हेगेलचा सिध्दान्त आणि राष्ट्रवाद

विवेक मराठी    06-Jun-2017
Total Views |

मानवी शरीराच्या सर्व अवयवांत जशी एकाच वेळी सुखानुभूती येते, तसाच अनुभव हर्बर्ट स्पेन्सरने दिलेल्या समाजविकास प्रक्रियेतून येतो. राष्ट्रनिर्माणातील चैतन्यतत्त्व हेगेलने स्पष्ट केले आहे, तर त्यातील विकासप्रक्रिया कशी असेल हे स्पेन्सरच्या विवेचनावरून कळते. या दोन संकल्पना समजल्याशिवाय संघाचा विकासक्रम वैचारिकदृष्टया समजणार नाही. तसे होत नसल्याने संघाबद्दल भरपूर गैरसमज आहेत. ज्यांचा संघाशी संपर्क आला आहे, त्यांना तो अनुभूतीतून समजला आहे व अनुभूतीला वैचारिक स्पष्टतेची गरज असतेच असे नाही.


र्बर्ट स्पेन्सर याने जैविक उत्क्रांतीचा सिध्दान्त सामाजिक उत्क्रांतीला लावत असताना राष्ट्रनिर्माणाची एखादी पुरेशी सशक्त व सक्षम संकल्पना नवसमाजनिर्मितीस कशी कारणीभूत होते, याची चर्चा केली. परंतु जैविक उत्क्रांतीचे नियम लावायचे असतील, तर त्यासाठी ती गोष्ट सजीव असावी लागते. कोणत्याही सजीव गोष्टीत एक चैतन्यतत्त्व असावे लागते. तसे प्रत्येक समाजात कोणत्या प्रकारचे चैतन्यतत्त्व असते? त्याचा आपणाला कशा प्रकारे प्रत्यय येतो? त्याचे आधुनिक राष्ट्रनिर्मितीत स्थान काय? असे अनेक प्रकारचे प्रश्न यातून उत्पन्न होतात. प्रबोधनकाळापूर्वी परमेश्वराची भीती घालून, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक अशा संकल्पना निर्माण करून समाज नियंत्रित करणे शक्य होत असे. नंतरच्या काळात राजेशाहीमध्ये कायद्याच्या भीतीनेही समाजावर नियंत्रण आणणे शक्य होत असे. पण समाजामध्ये जशी जागृती वाढू लागली, लोकांना आपल्या नैसर्गिक हक्कांची जाणीव होऊ  लागली, तसे राज्य, राज्यकर्ते व नागरिक यांचे परस्परसंबंध बदलू लागले. या बदलत्या संबंधांचे स्वरूप कसे असावे याबाबत अनेक पैलूंवर गेल्या पाच-सहाशे वर्षे चर्चा सुरू आहे व त्यातून नव्या सामाजिक संस्कृतीची संकल्पना विकसित होत आहे. यात व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून समाजाचा किंवा राज्याचा विचार करायचा की समाजाच्या एकत्वाला प्राधान्य देऊन व्यक्तीच्या स्वातंत्र्याची कक्षा ठरवायची, यावर अनेक प्रकारची मते व्यक्त केली गेली आहेत. समाजाचे अस्तित्वच संपले, तर 'बळी तो कान पिळी' या न्यायाने जंगली राज्य निर्माण होईल अशी जशी भीती आहे, तसेच सामूहिक हिताच्या नावाखाली राज्याच्या हाती अधिक अधिकार दिले, तर आपल्या अधिकारांचा उपयोग करून लष्कर, पोलीस यांच्याद्वारे नागरिकांना वेठीस धरले जाईल अशीही भीती असते. यात संतुलन कसे साधायचे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज भारतातील सहिष्णुता-असहिष्णुतेची चर्चा याच आधारावर सुरू आहे. एखादी व्यक्ती, संघटना किंवा विचार प्रभावी बनू लागला की त्यातून हुकूमशाही निर्माण होणार, अशी भीती व्यक्त व्हायला सुरुवात होते. परंतु जोवर अशा चर्चा समाजातील एकत्वाला बाधक ठरत नाहीत, तोपर्यंत त्या समाजातील चैतन्यतत्त्वासारख्या असतात. समाज जिवंत असल्याचे ते लक्षण असते.

मोदी सत्तेवर आल्यानंतर देशभरात मोदींची व संघपरिवाराची हुकूमशाही सुरू झालेली आहे, अशी हाकाटी सोशल मीडियामधून व प्रसारमाध्यमातून पिटली जात आहे. जर कोणाचीही हुकूमशाही असेल, तर अशा प्रकारची टीका करण्याचे स्वातंत्र्य टीकाकारांना कसे मिळाले असते? काही अपवादात्मक मोजक्या हल्ल्यांच्या घटनांची योजनापूर्वक प्रसिध्दी करून संघपरिवार जणू काही एखाद्या समाजाचे जीवन असुरक्षित करू पाहत आहे असा प्रचार केला जात आहे. प्रत्यक्षात त्यातील अनेक घटनांना वेगळा रंग देऊन त्या लोकांसमोर आणल्या जातात. जेव्हा संघपरिवार सत्तेपासून दूर होता, तेव्हा संघाला व परिवारातील अन्य संस्थांना यापेक्षा वाईट त्रास सहन करावा लागत असेच. लोकशाहीत एखादी विचारधारा लोकप्रिय होते तेव्हाच सत्तेवर येते आणि त्या लोकप्रियतेचे आनुषंगिक लाभ असतातच. जर लोकप्रियतेच्या प्रवाहाविरुध्द उभे राहायचे असेल, तर ते लाभ सोडण्याची तयारी ठेवावीच लागते. जोवर कायद्याच्या किंवा घटनेच्या अंतर्गत राहून लोकांमध्ये जायला, प्रचार करायला कोणी अडथळा करीत नाही, तोवर ही हाकाटी अर्थहीन ठरते. आज प्रसारमाध्यमे, न्यायालये, सोशल मीडिया सक्रिय आहे. पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेपासून निवडणुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या यंत्रांच्या विश्वसनीयतेच्या संदर्भातील सर्व मुद्दयांवर चर्चा होत आहे. असे असतानाही असहिष्णुतेचा जो प्रचार केला जात आहे, याचे कारण म्हणजे अशा प्रचाराला विरोध करणारा एक वर्ग समाजातच उभा आहे. तो स्वयंप्रेरणेने उभा आहे. मोदी ही व्यक्ती नसून एक सामूहिक मानसिकता त्यांच्यामागे उभी आहे. ही स्थितीच त्यांच्या विरोधकांना भीतिदायक वाटते. पण तो वर्ग वगळता अन्य समाजाला तसे वाटत नाही. कारण ही सामूहिक मानसिकता काही पाच-दहा वर्षांत निर्माण झालेली नाही. तिला नव्वदहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. चार पिढयांहून अधिक पिढया त्या विचारधारेसाठी कार्यरत आहेत. केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे, तर जीवनाच्या विविध क्षेत्रांत या विचारधारेतून कार्यकर्ते काम करीत आहेत. भारतातील कोटयवधी लोकांनी त्यांच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्यातून त्यांच्यामध्ये विश्वासार्हता संपादन केली आहे. त्यामुळे या परिवारावर टीका करणारे समाजापासून तुटत आहेत.

संघातील चैतन्यतत्त्व

संघावर तीन वेळा बंदी आली. गांधीहत्येसारख्या आरोपाला तोंड द्यावे लागून सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला. असे असूनही संघ सातत्याने वाढत गेला. विसाव्या व एकविसाव्या शतकातही संघाला वर्धिष्णू ठेवणारे चैतन्यतत्त्व कोणते? केवळ परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याच्या आरोपातून त्याचे उत्तर मिळेल काय? उदारमतवादी परंपरा असलेल्या, विविध परंपरा, चालीरिती, भाषा असलेल्या विविधतापूर्ण संस्कृतीत एखादी कट्टरतावादी विचारसरणी यशस्वी होऊ  शकेल काय? केवळ मुस्लीमद्वेषाची प्रेरणा पिढयानपिढयांची प्रेरणा निर्माण करू शकते काय? ज्या संघटनेपाशी धार्मिक, आर्थिक व राजकीय सत्ता नाही, ती संघटना कशी काय हुकूमशहा होऊ  शकते? आजच्या मुक्त वातावरणात लोक अशा संघटनेचे कशासाठी ऐकतील? शेकडो लोक आपले जीवन का समर्पित करतील? असे अनेक प्रश्न या संदर्भात उत्पन्न होतात. या प्रश्नांचे एकच उत्तर आहे व ते म्हणजे आपल्या देशाचे, राष्ट्राचे भविष्यातील उज्ज्वल स्वरूप त्यांच्या डोळयासमोर आहे. केवळ मुस्लीमद्वेष हाच हेतू असता, तर त्यासाठी तशीच एखादी संघटना पुरी झाली असती. त्याकरिता एवढा विशाल परिवार निर्माण करण्याची गरज नव्हती. जर्मन तत्त्वज्ञ हेगेलच्या सिध्दान्ताच्या आधारे संघातील चैतन्यतत्त्वाचे स्पष्टीकरण देता येईल.

हेगेलचा सिध्दान्त मानवी स्वातंत्र्याचे स्वरूप स्पष्ट करतो. आध्यात्मिक मुक्ततेपेक्षा ही मुक्ती वेगळी आहे. आध्यात्मिक मुक्ती ही व्यक्तिगत आहे, तर हेगेलची मुक्तीची कल्पना राष्ट्रस्वरूपात आहे. यासाठी त्याने द्वंद्वात्मक गतिशीलतेची - डायलेक्टिक्सची कल्पना मांडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये जडतत्त्व व चैतन्यतत्त्व असते. जडतत्त्व त्याला जगाशी बांधून ठेवते, तर चैतन्यतत्त्व त्याला मुक्त करू पाहते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याच्या चैतन्यतत्त्वाच्या रूपात मूलभूत स्वातंत्र्याची आकांक्षा असते. परंतु समाजातले अनेक घटक असे असतात की त्यामुळे व्यक्तीच्या मुक्ततेत अडथळा येतो. त्यामध्ये त्याची सामाजिक, आर्थिक स्थिती, सामाजिक व्यवस्था, रूढी, परंपरा असे अनेक घटक असतात. हेगेलच्या शब्दात - 'स्वतंत्र होऊ पाहणारे चैतन्यतत्त्व हे थिसीस, सिध्दान्त बनते व त्याला रोखू पाहणारी तत्त्वे ही प्रतिसिध्दान्त - ऍंटीथिसिस बनतात. या थिसिस-ऍंटीथिसीस, सिध्दान्त-प्रतिसिध्दान्त यांच्या परस्पर संघर्षातून द्वंद्वात्मक गतिमानता जन्मते. यात थिसीस-ऍंटीथिसीस किंवा सिध्दान्त-प्रतिसिध्दान्त यांच्या परस्पर संघर्ष-समन्वयातून एक नवा सिध्दान्त - सिंथेसिस तयार होतो. तो पुन्हा एक नवा सिध्दान्त, थिसिस बनतो व तेच वर्तुळ पुढे सुरू राहते. ही प्रक्रिया परिणामकारक व्हायची असेल, तर व्यक्तीमधील स्वातंत्र्याच्या आकांक्षा एकात्म व्हाव्या लागतात. नाहीतर एकाच व्यक्तीमध्ये विभिन्न व्यक्तिमत्त्वे (मल्टिपल पर्सनॅलिटीज) तयार होतात. ज्या वेळी अशा व्यक्तिगत स्वातंत्र्याकांक्षेचे सामूहिकीकरण होते, तेव्हा त्यातून राष्ट्रनिर्माते तयार होतात. जेव्हा म. गांधींना द. आफ्रिकेत वांशिक भेदाचा अनुभव आला, तेव्हा तो लढा त्यांचा व्यक्तिगत राहिला नाही. तो सामाजिक बनला. तसेच लो. टिळक, स्वा. सावरकर, डॉ. आंबेडकर वा अन्य राष्ट्रनिर्मात्यांबद्दल म्हणता येईल. या सर्वांनी समाजातील स्वातंत्र्याकांक्षा जागी केली. जो समाज मृतवत पडला होता, तो चैतन्यशील बनला. प्रत्येक राष्ट्रामध्ये असे चैतन्यतत्त्व निर्माण करणाऱ्या महापुरुषांची मालिका असते. ही मालिकाच राष्ट्राचे चैतन्यतत्त्व जागे ठेवते. तिचे स्मरण जोवर राहते, तोवर समाज मृत होत नाही. तो झाल्यासारखा वाटला, तरी तो त्यांच्या स्मरणातून पुन्हा जोमाने उभा रहातो. संघाचे चैतन्यतत्त्व हे डॉक्टर हेडगेवारांच्या स्वातंत्र्याकांक्षेतून निर्माण झाले आहे. त्यामुळे संघाच्या स्थापनेचा उद्देश स्पष्ट करताना डॉक्टर म्हणतात की 'हिंदू समाजाच्या संरक्षणार्थ जो स्वयंसेवक संघ निर्माण करायचा, त्यात  मुसलमान, ख्रिश्चन, इंग्रज आदी लोक असले काय किंवा नसले काय, संघाची स्थापना होणे आवश्यकच होते.' त्यामुळे संघाची स्थापना ही हिंदू समाजाच्या स्वाभाविक स्वातंत्र्याकांक्षेतून झाली आहे, मुस्लीमद्वेषातून नाही. संघाने या स्वातंत्र्याकांक्षेने भारलेले समूहमन तयार केले आहे व हे समूहमनच वेगवेगळया क्षेत्रांतील लक्षावधी कामे संचालित करीत आहे. त्यामुळे संघ ही आज संस्था राहिली नसून चळवळ बनली आहे.

परंपरेतील परिवर्तन

हिंदू समाजाची आध्यात्मिक स्वातंत्र्याची परंपरा ही व्यक्तिगत मोक्षाची आहे. या परंपरेसंबंधात हेगेलने विस्तृत विवेचन केले आहे. याचा परामर्श 'हेगेल्स इंडिया' या ऑक्सफोर्डने प्रकाशित केलेल्या पुस्तकात घेतला आहे. हिंदू तत्त्वज्ञानाबद्दल त्याने वेगवेगळया संदर्भात ऐंशी हजाराहून अधिक शब्द लिहिले आहेत. त्याने 'फँटास्टिक', 'सब्जेक्टिव्ह', 'वाईल्ड', 'ड्रीमी', 'फ्रेंझीड', 'ऍब्सर्ड' व 'रिपिटेटिव्ह' अशा शब्दांत त्याने हिंदू तत्त्वज्ञानाचे वर्णन केले आहे. अगदी ग्रीक संस्कृतीनेही हिंदू तत्त्वज्ञानाचे महत्त्व मान्य केले आहे, असेही तो नमूद करतो. पण त्याच्या मते हिंदू समाजाच्या 'ब्रह्म' या अंतिम मुक्तीच्या कल्पनेमध्ये चार महत्त्वाच्या त्रुटी आहेत. त्यामुळे, त्याच्या मते, पारंपरिक हिंदू तत्त्वज्ञान आधुनिक समाजनिर्मिती करू शकत नाही. पहिली त्रुटी म्हणजे मुक्तीची कल्पना व्यक्तिनिष्ठ असल्याने सामाजिक व अन्य व्यवस्थात्मक घटकांना टाळून एकटयासाठी मोक्ष मिळविण्याची ती प्रेरणा निर्माण करते. त्यामुळे स्वातंत्र्याच्या सामूहिक आकांक्षेतून जे परिवर्तन व्हायला हवे, तसे होत नाही. दुसरी त्रुटी म्हणजे मोक्षाचा अधिकार हा जन्माधिष्ठित आहे. त्यामुळे ती स्वातंत्र्याकांक्षा सर्वसमावेशक होत नाही. तिसरी त्रुटी म्हणजे ब्रह्माचे स्वरूप वर्णानातीत असल्याने त्यात प्रत्यक्षापेक्षा कल्पनेच्या खेळाचा भाग अधिक आहे. आणि चौथी त्रुटी म्हणजे ब्रह्मचैतन्याच्या कल्पनेचा हिंदूंच्या मनावर एवढा पगडा आहे की ते त्यातच रमलेले असतात, ऐहिकातील जीवन दुर्लक्षित करतात. त्यामुळे त्यांना इतिहासाचे व राजकारणाचे महत्त्व कळत नाही. त्याच्या शब्दात सांगायचे तर, 'हिंदूंनी लावलेला इतिहासाचा क्रम एवढा संभ्रम निर्माण करणारा व चुकीचा आहे की ज्या लोकांनी खगोलशास्त्र, गणित आदी विद्याशाखांत एवढे प्रावीण्य मिळविले असताना ते इतिहास लिहिण्यात अक्षम आहेत. त्यांनी लिहिलेल्या इतिहासामध्ये स्थैर्य व सुसंगती नाही.' आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्याने कितीतरी उदाहरणे दिली आहेत. त्या तपशिलात इथे जायचे कारण नाही. पण इतिहासात कधीही झाला नाही असा हिंदू संघटनेचा प्रयोग संघाच्या रूपाने करायचा आहे, हे डॉक्टरांचे विधान हाच मुद्दा अधोरेखित करते. हेगेलची आधुनिक राष्ट्राची संकल्पना सामूहिक स्वातंत्र्याकांक्षेच्या स्वरूपातील आहे. ती साम्राज्यवादी नाही की हुकूमशाहीवादी नाही. जेव्हा समाजाच्या स्वातंत्र्याची सामूहिक आकांक्षा जागी होते, तेव्हा त्यातूनच मानवी स्वातंत्र्याला पोषक अशा व्यवस्था निर्माण होत जातात व त्याचे प्रत्यंतर राज्यव्यवस्थेत पडते. जेव्हा राज्यव्यवस्था समाजाच्या सामूहिक स्वातंत्र्याचे प्रतीक बनते, तेव्हा ती परिपूर्ण राष्ट्रस्वरूपात साकार होते. हेच राष्ट्राचे चैतन्यतत्त्व असते. मानवी शरीराच्या सर्व अवयवांत जशी एकाच वेळी सुखानुभूती येते, तसाच अनुभव हर्बर्ट स्पेन्सरने दिलेल्या समाजविकास प्रक्रियेतून येतो. राष्ट्रनिर्माणातील चैतन्यतत्त्व हेगेलने स्पष्ट केले आहे, तर त्यातील विकासप्रक्रिया कशी असेल हे स्पेन्सरच्या विवेचनावरून कळते. या दोन संकल्पना समजल्याशिवाय संघाचा विकासक्रम वैचारिकदृष्टया समजणार नाही. तसे होत नसल्याने संघाबद्दल भरपूर गैरसमज आहेत. ज्यांचा संघाशी संपर्क आला आहे, त्यांना तो अनुभूतीतून समजला आहे व अनुभूतीला वैचारिक स्पष्टतेची गरज असतेच असे नाही.

आजवर समाजाच्या एखाद्या विशिष्ट वर्गात अशी स्वातंत्र्याची आकांक्षा जागवून किंवा विशिष्ट संस्थात्मक बदल करून सामाजिक सुधारणेचे प्रयत्न झाले. डॉक्टरांचे क्रांतिकारक महत्त्व हे की त्यांनी समाजाच्या सर्वसामान्य व्यक्तीलाही यात सहभागी होता येईल अशी कार्यपध्दती निर्माण केली व त्या परिवर्तनातून संस्थात्मक परिवर्तनाची संकल्पना मांडली. आपल्या कार्यपध्दतीत वैचारिकतेपेक्षा अनुभूतीला महत्त्व दिले. अनेक वेळा वैचारिक परिवर्तन केवळ बौध्दिक स्तरावर राहते, पण अनुभूतीतून झालेले परिवर्तन हे जीवन बदलून टाकते. अशी लक्षावधी लोकांची जीवने संघाने बदलून टाकली आहेत व त्यांच्या सामर्थ्यावर संघ उभा आहे. सत्तेच्या सामर्थ्यावर नाही. स्वर्ग मिळविण्याची इच्छा किंवा व्यक्तिगत मोक्ष ही संघाची प्रेरणा नाही, तर समूहमनाने संचालित केलेला सामूहिक प्रयोग असे संघाचे स्वरूप आहे. त्यामुळे हिंदू समाजात जागृतीसाठी जे जे महापुरुष निर्माण झाले, त्या सर्वांना संघाने प्रात:स्मरणीय मानले आहे. ही संघाची मूलभूत भूमिका आहे, डावपेचात्मक नाही. त्यामुळेच डॉक्टरांनी संघाचे काम प्रबळ, प्रभावी व रंगविरहित कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे म्हटले आहे. संघाला समाजाला स्वत:चा रंग द्यायचा नाही, तर समाज आपल्या स्वातंत्र्याकांक्षेतून जसा रंग घेईल, तसा नैसर्गिकपणे घेतला जाईल अशीच संघाची धारणा आहे. त्यामुळे संघाने कोणत्याही एका विशिष्ट उपक्रमाला वाहून घेतलेले नाही. त्यामुळे जेव्हा एका विशिष्ट चौकटीत संघाला बसवून समजावून घेण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा त्यातून गोंधळ निर्माण होतो. काही विशिष्ट कालसापेक्ष अजेंडा नसणे हाच संघाचा अजेंडा आहे.

kdilip54@gmail.com