मधुमेहात हृदयरोग का आणि कसा?

विवेक मराठी    11-Jul-2017
Total Views |

तुम्ही-आम्ही केवळ हृदयाचा विचार करतो. परंतु मधुमेहात खरा प्रश्न असतो तो रक्तवाहिन्यांचा आणि रक्तवाहिन्या चोंदल्यामुळे रक्तपुरवठा कमी झाल्याने होणाऱ्या पेशींच्या उपासमारीचा. इथेही निसर्ग सर्व रक्तवाहिन्यांना एकसारखा नियम लावत नाही. मेंदूकडे, मूत्रपिंडाकडे आणि हृदयाकडे रक्त पोहोचवणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रामुख्याने चरबीची पुटं चढलेली दिसतात. पायांच्या रक्तवाहिन्या चोंदतात. म्हणजे मधुमेहात होणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या प्रश्नाला थोडं व्यापक, संपूर्ण शरीराला नुकसान करण्याची क्षमता असलेलं स्वरूप असतं, असं समजायला हरकत नाही.


तापर्यंत झालेल्या अभ्यासांमधून मधुमेहाचं हृदयरोगाशी असलेलं नातं पूर्णत: अधोरेखित झालेलं नाही. कारण मधुमेह व्यवस्थित नियंत्रणात राखला, तरीही हृदयरोगाचं प्रमाण घटलेलं दिसत नाही. परंतु मधुमेह झालेल्या व्यक्ती खूप लवकर, म्हणजे इतरांच्या मानाने दहाएक वर्ष तरी आधी हृदयरोगाला बळी पडतात, हे सत्य नाकारता येत नाही. म्हणून मधुमेह आणि हृदयरोग या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं, मधुमेह झाला काय आणि हृदयरोग झाला काय, दोन्ही सारखंच असल्याचं सांगितलं जातं. Diabetes is heart disease equivalent.

अर्थात यात केवळ रक्तातल्या वाढलेल्या ग्लुकोजला जबाबदार धरता येत नाही. कोलेस्टेरॉल, रक्तदाब, स्थूलपणा, मेटाबॉलिक सिंड्रोम अशा अनेक गोष्टी एकत्र आल्याने हृदयरोगाचं फावतं. त्याला धूम्रपानाची जोड मिळाली, तर ते मिश्रण फारच स्फोटक होतं. कमी वयात हृदयरोगाला आमंत्रण मिळतं.

आता कॅनडात स्थायिक असलेल्या मूळ भारतीय वंशाच्या
डॉ. सलीम युसूफ यांनी केलेल्या 'इंटर हार्ट स्टडी' नावाच्या अभ्यासात यावर चांगला प्रकाश टाकला गेला. हृदयरोगाचं कारण ठरू शकतील अशा वेगवेगळया गोष्टींचा त्यांनी आढावा घेतला होता. वय, आपले जीन्स किंवा पुरुष म्हणून जन्माला येणं, (पुरुषांना स्त्रियांपेक्षा हृदयाचा झटका येण्याची भीती जास्त असते) हे कुणाच्याही हातात नाही. त्यामुळे हृदयरोगाशी संबंधित या तीन गोष्टी आपण बदलू शकत नाही. पण कोलेस्टेरॉल, रक्तदाब, लठ्ठपणा, सुयोग्य आहार, मधुमेह, धूम्रपान, व्यायामाचा अभाव, दारू पिणं, ताणतणाव अशा बदलता येऊ  शकणाऱ्या, आपल्या हातात असलेल्या नऊ  गोष्टी त्यांनी लक्षात घेतल्या. मधुमेही माणसांमध्ये यातल्या बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे हृदयरोग व्हायची शक्यता कितीतरी बळावलीच की!

तुम्ही-आम्ही केवळ हृदयाचा विचार करतो. परंतु मधुमेहात खरा प्रश्न असतो तो रक्तवाहिन्यांचा आणि रक्तवाहिन्या चोंदल्यामुळे रक्तपुरवठा कमी झाल्याने होणाऱ्या पेशींच्या उपासमारीचा. इथेही निसर्ग सर्व रक्तवाहिन्यांना एकसारखा नियम लावत नाही. मेंदूकडे, मूत्रपिंडाकडे आणि हृदयाकडे रक्त पोहोचवणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रामुख्याने चरबीची पुटं चढलेली दिसतात. पायांच्या रक्तवाहिन्या चोंदतात. म्हणजे मधुमेहात होणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या प्रश्नाला थोडं व्यापक, संपूर्ण शरीराला नुकसान करण्याची क्षमता असलेलं स्वरूप असतं, असं समजायला हरकत नाही. मुळात ते तसं असतंच.

मग 'असं का?' हा प्रश्न मनामध्ये उभा राहणारच. आजार म्हणून मधुमेहाचं प्रारूप त्याला कारणीभूत आहे. पहिली गोष्ट - मधुमेहात रक्तातलं ग्लुकोज वाढतं, रक्त आख्ख्या शरीरभर फिरतं. साहजिकच त्याचे दुष्परिणाम शरीराच्या कुठल्याही भागात दिसणार. रक्तातलं ग्लुकोज वाढलं की एक प्रकारे रक्तवाहिन्यांतून साखरेचा पाक वाहणार. तोही दिवसाचे चोवीस तास. साखरेचा पाक आपला चिकटपणाचा गुणधर्म सोडणार थोडाच? रक्त चिकट, गुठळया व्हायला पोषक बनणार. नुसतं तेवढंच नाही. रक्तात फिरणारं अतिरिक्त ग्लुकोज सर्वत्र प्रोटीन्सना चिकटणार. प्रोटीन्सचे मूळ गुणधर्म, मूळ स्वभाव बदलून टाकणार. पेशींचं बरंचसं काम प्रोटीन्स करत असतात. त्यांचेच गुणधर्म बदलले की पेशींच्या रोजमर्राच्या कामात अडचणी येणारच. त्यांचं काम चोख होणार नाहीच. अशाने पेशींच्या रासायनिक घडामोडी अर्धवट होतात, पूर्णत्वास जात नाहीत. ऑॅक्सिजनचा पूर्ण वापर होण्याऐवजी ऑॅक्सिजनचे काही रेणू मोकाट सुटतात. वाटेत जो मिळेल त्याला धरतात, मिठी मारतात. याला वैद्यक 'ऑॅक्सिडेशन' म्हणतं आणि मोकाट सुटलेल्या ऑॅक्सिजनच्या कणांना 'फ्री ऑॅक्सिजन रॅडिकल्स'. मोकाट सुटलेल्या जनावरांनी चांगल्या शेतात घुसून धुडगूस घालावा आणि शेताचं नुकसान करावं, तद्वत हे असतं.

नॉर्मल माणसांमध्ये ही फ्री ऑॅक्सिजन रॅडिकल्स तयार होत नाहीत असं नाही, परंतु त्यांचं प्रमाण अत्यंत अल्प असतं. शिवाय पालेभाज्या आणि फळं यातून मिळणारी बी आणि सी व्हिटॅमिन्स व सेलेनियमसारखी मिनरल्स त्या ऑॅक्सिजन रॅडिकल्सशी संयोग पावतात. त्यांना डोईजड होऊ  देत नाहीत. मधुमेहात या फ्री ऑॅक्सिजन रॅडिकल्सचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे रोजच्या आहारात असलेली व्हिटॅमिन्स किंवा मिनरल्स त्यांना काबूत ठेवण्यात बरीच कमी पडतात. त्यासाठी कच्च्या भाज्यांचा आणि विशिष्ट प्रकारच्या फळांचा आहारात अधिक प्रमाणात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

आपण व्यायाम करत असताना आपली ऑॅक्सिजनची मागणी वाढलेली असते. त्यामुळे ऑॅक्सिजनचा उपलब्ध असलेला प्रत्येक कण वापरण्याकडे शरीराचा कटाक्ष असतो. चुकार फिरणारे ऑॅक्सिजनचे फ्री रॅडिकल्ससुध्दा वापरून शरीर मोकळं होतं. त्यांना उपद्वयाप करण्याची संधी मिळत नाही. हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी मधुमेहींनी नियमित व्यायाम करण्याचं महत्त्व इथे अधोरेखित होतं.

शिवाय मधुमेहात बहुधा कोलेस्टेरॉल अधिक असतं. त्यातही हृदयरोगाला आयतं आमंत्रण देणाऱ्या प्रकारातलं कोलेस्टेरॉल मधुमेहात असतं. म्हणजे चांगलं एच डी एल कोलेस्टेरॉल कमी आणि वाईट एल डी एल कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराईड जास्त, असा मामला असतो. इतकं असूनही फारसा प्रश्न उद्भवला नसता, जर फ्री ऑॅक्सिजन रॅडिकल्स नसते. वाईट कोलेस्टेरॉल काढून टाकून त्याचं पित्तात रूपांतर करण्याची क्षमता आपल्या लिव्हरमध्ये असते. पण त्यासाठी हे कोलेस्टेरॉल लिव्हरकडे यावं लागतं, तरच त्याचं रूपांतर पित्तात होऊ  शकतं. फ्री ऑॅक्सिजन रॅडिकल्स चिकटले की एल डी एल कोलेस्टेरॉलचं स्वरूप बदलतं. लिव्हरच्या पेशी या ऑॅक्सिजन रॅडिकल्स चिकटलेल्या कोलेस्टेरॉलला ओळखू शकत नाहीत. परिणामी वाईट एल डी एल कोलेस्टेरॉल रक्तात फिरत राहतं आणि संधी मिळेल त्या ठिकाणी घर करतं. शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्या त्यांना आयत्याच मिळतात.

म्हणजे हे ऑॅक्सिडाइझ्ड एल डी एल कोलेस्टेरॉलचे कण सर्वात घातक असतात. रक्तवाहिन्यांच्या आतलं आवरण जिथे अत्यंत गुळगुळीत असेल, तिथे एल डी एल कोलेस्टेरॉल सहसा चिकटत नाही. परंतु काही कारणाने त्यांचा अंतर्भाग खडबडीत झाला की तिथे त्यांना हमखास चिकटण्याची संधी मिळते. गुळगुळीत काचेवर धूलिकण जमत नाहीत, पण खडबडीत भिंतीवर मात्र धुळीची पुटंच्या पुटं चढतात, त्यातलाच हा प्रकार. एकदा धूळ साचू लागली की तिची पुटं वाढतच जावीत, तसं एकदा रक्तवाहिनीच्या एखाद्या भागाला एल डी एल कोलेस्टेरॉल चिकटलं की त्याच जागी थरावर थर साचत जातात. त्यामुळे रक्तवाहिन्या चोंदतात.

काही जण सरळ लॅबोरेटरीत जातात आणि ''माझं कोलेस्टेरॉल तपासा'' म्हणून सांगतात. लॅबोरेटरी त्यांना त्यांचं टोटल कोलेस्टेरॉल तपासून देतात. पण याचा काहीच उपयोग नसतो. तुम्ही लिपिड प्रोफाइल करून एल डी एल कोलेस्टेरॉल माहीत करून घ्यावं, अशी डॉक्टरांची अपेक्षा असते. ते का, हे आता समजायला हरकत नाही. कारण एल डी एल कोलेस्टेरॉल हीच हृदयरोगामागे सगळयात महत्त्वाची गोष्ट असते. ती न तपासून काहीच फायदा नसतो.

एका गोष्टीचा ऊहापोह इथे व्हायला हवा. रक्तवाहिन्यांचा गुळगुळीत अंतर्भाग खरबरीत का होतो? यासाठी शरीरात निर्माण होणारी काही रसायनं कारणीभूत असतात. या रसायनांना वैद्यक 'इन्फ्लमेटरी सायटोकाइन्स' म्हणतात. पोटात दडलेल्या चरबीतून ते मुख्यत्वाने स्रवतात. ही रसायनं अनेक ठिकाणी इन्फ्लमेशन म्हणजे दाह निर्माण करतात. दाह झाला की ती जागा खरबरीत होणं आलं. मधुमेहात एरवीदेखील या इन्फ्लमेटरी सायटोकाइन्सची संख्या आणि प्रमाण दोन्ही जास्त असतं. साहजिकच रक्तवाहिन्यांचा अंतर्भाग खरबरीत होऊन तिथे चरबीची पुटं चढणं वाढतं. धूम्रपानामध्ये धुरातून रक्तात पोहोचलेली रसायनंदेखील असंच करत असतात. एका नजरेत वरकरणी कृश दिसणाऱ्या, परंतु थोडंसं पोट पुढे आलेल्या व्यक्तींना अचानक हृदयरोग झाल्याचं का दिसतं, हे आता वेगळं सांगायला नको. पुढे आलेल्या पोटात लपलेली चरबी त्यांचा घात करत असते. त्यात ती मंडळी सिगारेट-विडी ओढत असतील तर! समजलं तुम्हाला.

कुठल्या व्यक्तीत हे असं इन्फ्लमेशन आहे आणि कुठल्या व्यक्तीत नाही किंवा कमी आहे हे ओळखायचं कसं? हा विचार कोणाच्याही मनात येणं साहजिकच आहे. इथे शास्त्रज्ञांनी इन्फ्लमेशन असणाऱ्या व्यक्तींच्या रक्तात फिरणारं एक रसायन शोधून काढलं आहे. त्याला सी आर पी किंवा सी रीएॅक्टिव्ह प्रोटीन असं म्हणतात. रक्तातलं या रसायनांचं प्रमाण वाढलेलं दिसलं, म्हणजे समजावं - धोक्याची घंटा वाजू लागली आहे. काळजी घ्यायला हवी.

9892245272