कार्यकर्तेपण जपणारा राज्यपाल

विवेक मराठी    26-Jun-2017
Total Views |

*** रमेश पतंगे****

राज्यपालपदाचा डामडौल नाही, वागण्यात कसली कृत्रिमता नाही, कार्यकर्त्याला सलगी देण्यात कसली कमतरता नाही, बोलण्यात मार्दव, आणि जो ज्या कामासाठी आला आहे त्याचे काम होईल याची चिंता, हे रामभाऊंचे दर्शन मी कधी विसरू शकेन असे नाही. पंडित दीनदयाळजी यांनी जो आदर्श घालून दिला, तो राजकीय क्षेत्रात जगणाऱ्या एका कार्यकर्त्याचे दर्शन मी करू शकलो. 'कार्यकर्तेपण जपणारा राज्यपाल' या तीन शब्दात राम नाईक यांचे वर्णन करावे लागेल.

म्हटले तर राम नाईक आणि माझा परिचय 1970पासूनचा आहे. तेव्हा माझे वडील अंधेरीतील जनसंघाचे काम करीत असत. पश्चिम उपनगराच्या भाजपा जिल्ह्याची बैठक अंधेरीला मनोहर जोशी यांच्या बंगल्याच्या गच्चीवर होत असे. त्या बैठकीसाठी राम नाईक, प्रा. ग.भा. कानिटकर, रामदास नायक अशी नंतर आमदार झालेली कार्यकर्ते मंडळी येत. जोशी यांच्या घरीच माझे खूप काळ वास्तव्य असल्याने या सर्वांचा मला परिचय होता. तेव्हा मी महाविद्यालयीन विद्यार्थी होतो. संघाच्या कामात होतो. वडील जरी राजकीय पक्षाचे काम करीत असले, तरी मला तशी राजकारणाची गोडी नसल्यामुळे मी राजकारणापासून अलिप्त होतो.

अणीबाणीनंतर गोरेगाव ते दहिसर या भागाचा मी भागकार्यवाह झालो आणि पुढे दोन वर्षांनंतर महानगर कार्यकर्ता झालो. माझ्या कार्यक्षेत्रात राम नाईक यांचे घर येत असल्यामुळे कार्यवाह म्हणून त्यांच्या घरी मी दोन-तीनदा गेलो. महानगर कार्यकर्ता म्हणून महानगरच्या समन्वय समितीच्या बैठकीत मला भाग घ्यावा लागे. या बैठकीत तेव्हा हशू अडवाणी, राम नाईक, वामनराव परब अशी भाजपाची मंडळी असत. तोपर्यंत जनसंघाचे रूपातंर भाजपात झालेले होते. बैठक संपल्यानंतर राम नाईक यांच्याच गाडीतून गोरेगावपर्यंत मी येत असे. अंधेरी सोडून मी बोरिवलीला राहायला गेलो. गोरेगावला गाडी पकडून मी बोरिवलीला घरी जात असे. वाटेत रामभाऊंशी गप्पा होत.

या काळात मला राम नाईकांचे जे दर्शन झाले, ते अत्यंत क्रियाशील आणि प्रचंड जनसंपर्क असलेला लोकप्रतिनिधी या रूपात होते. तोपर्यंत ते आमदार झालेले होते. एकदा गोरेगावला प्रभात शाखा संपल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. सव्वा सातच्या सुमारास मी घरी पोहोचलो असेन. परंतु तेवढया सकाळीदेखील त्यांना भेटायला आलेल्या लोकांनी त्यांचा दिवाणखाना भरून गेलेला होता. त्या वेळी मी त्यांना पाहिले की अनेक पत्रांना उत्तरे देण्यासाठी ते स्वतःजवळ एक टेपरेकॉर्डर ठेवीत आणि प्रवासात उत्तर टेप करून ठेवीत. नंतर कार्यालयात टाईपरायटरवर उतरविले जाई. 'चरैवेति चरैवेति' हे त्यांचे आत्मकथन अनेक भाषांत प्रकाशित झालेले आहे. या आत्मकथनात त्यांच्या अफाट जनसंपर्काचे अनेक किस्से वाचायला मिळतात. सामान्य रिक्षावाल्यापासून ते सुनील दत्तसारख्या भारतख्यात व्यक्तींशी रामभाऊ सहज संपर्क साधू शकतात, हे त्यांचे वैशिष्टय.

उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली, तीही वयाच्या 83व्या वर्षी. जनसेवेचे व्रत घेतलेला कार्यकर्ता कधी वृध्द होत नाही. तो मनाने चिरतरुणच असतो. या वर्षी मुंबईत दोन कार्यक्रमांत त्यांची भेट झाली आणि दोन्ही वेळी त्यांनी लखनऊला येण्याचा आग्रह केला. काही कारण नसताना लखनऊला कशाला जायचे? असा माझ्यासमोरचा प्रश्न होता. शेवटी कारण निघाले. विवेकच्या 'समर्थ भारत - स्वप्न, विचार, कृती' या ग्रंथाचे प्रकाशन मुंबईत करायचे आहे आणि प्रकाशनासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बोलवावे असा विषय झाला. योगी आदित्यनाथ यांना भेटून कार्यक्रमाची कल्पना त्यांना सांगावी आणि निमंत्रण द्यावे असे ठरले. योगींना भेटण्यासाठी मी जावे, असेही ठरले. 5 जूनला मी लखनऊला पोहोचलो आणि राजभवनावरच मुक्कामाला गेलो. राजभवनात राहण्याचा हा माझा पहिलाच अनुभव.

लखनऊचे राजभवन अनेक एकरात पसरलेले आहे. त्याचा एक स्वतंत्र इतिहास आहे. पाच जूनला संध्याकाळी पोहोचताच, राज्यपाल राम नाईक यांचा निरोप आला की जेवायला रात्री माझ्याबरोबरच यायचे. राजभवनात त्यांचे निवासस्थान पहिल्या मजल्यावर आहे. बरोबर वेळेवर राजभवनातील सेवक मला घेऊन जाण्यासाठी आला. माझ्याबरोबर प्रदीप निकम आणि स्थानिक कार्यकर्ता कीर्ती वर्धन होते. आम्ही तिघेही जण भोजनासाठी गेलो. रामभाऊंनी आमचे स्वागत केले. भोजनासाठी रामभाऊंच्या पत्नी कुंदाताईदेखील बरोबर होत्या. आमच्या गप्पांत त्याही सहभागी झाल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पहिल्या दिवशी रामभाऊंची कन्या विशाखा यादेखील भोजनास बरोबर होत्या. 'चरैवेति चरैवेति' या रामभाऊंच्या आत्मकथनात जुन्या काळातील अनेक फोटो आहेत. मी विशाखाताईंना विचारले की एवढे फोटो कसे जमा केले? त्यांनी हसत हसत त्याचा किस्सा सांगितला.

जेवताना रामभाऊंनी मला विचारले, ''किती दिवस मुक्काम आहे आणि कार्यक्रम काय आहेत?'' मी लखनऊला कशासाठी आलो आहे हे त्यांना सांगितले. ते म्हणाले, ''सात तारखेला सकाळी सहा वाजता राजभवनात योग शिबिर आहे. या शिबिराला बाबा रामदेव येणार आहेत आणि मुख्यमंत्रीदेखील येणार आहेत. सांयकाळी लखनऊ विद्यापीठात शिवराज्याभिषेकाचा (हिंदवी स्वराज्य दिन) कार्यक्रम आहे. या दोन्ही कार्यक्रमांना तू उपस्थित राहा'' असे त्यांनी मला सुचविले. योगींना भेटण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही कार्यक्रम माझ्यापुढे नसल्याने मी होकार दिला.

राज्यपालपद हे पक्षातील ज्येष्ठ व्यक्तीला दिले जाते, ते एवढयासाठी की त्या व्यक्तीने आता राजकीय धकाधकीपासून दूर राहून विश्रांती घ्यावी. राज्यपालपद हे संविधानिक पद आहे आणि राज्यपालांना राज्यघटनेप्रमाणे विशेष कार्यकारी अधिकार नसतात. हे अधिकार मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्रीमंडळाकडे असतात. राज्यपाल राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. मुख्यमत्र्यांना सतत काम करावे लागते आणि त्यांनी काम केले नाही, तर विरोधी पक्ष आणि जनता त्याला धारेवर धरतात. राज्यपालांनी फार काम करावे अशी अपेक्षा नसते. राम नाईक यांचा स्वभाव स्वस्थ बसून राहण्याचा नाही. राज्यपालाच्या मर्यादेत राहून करता येण्यासारखे खूप विषय असतात. ते त्यांनी सुरू केले. त्यांचा कार्यालयीन दिनक्रम सकाळी दहापासून सुरू होतो, दुपारी तास-दीड तास भोजन आणि विश्रांती, त्यात दुपारची झोप नाही आणि रात्री साडेआठपर्यंत पुन्हा कार्यालयीन काम, भोजन झाल्यानंतर साडेदहापर्यंत निवासात बसून कार्यालयीन काम. स्वतःला इतके कामात गुंतवून घेणारे उत्तर प्रदेशच्या नशिबी आलेले राम नाईक हे पहिलेच राज्यपाल असावेत. राज्यपाल एवढे काम करतात म्हटल्यावर त्यांच्या सेवेत असलेला सर्व कर्मचारिवर्ग सतत कामात राहतो हे सांगायला नको. मग राजभवनातील गोशाळा असो, भाजीपाल्याची लागवड असो, शेती असो, फुलझाडांची आणि फळझाडांची देखभाल असो, सर्वच कामात तत्पर दिसले. राज्यपालांना भेटण्याची रीघ लागलेली असते. कोणाला पुस्तक भेट द्यायचे असते, तर कुणाला एखादे निवेदन द्यायचे असते. मी पाच जूनला राजभवनात गेलो, सहा जूनला राज बब्बर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे शिष्टमंडळ त्यांना भेटायला आले. विषय होता - राजीव गांधी यांच्या पुतळयाच्या विटंबनेचा.

राजभवनात राम नाईक आल्यापासून लखनऊ विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय सुंदर अश्वारूढ पुतळा बसविला गेलेला आहे. उत्तर प्रदेशात ज्यांना परमवीरचक्र मिळाले, अशा सर्व परमवीरचक्रधारकांच्या स्मृती जागृत ठेवण्याचे एक चित्रमय प्रदर्शन लष्कर विभागात रामभाऊंच्या प्रयत्नाने सुरू झाले. अतिशय उत्तम प्रेरणास्थळ असे त्याचे वर्णन करावे लागेल. कारगिल युध्दातील प्रसंग तेथे साकार झालेले बघायला मिळाले. रामभाऊंनी सुचविले नसते, तर माझे प्रदर्शन पाहण्यास जाणे शक्य झाले नसते. लखनऊ म्हटले की इमामबाडे आणि लखनऊच्या मुस्लीम राज्यकर्त्यांचे राजवाडे किंवा त्यांची स्मृतिस्थळे एवढेच दाखविले जाते.

लखनऊमध्ये 1857च्या स्वातंत्र्यसमराचे अतिशय बोलके प्रदर्शन आहे. ते ज्या भागात आहे त्याला रेसिडेन्सी म्हणतात. या रेसिडेन्सीच्या इमारतीतच 1857च्या स्वातंत्र्यसमराची एक तेजस्वी लढाई झालेली आहे. या लढाईच्या खाणाखुणा इमारतीच्या प्रत्येक भागावर दिसतात. आतमध्ये वेगवेगळया क्रांतिकारकांची चित्रे लावलेली आहेत आणि त्याखाली त्याचा इतिहास लिहिलेला आहे. ही इमारत आवर्जून पाहून ये, असे राम नाईक यांनी मला सुचविले आणि तेथे जाण्याची व्यवस्थाही त्यांनीच केली. राज्यपालांचा पाहुणा म्हणून विशेष वागणूक मिळाली, हे सांगायला नको.

जून सातला सकाळी सहा वाजता लखनऊ शहरातील जवळजवळ सातशे-आठशे स्त्री-पुरुष योग शिबिरासाठी राजभवनात एकत्र आले. 21 जून हा आंतराराष्ट्रीय योग दिवस आहे आणि या वर्षी 21 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लखनऊला फार मोठा कार्यक्रम होणार आहे. त्याच्या वातावरणनिर्मितीसाठी हा कार्यक्रम होता, कल्पना राम नाईक यांचीच. योगगुरू रामदेवबाबा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, त्यांचे मुख्य सहकारी मंत्री कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित होते. एकूण दीड तास कार्यक्रम झाला. रामदेवबाबांनी त्यांच्या खास शैलीत सर्वांकडून आसने आणि प्राणायाम करून घेतला. मला वाटते, असा कार्यक्रम फक्त लखनऊच्याच राजभवनात झाला असावा.

मी गेलो होतो योगी आदित्यनाथ यांना 'विवेक'च्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी, परंतु त्यांच्या भेटीची वेळ काही मिळत नव्हती. सहा तारखेलाच रात्री भोजन करतानाच मला रामभाऊंनी विचारले, ''भेटीचे काय झाले?'' मी त्यांना अडचण सांगितली. भोजन झाल्यानंतर मुख्यमंत्र्याशी बोलू असे ते म्हणाले आणि फोन करण्यासाठी बसले, इतक्यात मुख्यमंत्र्यांचा फोन आला. त्यांना सात तारखेच्या कार्यक्रमाविषयी काही बोलायचे होते. त्यांचा विषय संपल्यानंतर रामभाऊंनी फोनवरच माझा परिचय करून दिला, मार्मिक शब्दात 'विवेक'ची माहिती दिली आणि पतंगे तुम्हाला एका विशिष्ट कामासाठी भेटायला आले आहेत, हे त्यांनी सांगितले. योगीजींनी सकाळी दहाची वेळ दिली. रामभाऊ मला म्हणाले, ''राजभवनाच्या गाडीनेच जा, म्हणजे सुरक्षा रक्षक फार अडविणार नाहीत.'' सकाळी मी राजभवनाच्या गाडीने गेलो. मुख्यमंत्र्याची भेट झाली आणि कामाचे बोलणेही झाले. आल्यानंतर मी रामभाऊंना सर्व निवेदन केले.

संध्याकाळी त्यांच्याच गाडीत बसून मी लखनऊ विद्यापीठात हिंदवी स्वराज्य दिनाच्या कार्यक्रमासाठी गेलो. रामभाऊंनी विद्यापीठाला आग्रह केला होता की कार्यक्रम थोडा भव्य करा. त्यामुळे कार्यक्रम भव्य झाला. लखनऊ शहरातील मराठी भाषिक मराठमोळया पोषाखात कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. 'जय भवानी जय शिवाजी'च्या घोषणेने वातावरण दणदणून गेले. मुख्यमंत्री आणि राम नाईक या दोघांची भाषणे समयोचित झाली. अत्यंत मार्मिक उदाहरणे देऊन रामभाऊंनी शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराची वैशिष्टये सांगितली. उदाहरणार्थ, वृक्षांची निगा का राखली पाहिजे, पाण्याचे संवर्धन कसे केले पाहिजे, हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी दिलेली समज यासंबंधी अस्सल कागदपत्रांच्या आधारे शिवाजी महाराजांचे म्हणणे रामभाऊंनी सांगितले. ऐकणाऱ्यांच्या दृष्टीने हा सगळा नवीनच विषय होता.

राम नाईक यांचा आणि माझा परिचय जरी दीर्घकाळाचा असला, तरी एवढया जवळून सहवास घडण्याचा हा पहिलाच प्रसंग. 'कार्यकर्तेपण जपणारा राज्यपाल' या तीन शब्दात त्यांचे वर्णन करावे लागेल. राज्यपालपदाचा डामडौल नाही, वागण्यात कसली कृत्रिमता नाही, कार्यकर्त्याला सलगी देण्यात कसली कमतरता नाही, बोलण्यात मार्दव, आणि जो ज्या कामासाठी आला आहे त्याचे काम होईल याची चिंता, हे रामभाऊंचे दर्शन मी कधी विसरू शकेन असे नाही. पंडित दीनदयाळजी यांनी जो आदर्श घालून दिला, तो राजकीय क्षेत्रात जगणाऱ्या एका कार्यकर्त्याचे दर्शन मी करू शकलो, हेच माझ्या लखनऊ भेटीचे फलित आहे.

vivekedit@gmail.com