तो आणि आपण

विवेक मराठी    08-May-2017
Total Views |

अर्थात सगळयाच लहान मुलांप्रमाणे त्याचा आवडीचा खेळ होता गोटया खेळणं. काय करायचं ते आता त्याच ठरलं होतं. त्याच्या आयुष्याला ध्येय मिळालं होतं. तो त्याच्या आवडत्या गोटीचा कायापालट करणार होता. त्याने आपला अंश जाता जाता तुम्हा-आम्हांत ठेवला. तर असा तो. त्याचं नाव परमेश्वर, आणि ज्या गोष्टीला त्याने अजरामर केलं, तिला आपण पृथ्वी म्हणतो. खरं तर हा देव, परमेश्वर, जगन्नियंता म्हणजे आपला पूर्वजच. अर्थातच त्याचाच अंश आपल्यात आहे हे जितक्या लवकर आपल्याला समजेल, तितक्या लवकर त्याला मर्ूत्यांमध्ये शोधण्याची हौससुध्दा थांबेल.

काहीतरी भव्यदिव्य करून दाखवायचं, हे त्याने फार लहानपणीच ठरवलेलं. तो कोण, कुठचा, कोणाला माहीत नाही. कसा दिसायचा, कसा वागायचा, कुणाला कल्पना नाही. पण तुमची स्वप्नं तुम्हाला कधी तुमची जातकुळी विचारत नाहीत. एक नक्की की जेव्हा तो होता, तेव्हा त्याला खेळायला बऱ्याचशा गोष्टी होत्या. अर्थात सगळयाच लहान मुलांप्रमाणे त्याचा आवडीचा खेळ होता गोटया खेळणं. आठ-नऊ गोटया असाव्या त्याच्याकडे, त्यांच्यासोबत एकटाच खेळत असायचा. रांगेने सगळया मांडून ठेवायचा आणि मग एकामागोमाग एक सगळया फटाफट गलीत मारायच्या. सगळया रांगेने मांडल्या की त्यातली एक गोटी नेहमी त्याचं लक्ष वेधून घ्यायची. म्हणायला गेलं तर त्याला ती आवडायचीसुध्दा. ती दिसायलाच कित्ती छान होती. निरनिराळया रंगांच्या छटा स्पष्ट दिसायच्या तिच्यावर. असं वाटायचं, जणू काही नुकतीच रंगपंचमी खेळून आलीये. निळा, हिरवा, पिवळा, लाल, पांढरा... जणू काही इंद्रधनुष्यच.

आताशा तो मोठा होऊ लागला होता. वयाने आणि विचारांनीही. नवीन स्वप्न, नवा उत्साह, नवे मार्ग शोधण्याची धडपड.. सगळं काही एकत्रच. अस्वस्थ असायचा सतत. मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी करायचंय, सतत भुणभुण लावून असायचा. त्याच्या सोबतचे सगळे कसे नेहमीचे मार्ग स्वीकारून 'सेटल' झाले होते. याचं मात्र कुणाला कळायचंच नाही. म्हणता म्हणता हा ऐन तिशीला आला, तरीही ह्याचं काही एक ठरलेलं नव्हतं. शेवटी याला कुणीतरी म्हणालं, ''अरे, तू गोटयाच खेळ. तू कुठे नवीन काहीतरी करण्याच्या आणि स्वप्न पाहण्याच्या गोष्टी करतोस.'' त्याच्या डोक्यात क्षणार्धात काहीतरी चमकलं. धावतच तो घराबाहेरच्या अंगणात गेला. त्याच्या आवडत्या गोटीने त्याचं लक्ष पुन्हा वेधून घेतलं. त्याने तिला हातात घेतलं आणि क़ुठल्याशा निर्धाराने त्याचे डोळे चकाकले.

काय करायचं ते आता ठरलं होतं. त्याच्या आयुष्याला ध्येय मिळालं होतं. तो त्याच्या आवडत्या गोटीचा कायापालट करणार होता. त्याच्या या ध्येयावर सारेच हसले, पण तो त्यापासून ढळला नाही. त्याच्या कार्याला सुरुवात झाली होती. वेगवेगळे रंग आता जिवंत होणार होते. निळाशार रंग समुद्राच्या खोलीत खोलवर उतरला. हिरव्या रंगांच्या अगणित छटांनी वृक्षवल्लींना आपलंसं केलं. त्याची कल्पनाशक्ती आणि त्याचे प्रयत्न दोन्ही मिळून त्याच्या स्वप्नाचा पाया रचत होते. उरलेल्या रिकाम्या जागा कुठे शुभ्र बर्फाच्छादित पर्वतांनी, तर कुठे वाळवंटांनी भरून काढल्या. फेसाळत वाहणाऱ्या नद्यांनी, रोरावत वाहणाऱ्या वाऱ्यांनी आणि रिमझिम पाऊसधारांनी जिवंतपणा आणला. पण अर्थातच सगळंच इतकं सोप्पं नव्हतं. कधी हळव्या कलासक्तपणे सर्जनाचा आविष्कार करायचा, कधी कधी मनासारखं काही जमायचंच नाही. मग स्वतःच्याच हाताने तितक्याच स्थितप्रज्ञतेने साऱ्याचा संहार करायचा. पुन्हा श्रीगणेशा आणि पुन्हा सर्व काही. या सगळयात त्याच्या आयुष्याची खूप सारी वर्षं गेली. अर्थात स्वप्नपूर्तीला काळाचं बंधन नसतंच. त्याने जे ठरवलं, ते पूर्ण झालं. आयुष्यभर कष्ट करून बनवलेल्या त्या वस्तूचं नामकरणसुध्दा केलं.

आताशा तो थकला. ज्या स्वप्नाला आपण सत्यात आणलं, त्याच्या भविष्याची चिंता त्याला सतावायला लागली. आपण आयुष्यभर खपून जे उभं केलं, ते सांभाळायला आपल्याच तोलामोलाचा कुणीतरी लागेल याची त्याला जाणीव झाली. आणि त्याला त्यावरसुध्दा उपाय सुचला. त्याने आपला अंश जाता जाता तुम्हा-आम्हांत ठेवला. तर असा तो. त्याचं नाव परमेश्वर, आणि ज्या गोष्टीला त्याने अजरामर केलं, तिला आपण पृथ्वी म्हणतो. खरं तर हा देव, परमेश्वर, जगन्नियंता म्हणजे आपला पूर्वजच. अर्थातच त्याचाच अंश आपल्यात आहे हे जितक्या लवकर आपल्याला समजेल, तितक्या लवकर त्याला मर्ूत्यांमध्ये शोधण्याची हौससुध्दा थांबेल आणि त्याला पूर्णपणेच नाकारण्याचा करंटेपणासुध्दा.

9773249697