ऍश-ट्रे

विवेक मराठी    10-Jul-2017
Total Views |


नकलत्या दुपारची वेळ असते. उजव्या बाजूच्या खिडकीतून येणारी उन्हाची तिरीप टेबलावर विखुरलेल्या कागदांशी खेळत असते. सकाळपासून काहीतरी लिहिण्याचा चाललेला प्रयत्न, विखुरलेल्या कागदांतून, थंड  झालेल्या कॉफीमधून आणि भरत चाललेल्या ऍश-ट्रेमधून जाणवत राहतो. काहीच सुचत नसतं. विचारांची आवर्तनं मुक्तछंदात फिरत राहतात, पण कागदावर उमटत नाहीत. वाफाळत्या कॉफीचं कधीच गोमूत्र झालेलं असतं. आता लिहायचंच या निश्चयाने एक कोरा करकरीत कागद ओढून तुम्ही सुरुवात तर करता, पण विचार आणि शब्द हातात हात गुंफून येतच नाहीत. दिवसभर चाललेला त्यांचा लपाछपीचा खेळ तसाच चालू राहतो. तुम्ही वैतागता. उजव्या हातातलं पेन तसंच ठेवून डाव्या हाताने सिगरेटचं पाकीट शोधता. आज काही सुचतच नाहीये, या तिरिमिरीत तुम्ही ती शिलगावता. दोन-तीन लांबलचक कश घेता. तिच्या टोकाशी आता ऍश जमा होते. अस्ताव्यस्त टेबलावर कोपऱ्यात गेलेला ऍश-ट्रे तुम्ही खेचून जवळ घेता, आणि तुमच्या लक्षात येतं - कागद रिकामे राहिलेत, पण दिवसभरात ऍश-ट्रे मात्र भरून गेलाय.

आख्ख्या ऍश-ट्रेमध्ये विखुरलेली सिगरेटची थोटकं, राख आणि मघाशी विझवलेल्या सिगरेटचा धुगधुगणारा धूर. किती काय काय असतं त्या भरलेल्या ऍश-ट्रे मध्ये. काही सिगरेटी पूर्ण अगदी फिल्टरपर्यंत ओढून ओठाला चटका लागल्यावर विझवलेल्या. काही अर्धवट मध्येच खुडून टाकलेल्या. काही घाईघाईत संपवलेल्या. काही दुसऱ्या ब्रँडच्या, न झेपलेल्या आणि म्हणून लगेचच विझवलेल्या. काही महागडया, तर काही साध्या. शेवटी धूर होऊन राखेत झोपून राहिलेल्या. विखुरलेल्या थोटकांनी भरलेल्या ऍश-ट्रेवरून निघून तुमची नजर टेबलावर स्थिरावते.

टेबलावरही विखुरलेल्या कागदांचा पसारा. एकेक कागद म्हणजे जणू एकेक विचार. काही अर्धवट सोडून चुरगळून टाकलेले. काही अगदी शेवटपर्यंत लिहिलेले, पण शेवट मनासारखा होईना म्हणून ठेवून दिलेले. काही घाईघाईत खरडायचे म्हणून खरडलेले आणि मग मनासारखे झाले नाहीत म्हणून फेकून दिलेले. काही विचार नुसते क्षणभर आलेले म्हणून कागदावर उतरवलेले आणि मग पुन्हा विस्कटून गेलेले. काही न झेपणारे विचार वेगळयाच ब्रँडच्या सिगरेटीसारखे.. त्यांचाही चुराडा करून फेकलेला. बघता बघता आख्खं टेबल म्हणजे विचारांचा ऍश-ट्रे होऊन जातो. सगळे विचार शब्दांचा धूर करून कागदांच्या राखेत झोपून गेल्यागत दिसू लागतात.

विचारांच्या त्या ऍश-ट्रेवरून तुमची नजर हटते आणि डाव्या बाजूच्या हातभार उंचीच्या आरशाकडे जाते. तुमची नजर असे अनेक ऍश-ट्रे शोधत राहते. आयुष्यात येणारे लोक... असेच विखुरलेले. काही तुमच्या 'loyal' ब्रँडसारखे शेवटपर्यंत सोबत देणारे. प्रत्येक कशसोबत रंगतदार होत जाणारे. काही तुम्ही मध्येच खुडून टाकलेले. काही नुसतेच क्षणभर आलेले, पण कायमची 'kick' देऊन गेलेले. काहींसोबत जमलंच नाही तुमचं जणू काही... तुमच्या ब्रँडचे नव्हतेच ते. असे अनेक तुमच्या आयुष्यभर विखुरलेले. आयुष्याच्या भव्य ऍश-ट्रेमध्ये त्यांच्या आठवणींची राख उरलेली असते आणि तुम्ही त्यांच्यासोबत घालवलेले क्षण कधीच धुरासारखे दूर दूर गेलेले असतात.

आणखी एक दिवस संपलेला असतो आणि आणखी एक ऍश-ट्रे  भरून गेलेला असतो.  

9773249697

aabhish101010@gmail.com