कला सुंदर जगण्याची

विवेक मराठी    09-May-2017
Total Views |


आयुष्यात सगळयाच गोष्टी माझ्या अपेक्षेनुसार घडणार नाहीत. हे स्वीकारलं की बरेचसे ताण कमी होऊ शकतात. वास्तव स्वीकारण्याची सवय लावून घ्यावी. आपण अपयशी झालो तर ते सहजपणे स्वीकारावं. पुन्हा नव्याने तयारी करण्यास या स्वीकृतीची खूप मदत होते. इतरांकडून अवास्तव अपेक्षा करणंदेखील टाळावं. मला सर्वांनी समजून घ्यावं, माझंच ऐकावं यातून अपेक्षाभंगच हाताशी येणार.

काही दिवसांपूर्वीच एक बातमी न्यूज चॅनलवर पाहण्यात आली. 20 वर्षांच्या एका विद्यार्थ्याने हॉटेलच्या 11व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. तत्पूर्वी त्याने एका चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, 'मला कुणीच समजून घेऊ शकलं नाही'. खूप एकाकी अवस्थेतून त्याने हे पाऊल उचललं होतं. परिस्थितीने टाकलेल्या फासामध्ये तो अडकला होता.

सरळ सोपं असं कुणाच्या आयुष्यात असतं बरं? प्रत्येकाला काही ना काही दडपण आहेच. कधी परिस्थिती आपली खेळी खेळते, तर कधी मनाच्या खोल तळाशी निराशा, चिंता, दु:ख सारं अस्तित्व ढवळून काढतात. या दडपणाला लीलया पेलत आपल्या प्रगतीची घोडदौड जो सुरू ठेवतो, तोच हा जीवनाचा पट जिंकतो.

या विचारशृंखलेत अचानक खूप खूप जुनी आठवण जागी झाली. 2001 सालची. आम्ही नागालँडच्या मिसुलूमी गावी पोहोचलो. एका छोटयाशा खोलीत कल्याणाश्रमाची नीता बर्वे राहत होती. तिथल्या समाजात भारतीयत्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी तिथे एक शाळा चालवत होती. आम्ही तिथे पोहोचतो न पोहोचतो, इतक्यात सैन्याच्या वेषातले 8-10 तरुण तिथे पोहोचले. ते अर्धा तास तिच्याशी नागामिझमध्ये बोलत होते. थोडया वेळाने ते निघून गेले. मला वाटलं, आसाम रायफल्सचे जवान असावेत. पण तिने जे सांगितलं त्याने आम्ही थक्कच झालो. ते वेगळया नागालँडची मागणी करणाऱ्या फुटीरवादी गटाचे होते. आम्ही कोण, इथे का आलोय, काय करणार अशी चौकशी करण्यासाठी ते आले होते. पण नीताताईने सारा प्रसंग इतका सहज हाताळला की, आपण आतंकवाद्यांसमोर आहोत आणि ते आपल्याबाबत विचारताहेत हे आम्हाला हावभावावरून जाणवलं नाही. पण तेव्हा मनात आलं, तिला खरंच तणाव जाणवलाच नाही की तिने तो हुशारीने हाताळला असेल...

अशीच एक घटना कुर्ला स्टेशनवरची. गर्दीने तुडुंब भरलेला लेडीज कोच. मी गर्दीतून विद्युतगतीने बाहेर फेकले गेले, पण शेजारच्या बाईच्या हाताला धरलेला मुलगा मात्र बाहेर पडण्याऐवजी आत खेचला गेला. आई बाहेर अन् मुलगा आत. आईने स्टेशनवर उतरताच हाका मारायला सुरुवात केली. मुलगा दिसेना. ती इतकी घाबरली की, तिला चक्करच आली. सारे जण तिला सावरण्याचा प्रयत्न करत होते. पण ती केवळ आक्रोश करत होती. यात 10 मिनिटं गेली अन् स्टेशनला घोषणा झाली - तो मुलगा माटुंगा स्टेशनवरील पोलिसांकडे गेला होता. तिथून स्टेशन मास्तरकडे आणि त्याच्या आईला तिथून तो सुरक्षित असल्याचा संदेश मिळाला होता.

प्रसंग एकच होता, पण मुलाने धैर्य दाखवून परिस्थिती हाताळली, तर आई हातपाय गाळून बसली.

वरील तिन्ही प्रसंगांकडे बारकाईने पाहिलं, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू समोर येतो - अनपेक्षित, नकोशा त्रासदायक घटनांना दिलेल्या प्रतिक्रिया...

जेव्हा काही अनपेक्षित घडतं, तेव्हा एक ताण आपल्या मनावर येतो. आज आपलं जीवन अनेक व्यवधानांनी क्लिष्ट बनत चाललंय. दैनंदिन जीवनातदेखील खूप भागदौड करूनच आवश्यक गोष्टी मिळवाव्या लागतात. कधी मनाजोगतं मिळतं, तर कधी अपयश, अडचणी मार्ग रोखतात. त्यामुळे धावपळ, अतिश्रम, जीवघेणी स्पर्धा यातून येणारे ताणतणावही असंख्य आहेत.

अनेकदा परिस्थिती हाताबाहेर असते. त्यामुळे ठरवलेल्या गोष्टींपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आता हेच पहा ना, तुरीचं उत्पन्न प्रचंड आलं, पण मालाला उठाव नाही, अशा वेळी शेतकरी काय बरं अनुभवत असतील?

जेव्हा कोंडी फुटण्याचा कोणताच मार्ग दिसत नाही, माणसाची घुसमट होते, तेव्हा त्याला चिंता, ताणतणाव यांची जाणीव होऊ लागते. हे ताण कोणालाच चुकत नाहीत. प्रत्येकाच्या डोक्यावर तणावाची ही अदृश्य तलवार टांगलेलीच असते.

बघा ना, कुणाला खूप काम आहे त्याचा ताण, तर कुणाला काम मिळत नाही याचा ताण... विद्यार्थ्यांना परीक्षेचा, त्यामागून येणाऱ्या निकालाचा, मग मनाजोगतं करियर करण्याचा ताण, तर आईवडिलांना मुलांच्या वागण्याचा, त्यांच्या कुसंगतीचा ताण... एखाद्याला त्याच्या खडूस बॉसच्या अवकृपेचा ताण, तर लोकलमधून रोज ये-जा करणाऱ्यांना प्रवेश परीक्षेदरम्यान होणाऱ्या युध्दप्रसंगाचा ताण...

तसं पाहता सौम्य प्रमाणातला ताण आवश्यकच आहे, कारण ताणामुळे माणूस कार्यप्रवृत्त होतो. स्वयंपाकघरातला प्रेशर कुकर नाही का ताणामुळेच आपलं काम चोख करत? पण तो ताण अतिरिक्त झाला तर काय होतं, ते आपण जाणतोच.

म्हणजे येणारा ताण आपल्याला कार्यप्रवृत्त करत असेल तर ठीक, पण तो ताण जर चिंता, उदासी, एकाकीपणा, हृदयाची धडधड, भुकेच्या, झोपेच्या सवयीत बदल, निरसपणा, चिडचिड अशी लक्षणं दाखवत असेल, तेव्हा तो घातक ठरणार असतो.

ताण म्हणजे परिस्थितीसमोर हतबल असल्याचं दर्शवणारी मन:स्थिती आहे. आपल्या विचारातच त्याचा उगम असतो.

कधी आपल्या गरजांची पूर्तता होत नाही किंवा ती करण्याचा मार्ग समोर दिसत नाही, उदा., अपेक्षित आर्थिक मिळकत न होणं, कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात मान न मिळणं, कुटुंबातून प्रेम, सहकार्य न मिळणं, योग्य संधी घेण्यात अपयश येणं अशा अनेक गरजांच्या अपूर्तीने माणसाला ताणतणाव येतात.

आपण कधीकधी आपल्या कुवतीपेक्षा जास्त कामं करायला जातो किंवा आपल्या स्वत:कडून किंवा इतरांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांचं ओझं अनेकदा तणावाला कारणीभूत होतं. आपल्याला सर्वांनी चांगलं म्हणावं, आपण वेगळं काही करावं यासाठी माणूस न पेलणाऱ्या गोष्टी करण्याच्या मोहात पडतो आणि मग अपयश आलं की तणाव येतो.

ताणतणाव हे एकतर भूतकाळातून येतात किंवा भविष्यातून. रजनीच्या बाबतीतही हेच घडलं. सहा महिने ती सासरी राहिली. तिथे प्रचंड त्रास सहन करून सहा महिन्यांनी ती पुन्हा घरी आली. आईवडिलांना वाटलं, आता सारं ठीक होईल. पण रजनी त्या सहा महिन्यांना कवटाळून जगत होती. तिने घराबाहेर पडणं, परिचितांशी बोलणं सारं काही बंद केलं. माणसं अनेकदा वर्तमानात न जगता भूतकाळाचा काथ्याकूट करत राहतात अथवा भविष्याच्या भीतीपोटी स्वत:ला घाबरवत राहतात. यातून चिंता, नियंत्रण नसल्याची भावना निर्माण होते अन् मग तणावामध्ये रूपांतरित होते.

माणूस आनंद, दु:ख, राग, लोभ, मत्सर अशा विविध भावनांच्या छटा अनुभवतो. या भावनांना हाताळणं कधी अवघड होतं आणि भावनातिरेकाने ताण येतो. कुणी आपल्याला लागट बोलतं किंवा चुकीचं असतानाही आपण ते ऐकून घेतो, तेव्हा मनातल्या मनात खूप त्रास होतो. चिडचिड होते, तर कधी भावनांचा बांध फोडून आपण सैरभर वागतो. या दोन्ही टोकाच्या कृती ताणाला आमंत्रण देतात. कधीतरी आपल्याला खूप कोंडल्यासारखं वाटतं. खूप रडावसं वाटतं किंवा अगदी एकटं वाटतं. ही सारी मानसिक ताणाची लक्षणं आहेत. खूप आनंदानेही कुणाला ताण येतो.

कुणी सततच्या तर कुणी गंभीर आजारासोबत जगताना प्रचंड ताण अनुभवतात. अपघात, अपंगत्व, वयानुसार होणारे बदल स्वीकारणं कधी कठीण वाटतं व त्यातूनही तणाव निर्माण होतो.

स्वप्निल मार्केटिंग कंपनीत सेल्स मॅनेजर. कंपनीने त्याच्यावर विश्वास दाखवला, पण त्याने जबाबदारी घेतली अन् मार्केटमध्ये मंदी आली. उत्पादनांच्या मानाने मागणी घटली. याचा ताण स्वप्निलवर येऊ लागला. त्याने बनवलेले प्लॅनसुध्दा ही कोंडी फोडू शकले नाहीत. आपण ही जबाबदारी पेलू शकत नाही हा विचार बेचैन करू लागला. यातून झोपेवर परिणाम झाला. भूक मंदावली. चिडचिड वाढली. चांगली माणसं दुरावू लागली आणि भयंकर औदासीन्याने स्वप्निलला ग्रासलं.

अनेकदा या स्थितीत माणूस व्यसनांचा आधार घेतो, तर काही आत्महत्येचा प्रयत्नदेखील करतात. पण अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके तज्ज्ञांची मदत घेऊन त्यावर उपाययोजना करतात.

सततचा तणाव माणसाला नुकसान पोहोचवतो. रक्तदाब वाढणं, रक्तातलं ग्लुकोज वाढणं, थकवा, झोप जास्त वा कमी येणं, भूक न लागणं, वाईट स्वप्न पडणं, नकारात्मक विचार मनात येणं अशी लक्षणं दिसू लागतात. याचा परिणाम कार्यक्षमतेवर होतो. आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की, येणाऱ्या ताणाचं व्यवस्थापन कसं करावं आणि त्यानुसार आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकास चित्रात हा नवा रंग मात्र भरायचा आहे.

ताण ही शारीरिक, मानसिक स्थिती असली, तरी तिचं मूळ आपल्या विचारांत आहे, आपण ज्या संवेदना मेंदूला पाठवू, त्या मेंदू तशाच स्वीकारतो अन् कामाला लागतो. त्यामुळे ताण व्यवस्थापनात पहिली गोष्ट आपल्या मनातले विचार लिहून काढावेत. ते जर चिंता, दु:ख, ताणाला आमंत्रण देणारे असतील तर त्यांना वेगळा आकार द्यायचा आहे. यासाठी प्रत्येक ताण लिहून काढा व त्या ताणाच्या भोवती असलेले विचार समजून घेऊ. सर्वसाधारण विचार 'माझ्या आयुष्यात रस नाही', 'सगळं नियंत्रणाबाहेर गेलंय', 'मी हे सारं ठीक करू शकेन का?' इ. स्वरूपाचे असतात. हा येणारा प्रत्येक विचार सकारात्मक बनवा. लिहून काढा. सुरुवातीला जाणीवपूर्वक अगदी न पटणारं Affirmation स्वत:ला द्यावं. कारण आपण आपली सवय बदलण्याचा प्रयत्न करत आहोत. रोज उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी या विचारांचं आवर्तन करावं. यामुळे आपल्या अंतर्मनाला योग्य ते संदेश जाऊन ते सक्षम होईल व आपण तणावाच्या छायेतून बाहेर पडण्यास साहाय्य देईल.

यानंतर आपल्याला दुसरं काम करायचं आहे. आपल्याला त्रास देणारे किंवा तणाव उत्पन्न करणारे घटक लक्षात घ्या. रजनीचं उदाहरण आठवा बरं. तिच्या जागी स्वत:ला ठेवून पाहा काय काय जाणवतं? माझ्याच बाबतीत असं का झालं? माझं काय चुकलं? पुढे काय होणार? या चितांच्या गुंत्यात ती गुंतून गेले आहे. अर्थात तिचे पूर्वानुभव, विश्वासघात, अपघात, अनिश्चितता, आईवडिलांना झालेला त्रास या गोष्टी तणाव देणाऱ्या आहेत.

आता विचार करावा की कोणते घटक माझ्या नियंत्रणात होते अन् कोणते नियंत्रणाबाहेर होते? जे नियंत्रणाबाहेर होते, त्यांची चिंता करून काय उपयोग? आणि जे नियंत्रणात आहेत त्यासाठी काय योजना करता येईल?

नेहमी Solution Oriented विचाराची सवय लावावी. आता काय करायचं ते ठरवावं.

आयुष्यात सगळयाच गोष्टी माझ्या अपेक्षेनुसार घडणार नाहीत, हे स्वीकारलं की बरेचसे ताण कमी होऊ शकतात. वास्तव स्वीकारण्याची सवय लावून घ्यावी. आपण अपयशी झालो तर ते सहजपणे स्वीकारावं. पुन्हा नव्याने तयारी करण्यास या स्वीकृतीची खूप मदत होते. इतरांकडून अवास्तव अपेक्षा करणंदेखील टाळावं. मला सर्वांनी समजून घ्यावं, माझंच ऐकावं यातून अपेक्षाभंगच हाताशी येणार.

आजकाल मोबाइलच्या युगात गप्पा-गोष्टी माणसाच्या आयुष्यातून फिकट होत चालल्यात. मनात उठणारे लक्षावधी विचार मनातच साचून राहतात. हे कोंडलेले विचार, भावना रंग-रूप बदलून माणसामध्ये तणाव उत्पन्न करतात. यासाठी मनमुराद गप्पा माराव्यात. रोज डायरी लिहावी.

माणसाला आपली दु:ख, चिंता इतरांपासून लपवण्याची सारं काही छान चाललंय असं जगाला भासवण्याची सवय असते, पण असं स्वत:ला वा इतरांना फसवण्याने ताण अधिकच वाढतो. त्यामुळे जे सत्य आहे ते स्वीकारा. स्वत:ला आणि इतरांनाही स्वीकारा.

आपल्या आयुष्यात आपण शिस्तीचं महत्त्व समजून घेऊ या. शिस्त आली की एक नेटकेपणा आयुष्यात येऊ लागतो.

काही वेळा थोडा काळ वाट पाहण्याचा संयम दाखवावा लागतो. उदाहरणार्थ, आपल्याला फोन आला - ''तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला अपघात झालाय.'' तो माणूस पुढे काय बोलतोय हे ऐकण्याआधीच आपल्या डोळयासमोर अंधार आला, तर आपण परिस्थिती कशी हाताळणार? यासाठी कठीण परिस्थितीत धैर्य टिकवून ठेवणं हे कौशल्य आपल्याला विकसित करावे लागेल. त्यामुळे परिस्थितीचं योग्य आकलन होऊन योग्य कृती घडेल.

सतत नकारात्मक वातावरणात, तणावाच्या जागी राहणं टाळावं, थोडा ब्रेक घ्यावा. यासाठीच तर हवापालट म्हणून अन्य ठिकाणी जाण्याचा सल्ला देतात.

आपल्या कुवतीतल्या कामांना ओळखावं. त्या बाहेरील काम आपल्याला तणाव देणार आहे हे निश्चित. त्यामुळे आपण स्वीकारलेल्या कामाचं नियोजन, अचानक येणाऱ्या अडचणी, आपली कुवत, असलेला वेळ आणि उपलब्ध संसाधनं यांचा विचार करावा आणि त्यानुसार कामाला लागावं.

एवढं करूनही ताण येत असल्यास आधी अशा अडचणींच्या वेळी आपण कोणत्या उपाययोजना केल्या होत्या याचा विचार करावा व तशी अंमलबजावणी करावी. तरीही ताण येत असल्यास वरिष्ठांशी वा योग्य व्यक्तींशी बोलावं व कोंडी सोडवावी.

सतत काम-काम असं न करता दोन कामांमध्ये थोडा मोकळा वेळ ठेवावा. पुरेशी झोप घ्यावी. रात्री झोपताना मोबाइल दूर ठेवून झोपावं. हलकीफुलकी पुस्तकं, विनोद यांचं वाचन करावं. नियमित व्यायाम करावा. शारीरिक व्यायामात ध्यानाचाही समावेश करावा.

किमान 5 मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करावं. आपल्या आत डोकावून पाहावं अन् व्यापून राहणाऱ्या अनावश्यक विचारांना, चिंतांना शांत करावं.

आपल्या दिवसाची सुरुवात कर्णमधुर संगीताने करावी. जेव्हा जेव्हा ताण, थकवा, निराशा जाणवेल, तेव्हा संगीत ऐकावं. संगीतात अद्भुत शक्ती आहे. त्याचा अनुभव घेऊन पाहावा.

वेगवेगळे छंद जोपासावेत. मोकळया हवेत फिरायला जावं. पशुपक्ष्यांशी दोस्ती करावी. नवं काहीतरी शिकावं. यामुळे स्वत:कडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन प्राप्त होतो.

जेवणाच्या वेळा ठरवून घ्याव्यात आणि चौरस जेवण घ्यावं.

मनमोकळं बोलावं. आपलं मन मोकळं करण्याची किमान एक जागा असावी. वेळच्या वेळी निचरा झालेल्या गोष्टींचा ताण येणार नाही.

उत्साहवर्धक, प्रेरणादायी पुस्तकाचं वाचन करावं. आपल्या कामाच्या ठिकाणी, घरात, मोबाइलच्या स्क्रीनवर प्रेरणादायी वाक्य, सुविचार लिहावेत.

परिस्थितीपासून पळ काढून नाही, तर तिला सामोरं जाऊनच आपण स्वस्थ होऊ शकतो. खरं ना?

अनेकदा झालेल्या गोष्टींबाबत सतत चिंतन केल्याने हातात असलेल्या वेळातून काय करता येऊ शकतं याकडे दुर्लक्ष होतं. यासाठी भूतकाळात तितकाच वेळ राहावं, जेवढा वेळ 'आता काय करावं' याचं नेमकं उत्तर मिळत नाही. एकदा ते मिळालं की थेट कामाला लागावं.

भविष्याचा कानोसा घेतल्याने संभाव्य ताण टळतात वा त्यांची संहती कमी होते. परिचितांमध्ये एक लग्न होतं. लग्नाला अवघे दोन दिवस होते अन् अचानक फोन आला. लग्न रद्द झालं. कारणही तसंच होतं. मुलीच्या इच्छेविरुध्द हे लग्न लावलं जात असल्याचं मुलीने मुलाला सांगितलं. त्याने दोन तास वेळ घेतला. 500 जणांच्या या सोहळयाला रद्द करताना ताण आला नसेल का? निश्चितच, पण लोक काय म्हणतील या तात्कालिक ताणापेक्षा भविष्यात दोन जीवनांची किंमत मोजताना येणारा ताण, दु:ख ही त्यापेक्षा अनेक पटीने भयंकर असतील, याचा विचार करून निर्णय घेतला गेला.

ताणामुळे विचारशक्ती अस्थिर होते. निर्णय चुकतात. यासाठी ताणाशी लढता आलं पाहिजे.

आपण परिस्थितीला कसं हाताळतो त्यानुसार व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होणार असते. ताणतणाव ही आपली जणू परीक्षाच आहे म्हणा ना...!

माझी एक मैत्रीण नेहमी एक वाक्य म्हणते. खूप सोपं, पण खूप खोल खोलवर अर्थ असलेलं. ती म्हणते, ''दिवस काही घर बांधून राहत नाही.'' खरंच, जगण्याच्या शर्यतीत कधी मागे पडलो, अपयशी झालो, थकलो तरी हे वाक्य नवी उमेद देत राहिलं.

चिंता, ताणतणाव, कटकटी आज आल्या तरी उद्या नवा दिवस असेल. त्या येतील आणि जातीलही... मी हरणार नाही. चला तर मग, या तणावाला स्वस्थपणे, धैर्याने सामोरे जात सुंदर जगण्याची कला आपण आत्मसात करू या.

लेखिका समुपदेशक आहेत.

suchitarb82@gmail.com,

9273609555, 02351-204045