जॉनी वॉकर!!!

विवेक मराठी    26-Jun-2017
Total Views |


काळया स्क्रीनवर शेवटची कमांड लिहून त्याने एंटर दाबलं. गेला दीड तास चाललेला प्रॉब्लेम सुटला. आता 'appreciation mail ' येईल. 'Weekly Achievers'मध्ये नाव आणि फोटो येईल आणि बाकी सर्व मागच्या पानावरून पुढे सुरू राहील. त्याने डोळे मिटले आणि आळस दिला. मागची काही वर्षं झरझर त्याच्या डोळयांसमोर आली. आपल्याला काय करायचंय? या प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत एका IT कंपनीत येऊन तो स्थिरावला होता. वेगवेगळया शिफ्ट्समध्ये येऊन क्लायंटच्या नेटवर्कची देखभाल करायची, हे त्याचं काम. नक्की काय करायचंय हे माहीत नसणं आणि जे करत आहोत ते आवडत नसणं हे ऐन पंचविशीतले दोन प्रॉब्लेम्स त्यालाही सतावत होते. आणि या साऱ्याच्या मध्यात आज बऱ्याच दिवसांनी आपल्यासाठी 'appreciation mail' येणार, ही गोष्ट सुखावणारी होती.

त्याने डोळे उघडले, आळस झटकला. इतक्यात समोरून मॅनेजर आला. म्हणाला, ''चल, कॉफी प्यायला जाऊ.'' याने कॉफी मग उचलला आणि दोघे कॅफेटेरियाकडे निघाले.

वाफाळत्या कॉफीचा एक घोट घेत मॅनेजरने विचारलं, ''नक्की काय करायचंय मग तुला?'' याला काही सुचेना. काही क्षण शांतता. ''काय करायचंय ते माहीत नाही, पण जे करतोय ते करायचं नाहीये आयुष्यभर.'' आपोआपच याच्या तोंडून निघालं.

मॅनेजरच्या चेहऱ्यावर किंचित हास्य. ''बरं, पण जे करतोयस त्यात वाईट काय आहे?'' पुन्हा काही क्षण शांतता. ''कारण हे सगळं खूप रुटीन आहे. तेच तेच काम, शिफ्ट्स... सामान्य आहे फार. मला काहीतरी वेगळं करायचंय.''

' 'वाह, छानच !!!'' हातातला मग टेबलावर ठेवत मॅनेजर म्हणाला, ''छान वाटतंय ऐकायला. काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असावीच. खरंय. पण त्याआधी जे सामान्य आहे, रुटीन आहे तेसुध्दा अव्याहतपणे, तक्रारी न करता जमायला हवं. जे काम आपण करतोय ते आवडत नाही की जमत नाही, याचा शोध घ्यायला हवा. आवडीचं काम करायला मिळणं हा नशिबाचा भाग असू शकतो, पण कामाची आवड जोपासणं आपल्या हातात असतं.''

'' ऐकायला बरं  वाटतंय , पण ही तर सरळसरळ तडजोड झाली.'' याचा सडेतोड प्रश्न आला.

 काही क्षण शांततेत गेले. मग  मॅनेजर म्हणाला, ''कसंय, काही लोकांना आपलं 'destination' काय आहे याची माहिती असते आणि त्यानुसार ते आपला मार्ग निवडतात. त्यांना आपण असामान्य म्हणतो. काही लोक असे असतात ज्यांना आपलं 'destination' माहीत नसतं, पण असलेल्या मार्गावर चालत राहणं माहीत असतं आणि चालता चालता त्यांना आपलं 'destination' गवसतं.  हे लोक अव्याहतपणे चालून आपल्या 'destination'पर्यंत पोहोचतात. यांना आपण 'यशस्वी' असं म्हणतो. बरेचसे लोक 'सामान्य'असतात, ज्यांना 'destination'सुध्दा माहीत नसतं आणि हाती असलेल्या मार्गावर चालायचंही नसतं. आत्ता ह्या घडीला तू सामान्यच आहेस आणि कदाचित आज जो मार्ग तुला रुटीन आणि सामान्य वाटतोय, त्याच मार्गावर तुझ्या यशाची बीजं असतील.''

''म्हणजे नक्की मी काय करायला हवं??'' याचा प्रश्न. मॅनेजरने कॉफी संपवली आणि जाता जाता हसत हसत म्हणाला, ''जॉनी वॉकर!!!''

टेबलावर एकटाच बसून विचार करताना याला आठवलं - 'Keep Walking'. चालत राहा. सामान्य ते असामान्य हा खरं तर एक प्रवासच आहे.

 9773249697