'वेड पांघरून बारामतीला'

विवेक मराठी    01-Jul-2017
Total Views |

 

आजही तो कोथळा काढणाऱ्या शिवरायांना स्वातंत्र्याचे व स्वराज्याचे लढवय्ये समजण्यापेक्षा इस्लामचे शत्रू मानणाऱ्या मानसिकतेला कोणी विकृत बनवले, त्याचा खेद व्हायला हवा. पण वेड पांघरून बारामतीला जाण्यातच हयात गेल्यावर यापेक्षा दुसरा योग्य युक्तिवाद 'श्रीमंत' पवार साहेबांना कुठून सुचायचा? शिवराय हिंदू धर्मासाठी लढत नव्हते, तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तरी कुठे धर्मासाठी लढत होता? त्याने तर अफजलखानाला साथ दिली होती. जेव्हा कोणी हिंदू लढत असतो, तेव्हा लढाई धर्माची कधीच नसते. हिंदू नेहमी स्वराज्यासाठी व स्वराष्ट्रासाठी लढतो. तो पवारांसारखा 'श्रीमंत' नसतो.

मिताभच्या कुठल्या तरी एका चित्रपटात गर्दीच्या प्रसंगात एक चेहरा मला खूप ओळखीचा वाटला होता, म्हणून तो चित्रपट अगत्याने दुसऱ्यांदा बघितला होता. पण जेव्हा त्या चेहऱ्याची ओळख पटली, तेव्हा मनापासून खूप दु:ख झाले होते. तो चेहरा 1950-60च्या जमान्यातील एक लोकप्रिय अभिनेता नायकाचा होता. त्याचे नाव भारतभूषण! त्याचा काळ संपल्यावर त्याची ओळखही कोणाला राहिली नव्हती. मग टिकून राहण्यासाठी वा उदरनिर्वाहासाठी त्याच्यावर अशी नामुश्की आली होती काय? ह्या प्रश्नाचे उत्तर मला तेव्हा सापडले नव्हते. तसेच काहीसे भगवान दादांना नाचणाऱ्या घोळक्यात किरकोळ व्यक्ती म्हणून बघितल्यावर वाईट वाटायचे. आजही ज्या भगवान दादांच्या 'भोली सुरत' गीतावर चौथी पिढी डोलू लागते, त्यांनी असे कुठल्या घोळक्यात नगण्य म्हणून पेश होणे, त्यांच्या इतिहासाला काळिमा फासणारे असते. ज्यांनी दीर्घकाळ सत्ता-प्रतिष्ठा ताठ मानेने भोगलेली असते, त्यांच्या आगतिकतेकडे बघवत नाही. अशी माणसे आपणच कमावलेली प्रतिष्ठा वा मानसन्मान धुळीस मिळवत असतात. सहा महिन्यांपूर्वी जगाचे राजकारण सलग आठ वर्षे खेळलेले बराक ओबामा आता निवृत्त झालेले आहेत. पण अमेरिकेचे अध्यक्षपद भूषवलेल्या याच ओबामांनी आपल्या अनुभवाचा आधार घेऊन नव्या अध्यक्षांना खडे बोल ऐकवावेत, असे प्रसंग तिथे वारंवार येत असतात. पण पन्नाशीतल्या ओबामांनी तो मोह टाळला आहे. आपण जे पद भूषवले, त्यातून जी जगन्मान्यता मिळवली, ती धुळीस मिळणार नाही, याची काळजी त्या मुरब्बी राजकारण्याने घेतली आहे. कारण अशा उच्चपदाचा अनुभव घेतलेल्यांची प्रतिष्ठा अन्य कोणी पुसून टाकू शकत नसतो. तो इतिहास असतो आणि त्याची विटंबना तीच व्यक्ती करू शकत असते. आपल्या छचोर वर्तनातून वा वक्तव्यातून तीच महान व्यक्ती आपल्या प्रतिमा जमीनदोस्त करू शकत असते.

शरद पवार आता वरीष्ठ राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. ज्येष्ठ, वरिष्ठ म्हणजे प्रचलित काळात संदर्भहीन झालेले, असा त्याचा अर्थ घ्यावा किंवा कसे, असा प्रश्न म्हणून पडतो. कारण हल्ली पवार कायम कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधले जावे, अशी चमत्कारिक विधाने सरसकट करू लागलेले आहेत. 'कहींपे निगाहे कहींपे निशाना' अशी त्यांची अवस्था झाली आहे. पाव शतकापूर्वी देशाचा पंतप्रधान होण्यासाठी मुंबईहून दिल्लीला झेपावलेल्या पवारांना, राजधानीत आपले बस्तान बसवता आले नाही, म्हणून पुढे मनमोहन सिंग यांच्यासारख्या दुबळया पंतप्रधानाच्या सरकारमध्ये नगण्य पदावर समाधान मानावे लागले होते. पुढल्या पिढीला आशीर्वाद देणे किंवा युक्तीचे चार शब्द सांगावेत, अशा वयात आज पवार आहेत. सहाजिकच त्या पुढल्या पिढीने त्यांच्या वयाचा व अनुभवाचा लाभ घेत भविष्य बघायला हवे. पण त्याच वयात पवार काहीतरी निमित्त शोधून वादग्रस्त होण्याचा जो हास्यास्पद प्रयास करतात, ते बघून त्यांच्या समकालीन पिढीलाही वैषम्य वाटत असेल. आताही पुण्यात कुठल्यातरी समारंभात पवारांनी इतिहासाच्या संदर्भात आपले ज्ञान म्हणून जी काही मुक्ताफळे उधळली आहेत, ती केविलवाणी आहेत. शिवरायांचा इतिहास नव्याने लिहिला जात असल्याचे म्हटले जाते. त्याला कोणाची हरकत नसावी. पण त्यात चुकीच्या इतिहासातून चुकीचे राजकीय डाव खेळण्याचा पवारांचा प्रयास म्हणजे वेड पांघरून बारामतीला जाण्यासारखा प्रकार आहे. शिवरायांना किंवा आणखी कोणाला पुरोगामी वा सेक्युलर ठरवण्याची खेळी नवी नाही. त्या खेळाला अधूनमधून नव्या फ़ोडण्या देत शिळया कढीला ऊत आणला जातच असतो. शेवटी सत्य काहीच नसते. आपापल्या सोयी व गरजेनुसारच कथाकथन होत असते आणि पवारही त्याला अपवाद नाहीत. मग इतिहास शिवकालीन असो किंवा पवारकालीन असो.

शिवराय हे कुठल्या धर्माच्या विरोधात नव्हते, हे नव्याने कथन करण्याची गरज नाही. एक हिंदू राजा हा कधीच धर्माच्या नावाने राज्य करीत नसे. किंबहुना कुठलाही हिंदू राजा आपला धर्म जनतेवर लादत नव्हता. हिंदू राज्य असे कुठे कधी नव्हते. अलीकडल्या काळात नेपाळ तसा हिंदू देश होता आणि तरीही त्याने आपल्या धर्माची सक्ती कोणा सामान्य माणसावर केली नाही. मग शिवराय तर चार शतके मागले आहेत. ते हिंदू धर्माचे राज्य करीत नव्हते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांच्या नावाच्या मागे 'गोब्राह्मण प्रतिपालक' अशी बिरुदावली कुठून आली, त्याचाही शोध करण्याची गरज नाही. बाबासाहेबांनी सात दशकांपूर्वी लिहिलेली राज्यघटना आज तरी जशीच्या तशी कुठे उरली आहे? प्रत्येक पिढीने व काळाने त्यात आपल्याला हवे तसे बदल करून घेतले आहेत. मग शिवकालीन इतिहासात इथे तिथे काही बदल असू शकतात. असे बदल कशासाठी केले जातात आणि काही प्रसंगी ते जनहिताचे कसे असतात, हे माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराने पवारांसारख्या दिग्गजाला सांगण्याची गरज आहे काय? शिवराय बाजूला ठेवा आणि शरद पवार नावाच्या राज्यकर्त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक खोटया गोष्टी जनहित म्हणून केल्या, पुढे त्याची कबुलीसुध्दा दिलेली आहे. अनेकदा सामान्य जनतेच्या भल्यासाठीच काही खोटया गोष्टी तिच्या मनात भरवाव्या लागत असतात, असा पवारांचाच सिध्दान्त आहे. शिवराय मुस्लिमांचे शत्रू नव्हते की कुठल्या धर्माचे विरोधक नव्हते, असे पवार म्हणतात. मग पवार इस्लामी धर्माचे प्रचारक पुरस्कर्ते आहेत, की हिंदू धर्माचे विरोधक आहेत? नसतील, तर त्यांनी आपल्या कारकिर्दीत कसे वर्तन केले होते? त्यांनी हिंदूंना हकनाक कशाला मरू दिले? हिंदूंना मारणाऱ्या इस्लामी दहशतवादाला पाठीशी घालताना, पवार हिंदू धर्माचे शत्रू झाले होते असे मानावे काय?

काल-परवाच मुंबई 1993 सालच्या बाँबस्फोटातील दुसऱ्या सुनावणीचा निकाल लागला आणि त्यात सातपैकी सहा आरोपींना शिक्षा झाली. ते सर्व मुस्लीम आहेत. ते मुस्लीम आहेत म्हणून त्यांना भारतीय न्यायव्यवस्थेने दोषी मानलेले नाही. पण त्यांनी तोच गुन्हा केला व हिंदूंना मारण्यासाठीच असे भीषण कारस्थान शिजवून अंमलात आणले, तेव्हा पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी अशा घातपाती मुस्लिमांना पाठीशी घालण्यासाठी कोणते गैरसमज निर्माण करण्याचा विडा उचलला होता? ज्या दिवशी ती भयंकर घटना घडली, त्या संध्याकाळी मुंबईकरांना शांतता राखण्याचे आवाहन करायला मुख्यमंत्री शरद पवार दूरदर्शनच्या पडद्यावर अवतरले. तिथे त्यांनी कोणते भयंकर सत्यकथन केले होते? मुंबईत सर्व अकरा स्फोट घडलेले होते आणि ते सर्व हिंदूबहुल भागात घडलेले होते. म्हणजेच त्यातून अधिकाधिक हिंदूंना ठार मारण्याचा डाव होता. किंबहुना अन्य कोणापेक्षाही तो सर्वात आधी पवारांनाच कळलेला होता. तरी तसेच्या तसे सत्य लोकांना उमजू नये, म्हणून पवारांनी कोणते उपाय योजले होते? तर त्यांनी मुस्लीम वस्तीतही स्फोट झाल्याची थाप दूरदर्शनच्या आवाहनातून मारलेली होती. इतिहास सोडा, पवार तर वर्तमानातही दिशाभूल करत होते. लोकांमध्ये गैरसमज पसरवीत होते. किंबहुना त्यांनी वर्तमानाविषयी मुंबईकर जनतेची व भारतीयांची शुध्द फसवणूक केलेली होती. मग तेव्हा पवार हिंदूविरोधी होते, की इस्लामचे पुरस्कर्ते होते? त्यांनी सत्य लपवून असत्य दडपून कशाला सांगितले होते? तर जनतेमध्ये वैमनस्याची भावना वाढून दंगली पेटू नयेत, म्हणून खोटेपणा केला होता, असा त्यांचाच दावा आहे. असायला हरकत नाही. पण सर्वच वेळी सत्य सांगता येत नाही आणि उपकारकही नसते, इतकाच त्याचा अर्थ आहे. इतिहास वा वर्तमान सांगताना जनहिताचेही भान ठेवावे लागते, असाच त्याचा अर्थ नाही काय?

'गोब्राह्मण प्रतिपालक' अशी उपाधी नंतरच्या काळात लावली गेली वा घुसवली गेली, असे सांगताना सत्यशोधक झालेले पवार मुंबईतले शेकडो लोक रक्ताच्या थारोळयात आक्रोश करत असताना, खोटयाचे पुजारी कशाला झालेले होते? आपले खोटे हे जनहिताचे आणि दुसऱ्याचे खोटे हानिकारक असल्या भंपकपणाला सत्यशोध म्हणता येत नाही की मानता येत नाही. शिवराय मुस्लीमविरोधी नव्हते, तर मुस्लीम धर्म लादण्याच्या विरोधात होते. तसे नसते, तर त्यांना स्वराज्य स्थापण्याची काही गरज नव्हती. आपल्या धर्मपरंपरांवर वा श्रध्दास्थानावर गदा आली, म्हणून त्यांना लढाईत उतरावे लागले होते. ते नुसते परकीय आक्रमण नव्हते. तो प्रादेशिक संघर्ष नव्हता, तर आक्रमणाचा विषय होता आणि आक्रमण हे प्रादेशिक असण्यापेक्षाही सांस्कृतिक व धार्मिक होते. तेव्हा धार्मिक सत्ता लादण्याच्या विरोधातली ती लढाई होती. अफजलखान असो किंवा आणखी कोणी सुलतान बादशहा असो, त्यांनी देवळे उद्ध्वस्त करण्यातून हा संघर्ष अधिक पेटला होता. शिवरायांचे स्वराज्य म्हणजे तरी काय होते? स्वराज्य कशासाठी हवे होते आणि टिकवायचे होते? शिवरायांनी त्यासाठी अफजलखानाला मारला आणि त्याच्या कोथळा बाहेर काढला, तो त्याचा धर्म संपवण्यासाठी नव्हे, तर आपला धर्म वाचवण्यासाठी होता. ती बचावात्मक लढाई होती. आपला धर्म वाचवताना शिवराय इस्लामला नष्ट करायला निघालेले नव्हते. म्हणून त्यांच्या सेनेत मुस्लीम सैनिक वा लढवय्येही सहभागी झालेले होते. त्यामुळे शिवराय धर्मप्रसारासाठी लढत नव्हते की लढाया करत नव्हते, हे अर्धसत्य आहे. ते आपला धर्म नष्ट होऊ नये म्हणून लढाईच्या आखाडयात उतरले होते आणि त्या लढाईतला शत्रू मुस्लीम सुलतान बादशहाच नव्हते, अगदी मराठे सरदार व हिंदू राजे सरदारही कापून काढावे लागले होते. पण इथेही पवारांना अर्धसत्य कथन केल्याशिवाय श्वास घेता येत नाही.

शिवराय हिंदू धर्माचे पुरस्कर्ते असते, तर त्यांनी अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वाचला नसता, असा आणखी एक शोध पवारांनी लावला आहे. अर्थात तोही शिळया कढीला आणलेला ऊत आहे. आपणही 'पुरुषोत्तम' असल्याचे सिध्द करण्याची ती केविलवाणी कसरत आहे. खरेच पवारांना जातिपातीचे कौतुक नसते, तर त्यांना कुलकर्ण्याखेरीजही अनेक हिंदूंना शिवरायांच्या तलवारीचे बळी व्हावे लागले होते, त्याचे स्मरण झाले असते. पण अशा इतर बळींची जात पवारांना आडवी आली ना? शिवराय जातीपाती, धर्म असले भेद मानत नव्हते, हे सांगण्यासाठी कोणी 'कोकाट'ण्याची गरज नाही. अठरापगड जातीतल्या तरुणांमध्ये राष्ट्रीयत्व वा स्वाभिमान जागवून त्यांच्या पुरुषार्थाला आवाहन करणाऱ्या शिवरायांना, आज कुणा पुरुषोत्तमाने संशोधन करून शोधण्याची गरज नाही. साडेतीनशे वर्षे शिवराय भारतीय जनमानसात अढळ स्थान प्राप्त करून बसले आहेत. कारण त्यांनी कुठल्या धर्मजातीचा भेदभाव केला नाही, याची प्रत्येक भारतीयाला जाण आहे. आडनावांचा वा जातीचा शोध घेऊन त्यांनी 'श्रीमंत पवारांचे' राजकारण केले असते, तर इतिहास वेगळा घडला असता. तेव्हा 'श्रीमंत' पवार साहेब, सवाल शिवराय कोणाकडे मुस्लीम म्हणून बघत होते असा नसून, आजचे किती मुस्लीम शिवरायांकडे धर्मनिरपेक्ष राजा म्हणून बघतात, असा प्रश्न आहे. खरेच मुस्लीम नेत्यांना किंवा मुस्लिमांकडे मताची माधुकरी मागणाऱ्यांना त्याची जाणीव असती, तर अफजलखानाच्या कोथळयात कुणाला धर्म दिसला नसता. तशी छायाचित्रे वा पोस्टर्स बघून कोणाच्या धर्मभावना दुखावल्या नसत्या. सांगली-मिरजची दंगल त्याच चित्राने घडवली होती. कारण अफजलखानाच्या त्या कोथळयात अनेकांना इस्लामची विटंबना दिसली होती. दंगलीला प्रवृत्त झालेल्यांना अफजलखानातला मुस्लीमच दिसला होता.

पवार साहेब, अफजलखानाचा धर्म कुठला होता वा शिवराय कुठल्या धर्माचे पुरस्कर्ते होते हा सवाल नाही. आजचा सवाल आहे, तो शतकांपूर्वीच्या इतिहासातला स्वराज्याचा शत्रू असलेल्या त्या अफजलखानामध्ये ज्यांना आपला धर्मबंधू दिसतो, त्यांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. त्यांच्या विकृत मनोवृत्तीला आजही ती लढाई किंवा तो संघर्ष धर्माची लढाई वाटतो. त्या कोथळा काढणाऱ्या लढाईत आपल्या धर्माचा प्रतिनिधी म्हणून जे अफजलखानाकडे मुस्लीम लढवय्या म्हणूनच आजही बघतात, त्यांच्याच ऐतिहासिक समजुतीची समस्या आहे. त्यांची समजूत बदलण्याची गरज आहे. आज इथला मुस्लीम समाज खरेच प्रामाणिक राष्ट्रवादी असेल, तर त्याला अफजलच्या कोथळयाचा खरा इतिहास सांगायला हवा आहे - अफजलचा कोथळा मुस्लीम म्हणून काढला नव्हता, तर स्वराज्याचा शत्रू म्हणून काढावा लागला, हे कोण समजावणार? आजही तो कोथळा काढणाऱ्या शिवरायांना स्वातंत्र्याचे व स्वराज्याचे लढवय्ये समजण्यापेक्षा इस्लामचे शत्रू मानणाऱ्या मानसिकतेला कोणी विकृत बनवले, त्याचा खेद व्हायला हवा. पण वेड पांघरून बारामतीला जाण्यातच हयात गेल्यावर यापेक्षा दुसरा योग्य युक्तिवाद 'श्रीमंत' पवार साहेबांना कुठून सुचायचा? शिवराय हिंदू धर्मासाठी लढत नव्हते, तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तरी कुठे धर्मासाठी लढत होता? त्याने तर अफजलखानाला साथ दिली होती. जेव्हा कोणी हिंदू लढत असतो, तेव्हा लढाई धर्माची कधीच नसते. हिंदू नेहमी स्वराज्यासाठी व स्वराष्ट्रासाठी लढतो. तो पवारांसारखा 'श्रीमंत' नसतो. उपाशीपोटी तो देशासाठी लढतो. आजही सीमेवर लढणारा प्रत्येक मराठा वा भारतीय तितकाच धर्मनिरपेक्ष आहे. त्याची प्रेरणाही शिवरायांकडून आलेली आहे. 'श्रीमंती' बादशहाकडून येत असते. आपल्या वयाला व प्रतिष्ठेला शोभणारे वर्तन साहेब कधी सुरू करणार? कधी श्रीमंतीची हाव सुटायची?               

bhaupunya@gmail.com