आधुनिक ज्ञानपोई

विवेक मराठी    08-May-2017
Total Views |


'वाचाल तर वाचाल' असा एक सुंदर सुविचार आपण अनेक वेळा ऐकत असतो, किंवा वडीलधाऱ्यांनी कधीकधी दिलेला तो अनुभवजन्य सल्ला असतो. आज आपण ज्या वातावरणात जगत आहोत, ते खूप गतिमान आहे. 'इथे श्वास घ्यायलाही वेळ नाही' हा मराठी भाषेतील वाक्प्रचार नसून ते आजचे वास्तव झाले आहे. महानगरांमध्ये, नगरांमध्ये आणि छोटया छोटया गावात ही परिस्थिती अनुभवता येते. तक्षशिला, नालंदा यासारख्या प्रचंड ग्रंथालयांचा वारसा सांगणाऱ्या आपल्या देशात वाचन आणि अध्ययन यांच्याबाबत आज अशीच स्थिती आहे. त्याला मराठी भाषा किंवा महाराष्ट्र अपवाद नाही. मागच्या वीस-पंचवीस वर्षांत आपल्या सर्वांचे जगण्याचे संदर्भ बदलले आहेत. त्याचप्रमाणे जीवनातील प्राधान्यक्रमही बदलले आहेत. कधीकाळी अग्रस्थानी असणारा वाचनसंस्कार आणि वाचन व्यवहार दिवसेेंदिवस खाली खाली घसरू लागला आहे. याला जशी सामाजिक, आर्थिक कारणे आहेत, तशीच काही परिस्थितीजन्य व्यक्तिगत कारणेही आहेत. पण साऱ्या कारणांवर मात करून पुन्हा एकदा नव्याने आपल्या जगण्यात वाचनसंस्कार रुजायला हवा, पुन्हा एकदा गतवैभवासारखी वाचनसंस्कृती विकसित व्हायला हवी, याबद्दल कुणाच्या मनात शंका असणार नाही.

या साऱ्या पार्श्वभूमीवर 4 मे रोजी देशातील पहिले 'पुस्तकांचं गाव' महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागाच्या वतीने सातारा जिल्ह्यात भिलार या गावी साकार झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. एक नावीन्यपूर्ण कल्पना त्या निमित्ताने प्रत्यक्षात आली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी 27 फेब्रुवारी 2016 रोजी या प्रकल्पाची घोषणा केली आणि युध्दपातळीवर पाठपुरावा करत गतिशील कार्यवाही केल्याने हा प्रकल्प विक्रमी वेळात साकार झाला. आपल्या देशात पहिले 'पुस्तकांचं गाव' होण्याचा मान जरी भिलार गावाला मिळाला असला, तरी अशा प्रकारची ग्रंथसंपदेने समृध्द असणारी अनेक गावे जगाच्या पाठीवर आहेत. त्यापैकी 'हे ऑन वे' हे ब्रिटनमधील पुस्तकांचे गाव पाहून विनोद तावडे यांना ही कल्पना सुचली आणि आता ती प्रत्यक्षात साकार झाली आहे. मराठी साहित्यातील सर्व साहित्य प्रकारांची स्वतंत्र दालने भिलार गावात उभारली गेली असून भविष्यात या गावातील ग्रंथसंपदा वाढणार आहे. त्याचबरोबर अन्य भारतीय भाषांमधली पुस्तकेही तेथे उपलब्ध होणार आहेत.

महाराष्ट्र शासनाचा हा सारा आटापिटा कशासाठी आहे? यातून शासनाला आणि समाजाला काय साध्य करायचे आहे? या प्रश्नाचा विचार या निमित्ताने आपण सर्वांनी करायला हवा. वर उल्लेख केल्याप्रमाणे जर वाचनसंस्कृतीबाबत आपल्या समाजाची घसरण सुरू असेल, तर मग असे उपक्रम कशासाठी? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जाऊ शकेल. पण या उपक्रमाकडे प्रश्नार्थक नव्हे, तर सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले, तर आपल्याला या उपक्रमात दडलेली सुप्त ऊर्जा लक्षात येईल. एका बाजूला धकाधकीचे जीवन, कामातून निर्माण होणारा ताणतणाव, आणि वाचनाची भूक वाढेल आणि ती भागवली जाईल अशा वातावरणाचा अभाव अशा परिस्थितीत भिलार येथे देशातील पहिले पुस्तकांचे गाव साकार झाले आहे आणि भविष्यात अशा प्रकारची गावे अनेक ठिकाणी साकारण्याचा शासनाचा मानस आहे. जे पुस्तकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यांना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या साहित्यकृतींचा आस्वाद घेता येणार आहे. आणि जे वाचनसंस्कृतीपासून तुटले होते, त्यांची मुळे पुन्हा रुजायला मदत होणार आहे. मात्र त्यासाठी पुस्तकांच्या गावाला, भिलारला जायला हवे.

'पुस्तकांचं गाव' हा शासनाचा उपक्रम असला, तरी तो आता तसा राहिलेला नाही. कारण भिलारच्या ग्रामस्थांनी तो उपक्रम आपला म्हणून स्वीकारला आहे. या उपक्रमात आपली मानसिक गुंतवणूक केली आहे. आणि जेव्हा जेव्हा शासकीय योजनांमध्ये समाजाचा सहभाग वाढतो, तेव्हा तेव्हा त्या योजना सर्वार्थाने यशस्वी होतात, असा आपला अनुभव आहे. भिलार गावातील ग्रामस्थांनी शासनाच्या या उपक्रमात सहभाग घेतला असे न म्हणता त्यांनी शासनाची योजना जिवंत केली असे म्हटले, तर अतिशयोक्ती होणार नाही. एका छोटया गावात सुरू झालेल्या या उपक्रमाचे परिणाम दिसायला आणखी काही दिवसांचा अवधी जाऊ द्यावा लागणार आहे. मात्र जी सुरुवात झाली, ती खूप सकारात्मक आणि आनंददायी आहे.

पुस्तकांच्या गावाच्या निमित्ताने जुन्या परंपरेची पुन्हा नव्याने सुरुवात होत आहे. म्हटले तर ही खूप नवी आणि आकर्षक कल्पना आहे आणि गतकाळात शोध घेत गेलो, तर आपल्या चिरंतन संस्काराचेच आपण नव्याने पुनरुज्जीवन करत आहोत. कधीकाळी अशीच संपन्न ग्रंथालये आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेली होती. तेथे चिंतन, मनन आणि अध्ययन करून शब्दाला रत्नाचे आणि शस्त्राचे रूप दिले जात होते. जागोजागीच्या ज्ञानपोयांच्या माध्यमातून तेव्हा देश आणि समाज घडला होता. आपल्या देशाचा तोच वारसा आणि तीच परंपरा पुन्हा नव्याने प्रवाहित करण्याचा मान महाराष्ट्र शासनाला आणि भिलार गावाला मिळाला आहे. आपल्या जीवनातून लुप्त होऊ पाहणारी वाचनसंस्कृती आणि मानवी जीवनाची समस्या बनलेला एकटेपणा दूर करण्यासाठी, परिपूर्ण जीवनाचा आनंद घेण्यासाठी ही आधुनिक ज्ञानपोई उपयुक्त ठरेल, आणि देशभर तिची प्रतिबिंबे उमटू लागतील, असा विश्वास वाटतो. कारण हा विषय केवळ पुस्तकांचा नाही, तर आपल्या समृध्द जगण्याचा आहे.