हितगुज

विवेक मराठी    27-Jun-2017
Total Views |

गेले पाच महिने आपण विविध पैलूंवर, जीवन कौशल्यांवर बोलत होतो. लेख हे एक निमित्त होतं, त्यातून घडत गेलं चिंतन 'सुंदर जगण्याचं' आपणा सर्वांचं... ओळख होत गेली स्वत:शी, परिस्थितीशी, माणूसपणाशी.. पाहता पाहता क्षितिज रंगाची अखेरची छटा आपल्यासमोर मांडण्याची वेळ आली. गेले पाच महिने चिंतन, लेखन आणि भरभरून आलेल्या प्रतिक्रियांनी एक गोष्ट जाणवत गेली. खरंच, जीवन सुंदर आहे, अगदी त्या क्षितिजावरच्या रंगांसारखं... आणि जाणवलं त्या सुंदर जीवनात मोगऱ्याचा सुगंध ओतणं आहे केवळ आपल्याच हाती...


न्हाचा दाह संपवत पावसाच्या आगमनाची चाहूल लागतेय. आकाशपटलावर विविध रंगांच्या छटा पसरू लागल्यात. क्षितिजामध्ये अलगद होणाऱ्या या रंगांना नाव देणंही किती कठीण...! पण तरीही हे रंग सुंदर बनवतात त्या आकाशाला, त्या क्षितिजाला अन् त्यांना न्याहाळणाऱ्या तुम्हा-आम्हालाही.

आकाशाकडे पाहता पाहता आपलं अस्तित्वही त्याच्यासारखंच भासू लागतं. खरं तर ऊन-पावसाचे खेळ आपल्या आयुष्यातही असतातच ना! कधी विजांचा कडकडाट, तर कधी ढगांचा गडगडाट... पण तरीही रोज चंद्र-चांदण्यांचे सोहळे साजरे करत असतं आकाश. आपल्याही साऱ्या अडचणींवर मात करत जगायचंय, सुंदर करायचंय आपलं जीवन...

म्हणून तर आपण विविध पैलूंवर, जीवन कौशल्यांवर बोलत होतो गेले पाच महिने. लेख हे एक निमित्त होतं, त्यातून घडत गेलं चिंतन 'सुंदर जगण्याचं' आपणा सर्वांचं... ओळख होत गेली स्वत:शी, परिस्थितीशी, माणूसपणाशी...

व्यक्तिमत्त्व हे काही एका क्षणात बदलणारी गोष्ट नाही. फूल कसं हळुवार उमलत जातं, तसं व्यक्तिमत्त्व विकसित होत जातं. लेखन, भाषण व्यक्तिमत्त्व बदलू शकत नाहीत, पण ते एक आरसा मात्र निश्चित धरतात आपल्यासमोर. आता त्यात कोणाला काय दिसणार हे प्रत्येकाच्या दृष्टीवर अवलंबून.

या लेखनादरम्यान मला अनेकांनी दूरध्वनीवरून आपल्या प्रतिक्रिया कळवल्या. त्यात एका आजींनी मला सांगितलं की, काही कारणाने त्या खूप निराशेतून जात होत्या, पण लेख वाचल्यावर नवी दृष्टी मिळाली. खरं तर मला इथे स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवलं - 'गुरुत्वाकर्षणाचा नियम कुठे बाहेर नव्हता. तो सफरचंदात नव्हता किंवा त्या झाडात नव्हता. तो न्यूटनमध्येच सुप्तपणे वास करत होता. निमित्त झालं ते सफरचंद.'

आपणदेखील जीवनाच्या देण्याने ओतप्रोत भरलोय. भरभरून मिळालंय आपल्याला. हवी आहे ती केवळ दृष्टी. जे आपल्याकडे आहे ते पाहण्याची अन् भरभरून दान वाटणारी माणसं, निसर्ग आपल्या आवतीभोवती तर आहे, हवी ती लहान होऊन दान घेण्याची इच्छाशक्ती.

निसर्ग आपल्याला जे सांगतो, तेच विज्ञानही सांगत आहे. 'Change is the only permanent thing in the universe.' 'बदल हीच एकमेव स्थिर गोष्ट' हे स्वीकारलं, तर या व्यक्तिमत्त्व विकासाला वयाचं कोणतंही बंधन नाही. अधिक नवं, अधिक सुंदर होण्याचा ध्यास लागला की सारं काही सोपं होऊन जातं.

समुपदेशनादरम्यान अनेकदा एका प्रश्नावर अडकलेली माणसं भेटतात. 'मीच का?', 'माझंच का असं व्हावं?' या प्रश्नाला एकच उत्तर आहे. आजूबाजूला असणाऱ्यांचं सूक्ष्म निरीक्षण. सुख आणि दु:ख आपल्या आयुष्यात आलटून पालटून येतच असतात. ते येतात तसे जातात अन् जातात तसे येतातही. त्यामुळे त्यांच्या ये-जा करण्याला स्वीकारायला हवं.

मीच का? हा प्रश्न अनेकदा जबाबदाऱ्यांबाबत विचारला जातो. एखाद्या व्यक्तीच्या वृध्दापकाळात जेव्हा त्याला आपल्या घरी नेण्याची, शुश्रुषा करण्याची वेळ येते, तेव्हा बहुतांशी मुलांना वाटतं, 'मीच का? तो का नाही? त्याचं घर मोठं, त्याचा पगार चांगला' इ.इ. अनेकदा हाच प्रश्न वाद, अस्वस्थता याचं मूळ असतो. ज्यांना व्यक्तिमत्त्व सुदृढ बनवायचं, त्यांनी हा प्रश्न थोडा बदलून स्वत:ला विचारावा - 'मी का नाही बरं?' हाच त्यांचा वेगळेपणा असतो. यामुळे मनातील द्वंद्वं संपतात.

माझ्याकडे एक केस आली होती. शाळेमध्ये शिक्षिका. आर्थिकदृष्टया उत्तम. पण खूप थकून गेलेली. ती बोलायला लागली, तिच्या बोलण्यात केवळ एकच गोष्ट येत होती. ''त्यांनी तसं केलं'', ''सहशिक्षिका असं म्हणाली'', ''मुलगा असं बोलला.'' प्रत्येकासाठी तिने आदर्श वागण्याच्या चौकटी केल्या होत्या आणि त्यात कोणीच न बसल्याने ती निराश झाली होती.

इतरांनी कसं वागावं याबाबत आपलं मत जरूर असावं, पण त्याचा आग्रह धरला की गोष्टी बिघडतात. इतरांचं वागणं हे खरं तर आपल्या नियंत्रणाबाहेरची गोष्ट. पण आपण त्याला अनावश्यक महत्त्व देऊन स्वत:चा संयम घालवतो.

व्यक्तिमत्त्वामध्ये 'संयम' खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बोलण्याचा, वागण्याचा, मत बनवण्याचा संयम - संयम म्हणजे बोलण्यापूर्वी, कृती करण्यापूर्वी सर्वांगाने विचार करून, वेळ घेऊन मगच बोलणं, कृती करणं.

तसाच संयम सुखदु:खाच्या प्रसंगातही दाखवावा लागतो. विशेषत: दुसरी व्यक्ती आपल्या चुका दाखवते, तेव्हा आपल्या संयमाची खरी परीक्षा असते.

व्यक्तिमत्त्व विकासाच्या या प्रवासात खाचखळगे अनेक आहेत, पण चांगल्या आठवणींची मलमपट्टी जवळ असली की प्रवास सुखकर होणारच.

तुम्ही रबराचा गुण पाहा ना, कितीही ताणतो अन् आकुंचनही पावतो. माझ्या एका वर्गमित्राची मला आठवण झाली. वर्गातील हुशार मुलांशी त्याची छान मैत्री होती आणि अगदी वाया गेलेली मुलंदेखील त्याच्याशी छान वागायची. सर्वांना सामावून घेणं, सर्वांना आपलेपणा वाटणं ही सुंदर व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. अर्थात, असं लवचीक राहताना आपल्या तत्त्वांशी तडजोड करावी असं मात्र नाही.

माणूस - मग तो कुणीही असो, त्याचं जीवनाचं स्वत:चं असं एक तत्त्वज्ञान असतंच. तत्त्व म्हटल्यावर मला माझ्या दादाकडून शिकलेल्या गोष्टींची आठवण झाली. त्याने मला सांगितलं होतं की गाडी चालवताना एखादा प्राणी, छोटासा कीटक जरी असला तरी तो उगीच मारायचा नाही. नीट लक्ष ठेवून गाडीचा वेग कमी करायचा. कोणताही प्राणी लहान आहे म्हणून उगीच त्याच्या जगण्याची किंमत कमी करण्याचा अधिकार आपल्याला नाही. तर अशी ही प्रत्येकाची तत्त्व. ती जपत जपत पुढे जायचं. पण आपली तत्त्व इतरांचं नुकसान तर करत नाहीत ना, याची खात्री वेळोवेळी करून घेतली पाहिजे.

आपल्या प्रत्येक कृतीची आपण जबाबदारी घ्यावी. केवळ यश आपलं अन् अपयशाला वाटेकरी शोधणं या प्रवृत्तीपासून नेहमी दूर राहिलं की आपण स्वत:चा अन् इतरांचादेखील विश्वास कमवू शकतो.

रोज नवा दिवस उगवतो. आपणही रोज नवी सुरुवात करू या. कालची दु:ख, कालचे हिशोब आजच्या पानावर नकोत. चांगल्या गोष्टींची अन् चुकांतून घेतलेल्या बोधांची शिल्लक घेऊन आजचा डाव मांडू या.

कटुता आपल्याला नकारात्मक बनवते. म्हणून भावनांचं योग्य नियमन करणं ही निकोप व्यक्तिमत्त्वाची गरज आहे. असलेली अन् जुळलेली सर्व नाती जपत त्यांना आपुलकीचं देणं देत अधिक श्रीमंत होऊ या. इतरांच्या प्रमादांना क्षमा करण्यासारखा आनंद नाही. अर्थात हे काही सोपं नाही, पण प्रयत्न करून तर पाहू.

नित्य नावीन्याचा ध्यास ठेवू या. नवं करण्याचा, नवं जगण्याचं प्रयत्न करू.

जर आपला दृष्टीकोन आशावादी असेल अन् योग्य दिशेने प्रयत्न असतील, तर शून्यातून विश्व निर्माण करता येतं हे आपणा सर्वांना अभिमानास्पद असणाऱ्या अरुणिमा सिन्हाने सिध्द केलंय.

पाहता पाहता क्षितिज रंगाची अखेरची छटा आपल्यासमोर मांडण्याची वेळ आली. गेले पाच महिने चिंतन, लेखन आणि भरभरून आलेल्या प्रतिक्रियांनी एक गोष्ट जाणवत गेली. खरंच, जीवन सुंदर आहे, अगदी त्या क्षितिजावरच्या रंगांसारखं... आणि जाणवलं - त्या सुंदर जीवनात मोगऱ्याचा सुगंध ओतणं आहे केवळ आपल्याच हाती...

           (लेखिका समुपदेशक आहेत.)

9273609555, 02351-204047

suchitarb82@gmail.com,