह्यू लिहायचे. कामं काय थोडी असतात त्यांच्यासारख्या कष्टाळू माणसापुढे?

अगं, आपणही त्यांच्या मागोमाग जाऊ. वेडे, त्यांना शोधायला त्रास नाही पडत. जिथे टीव्ही कॅमेऱ्यांचा प्रकाशझोत दिसेल, त्या दिशेकडे तोंड करून चालत सुटायचं. हे बघ, दिसले का? कॅमेऱ्यांच्या झोतात आणि पत्रकारांच्या कोंडाळयात मंद स्मित करत असलेले केजरीवाल? क्रांतिकारक आहेत की नाही ते बने? म्हणतात ना, ब्रह्म तेथे माया, तसे केजरीवाल तेथे टीव्हीची छाया!

बने, अगं तुझं काय चाललंय? त्या टीव्हीवाल्यांकडे बघून एवढी का मुरडते आहेस? तुला च्यानेलवर जायचंय का चर्चा करायला? अगं, त्यासाठी वेगळे कपडे लागतात, कोपरापर्यंत बाह्यांचा ब्लाउज, मातकट, राखाडी रंगाच्या सुती साडया, डोळयात वाटीभर काजळ आणि कपाळावर ताटलीएवढी टिकली लावावी लागते त्याच्यासाठी. शिवाय तू सेकुलर आहेस का बने? काय म्हणालीस? सेकुलर म्हणजे काय? काय हे बने, शाळेत काही शिकवत नाहीत का तुम्हाला? कुमार केतकरांचा किंवा वागळयांचा सेकुलरितेचा फुकट कोर्स कर आधी, मग बोलावतील टीव्हीवाले तुला.

ऐकलंस का बने, तो केजरीवालांच्या मागे उभा आहे ना, तो अत्यंत ढ दिसणारा माणूस पाहिलास? त्याचं नाव आशुतोष. तो आधी पत्रकार असताना राजकारण करायचा, आता राजकारणात आल्यावर पत्रकारिता करतो म्हणे. ते दुसरे आहेत ते आशिष खैतान. कोण रे तो त्यांना आशिष सैतान म्हणतोय? ठिकठिकाणी निवडणुकांच्या पूर्वी जे खूप विनोदी आप अंतर्गत सर्वे येतात, ना ते लोकांना हसवण्याचं महान कार्य हेच करतात. सध्या ते येणाऱ्या गुजरात निवडणुकांचे अंतर्गत सर्वे करण्यात गुंतले असतील. ते तिकडे उघडेबंब दिसतात ना, ते संदीप सिंह. गरजू स्त्रियांची रेशन कार्डे स्वत: रस घेऊन बनवून देतात, इतके ते 'काम'सू आहेत म्हणे!

मुख्यमंत्र्यांची मुलाखत संपत आली वाटतं. चला. आता ते तडक विमानतळावर जातील, गुजरात किंवा कर्नाटकमध्ये निघाले असतील ते प्रचाराला. बने, अगं, ते साधे राजकारणी नाहीत. तू हिंदी चित्रपट बघतेस ना? त्यात कसे इच्छाधारी नाग असतात, जे हवं तेव्हा हव्या त्या माणसाचं रूप घेऊ शकतात? तसे केजरीवाल हे इच्छाधारी राजकारणी आहेत. ते गोव्यात जातात तेव्हा ते अर्विन केजरीवालीस बनून चर्चमध्ये जातात, पंजाबमध्ये ते अरविंदरसिंग केजरीवाल बनून गुरुद्वाराच्या लंगरमध्ये जेवतात. उद्या कर्नाटकात निवडणुका जाहीर झाल्या की ते अरविंदाप्पा केजरीगौडा बनून दसऱ्याच्या मिरवणुकीत सामील होतील आणि गुजरातमध्ये अरविंदभाई केजरीदास बनून गरबा खेळतील.

काय म्हणालीस? ह्या इतक्या सगळया कामांमधून मुख्यमंत्री दिल्ली प्रशासनाची कामं कशी आणि केव्हा करतात? हा हा हा. भोळी रे भोळी आमची बनी. तो मोठा फ्लेक्स वाचला नाहीस का? 'एट लिस्ट ही इज डूइंग समथिंग'! ते समथिंग काय आहे ते कुणालाच कळू न देता कामं केल्यासारखी भासवणं, यालाच म्हणतात 'आपचे' सरकार!

shefv@hotmail.com