डायबेटिक किटोऍसिडोसिस

विवेक मराठी    27-Jun-2017
Total Views |


मधुमेहात अचानक उद्भवणाऱ्या आणि जिवाचा धोका असणाऱ्या प्रश्नांची यादी केली, तर डायबेटिक किटोऍसिडोसिस नक्कीच अग्रस्थानी राहील. ग्लुकोजपेक्षा वेगळी ऊर्जा, म्हणजे चरबी वापरली गेली की प्रश्न उभा राहतो. कारण त्यातून निर्माण होणारे किटोन्स आपण तितक्या शिताफीने शरीराबाहेर टाकू शकत नाही. शिवाय या रासायनिक क्रियेत ऍसिड तयार होतं. आता मधुमेहाच्या रुग्णामध्ये होणाऱ्या या गोंधळाला आपण किटोऍसिडोसिस का म्हणतो, ते वेगळं सांगायचं कारण नाही. किटोन्स आणि ऍसिड या दोन शब्दांचा हा संगम आहे.

धुमेहात अचानक उद्भवणाऱ्या आणि जिवाचा धोका असणाऱ्या प्रश्नांची यादी केली, तर डायबेटिक किटोऍसिडोसिस नक्कीच अग्रस्थानी राहील. यात अचानक रक्तात नेहमीपेक्षा अधिक ऍसिड तयार होतं आणि पुढच्या समस्या सुरू होतात. म्हणून मुळात हा प्रश्न असा का डोकं वर काढतो, हे समजून घेणं आवश्यक आहे.

शरीरातल्या बहुतेक सर्व पेशींना ग्लुकोज आपसूक मिळत नाही. त्यासाठी इन्श्युलीनच्या चावीने ग्लुकोज आत घेणारं दार उघडावं लागतं. सुदैवाने मेंदूचा एक अपवाद वगळता बहुतेक सर्व पेशींना आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी केवळ ग्लुकोजवर अवलंबून राहण्याची पाळी येत नाही. ती इतर प्रकारच्या ऊर्जेतून आपली गरज भागवण्यास सक्षम असतात. आपल्याकडे सीएनजी आणि पेट्रोल किंवा पेट्रोल आणि वीज अशा दुहेरी इंधनावर चालणारी वाहनं असतात, त्यातलाच हा प्रकार. आता जेव्हा गाडी पेट्रोलवर चालत असेल, तेव्हा त्यातून बाहेर पडणारा धूर वेगळा आणि सीएनजीवर चालताना त्यातून निर्माण होणारी रसायनं निराळी असणारच. तसंच काहीसं आपल्या पेशींबाबत होतं. पेशी ग्लुकोज वापरात असतील तेव्हा फारसा प्रश्न उद्भवत नाही, कारण ग्लुकोजचं विघटन झाल्यावर त्यातून कार्बन डाय ऑॅक्साईड व पाणी बनतं. या दोन्ही गोष्टी शरीराबाहेर फेकण्यात कुठलीच अडचण नसते.

ग्लुकोजपेक्षा वेगळी ऊर्जा, म्हणजे चरबी वापरली गेली की मात्र प्रश्न उभा राहतो. कारण त्यातून निर्माण होणारे किटोन्स आपण तितक्या शिताफीने शरीराबाहेर टाकू शकत नाही. शिवाय या रासायनिक क्रियेत ऍसिड तयार होतं. आता मधुमेहाच्या रुग्णामध्ये होणाऱ्या या गोंधळाला आपण किटोऍसिडोसिस का म्हणतो, ते वेगळं सांगायचं कारण नाही. किटोन्स आणि ऍसिड या दोन शब्दांचा हा संगम आहे.

शरीराची ऊर्जा गरज भागवणारी प्रमुख यंत्रणा ग्लुकोजवर अवलंबून असते. त्यामुळे पेशींना इन्श्युलीनने दारं उघडून दिली की त्यांना आत आलेल्या ग्लुकोजचा नियमित पुरवठा होत राहतो. इंधनाची पर्यायी व्यवस्था वापरण्याची त्यांना गरजच उरत नाही. याचाच दुसरा अर्थ असा की पुरेसं इन्श्युलीन उपलब्ध असताना किटोऍसिडोसिस होण्याची शक्यता जवळपास नसतेच.

टाइप वन मधुमेह म्हणजे शरीरात अजिबात इंश्युलीन न बनणं. या रुग्णांना बाहेरून इन्श्युलीन देण्यापासून पर्याय नसतो. कारण कुठल्या तरी क्षणी यांच्या बीटा पेशींवर हल्ला होतो आणि त्या पेशींचा नायनाट होतो. हल्ला करणाऱ्या पेशीदेखील त्याच मंडळींच्या असतात. याला वैद्यक 'ऑॅटो इम्युनिटी' म्हणतं. थोडक्यात आपल्याच रोगप्रतिकारक शक्तींकडून घोडचूक होते. आपल्याच पेशींना त्या ओळखण्यात गफलत करतात. त्यांना परक्या समजून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना नामशेष करतात. ही प्रक्रिया केवळ काही दिवसांतच होते. म्हणजे टाइप वन मधुमेहात किटोऍसिडोसिस होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. किंबहुना कित्येकदा या प्रकारच्या मधुमेहाचं निदान किटोऍसिडोसिस झाल्यावरच होतं. अचानक मुलं खूप लघवी करू लागतात, अकस्मात बेशुध्द होतात, हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तिथे कळतं की त्यांना मधुमेह झालाय आणि त्याची परिणती म्हणून ती मुलं किटोऍसिडोसिसमध्ये गेलीत.

यासाठी पालकांनी सजग राहणं हा एक उत्तम मार्ग आहे. कालपर्यंत अंथरूण ओलं न करणारा बबडया किंवा छकुली आज अचानक ते करायला लागला/लागली अथवा बाळसेदार मुलं व्यवस्थित खात असूनदेखील त्यांचं वजन अकस्मात कमी व्हायला लागलं, तर त्यांचं रक्तातली ग्लुकोज तपासून घ्या. ह्यां, इतक्या लहान मुलाला कसं काय होईल, तो वा ती नाटक करते, अभ्यास करायला नको म्हणून सारखं लघवीला जाते असं न समजता त्यांना डॉक्टरकडे न्या. फार तर काय होईल, त्यांना काहीच न झाल्याचं समजेल, थोडेसे पैसे फुकट जातील. पण निदान त्यांचं निदान लांबणीवर पडणार नाही. किटोऍसिडोसिस झाल्यावर निदान होणं हे खरंच दुर्दैवी आहे. त्यात मृत्यू होण्याचं प्रमाण बरंच जास्त आहे.

तरुण टाइप वन मधुमेही केवळ लोकलाजेस्तव आपला नेहेमी इन्श्युलीन डोस घेणं टाळतात. कधी इन्श्युलीन संपतं आणि त्याच क्षणी ते उपलब्ध करणं कठीण असतं. कारण आपल्याकडे अजूनही लहानसहान गावांमध्ये मेडिकल दुकान नाही. आजारी आहे, काही खाल्लं नाही म्हणून इन्श्युलीन दिलं जात नाही. इन्श्युलीन वेगळया प्रकारचं आणि सुई त्याला मॅच नसलेली वापरली गेली, अशा अनेक कारणांनी इन्श्युलीनची उणीव तयार होते, मुलं किटोऍसिडोसिसमध्ये जातात.

अर्थात केवळ टाइप वन मधुमेह असलेल्या व्यक्तींनाच किटोऍसिडोसिस होतो असं नाही. ज्या ज्या मंडळींमध्ये इन्श्युलीन कमी बनतं, कुठल्या तरी कारणाने इन्श्युलीनची कमतरता जाणवते, त्या त्या वेळी किटोऍसिडोसिस होण्याची शक्यता असते. टाइप टूसहित मधुमेहाच्या इतर कुठल्याही प्रकारात तो होऊ  शकतो.

किटोऍसिडोसिसची प्रत्यक्ष लक्षणं दिसण्याआधी मात्र आणखी काही गोष्टी व्हाव्या लागतात. किटोन्स तयार होण्यासाठी पेशींनी चरबी किंवा फॅटी ऍसिड वापरली पाहिजेत. म्हणजे फॅटी ऍसिड्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजेत. ती मोठया प्रमाणात तयार होतात इन्श्युलीनला अवरोध होतो तेव्हा, इन्श्युलीन रेझिस्टन्स वाढून काउंटर रेग्युलेटरी हॉर्मोन्स बनतात तेव्हा.

साधारणत: हे इन्श्युलीनला अवरोध करणारे हॉर्मोन्स आपण आजारी पडल्यावर बनतात. इन्फेक्शन हे जगभरात याचं सगळयात मुख्य कारण आहे. लघवीचा किंवा फुप्फुसांना जंतुसंसर्ग होतो आणि इन्श्युलीनवर अवलंबून असणारी मधुमेही मंडळी किटोऍसिडोसिसमध्ये जातात. कोणाला औषध म्हणून स्टिरॉइड दिली जातात, कोणाला मानसिक आजारांवरचे उपचार सुरू असतात. काहींना हृदयरोग होतो, आत्यंतिक मद्यपान केलं जातं, पॅन्क्रियाटायटिससारखा स्वादुपिंडाचा प्रश्न असतो, अशा बऱ्याच कारणांमध्ये किटोऍसिडोसिसची भीती वाढते. तरुण मुलींमध्ये वजन कमी करायला मुद्दाम इन्श्युलीन घेणं टाळलं जातं. पाश्चात्त्य जगात पुन्हा पुन्हा किटोऍसिडोसिस होण्याचं हे महत्त्वाचं कारण आहे. आताशा इन्श्युलीन पंप वापरण्याचा प्रघात जोर धरतो आहे. इन्श्युलीन पंपात काही बिघाड झाला, शरीराला इन्श्युलीन पुरवणारी नळी बंद झाली, तरी किटोऍसिडोसिस होऊ  शकतो.

किटोऍसिडोसिसची लक्षणंदेखील सहज समजण्यासारखी आहेत. इन्श्युलीन कमी झालं म्हणजे रक्तातलं ग्लुकोज आत्यंतिक वाढणार, तीन-चारशेच्या वर जाणार. ग्लुकोज इतकं वाढलं म्हणजे लघवी होण्याचं प्रमाण वाढणार. लघवीतून पाणी आणि क्षार शरीराबाहेर फेकले जाणार. शरीरातलं पाण्याचं प्रमाण खूप कमी होणार. अल्कली असलेले क्षार बाहेर जात असल्याने रक्तात ऍसिड वाढणार. मुख्य म्हणजे हे सगळं जेमतेम 24 तासांच्या आत घडतं. किटोऍसिडोसिस झाल्यावर बहुधा किमान 60% पेशंटमध्ये, अचानक पोट दुखू लागतं, वांत्या सुरू होतात. पण अनेकदा त्या अगोदर दोनेक दिवस वारंवार तहान लागणं, लघवी होणं ही लक्षणं असतात. कधीकधी ताप असतो, लघवीत जळजळ जाणवते. न्यूमोनिया होऊ  शकतो. आपल्याकडे टीबी बराच दिसतो. तो झालेला असताना इन्श्युलीन न वापरल्यासदेखील किटोऍसिडोसिस होऊ  शकतो.

एकदा किटोऍसिडोसिस झाला की आयसीयूत भरती करण्यावाचून गत्यंतर नसतं. दिवसातून कित्येकदा करावं लागणारं ग्लुकोज, क्षार, रक्तातलं ऍसिडचं प्रमाण यासाठी आयसीयू हाच मार्ग असतो. त्यात पैसे खर्च तर होतात, त्याचबरोबर मनस्तापदेखील खूप होतो. हे सगळं सहज टाळता येऊ शकतं. गरज असते ती सजग राहण्याची. आपल्या आजाराबद्दल व्यवस्थित माहिती मिळवून घेण्याची.

दुर्दैवाने आपल्याकडे इन्श्युलीनबद्दल खूप गैरसमज आहेत. ते घेणं म्हणजे काहीतरी महाभयंकर झालंय असं मानलं जातं. शिवाय आपले लोक वैद्यकीयदृष्टया सजग नाहीत. आपलं उखळ पांढरं करून घेण्यासाठी, दुसऱ्याचं नुकसान झालं तरी हरकत नाही पण स्वतःचा आर्थिक लाभ शाबूत राहावा म्हणून इन्श्युलीनबद्दल वावडया उठवणारे कमी नाहीत. त्यामुळं कित्येक मधुमेही अचानक इन्श्युलीन थांबवून झाडपाल्याकडे वळतात. अगदी चांगले सुशिक्षित, पांढरपेशे लोकही याला बळी पडताना दिसतात. त्यांची मुलं वारंवार किटोऍसिडोसिसमध्ये जाताना दिसतात. अशांना कळकळीची विनंती करावीशी वाटते की त्यांनी ऐऱ्यागैऱ्यांच्या भूलथापांना भीक घालू नये. जी मंडळी टाइप वन मधुमेह इन्श्युलीनशिवाय बरं करू असा दावा करतात, त्यांच्याकडून काही रुग्णाला न होण्याचं व त्यांची पूर्ण जबाबदारी स्वीकारण्याचं लेखी वचन मागावं. पाहा काय फरक पडतो. ते लोक कसे ताबडतोब आपले शब्द बदलतात. गरज असताना इन्श्युलीन न घेण्याचा हट्ट करू नये, हे टाइप वन मधुमेह असणाऱ्यांच्या हिताचं आहे हे नक्की.

 9892245272